मर्यादा!

Submitted by मुग्धमानसी on 4 July, 2013 - 04:05

"माझ्या मर्यादा समजून घे..." - तू म्हणालास... आणि बास!
माझ्या सगळ्याच प्रश्नांना तू तुझ्या मते उत्तर दिलेलं होतंस.
ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच.

खरंतर बरं झालं. तसंही ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोचण्याची शक्यता नव्हतीच.
ते ओठांतून निघाले अन् हवेत विरून गेले. डोळ्यांतून निसटले अन् मातीत मिसळून गेले. स्पर्शातून झरले अन् भलत्याच आगीत जळून खाक झाले.....!
सगळेच या पाच भूतांनी मिळून गिळून टाकायचे आहे म्हणा... पण माझ्याच शब्दांनी माझ्याशी असे वागावे?
असो.

तुझ्या मर्यादा!
हं.... माझ्या लक्षातच नव्हतं आलं. तू समुद्र असलास तरी तुला आहेतच ना किनारे... तू सुर्य असलास तरी तुलाही पाळाव्या लागतात उजडण्या-मावळण्याच्या वेळा.
माझ्या लक्षातच नव्हतं आलं. खरंतर... तूच लक्षात येऊ दिलं नाहीस कधी.
माझ्या नजरेसमोर मुद्दामून अंथरून ठेवलंस तुझ्या अमर्याद कर्तृत्वानं आच्छादलेलं... मळभलेलं आभाळ.
माझ्या कानात तूच अखंड ओतत राहिलास तुझ्या विजयघोषात दुमदुमणारा झिंगलेला उग्र वादळस्वर.
माझ्या पायाखाली भक्कम असलेल्या वीतभर जमिनीला उपेक्षून मी विश्वास ठेवला तुझ्या आभाळभर अमर्याद पण अधांतरी मायेवर...

मी माझ्या मर्यादा उल्लंघल्या... सीमा ओलांडल्या... माझी जमिन टाकली... तुझ्या अथांगतेला भुलले. भान विसरले. तुझ्यापाशी आले.
तुझ्या आच्छादलेल्या, मळभलेल्या आभाळातून मला बेभान बरसायचं होतं. पुन्हा जमिनीशी वेगळं नातं जोडायचं होतं. वाहून, कोसळून, साचून, झरून, झिरपून... सगळं काही भरभरून जगून... कडाडत्या उन्हात पुन्हा विरघळून... पुन्हा पुन्हा हवेत मिसळून वर पसरलेल्या तुझ्या मिठीत पुन्हा पुन्हा शिरायचं होतं....

पण मला मर्यादा होत्या. आताही आहेत. नेहमीच राहतील.
आता तू म्हणतो आहेस तुलाही आहेत मर्यादा. ठिक आहे.

पण कधीतरी तुही बेभान होऊन... तुला विसरून... देऊ केलं होतंस मला एक अमर्याद प्रेम! तुझ्या डोळ्यांत त्या प्रेमाची मर्यादा मला तेंव्हा तरी दिसली नव्हती.
त्या क्षणभंगूर का होईना... मर्यादा विसरून केलेल्या प्रेमाखातर... पुन्हा एकदा... तुझ्या कर्तव्यांनी, जवाबदार्‍यांनी, प्रतिष्ठेनी, कर्तृत्वाने, समाजाने आणि.... बहुतांशी तुझ्या स्वतःच्या भ्रमांनी.... तुला घालून दिलेल्या मर्यादा नजरेआड करून... माझ्याकडे, माझ्या आत फक्त एकदाच डोकावशील?
कदाचित तुला मी सापडेन आणि त्या सोबत गवसेल ते अथांग आकाश. तूच एकेकाळी आत्मविश्वासाने अंथरलेलं.
________________

-मुग्धमानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्येकीन एकदातरी अनुभवलेल विदारक सत्य इतक्या सहजतेन मांडलयस तू की शब्दच सुचत नाहीयत तारीफ करायला Happy

धन्यवाद.
सुप्रिया>> 'सहजतेनं' मांडलंय असं वाटतंय ना तुला? मग जिथं पोचायला हवं तिथं एवढ्या सहजतेनं हे म्हणणं का कधीच पोचत नाही? Sad

ज्याच्यासाठी हा सोपस्कार मांडलेला असतो त्याला या भावनांची तितकीशी किंमत नसावी. ( अस आपण आपल आपल्या मनाला समजवायचं ) दुसर काय ? Happy

दंडवत!!
काय लिहिलंय! थेट भिडलं... अगदी थेट!

ज्याच्यासाठी हा सोपस्कार मांडलेला असतो त्याला या भावनांची तितकीशी किंमत नसावी. ( अस आपण आपल आपल्या मनाला समजवायचं ) दुसर काय ?
>>> असं समजावलं तरी त्रास आपल्यालाच होतो. कारण सोपस्कार मांडण्यामध्ये आपला जीव असतो, त्यावरच प्रश्नचिन्ह येतं या उत्तरामुळे...त्यामुळे हे उत्तर माझ्याकडून बाद! Happy

'सहजतेनं' मांडलंय असं वाटतंय ना तुला? मग जिथं पोचायला हवं तिथं एवढ्या सहजतेनं हे म्हणणं का कधीच पोचत नाही?
>> या प्रश्नाचं उत्तर कधीच शोधू नये, असं वाटायला लागलंय मला हल्ली... Happy

आनंदयात्री>>> ह्म्म्म. पण 'प्रश्नाचं उत्तर शोधायचं नाही' असं ठरवल्याने प्रश्न पडायचे थांबत नाहीत ना...

बाप रे! किती सहज मांडलंस इतकं खोल्वरचं.. Sad
भिती, मग विश्वासाची बांधणी, मग तो उधाण आवेग आणि मग ते जमीन काढून घेणं आणि त्याही मगचं अंधारलं रितं अवकाश ...
पण सहजतेनं मांडलेलं हवं तिथं पोचत नाही म्हणून तरचं ना हे सगळं? ते पोचेनासं होतं एवढंच खरं. बस्स! त्यापुढं कसले प्रश्न, कसली उत्तरं, कसली explanations अन कसली discussions..
पण यापुढंही पोचतो गं आपण.. खात्रीनी..

खूप सुंदर लिहील आहेस... डायरेक दिल से __/\__

प्रत्येकीन एकदातरी अनुभवलेल विदारक सत्य इतक्या सहजतेन मांडलयस तू >>>> अगदी अगदी
जिथं पोचायला हवं तिथं एवढ्या सहजतेनं हे म्हणणं का कधीच पोचत नाही? >>>> हे ही तितकच खरं ग

खुप आत आत पोहोचलं! जीवाला लागणारं लिहिलयस गं!
__/\__

प्रत्येकीन एकदातरी अनुभवलेल विदारक सत्य इतक्या सहजतेन मांडलयस तू >>>> अगदी अगदी
जिथं पोचायला हवं तिथं एवढ्या सहजतेनं हे म्हणणं का कधीच पोचत नाही? >>>> हे ही तितकच खरं ग
Happy