प्रिय मुलास

Submitted by दाद on 5 July, 2013 - 05:37

प्रिय मुलास....

तुझी-माझी पहिली भेट... तुला आठवत नसणारचय असं गृहीत धरतेय... मी विसरूच शकले नाहीये.
तान्ह्याला पहिल्या आठेक दिवसांत कोवळ्या उन्हात न्यावं म्हणे... म्हणून मी घरातल्या गाऊनमधेच तुला घेऊन आईच्या घरी मागे अंगणात तुळशीपाशी उभी आहे. तुला मी नवीन.... पण मलाही तू नवीनच, की.
... मऊ, मवाळ उन्हाची तुझ्या कोवळ्या कायेशी सलगी होतेय असं बघत... तुला झुलवत मी काहीबाही बोलतेय, दाखवतेय. आकाश, माड, पेरूचं झाड, शेवग्यावरला ऐकू येणारा काऊ, मलाही न दिसलेली चिऊ, मधेच डोकाऊन गेलेले आबाजी, वरच्या मजल्यावरल्या भाभीनं सक्काळीच वाळत घातलेलं रंगेबीरंगी पातळ... असलच काहीबाही.

चपचपीत तेल घातलेलं मोठ्ठंच्या मोठ्ठं, जरा तुळतुळीतच डोकं, मोटारीच्या दिव्यासारखे गोलच्या गोल भिर भिर डोळे... हातापायाचे झेंडे नाचवीत इकडम-तिकडम चाललं होतं तुझं, असं आपलं माझं मत... तुझ्या डोळ्यांवर ऊन येतय असं वाटून मी वळणार, इतक्यात लक्षात आलं की...
आजूबाजूचं सगळं चल-चित्रं सांडून तू एकटक अन थेट माझ्या डोळ्यांत बघतोयस... पापणी न लवता. आश्चर्यं वाटण्यापूर्वीच मोहन पडलं. संपूर्णं उघडलेल्या शिंपीसारख्या पापण्यांनी शाकारली काळीभोर वर्तुळं... त्यातून उतू जाणारी, एक मोतियातेज, संततधार ओळख माझ्या काळजात उतरत राहिली... तुझ्याबरोबर निश्चल, नि:शब्दं कितीवेळ उभी होते तिथे कुणास ठाऊक...
’मीट अरे राजा, पापणी लवू दे ना... एकदातरी...’ असा एक टाहो घशात घुमत राहिला.... पण संमोहन असं की, तसा शब्दंच काय पण श्वासही धजला नाही. शेवटी माझ्या कासाविशीनं डोळ्यांमधून ठाव सोडला... पापण्या फडफडवीत धुकं परतत राहिले...
तुला त्याचं काहीच नव्हतं....

तुला आठवत नसणारचय.

तू गुणी होतास रे. वाभरा, अवखळ नाहीसच... थोडा बोद्याच. उगीच धावपळ करावी लागणार्‍या हालचालींमधे, खेळांमधे तुला फारसा इंटरेस्ट नसायचाच. एक कार घेऊन कित्ती वेळ एका जागी बसायचास. रिमोटने कुठेतरीच पळणार्‍या गाड्यांपेक्षा हाताने ढकलून आपल्या कक्षेत रहाणार्‍या साध्या ठोकळ्याच्या गाड्या तुझ्या अधिक आवडीच्या.
फक्तं भरवताना अंगात यायचं, तुझ्या. सगळा व्यायाम.... तुझा अन माझाही, तुझ्या जेवणाच्या वेळी. एक घास खाऊन तो जिरवून मग पुढला घास... असलं जेवणं अन भरवणं.

शाळेच्या पहिल्या दिवशी दरवाजातच अगदी स्टाईअलमधे मला टाटा करून गेलासही... मीच रडले, तू नाहीच. मग तुझ्या बाबाची, माझी उलटी समजूत काढताना पुरेवाट.
तबला ’गर्ल्सचं वाद्यं’ म्हणून शिकायला तुझा किती ठाम नकार होता. झाकीर त्याच्या झिपर्‍यांमुळे तुला मुलगी वाटला होता... त्याला तुझा, माझा अन झाकीरचाही नाईलाज.
इतक्या धिटाईनं अन ठामपणे तबला शिकायला तू नकार दिलास की... कुठेतरी त्याचं कौतुक वाटलं पण... काळजाच्या "मी एक बर्‍यापैकी तबला वादक अन तू माझा मुलगा" ह्या एका कोपर्‍याला धस लागला तो लागलाच...

तू खरच गुणी, रे. माझं इथलं पुनर्शिक्षण झालं अन कामानिमित्तं तुला इथे ठेऊन परदेशी जावं लागलं. जीव तिळतिळ तुटणं म्हणजे नक्की काय ते आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलं... तुला टाटा करीत करीत कस्टम्सच्या दाराआड जाताना. तिथून तुझ्या शाळेत जायच्या वेळेआ़धी आणि शाळेतून आलास की असे रोज दोन फोन. तक्रार करणं तुझ्या स्वभावातच नव्हतं की... त्या वयातही तू समजुतदार होतास... जे काही असेल ते, पण ’आई तू कधी परत येणारेस?’ हा जीवाची तडफड करणारा प्रश्नं तू फार वेळा विचारला नाहीस. माझ्याविनाही रमला आहेस, रहातो आहेस... ही वस्तुस्थिती एकाचवेळी सुखाची आणि बोचणारीही.

तुझा वेळ जावा अन मलाही सरप्राईज म्हणून त्या काळात तुला पेटीची मुळाक्षरं शिकवणारी तुझी आज्जी... ’आज्जी टास्क मास्टर आहे’ अशी एकमेव तक्रार मी अमेरिकेत असताना तू फोनवर केल्याचं मला छान आठवतय. तुझे आबाजी रिटायर होण्याच्या आनंदात होते. प्रत्येकवेळी फोन करू तेव्हा, रिटायर झाल्यावर काय काय गंमत-जंमत करणारेत किंवा वेळेत आंघोळ सारखं वैतागवाणं ते सगळं कसं टाळणारेत त्याचं रसभरित वर्णन करत होते फोनवर. आपल्याकडे आलेल्या एका पाहुण्यांना "मी मोठा झालो की, आई सारखा किंवा बाबांसारखा इंजिनियर-बिंजिनियर होणार नाहीये... मी आबाजीं सारखा रिटायर होणार" असं सांगून तिथे हजर घरच्या-दारच्या सगळ्यांना आडवं केलं होतंस.

आपल्याला मिळालं नाही ते ते तुला पुरवण्याच्या बापधर्माला जागून बाबा इलेक्ट्रिक शेव्हर आणतो आणि मग अर्थातच इतर मित्रांसारखी ब्लेड वापरण्याचा तुझा हट्टं. अजून आठवतं... मामाकडे राहायला जाताना, शेव्हर मुद्दाम विसरून गेलास. मग मामाचा रेझर वापरलास. हातघाईच्या लढाईवरून नुक्त्या परतलेल्या सैनिकासारखा तुझा घाव-डाव वाजलेला रक्तं ओघळणारा चेहरा मामाने मोबाईलमधे बंदिस्तं केला. तू, तो मला पाठवण्याचा आगाऊपणा केलास!

आईनं गुरू होणं शक्यंच नाही असं माझं अनुभवाअंती ठाम मत आहे. अगदी थोड्यावेळासाठी सुद्धा आईपणा सांडता येईल त्यांना जमेल, मात्रं. मला नाही जमलं हा माझा कबुली जबाब. आपला संवाद तर तुटलाच पण तुझ्या रियाजापेक्षा आपली भांडणं अधिक व्हायला लागली. माझ्या आ’ईगो पेक्षा तुझं शिकणं अधिक महत्वाचं, हे वेळीच माझ्या ध्यानात आलं म्हणून वाचलो नै?
प्रेमानं शिकलास, रे त्यानंतर. उगीच तुला स्वत: कल्हई करायला घेतली असा मला पश्चात्ताप होण्याइतका ताडमाड वाढलास तुझ्या गुरूच्यात.
कसं का होईना पण तुझे कान, मेंदू आणि हात झक्कास एकत्रं काम करतात. पहिल्या दोन वर्षांतच बोटांचं टेक्निक-बिक्निक मी दाखवण्यात अर्थं नाही, तुझं तू अधिक एफिशियंटली वाजवतोस हे लक्षात आल्यावर... माझं काम अधिक सोप्पं झालं.
तुला चॅलेंज मिळेल असलं काही सतत तुझ्यावर सोडत रहायचं.... आणि मजा बघायची.

तुला माहितै? तुझ्या कार्यक्रमांना तू कूल.... मी धास्तावलेली. मला आवडत नाही तू पेटीवर असताना तुझ्याबरोबर तबल्याच्या साथीला बसायला. तुला सम सापडणारच असते तेव्हा तू कूलच.
’तुला सम सापडली नाही तर?....’ ह्या फक्तं आयाच करू शकतिल असल्या अचरट काळजीत मी धास्तावलेलीच. त्यामुळे तू व्यवस्थित ठिक्कं समेवर आणि मी साध्या सोळा मात्रांच्या तीनतालात, सतरा नाहीतर पंधरा मात्रांचं अच्चाट मूर्खं आवर्तन वाजवून माझ्याच पायात पाय अडकून धडाम!
"काय गं? बरी आहेस ना..." असा तूझा वर चढवलेल्या भुवयांनीच प्रश्नं आणि डोळे मिचकावत, ओठ मुडपत मी पुढच्या धास्तीच्या तयारीत. तू पेटीच्या साथीला असशील तर मी तबल्यावर बसायला एव्हढ्यासाठी काकू करते, रे.
माझी शोभा झालेली चालते मला... पण "ही इतकी अनुभवी... चुकेल कशी... पेटीवालाच चुकला असणार" असल्या भ्रमातल्या अनगड कानसेनांना तुझ्याबद्दल झालेला हा गैरसमज खपत नाही मला.
अख्ख्या आयुष्याची संगीतातली कमाई एका बाजूला आणि तुझं आईपण दुसर्‍या... असलं कुरुक्षेत्रं... आईपण जिंकत रहातं.

तुझ्या पेटी शिकण्याच्या चारेक वर्षांत माझा सगळ्यात आवडती वेळ कोणती माहितीये? तुला घेऊन सव्वातासाच्या अंतरावरल्या तुझ्या पेटीच्या क्लासला जाणं. शुक्रवार संध्याकाळ, गुरूवारीच माझ्या भोवती रुंजायला लागायची. काय काय ऐकत जायचो, आपण. कधी तू काहीतरी मिळवून "तुझं राहू दे... हे ऐक" म्हणत मला ऐकवायचं. मग त्यात दहावेळा ते गाणं, धून मागे फिरवीत, एखादा पीस परत परत ऐकायचा. मी, ’शब्दं कायतरीच आहेत’ ह्यावर ट्रॅक बदलायच्या घाईत आणि तू त्यातलं अजून काहीतरी सापडलेलं मला ऐकवायच्या. मराठी, हिन्दी गाण्यांच्या शब्दांशी तुझं मुळीसुद्धा काहीही घेणं-देणं नाही.
तुझ्यामते ’बेकरार’ म्हणजे "दोन करार" आणि "माझा घाव तुझे चरणी"नं मीच काय पण पंडितजी, नामदेव आणि खुद्दं विठ्ठलालाही घेरी येईल ह्याबद्दल तू ठार अनभिज्ञ. घरी परत येताना, काही गाणी पूर्णं ऐकून मगच घरी जायचं म्हणून मुद्दाम वाट वाकडी करून गेलोत, घरासमोर गाडी उभी करून ऐकत बसलोय... असले वेडे.
"हा पीस वाजवून दाखव", असल्या माझ्या तुझ्याशी आनंदानं हरलेल्या बेट्स, मदन मोहन ग्रेट की, ए आर, ह्यावर आपले ठरलेले वाद.
पण त्या सगळ्या-सगळ्यां फेर्‍यांमधे त्या आपल्या गाडीतल्या त्या छोट्ट्या जगात तू, मी अन गाणं.... बाकी काही काही नाही, कुण्णी कुण्णी नाही.... अगदी बाबासुद्धा. तो ही बिचारा जाणूनच ह्यातून बाहेर राहिला.
माझ्या लहानपणी नं, डायनिंगटेबल, खुर्च्या जवळ जवळ आणून, चादरी, आईचं पातळ असलं काय काय वापरून घर-घर खेळायचो आम्ही. एखाद्या बहिणीशी, सखीशी खुसुखुसु करताना... एकदम उबदार, सुरेख वाटायचं... बाहेरचं सगळं जग कुठे गुल असायचं कुणास ठाऊक.... तस्सं वाटायचं बघ.

तू, मी किंवा गाणं ह्यापैकी कशाचीही वजावट चालली नसती...

आपणहून मोठा झालायस काही बाबतीत अन काही बाबतीत, कायम लहान रहायचय तुला. तुझं-माझं त्या कोणत्या "बाबी" ह्यावर एकमत होईपर्यंत तू अन मीही वयानं वाढणारच आहोत... त्याला इलाज नाही. आपल्यातली जनरेशन गॅप म्हणायची ती हीच आणि एव्हढीच. बाकीच्या गॅपा क्षुल्लक आहेत... कोणत्याही क्षणी तू किंवा मी ढांग टाकून त्या बाजूला जाऊ शकतो इतक्या.

परवाच तुझ्याच एका कार्यक्रमाच्या प्रॅक्टिसला गाड्याबरोबर नळ्याची म्हणत मीच आले लळत-लोंबत तुझ्याबरोबर. मी वाजवत नसलेल्या तुझ्या त्या कार्यक्रमाची ती मॅड प्रॅक्टिस मीच जास्तं एंजॉय केली... खूप खूप दिवसांनी तुझ्याबरोबर पुन्हा एकदा गाडीतून लांबची सफ़र... पुन्हा एकदा ऐकणं, ऐकवणं... पुन्हा वाद... पुन्हा एकदा तू-मी-गाणं ह्या तीनच बिंदूंवर आख्खं आकाश तोलल्याच्या आनंदात न्हाले.

आताशा आढ्याचं पाणी वळचणीला चाललय. तू नवनवीन ट्रॅक्स आणून ऐकवतोस. ’ह्या वाद्याचा हा लेयर ऐकू येतोय का?’ असले अचाट प्रश्नं विचारतोस. मला ऐकू येत नसलेल्या त्या वाद्याचा तो माझ्यापुरता नगण्यं पीस मला ऐकू यावा म्हणून तुझा आटापिटा बघते मी. ’नेति नेति’ करीत त्याच एका वाद्यापर्यंत मला बोट धरून नेतोस तेव्हा....
तेव्हा मी भरून पावते. आवाजांच्या ह्या जादुयी दुनियेतले मला न दिसणारे रंग, गंध, स्पर्श तुला अनुभवता येतायत... बोट धरून एखाद्या अजाण बालिकेसारखी मला त्यातून फिरवून आणतोस... अजून काय हवं?

तुझ्याच बॅन्डमधल्या एका गाण्यावर तबला आणि इलेक्ट्रॉनिक ड्रमकीटवर ड्रम्स अशी कसरत करायचीये मला. ड्रम्समधून तुला हवा तसा ठेका, आवाज यायला हवा म्हणून मला समजावतोस... प्रसंगी वाजवून दाखवतोस तेव्हा वाटतं...
जमूच नये आपल्याला.. किमान न जमल्याचं नाटकतरी करावं... म्हणजे समजावत रहाशील वेगवेगळ्या रितीनं, पद्धतीनं. तुला अवगत झालेलं, अनुभूत झालेलं सुर-तालाचं हे जग तुझ्या नजरेनं चितारत रहाशील माझ्यासाठी... मला कळेल, समजेल असं... माझ्यासाठी ते स्वर्गसुख.

तुझं-माझं हे एकमेकांवरचं विसावलेपण तुला घातक तर नाही ना होणार ह्या अजून एका अचरट काळजीने मध्यंतरी धास्तावले.
’एखादी छानशी गोडुली आयुष्यात येईल... अख्खाच्या अख्खा तिचाच हवास असा हट्टं धरेल... होऊन जा... अगदी खुश्शाल.’ असं तुला सांगितलं तर ... ’कायपण काय बोलतेस?’ म्हणत चिडलास.

त्यावेळी तुला हे एक सांगायचच राहिलं... अरे, मुली-बिलीचं सोड... पण आई ही अशी एक जागा आहे, जिथं नव्यानं जन्मं घेण्याची सोय आहे....

आत्तापुरतं इतकच.
तुझी
आई(च)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अफाट सुंदर लिहिलय Happy

आ'इगो _/\_

आई ही अशी एक जागा आहे, जिथं नव्यानं जन्मं घेण्याची सोय आहे..>>>>>>>> हे प्रचंड आवडलं..............

पोचल अगदी थेट
भिडल मनापासून
शेवटाचा परिच्छेद खासच

तुझ्या एकटीच नाही प्रत्येक आईच आणि टू बी आयाच मनोगत आहे हे

छानच, अगदी काळजाला भिडणारं!
तुझ्या एकटीच नाही प्रत्येक आईच आणि टू बी आयाच मनोगत आहे हे+१

छानच, दाद. आई अगदी पोचली.

"ही इतकी अनुभवी... चुकेल कशी... पेटीवालाच चुकला असणार" असल्या भ्रमातल्या अनगड कानसेनांना तुझ्याबद्दल झालेला हा गैरसमज खपत नाही मला. << Happy

मी मोठा झालो की, आई सारखा किंवा बाबांसारखा इंजिनियर-बिंजिनियर होणार नाहीये... मी आबाजीं सारखा रिटायर होणार <<< Lol

खूपच सुंदर लिहिलय दाद. अगदी मनापासून लिहिलंय हे प्रत्येक शब्द वाचताना जाणवतं.

ण आई ही अशी एक जागा आहे, जिथं नव्यानं जन्मं घेण्याची सोय आहे.... >>>> या वाक्याला त्रिवार सलाम!

शलाकाताई कित्ती गोड... तुमच्या तान्हुल्याची ओळखपासूनचा हा शब्दांचा प्रवास संपूच नये असं वाटत राहीलं. रिटायर-बेकरार्-माझा घाव!! जाम हसले बाई Happy
आत्ताच मंजुताईचा म्.......स्त लेख वाचला आणि हे.. बस्स-काही दिवस बरे जातील आता! Happy
मधून मधून लिहत जा बाई, श्वास अडकायला होतो नाहीतर..

नि:शब्द!!....................
तू म्हणजे ना एक अनुभव आहेस शलाका.......... आणि तशीच लेखनातून प्रतीत होतेस..

शलाका Happy
आजच लेकानी मला बळच मोझार्ट ऐकायला बसवलं, आणि बघ याला म्हणतात क्रिएटिव्हीटी , माईकच्या स्टँडवर वाजवाव हे सुचलंच कसं असेल या माणसाला, वगैरे वगैरे...मी नुसतीच ऑ! हा एवढा मोठा झालाय?
कळलच नाही की मला Uhoh असल्या कायतरी विचारात. आणि नेमका आज तुझा हा लेख. अगदी अगदी या हृदयीचे त्या...झालं.

बाकी तुझ्या लिखाणाला कायमच सलाम करत आले आहे. Happy

>> "मी मोठा झालो की, आई सारखा किंवा बाबांसारखा इंजिनियर-बिंजिनियर होणार नाहीये... मी आबाजीं सारखा रिटायर होणार" Proud

मस्त लिहिलंयस. शिष्यादिच्छेद् पराजयम्!
Friends are the family we choose म्हणतात. नात्यातच मैत्र सापडणं यासारखा आनंद नाही. ते मैत्र अभंग राहो. Happy

छानच लिहिलंय.
"जमूच नये आपल्याला.. किमान न जमल्याचं नाटकतरी करावं... म्हणजे समजावत रहाशील वेगवेगळ्या रितीनं, पद्धतीनं. तुला अवगत झालेलं, अनुभूत झालेलं सुर-तालाचं हे जग तुझ्या नजरेनं चितारत रहाशील माझ्यासाठी... मला कळेल, समजेल असं... माझ्यासाठी ते स्वर्गसुख." >>> हे खास.
(आपलं मूल आपल्यापेक्षा मोठं व्हावं यासारखा दुसरा आनंद नाही हेच खरं.)

Pages