रायगडाचा भवानीकडा, की अतिदुर्गम चोरवाट!!!

Submitted by Discoverसह्याद्री on 7 July, 2013 - 15:02

....क्रिकेट-बॉलीवूड-राजकारण-भ्रष्टाचार-गुंठेवारी-पैसा-स्वार्थ-दहशतवाद यांच्या कर्कश्य कोलाहलानं कधीकधी खरंच शीण येतो.. अन् मग आपण सह्याद्रीकडे ‘धाव’ घेतो, सह्याद्रीचा 'धावा' करतो... कारण अगदी सोप्पं आहे. आजंही सह्याद्रीच्या कडेकपा-यात, वाड्या-वस्त्यांमध्ये, शेतां-शिवारांत घमघमत असतात इतिहासाची स्मरणं, शिवरायांच्या अन् त्यांच्या शिलेदारांच्या पाउलखुणा - एक अदृश्य कालातीत शक्तीस्त्रोत!!!

Shelarkhind1_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

अशीच एक भारावलेली कथा ऐकायला मिळते रायगडाभोवतीच्या काळ अन् गांधारी नद्यांच्या खो-यात.. कथा जिगरबाज – ‘सर्जा’ची! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रतिभेतून साकारलेल्या ‘शेलारखिंड’ या अप्रतिम कादंबरीतला हा नायक ‘सर्जा’, शिवाजीराजांचं मन जिंकण्यासाठी ‘भवानीकडा’ चढण्याचं दुर्दम्य आव्हान स्वीकारतो काय, अन् ध्यास घेऊन भवानीकडा चढून जातो काय.. खरं घडलं असेल की दंतकथा; कुणास ठावूक!!
Shelarkhind2_DiscoverSahyadri.jpg
(साभार: ‘शेलारखिंड, श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे)

१९८० च्या दशकात हिरा पंडित, तु. वि. जाधव यांच्या तुकडीनं भवानीकडा सर केला होता. त्यांच्यापासून स्फुर्ती घेऊन, चिंचवडच्या ’मोरया गिरीभ्रमण संस्थेचे’ आम्ही तब्बल ५५ आरोहक भवानीकडा कातळारोहण मोहिमेवर निघालो.

...सक्काळीचं रायगडवाडीतील भैरोबाच्या मंदिरातला मुक्काम आवरून कूच केलं होतं. रायगडाच्या टकमक व हिरकणी टोकांनी भव्य रायगडाच्या पर्वतातला मराठमोळा बेडरपणा खुलून दिसत होता. भवानी कड्याच्या फक्त पायथ्याजवळ पोहोचण्यासाठीसुद्धा रायगडाला अर्धी प्रदक्षिणा घालावी लागते. रायगडवाडीतून पूर्वेला गर्द झाडीतून वाटचाल सुरू करून, रायनाकाच्या स्मारकापाशी विसावलो. निसर्गाचं एक रांगडं रूप - टकमक टोकाचा उत्तुंग कडा – पायथ्यापासून पाहून थरारलो. टकमक टोकाला वळसा घालत, रायगडाच्या कोसळलेल्या कड्यांच्या पायथ्यापासून आडवं जात राहिलो. आता मोकळवनातून आकाशात घुसलेला भवानी कडा खुणावू लागला. रायगडाचं दुर्गमत्त्व नेमकं कश्यात, हे उलगडणारे दृश्य सामोरं होतं - रायगडाचे कराल कातळकडे उजवीकडे, समोर काळ नदीचं चिंचोळं खोरं, घनदाट गूढ रानवा अन् पाठीमागे सह्याद्रीची मुख्य रांग!!!

Bhavani_Kada_Route_DiscoverSahyadri.JPG
(काळ नदीच्या पात्रापासून रायगड अन् डावीकडे भवानीकडा – दूरदर्शन)

रायगड परिक्रमा अंदाजे ४-५ किमी झाल्यावर, भवानीकडा काहीसा मागं पडला. इथंवरची वाट तशी सोप्पीच होती. भवानी कड्यापासून लगबगीनं खो-यात उतरणारी कातळधार आता आमच्या उजवीकडे आली. या धारेवर झाडीभरली ‘वाघोलीखिंड’ दिसू लागल्यावर, उजवीकडे दाट झाडीत घुसलो. वाट अशी नव्हतीच. हाताशी येईल ते कारवी-काटकीचं बुटुक धरण्याची, घसा-यावर केविलवाणी धडपड करून जीव मेटाकुटीला आलेला. अखेर डोंगररांगेवर ‘वाघोलीखिंड’ चढून हाफहूफ करत बसलो. वाघोलीखिंडीची थोडीशी सपाटी म्हणजे भवानीकडा मोहिमेचा Advance Base Camp. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या तीन तासांच्या चालीनं, अन् कोकणातल्या उन्हांनं आमची तुकडी थकत चालली होती. अन् अद्याप प्रत्यक्ष भवानीकडा चढायची सुरुवात पण नाही झालेली..

समोर होते भवानीकड्याचे भयाण कातळटप्पे, मध्येच एखादा गवताचा भुरा पटटा, आणि खूप सारा घसारा. समोरच असला, तरी भवानी कड्याच्या प्रत्यक्ष चढाईसाठी कातळधारेवरची खडतर चढाई अजून बाकी होती. फर्स्ट क्लाइम्बरनं रोप, हार्नेस बेल्ट, कॅरॅबिनर्स, रॉक पिटान्स, लोखंडी पेग, हॅमर, एक्स्पांशन बोल्टस आणि घसा-यामध्ये छोट्या पावट्या बनवण्यासाठी चक्क आईसअॅ क्स सोबत घेतली. आरोहणाचा सर्वच भाग घसार्याचा, अरुंद आणि धोकादायक असल्यामुळे वाटेतील मजबूत झाडांच्या सहाय्याने अन् लोखंडी मेख वापरून रोप अँकर वापरून कातळारोहण सुरक्षित केलं होतं. कॅरॅबिनरच्या सहाय्याने स्वत:ला रोपशी जखडून आरोहक मार्गस्थ झाले.

वणव्यानं काळवंडलेल्या तीव्र उतारावरचे गांडूळमातीनं माखलेले भुसभूशीत उतार असह्य होवू लागले. कोसळलेल्या जिवघेण्या, कर्दनकाळ आणि आ वासलेल्या द-या, तळपणारा सूर्यनारायण, जवळचं पाणी संपलंय, असं असूनंही कोणत्यातरी जबरदस्त इच्छेनं अतिअरुंद पावठ्यांवरून पट्कन पावलं उचलली जात होती. अन् भवानी कड्याचा मुख्य आव्हानात्मक भाग अधिकाधिक जवळ येत चालला होता. दूरवर नजर टाकली, तर सह्याद्रीचे तालेवार शिलेदार - लिंगाणा, कोकणदिवा, राजगड, तोरणा खुणावत होते.

आता समोरच्या उंच टेपाडाला ट्रॅव्हर्स मारावा लागला. घसा-यातून चढत चढत, झाडीभरला टप्पा आला. समोर भवानी कडा तर डावीकडे खुबलढया बुरुजाची खिंड दिसत होती. भणाणणारा वारा, लांबवर चक्कर मारणारी एखाद-दुसरी घार अन् खोSSSSल गेलेल्या दरीचं दृष्टीभय असा माहोल.

अखेरीस ५०० मी लांबीच्या अतिअरुंद धारेवरून डोंबारकसरत करत, आम्ही भवानी कड्याच्या प्रत्यक्ष आव्हानात्मक कातळारोहण टप्प्यांपाशी पोहोचलो. आणि, इथं दिसला सपाटीवरचा दगडी चौथरा - निश्चितपणे पहा-याचं मेट!!! म्हणजेच, ‘भवानीकडा’ हे रायगडाची अति-दुर्गम चोरवाट असल्याचा स्पष्ट पुरावाचं मिळाला. इथून २० मिनीट चालल्यावर कड्याच्या ऐन गर्भात पाण्याचं सरपटी गुहाटाकं अन् पाण्याचा विपुल साठा मिळाला.

भवानी कड्याचा माथा २०० मी उंचीवर होता. त्यातील १५० मी भागात ७५-९० अंशात चढाई होती. उत्तम खाचा असलेले दोन कातळटप्पे करून, १० मी. अवघड टप्प्यापाशी येऊन पोहोचलो. कातळावर कोणत्याही प्रकारचे होल्ड्स नसल्यामुळे जुमारिंग करावे लागणार होते. वेळेची बचत करण्याकरता, जुमारास एट्रीअर (पायर्यासदृश शिडी) जोडण्यात आली. आता या एट्रीअर मध्ये हात-पाय अडकवून मग चढायचे, असा एकंदर बेत होता. वर चढायला लागल्यावर मस्त झोका मिळतो...उजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. शेवटच्या दोन टप्प्यांत कातळ ढीले असल्यानं, आरोहण अत्यंत धोकादायक होते. ते पार करून पोहोचलो भवानी कड्याच्या माथ्यावर!

अतिशय आनंदाचा क्षण होता तो! आणि विजयाची मजाही काही औरच!!!

‘राजाच्या रायगडाचा ह्यो भवानी कडा म्या यंगनार..’ असं आव्हान स्वीकारणा-या शेलारखिंड कादंबरीमधल्या ‘सर्जा’च्या नजरेतली जिद्द अन् छातीची धडधड आम्ही अनुभवत कितीतरी वेळ अनुभवत तिथेच पडून राहिलो... Happy

-------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या या मोहिमेला तु.वि.जाधव या मुंबईच्या शिवभक्त ट्रेकर अन् सिद्धहस्त लेखकांनी दिलेली अत्यंत मोलाची (अन् देखणी) दाद:::

DiscoverSahyadri_BhavaniKada.jpg

-------------------------------------------------------------------------------------------------------

टीप:
१. २६-जानेवारी-१९९६ ला केलेली ही मोहीम आहे. माझ्याकडे फोटोज उपलब्ध नाहीत.
२. दुस-या एका ग्रुपच्या मोहिमेतील फोटो डोंगरभाऊ सुशांत गुजर यांच्या ब्लॉगवरचे बघता येतील: http://sushantgujar.blogspot.in/2013/02/trek-to-raigad-fort-via-bhvani-k...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक्कदम जबरदस्त! आम्ही सिंरातोरा केला त्यावेळी वाटेत हिरा पंडीत व त्यांचा चमू भेटलेला.. भवानी कडा आरोहण मोहिम होती त्यांची! ..

उजवीकडे उंच कातळ, समोर कातळ. आपण वर चढतोय, डावीकडे अन मागे खोल दर्या...झोका मिळाला की एकदम दरीतच जातोय की काय, असं थरारक दरीचं दर्शन व्हायचं. हृदयाचे ठोके वाढले, घामटं आलं, अन् अखेरीस तो टप्पा पार झाला. >>> असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:)

हा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो > अगदी.. वाचतानाही रोमांचीत जाहलो होतो.

एकदा वाघ दरवाज्याने उतरायचे स्वप्न आहे> वाघ दरवाजा बघण्याच आमच स्वप्न पुर्ण झालयं हे काय कमी आहे. Wink

खूप धन्यवाद मंडळी!!!

@हेम: बरोबर आहे, गिर्यारोहक मंडळीत हिरा पंडित, तु.वि.जाधव यांच्या तुकडीनं पहिल्यांदा केला भवानी कडा!

@जिप्सी: धन्यवाद!!! मात्र ब्लॉगवरचे फोटो फक्त कल्पना यावी म्हणून दिलेत, ते आमच्या मोहिमेचे नाहीत.

@सेनापती: हा संपुर्ण प्रदेश रोमांचीत करतो. >>> +१११११११११११११११११११११११११११११११११११. रायगडाचा प्रदेश शब्दातीत भारावलेला आहे. मी http://www.maayboli.com/node/40397 आणि http://www.maayboli.com/node/40650 इथे वर्णन केल्याप्रमाणे, परत कधी एकदा रायगड घाटवाटा करतोय असं झालंय..

@इंद्रधनुष्य: असा अनुभव नसला तरी तो थरार काय असतो याची जाणिव आहे.. Hats Off DS:) >>> माझं कर्तृत्त्व काहीच नव्हतं मोहिमेला. मी फक्त थरार मनसोक्त अनुभवला.. Happy

पहिले २ प्र. चि. खालील पुस्तकातून घेतले आहेत..
साभार: ‘शेलारखिंड', श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे

डोंगरवेडा
नुतनजे
जाई.
आनंदयात्री
रोहित ..एक मावळा
Yo.Rocks

कातळारोहण करताना सामान्य आरोहकानं अनुभवलेला थरार पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय.. प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे.. Happy

मस्तच अनुभव. ह्या मोहिमेत सगळ्यांना कातळारोहणाची माहिती असणं आवश्यक होतं का?

जुमारिंगने फार चिडचिड व्हायची. फार वर्षं झाली ते करून.

- आऊटडोअर्स: भवानीकडा मोहीम आखण्यासाठी कातळारोहण तंत्र अवगत असणं, हे अत्यावश्यक आहे.
पण एकदा सेटअप तयार झाल्यावर - रोपचा सुरक्षा बिले, अवघड जागी (जुमारिंगच्या ऐवजी) एट्रीअरची शिडी आणि तज्ज्ञ कार्यकर्त्यांच्या मदतीनं, आम्ही आम-जन्ता सुद्धा भवानीकडा चढून गेलो. Happy

- बंकापुरे: धन्यवाद Happy

Khup mast.

Amhi Raigadla gelelo tevha aamhala raigadchi khad n khada mahiti aslele Suresh wadkar bhetle.
Tyani Raigadvar PHD keli aahe and 100 hun adhik vela bhet dili aahe.

Amhi Raigadla gelelo tevha aamhala raigadchi khad n khada mahiti aslele Suresh wadkar bhetle.
Tyani Raigadvar PHD keli aahe and 100 hun adhik vela bhet dili aahe. >>> उर्मीलाजी, शंभर ??? सुरेश वाडकरांचा १००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल कारण काही वर्षांपुर्वी आम्हाला जेव्हा रायगडावर ते भेटले होते तेव्हाच त्यांची ती ५०० च्या आसपासची भेट होती Happy

आणखी एक.. सुरेश वाडकर हे पक्षांचे अतीशय हुबेहुब आवाज काढू शकतात.. आम्ही संध्याकाळी टकमक टोकावर बसून त्यांच्या कडून अनेक पक्षांचे आवाज ऐकलेले आहेत Happy

१००० वेळा रायगड करण्याचा निश्चय आहे आहे माझ्या अंदाजाने तो लवकरच पुर्णपण होईल किंवा झालेलाही असेल

>>> झाला कधीच. Happy