तुटली तार

Submitted by चाऊ on 14 July, 2013 - 12:07

तार तुटली एक जुन्या निरोपांची
दूरच्या भल्या बु-या बातम्यांची

चाहूल तिची चुकवी काळजाचा ठोका
काय असेल लपलेली ओळ अघटिताची?

चौदा ओळींतील अर्थ वेगळाले
चुकवून क्रमांक होई पखरण विनोदाची

दूत खाकीतील काढी लखोटा तो
अल्प शब्दात वार्ता आप्तस्वकीयांची

कड कट्टाची थांबली ही गाज
जुनी झाली ही त-हा संदेशाची

नव्या तंत्राच्या वेगात ही हरवली
परि विसरु नका जलद तार साची

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान कविता ! Happy अचूक टायमिंग आणि तारेवरही कविता करण्याची कल्पना छान चाऊ.
मला स्वतःला जरी कधी तार मिळण्याचा प्रसंग अनुभवता आला नाही तरी ती येताना किवा चांगली अथवा वाईट बातमी आल्यावर माणसाच्या मनात होणारी घालमेल, चिंता किंवा आनंद मी पाहिलेला आहे.. ज्यांना हा एवढाही अनुभव नाही त्यांना तार आणि तिच्याशी निगडित भावना कधीच समजणार नाहीत असं वाटतं.. एस.एम.एस आला म्हणून घाईने फोल्डर ओपन करून एका क्लिकवर उत्तर पाठवणारी पुढची पिढी तार हातात पडेपर्यंतची अस्वस्थता समजूही शकणार नाही..

धन्यवाद!
तारेत बहुदा वाईटच बातमी असायची.त्यामुळे तारवाला दारात आला की घाम फुटायचा. नंतर कधीतरी तुरळक लग्नात वगैरे नंबराप्रमाणे ठरीव शुभसंदेश पाठवले जायचे. परंतू सर्वसामान्यांना तारवाला दारात नकोच हिच भावना असायची..

छान!