भटकंती चिंब वाटांची...

Submitted by ferfatka on 11 July, 2013 - 06:35

पुण्या-मुंबईकरांचे पावसाळ्यात भटकण्याचे आवडते ठिकाण म्हणजे लोणावळा व खंडाळा. या पर्यटनाच्या यादीत लवासा, अ‍ॅम्बी व्हॅली, ताम्हीणी घाट व माळशेज घाट ही स्थळे भाव घावून जातात. मात्र, नेहमीच्या या ठिकाणांऐवजी या वेळी निवांत ठिकाणी हिंडायला जायचे ठरविले. नेहमीच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची वाढणारी गर्दी व त्यापेक्षाही त्यांचा नकोसा असलेला उच्छाद, हुल्लडपणा नको असेल तर अशा निवांत ठिकाणी जायला हरकत नाही. त्या विषयी...

DSCN3705.jpg

मागच्या रविवारी दुपारी जेवण करून घरातून निघालो. लोणावळ्याच्या अलीकडे असलेल्या एका छोट्याश्या वळणवावरून गावाकडे जाणारा हा रस्ता आहे. हे ठिकाण पुण्याच्या पश्चिमेला आंदर मावळात आहे. (खºया भटक्यांना अंदाज येईल) हा संपूर्ण परिसर भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. जस जसे *** गावाकडे जायला निघालो तस तशी गर्द हिरवाई दिसू लागली. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे सगळीकडे गर्द हिरवळ पसरलेली दिसली. काही अंतरापर्यंत बºयापैकी वस्ती असणारा हा भाग पुढे र्निमनुष्य आहे की काय असे वाटू लागते. पुणे-मुंबई महामार्गापासून सुमारे ३५ किलोमीटरवर असणाºया या गावाकडे जाणारा हा रस्ता एकदम मस्त डांबरीरोड आहे. किरकोळ ठिकाणी असलेले खड्डे सोडल्यास रस्ता छान आहे. विशेष म्हणजे अजून तरी हा भाग मोठ्या बिल्डर्सच्या नजरेतून सुटलेला दिसतो.

DSCN3712.jpg

डावीकडील डोंगराच्या कडेकडेने हा रस्ता जातो. डोंगराच्या पायथ्याशी किरकोळ वस्ती करून लोक राहतात. इथपर्यत रस्ता सरळ व सोपा आहे. वेडीवाकडी वळणे, शेजारी हिरवीगार गर्द झाडी, मध्येच येणाºया पाऊसाच्या सरी असे करत आम्ही पुढे निघालो. सर्वांना मोहून टाकणारे १५ ते २० धबधबे या भागात आहेत. पण या धबधब्यापर्यंत पोहोचणे थोडे अवघड आहे. रस्त्यापासून अंदाजे १ किलोमीटर पायपीट करण्याची तयारी ठेवल्यास हे साध्य होईल. उंच डोंगरातून चिंचोळ्या वाटेतून खळाळत कोसळणारे धबधबे व चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार झाडांमधून प्रचंड वेगाने वाहणारे वारे अनुभवायला मिळत होते. समोरील बाजूस आडव्या पसरलेल्या ******* डोंगरावरच्या पवनचक्क्या दिसत होत्या.
गावापर्यंत पोहोचोस्तोवर शेतामध्ये काम करणारे शेतकरी व त्यांच्या मदतीला असणारी बैलजोडी हे दृश्य सर्वत्र दिसून येत होते. पाऊस चांगला झाल्यामुळे सर्वत्र भाताची खाचरे भरून वाहून लागली आहेत. भाताची हिरवी रोपे पेरण्याची लगबग सुरू होती.

DSCN3729.jpg

अधेमधे पाऊस जोरात येत होता. तर काही काळ थांबत होता. एक पांढºया शुभ्र धबधबा पाहता आतो. अचानक जोरात पाऊस पडला. आणि पाहता पाहता त्या धबधबचे पांढरे पाणी चिखलमिश्रीत होऊन गेले. एका ठिकाणाहून पांढरे तर दुसरीकडून चिखलयुक्त पाणी वाहत होते.

या भटकंतीचे शेवटचे टोक असलेल्या गावात पोहोचल्यावर येथून कर्जत परिसर सुरेख दिसतो. हिरव्या रंगात सजलेले डोंगरकडे, ढगांचा सुखद स्पर्श, हलकासा गारवा, वळणदार रस्ते, असंख्य छोटे-मोठे धबधबे यामुळे हा परिसर खुलून दिसतो. इथून जवळंच ***घाट नावाची कोकणातलं कर्जत आणि मावळाला जोडणारी पुरातन व्यापारी पायवाट होती.

निसर्गसौंदर्याचा हा साक्षात्कार पाहण्यासाठी काही तुरळक पर्यटक इथे दिसले. एका छोट्या धबधब्याखाली होत असलेली हुल्लाडबाजी पाहून वाईट वाटले. त्यामुळे याही स्थळाचे वाटोळे होण्यास सुरूवात झाली की काय असे वाटले. कदाचित या गावात येणाºया मुख्य रस्त्यावरील असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांतील लोकांना हे ठिकाण हळूहळू समजू लागले आहे.

नवीन ठिकाण भटक्यांना (हौसे नवश्यांना) कळले की तेथे जाण्यासाठी प्लॅन तयार होऊ लागतात. या ब्लॉगसारखे असंख्य ब्लॉगवरील पर्यटनस्थळांची माहिती घेऊन ही मंडळी तेथे उच्छाद मांडायला जातात. हळूहळू गर्दी वाढू लागते. मग तेथे लोणावळा व खंडाळ्यात दिसणारी बेधुंद तरुणाई मस्ती करताना दिसते. निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाणारी मंडळी खूप कमी असतात. दारू व अन्य गोष्टींचा ‘आस्वाद’ घेण्यासाठी? जाणारी मंडळी त्याहून जास्त असतात. यासाठी या स्थळाची माहिती द्यावी का न द्यावी असा विचार मनात आला. त्यामुळे ज्यांना येथे मनापासून भेट दयायची असेल त्यांनी आपला मेल ‘कॉमेट’ बॉक्समध्ये लिहिल्यास अशांना नक्कीच येथे जाण्याचा मार्ग सांगितला जाईल. निसर्गाने तयार केलेला हिरवाईचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे जायलाच हवे. तसे काही हे ठिकाण अन्य ठिकाणांपेक्षा वेगळे नाही. मात्र, अद्याप तरी पर्यटनास जाणाºया भटक्यांसाठी दुर्लक्षित आहे. काही वेळा अशा ठिकाणे दुर्लक्षित राहणे बरेच आहे. अन्य पर्यटनस्थळी दिसणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्या, फेकून दिलेल्या पाण्याच्या बॉटल्स, खरकटे अन्न, पर्यटकांसाठी असलेले कणीस, चहा व खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे होऊ नये हाच एक विचार.

अधिक फोटो पाहण्यासाठी :
http://www.ferfatka.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! धबधबा पाहिला की माझा जीव निवतो.:फिदी:(प्रत्यक्षात कोणताही पहायला न मिळाल्याचे दुखः आहेच.:अरेरे: )

मस्त, मस्तच Happy
फेरफटका, भटकंतीचे तुमचे सगळे धागे वाचलेत आणि आवडले. Happy
ब्लॉगही सुरेख.

निसर्गाचा आस्वाद घ्यायला जाणारी मंडळी खूप कमी असतात. दारू व अन्य गोष्टींचा ‘आस्वाद’ घेण्यासाठी? जाणारी मंडळी त्याहून जास्त असतात. यासाठी या स्थळाची माहिती द्यावी का न द्यावी असा विचार मनात आला. त्यामुळे ज्यांना येथे मनापासून भेट दयायची असेल त्यांनी आपला मेल ‘कॉमेट’ बॉक्समध्ये लिहिल्यास अशांना नक्कीच येथे जाण्याचा मार्ग सांगितला जाईल. निसर्गाने तयार केलेला हिरवाईचा हा सोहळा पाहण्यासाठी येथे जायलाच हवे. तसे काही हे ठिकाण अन्य ठिकाणांपेक्षा वेगळे नाही. मात्र, अद्याप तरी पर्यटनास जाणाºया भटक्यांसाठी दुर्लक्षित आहे. काही वेळा अशा ठिकाणे दुर्लक्षित राहणे बरेच आहे. अन्य पर्यटनस्थळी दिसणाºया प्लॅस्टिकच्या पिशव्या, फेकून दिलेल्या पाण्याच्या बॉटल्स, खरकटे अन्न, पर्यटकांसाठी असलेले कणीस, चहा व खाद्यपदार्थांचे स्टॉल येथे होऊ नये हाच एक विचार.
>>>> खूपच स्तुत्य विचार ....

#ferfatka छान! राजाराणीच्या गोष्टींतल्या सारखा खजिना सातव्या खोलीत कुलुपबंद ठेवून किल्ल्या तुमच्याकडे ठेवल्यात ,उत्तम .

सुंदर प्रचि, कळकळीचे विचार.
या भव्य सौंदर्याजवळ क्षुद्र मनोवृत्ती उथळ जाणीवा घेऊन बुजबुजू लागल्यात.
शशांकजींशी सहमत.