माझे अण्णा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अण्णा म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांचे वडील. बालपणीचा माझा पहिला वहिला मित्र. घरात कोकणी आणि मराठी दोन्ही बोलत असल्याने, घरी कोकणीमधल 'अरे तुरे' च वापरल जायच, समजा जरी मराठी बोललो तरी संबोधन 'अरे' हेच, मग ते आजोबा असोत, नात्यातली इतर वडिलधारी मंडळी असोत... त्याला निकष एवढाच की ती व्यक्ती तुम्हाला जवळची असायला हवी! आणि कोकणीत बोलताना तर 'अरे तुरे' च वापरल जात. असो.

तर काय सांगत होते, मी आजोबांना अरे तुरे च करत असे, अन त्यांना ही ते आवडायच. तर या मित्राच्या अगदी गळ्यात गळा घालून आजी, आई, बाबा, काका, आत्या, मावशी, इतर भावंड आणि बाकीच सगळ जग माझ्यावर कित्ती कित्ती अन्याय करतय हे सांगायला एकदम बर वाटायच. आणि मुख्य म्हणजे त्यांना ते पटायचही. न पटण्यासारख होतच काय म्हणा? आणि मग सर्वांना माझ्यासमोर लुटुपुटूचा जाब विचारला जायचा. ते मला खूपच आवडायच, अर्थात तेह्वा ते सार लुटुपुटूत चालायच हे कळायचच नाही, घरातली सर्वात मोठी व्यक्ती आपली बाजू घेऊन बोलते आहे, तमाम शत्रूगणाला जरब देते आहे, ह्याचच अप्रूप वाटत असे. शत्रूगण गूपचूप ऐकून घेतो आहे ह्याचा केवढा आनंद व्हायचा! नंतर भावंड आणि कधी कधी मोठी माणसं फ़िदी फ़िदी का हसायची तेच कळायच नाही तेह्वा मला!! सगळ्यात शेंडे फ़ळ असल्याचे हे असे तोटे पण होते!! पण, काहीही असल, तरी हा कार्यक्रम आठवड्यातून एक दोन वेळा व्हायचाच.

अण्णांकडे गोष्टींचा खूप साठा होता, आणि आम्हां भावंडांना जमवून गोष्टी सांगायला त्यांना खूप आवडायच पण. माझ्या लहानपणी, आम्ही एकत्र कुटुंबात रहात होतो, आजी, आजोबा, काका, काकी, माझी चुलत भावंड, आई, बाबा आणि मी. रात्रीची जेवण झाली की आम्ही भावंड, अण्णांच्या ताब्यात असायचो, आणि मग गोष्टी, गाणी, वेगवेगळी स्तोत्र यांचा खजिनाच खुला व्हायचा आमच्या साठी. घराच्या मागच्या बाजूला व्हरांडा होता, नेमकी वीज जायची आणि, चंद्र प्रकाशातल्या उजेडात अण्णा प्राण्या पक्ष्यांचे वेगवेगळे आकार करून दाखवायचे, जंगल खात्यात नोकरीला असल्याने त्यांनी जंगलांमधून भरपूर भटकंती केली होती, वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाजही काढून दाखवायचे. आम्ही पण तसे आवाज काढून बघण वगैरे ओघाने होतच होत, मे महिन्यांच्या सुट्ट्यांमधे आतेभावंडही येत असत पुण्याला, मग कल्ला करायला किती वेळ!! खूप मजा यायची!! घरातली बायका मंडळी आमच्या दंग्याला कंटाळत, पण अण्णांच्या पाठिंब्यावर हे उद्योग आम्ही बिनदिक्कत करत होतो!! ते आमच्या पैकीच एक होते.

आता वयाने जऽऽरा मोठे होते, केस पांढरे झाले होते, चालताना काठी घ्यावी लागत होती कधी कधी, म्हणून आम्हाला काहीच फ़रक पडत नव्हता. त्यांचा मोठेपणा कळण्याच ते वय नव्हत आणि त्या मोठ्या माणसाने ही कधी तो जाणवू दिला नाही.

अण्णा त्यांच्या भावंडात सर्वात मोठे. सर्व भाऊ, बहिणी मिळून आठ जण. माझे पणजोबा लवकर गेले, आणि मोठा भाऊ म्हणून सगळ्यांची जबाबदारी अण्णांवर येऊन पडली. भरीस भर म्हणून लहान वयात लग्नही झाल. माझी आज्जीही अगदी लक्ष्मीच होती. दोघांनी दोन्ही बाजूच्या खूप जणांच खूप काही केल, शिक्षण, नोकरी लावून देण, आपल्याकडे रहायला ठेवून घेण, आणि सार काही निरिच्छ भावनेने, मायेने, प्रेमाने. पुन्हा कोणासाठी काही केल तर त्याची वाच्यताही नाही कोणाकडेही. कुठूनतरी, कधीतरी कळायच... आजदेखील अण्णांची नात आहे म्हटले की जे त्यांना ओळखतात, त्यांच्या नजरेत उमटणारी आपुलकी आणि माया बघून मला अचंबा वाटतो, इतक्या मोठ्ठ्या माणसाशी आपल इतक जवळच आणि हक्काच नात होतं याबद्दल खूप अभिमान वाटतो, त्यांच नाव टिकवण्याची जबाबदारी पण वाटते.

माझ्या पुस्तकांच्या वेडाच त्यांना खूप कौतुक होत.त्यांनाही होतच ते वेड. त्यामुळे त्यांचा पुस्तकांचा संग्रह माझ्यासाठी नेहमीच खुला होता, अणि कुठलही पुस्तक हातात घ्यायला बंदी नव्हती. गडकर्‍यांची नाटक, शेक्सपिअर, श्री भगवद्गीतेवरची निरुपण, वि.स., तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, संत कबीर, सामाजिक प्रश्नांवरची पुस्तकं, कथा कादंबर्‍या, राजगोपालाचारींच रामायण, महाभारत, बा. भ, ग. दि. मा., अत्रे, गोट्या, चिंगी सारखी पुस्तक, पु. ल., चि. व्ही. जोशी...किती नाव घावी.... अजून बरीचह्शी इथे लिहीली पण नाहीत! पण, तेह्वापासून लागलेल वाचनाच वेड आजतागायत सोबत करतय....

पुस्तकांवरून असच आठवल. एकदा, अण्णांचे एक मित्र घरी आले होते. दोघांच्या गप्पा सुरु होत्या, मी ही तिथेच शेक्सपिअर आणि शब्दांचे अर्थ शोधायला डिक्शनरी घेऊन जवळच बसले होते. शब्दांशी झटापट सुरुच होती. आणि एकदम ते मित्र मला म्हणाले, काय कळतय का काय वाचते आहेस ते? आणि मग अण्णांकडे वळून म्हणाले, अहो, हे काय वाचतेय ती?? एवढ्यात काय कळणार आहे तिला यातल? काहीतरी तिच्या वयाला चालेलस द्या... यावरच अण्णांच उत्तर मात्र मला अजून ही आठवत. ते म्हणाले होते, आत्ता तिला काही समजाव अशी अपेक्षाच नाही आमची, पण नकळत घडलेल हेच वाचन तिच्या जाणीवा प्रगल्भ करेल, तिला एक नजर देईल. कळत नकळत तिच शिक्षण होतय, त्याच्या आड येण्याच पाप मी कस करेन?

माझ शिक्षण अजूनही अव्व्याहत सुरुच आहे रे अण्णा...

लहानपणच्या आठवणींत रमताना, आता कळत की शिकवण्याचा अथवा उपदेशाचा आव न आणता या माणसाने आम्हा भावंडांना खूप काही शिकवल, आयुष्यभर पुरेल अन तरीही उरेल, इतक पाथेय दिल. जीवनमूल्य शिकवली, ताठ मानेन जगायला शिकवल. स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवला आणि जिथे गरज पडेल तिथे प्रवाहाविरुद्ध पोहू शकू, गरज पडली तर एकट्यानही, इतकी हिम्मत दिली, ह्याहून अनमोल दुसर काय असू शकेल? आणि हे सार हसत खेळत. कसलाही आव न आणता, अगदी नकळत, भलेपणाचे संस्कार दिले. फ़ार साधी, सरळ अशी शिकवण होती त्यांची. साध्या साध्या गोष्टी सांगत. कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका.... साधीच, पण आजवरच्या आयुष्यात सतत उपयोगी पडलेली शिकवण. भले त्यांनी आम्हाला महागडी खेळणी आणली नसतील, शॉपिंगला नेल नसेल... याची काही गरजही नव्हती आमच्या लहानपणी. या सर्व गोष्टींपेक्षा, सर्वात महत्वाचा असा त्यांचा वेळ आमच्यासाठी कायमचाच राखीव होता.

अण्णांशी कधीही संवाद साधायला आम्हां कोणालाच कसलीच अडचण कधीच जाणवली नाही. मला तर अजूनही जाणवत नाही. माझा मित्र अजूनही माझ्या मनात ठाण मांडून बसलाय. कधी मनात कसली दुविधा आली, चल बिचल झाली, निर्णय घेताना अडल्यासारख वाटलच, तर लौकीकार्थाने माझ्या बरोबर नसलेल्या या मित्राशी मी संवाद साधते, माझ्याच मनात. त्या हृदयीचे या हृदयी केव्हाच घातले आहे, त्याची हलकेच एक उजळणी होते, डोळ्यांत नकळत उभा राहिलेला अश्रू त्यांच अस्तित्व माझ्यापुरत तरी अगदी जिवंत बनवतो. मनाला एक नवी उभारी मिळते.

थोडस भावनेच्या भरात लिहिल्यासारख वाटेल, पण माझा अण्णा, म्हणजे,

सकल चिंतामणी शरीर l जरी जाय अहंकार आशा समूळ ll
निंदा हिंसा नाही कपट देहबुद्धी l निर्मळ स्फटीक जैसा ll
मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी l येती तयापासी अवघीं जनें ll
तीर्थासी तीर्थ झाला तोची एक l मोक्ष तेणे दर्शने ll

असा होता...

प्रकार: 

छान लिहिलय, अशी सन्गत लाभणे हे देखिल भाग्यच! Happy
आणि सन्गतच माणसाला घडवते वा बिघडवते!

शैलजा, हा लेख आणि विषय यापेक्षा मला महत्वाचा वाटतो तो सहजशैलीत लिहिणार्‍या एका लेखिकेचा जन्म.
आगे बढो.

खुपच छान लिहलयं!
अगदी ओघवतं!! आणि मला माझ्या आजोळची आठवण करून देणारं!! Happy

खुप छान लिहिल आहे. ओघवती भाषा आहे.

लिंबूदा, दिनेशदा, कृ, सुहास्य सार्‍यांचे आभार.

आयटी गर्ल
सुंदर लिहिलयस. सहज सोप्पी, ओघवती भाषा. हे असं लिहिणं सोप्प नाही.
****सर्वात महत्वाचा असा त्यांचा वेळ आमच्यासाठी कायमचाच राखीव होता.****
हे जे आजोबा-आज्जी देऊ शकतात ते आजचे आई-वडिल इच्छा असूनही देऊ शकत नाहीत.... मग आजच्या घरट्यातून आज्जी आजोबांची "अडचण' कशी होते?....
असो... लिहीत रहा. 'सहज' हा तुझ्या लेखणीचा स्वभाव दिसतो... अगदी आवडला.

नमस्कार शैला,

खूप छान लीहीलेस ग.

माझे आजोबा. काय लीहू ग. इतके सुवीचारी आणि सुसन्स्क्रुत. मी अगदी लहान असल्यापासून म्हणजे अगदी कळत असल्यापासून आजोळी रहायचो. लहानपणापासून अण्णांना माझे कवतीक आई शीवाय एकटा रहातो म्हणून. (आता आई शिवाय रहायची सवयच पडून गेलीय)
मला ते गोष्ट सांगायचे. डम डम डमरु कोल्ह्याची. डोळ्यासमोर एक जंगलाचे चित्र असायच. तिथे मी आणि माझे आजोबा दोघच. बाकी कुण्णा कुण्णा ला म्हणून प्रवेश नाही. मी आंघोळ करून आलो की मला त्यांच्या पेश्शल ब्रश ने भांग पाडायचे आणि म्हणायचे कसा राजबिंडा दिस्तोय. मला काही तो शब्द कळायचा नाही. मी म्हणायचो - अण्णा मला राजबिनडोक करा.

हो अग मी सुद्धा माझ्या आजोबांना (आईच्या बाबांना) अण्णाच म्हणायचो.

मी आधी लिहिला होता प्रतिसाद हरवला वाटत Sad

खुप छान लिहिल आहेस.
असे आजोबा मिळायला नशीब लागत. नशीबवान आहेस. Happy

दाद, तुमच्यासारख्या शब्दांवर प्रभुत्व असणार्‍या व्यक्तीकडून कौतुकाचे शब्द ऐकण म्हणजे एकदम ग्रेट वाटल!! आणि कसलाही मोठेपणाचा अभिनिवेश न बाळगता एवढी दिलखुलास दाद दिलीत, खूप आभार!!

केदार, झकास आभार तुमचेही.

छान लिहिलंय. शेवटचा पॅरा पण खूप आवडला.
>>कोणाचे मिंधे राहू नका, खोट बोलू नका, कधी खर मत मांडताना, आणि स्पष्ट बोलतानाही समोरच्याला होता होईतो दुखवू नका....
अगदी खरं आहे.

-लालू

लालू, लेख आवडल्याच आवर्जून सांगितल्याबद्दल खूप आभार.

आय.टी. खरच खूप छान वाटले वाचून, नकळ्त बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, अशीच लिहीत रहा.

आयटी गर्ल वेगवेगळ्या विषयांवर आणी सहज ओघवत्या भाषेत सुंदर लिहिते आहेस.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

अन्जलि

वा शैलू सुरेख लिहलयस.. असा मित्र प्रत्येकाला हवाच गं... फार सुदैवी आहेस तू Happy
तुझा लेख वाचून मात्र मला माझ्या मैत्रिणीची खूप आठवण येतेय.. माझ्या आजीची Happy

>>>> प्रत्येक नॉस्टॅल्जिक लेखाला कारुण्याची झालर चढवलीच जाते <<<<
हसत खेळत रमत गमत नॉस्टॅल्जिक कस व्हायच ते शिकवाल का जरा? Proud
म्हण्जे मग प्रत्येक नॉस्टॅल्जिकला कारुण्याची झालर चढणार नाही! नै का?

त्यातुन उद्या कोणी महाभाग कित्येक वर्षांपूर्वीच्या हनिमूनच्या आठवणीन्नी नॉस्टॅल्जिक झाला अन कारुण्याचि झालर चढवुन अश्रु पाघळू लागला तर वाचकांवर भलतीच आफत ओढवेल, नै का? Wink तेव्हा तुम्ही ते हसतखेळत नॉस्टॅल्जिक व्हायचे कसे ते शिकवण्याचे मनावर घ्याच!

'पॉकेट ऑक्सफर्ड डिक्शनरी'त 'नॉस्टॅल्जिया'ची व्युत्पत्ति दिलीय -
Gk. nostos - return home, algos - pain !

त्यामुळे, 'नॉस्टॅल्जिया'ला दु:खाची नुसती झालरच नाही तर दु:ख हा त्याचा गाभाच असावा, असं वाटतं !

Pages