अनवट आशा

Submitted by दिनेश. on 19 June, 2013 - 10:56

अनवट हा शब्द सहसा अप्रचलित रागांसाठी वापरतात. गुणक्री, रायश कानडा असे काही राग आपण नियमित
ऐकत नाही, आणि त्या रागांतील रचना कानावर पडल्या तर काही खास ऐकतोय असे वाटते.

पं. मालिनी राजूरकरांचे "चाल पहचानी", जयमाला शिलेदारांचे " कोपला का ", रामदास कामतांचे "संगीतरस सुरस" अशा काही रचना ऐकल्या, कि असेच हरखून जायला होते.

पण आपली आशा ( आशा भोसले, आपलीच ती ) पण काही कमी नाही. पण होतं काय, अशा अवघड रचना ती
इतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो
त्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. तर अशा काही रचना, मला आठवतात त्या. आणि अर्थातच
तूम्हाला ज्या आठवतील, त्या तूम्ही लिहायच्याच आहेत.

१) सुकतातची जगी या

दिनानाथ मंगेशकरांचे हे नाट्यगीत, आशांनी गायलेय. दिनानाथ त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात कसे गात
असावेत, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. पण आशाने मात्र ती चमकदार गायकी, अशी काही
सादर केलीय, कि ज्याचे नाव ते. खरं तर तिला थेट तालिम फारशी मिळालीच नसावी. तिच्या अंगात आहेत
ते अलौकिक कलागूण. शिवाय तिचे स्पष्ट शब्दोच्चार. गाण्यातला प्रत्येक शब्द लिहून घ्यावा, असे खणखणीत.

२) बाई गं माझ्या पायाला बांधलाय भवरा

आनंदघन म्हणजेच लताच्या संगीतात, आशाने गायलेली हि लावणी. ( चित्रपट बहुतेक मराठा तितुका मेळवावा )
गुलजार गुलछडी
नटुनी मी खडी खडी
नाचते मी घडीघडी
करते नखरा नखरा
बाई गं माझ्या पायाला
बांधलाय भवरा

असे काहीसे शब्द आहेत. या लावणीत भिर्रर्रर्रर्र........................... अशी एक लांबलचक भिरभिरणारी तान
तिने घेतलीय. ती तानच काय तेवढा दमसासही आपल्याला अवघड आहे. पडद्यावर नर्गिस बानू आहे,
पण तिलाही ही तान अवघड गेलीय. आणि याच गाण्याबाबत नव्हे तर इथे लिहितोय त्या सर्वच
गाण्यांच्या बाबतीत खरे आहे, कि या गाण्यांचा वाटेला नंतर कुणी गेलेलं मी ऐकलेले नाही.

३) देव नाही जेवलेला

धर्मकन्या हा हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत असलेला एक चित्रपट. "सखी गं मुरली मोहन मोही मना,"
हे गाणे त्यातले ( पडद्यावर जयश्री टी. ) हे गाणे जरा नेहमीच्या ऐकण्यातले म्हणून परिचित. पण
त्यातली ग या अक्षरावर घेतलेली तान, भल्या भल्या गायिकांना जमणारी नाही. याच चित्रपटात
"पैठणी बिलगून म्हणते मला, जानकी वनवास गं संपला" अशी पण रचना आहे. तीदेखील आशानेच
गायलीय. ( पदद्यावर अनुपमा ) तीसुद्धा सुंदर आहेच. पण सरताज अशी रचना आहे ती, "देव नाही झोपलेला"
सगळ्यांच्या भुकेची जबाबदारी घेतलेला तो देव, आपल्याला उपाशी ठेवून झोपलेला नाही, तर रात्रीच्या अंधारात
तो आपली झोपडी शोधतोय, अशा भावार्थाचे हे गाणे, ऐकल्यावर अक्षरश: भान हरपते. इतके आर्त गाणे
असूनही त्याचे कुठेही रडगाणे झालेले नाही ( तूलना गैर आहे, पण लताने "अम्मा रोटी दे, बाबा रोटी दे" या
गाण्याचे रडगाणे केलेले आहे. ) उलट देवावरची अढळ निष्ठाच त्यात दिसते.

४) कवडसा चांदाचा पडला

जिद्द या नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. श्रीराम लागू, जयश्री गडकर, उषा चव्हाण, संजय जोग
असे कलाकार होते. पण वरची लावणी, उषा चव्हाणवर नव्हे तर सहनायिका, संजीवनी बीडकरवर चित्रीत झाली
होती.

बाहेर चांदणे, खिडकी होती बंद
बिलगून सख्याला मिठीत होते धुंद
निलाजरा तो खट्याळ वारा आला
खिडकी उघडून, पडदा सारून गेला
कवडसा चांदाचा पडला,
अन साजण माझा खुदकन गाली हसला

अशा शब्दांनी सुरु होणारी हि लावणी, आशाने फारच सुंदर गायलीय. यातले बाई गं, बाई गं हे शब्द
तर खासच. अगदी चांदण्याचा शिडकावा झाला असे वाटते, हि लावणी ऐकून.

५) बेबसी हदसे जो गुजर जाये

ओ.पी. नय्यरच्या संगीतात आशाने हे गाणे कल्पना या चित्रपटासाठी गायलेय. ( पडद्यावर रागिणी )
हि रचना ओपीनी, बेगम अख्तरच्या एका ठुमरीवर बेतलीय असे म्हणतात, तरीही आशाची कामगिरी
बेजोड आहेच. मेरे नग्मोंसे उनका दिल ना दुखे, या ओळीवर तर तिने अप्रतिम काम केलेय.

चित्रपटात मरणासन्न नायिका हे गाणे म्हणतेय असा प्रसंग आहे, तरी हे गाणे करुण वगैरे झालेले नाही.

६) अकेली हूँ मै पिया आओ

संबंध या ओपीनीच संगीत दिलेल्या चित्रपटातली हि रचना. पडद्यावर नाजनीन. हाही एक मुजराच
आहे. पण अनेक रागरागिण्यांशी खेळत आशाने या रचनेला उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. उस्ताद अमीर
खाँ साहेबांनी पण या रचनेची तारीफ केली होती.

७) सूनी सूनी साँस कि सितार पर

शंकर जयकिशनने नेहमीच लताला झुकते माप दिले पण लाल पत्थर चित्रपटात मात्र लताचे गाणे नव्हते.
आशा आणि मन्ना डे यांनी गायलेली, रे मन सूर मे गा, ही रचना पण यातलीच. पण त्यात मन्ना डे असल्याने
आशाचे कर्तृत्व जाणवत नाही. ते जाणवते ते या गाण्यात.
मनमोहना बडे झूठे या गाण्यातील लताच्या आलापांचे ( आणि नूतनच्या अभिनयाचे ) नेहमीच कौतूक
होते, पण त्यात तोडीच्या ताना आशाने या गाण्यात घेतल्यात ( दुर्दैवाने राखीला पडद्यावर त्या साकार
करता आलेल्या नाहीत. )

८) कतरा कतरा मिलती है

इजाजत मधल्या, मेरा कुछ सामान या रचनेचे यथायोग्य कौतूक होतेच. पण त्याच चित्रपटातली हि
रचनाही त्याच दर्ज्याची है. प्यासी हू मै प्यासी रहने दो, मधली आर्तता काय वर्णावी. ( पडद्यावर रेखा, संगीत आर्डी )

९) काली कमली वाले कि

आर्डीनेच आशाकडून, नमकीन या चित्रपटासाठी हि रचना गाऊन घेतलीय. पडद्यावर शबाना आझमी आहे, पण ती मूक असल्याने गाने तिच्या तोंडी नाही. फिर से ऐयो, बदरा बिदेसी पासून जे गूढ वातावरण तयार होते,
ते पुढे पुढे जवळजवळ भारूनच टाकते. ( मला आठवतय त्या प्रमाणे शबाना या गाण्यानंतर स्वतःला संपवते.)

१०) जी चाहता है चूम लू

बरसात कि रात हे नाव घेतले कि, ना तो कारवाँ कि तलाश है, हि कव्वालीच आठवते. ती अप्रतिम आहे हे खरे आणि त्यात आशाचा पण आवाज आहे, हेही खरेय. पण निदान उत्तरार्धात तरी ती मन्ना डे आणि रफीनी
खाऊन टाकलीय. त्याच चित्रपटात, जी चाहता हे चूम लू, अपनी नजर को मै.. अशी पण एक कव्वाली आहे,
आणि त्यात आशा आणि सुधा मल्होत्रांने खुपच रंगत आणलीत. त्यातल्या एका आलापात तर दोघी
इतक्या सुरेल शिरल्यात, कि दोन वेगवेगळे आवाज ओळखता येत नाहीत.

११) माँग मे भरलो रंग सखी री

मुझे जीने दो मधे, जयदेव ने लताला, रात भी है कुछ भिगी भिगी, अशी सुंदर रचना दिलीय, पण आशाला
मात्र दोन गाणी दिली आहेत. एक आपल्या नेहमीच्या ऐकण्यातले, नदीनाले ना जाओ श्याम.. ( चित्रपटातली
यातली चाल वेगळी आहे. शिवाय संग सवतीया ना लाओ, असे जास्तीचे कडवेही आहे. ) पण दुसरे, जरा कमी
ऐकण्यातले, आँखमे भरलो रंग सखी री, ऑंचल भरलो तारे. ( पडद्यावर वहीदा रेहमान )

या गाण्यातल्या मिलन रुत आ गयी वर आशाने सुंदर कारीगिरी केलीय शिवाय एकंदरच या गाण्याची चाल,
खास करून तिच्या ओळी फारच कठीण आहेत.

यातली बहुतेक गाणी नेटवर आहेतच, पण मी मुद्दाम लिंक्स देत नाही, कारण अशी रत्ने स्वतः शोधून
काढण्यातच मजा आहे, आणि काय सांगावे तूम्हाला आणखीही अशा रचना सापडतीलच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश दा........ चुकुन प्रकाशचित्रांमधे धागा उघडलेला आहात ... Happy

इजाजत मधली सगळी गाणी विचारपुर्वक लिहिलेली आहे... प्रत्येकाच्या सुप्त आशा आकांक्षा त्यात ओतप्रोत भरलेल्या दिसतात

पाण्यातले पहाता, प्रतिबिंब हासणारे - चित्रपटः सोबती.

कुठेतरी वाचलेली एक आठवण: खळ्यांनी जेव्हा हे गाणं आशाताईंना ऐकवलं तेव्हा त्या म्हणाल्या की ही चाल कुठल्याही माणसाच्या गळ्यातून येणं अवघड आहे. पण खळ्यांनी आशाताईंना गळ घातली. आशाताईंनी थोडी मुदत मागून घेतली आणी एक अट घातली की त्या हे गाणं एकदाच रेकॉर्ड करणार. एका टेक मधे झालं तर ठीक. आणी जमलं, एका टेक मधे, एक अविस्मरणीय गाणं जन्माला आलं.

किस्सा खरा की एखादा गायक पुढे मोठा झाला की 'हा पाळण्यात असताना सुद्धा अगदी सुरात रडायचा' टाईप जोडलेले अ‍ॅपेंडिक्स हे माहीत नाही, पण गाणं मात्र अफाट आहे.

मस्त लेख
यातल कतरा कतरा ओळखीच आहे
रात्री एफ एम वर बर्याचदा लागत
प्यासी हू मै वर आपण फिदा आहोत

बाकीची गाणी नवीन आहेत माझ्यासाठी
युट्युबवर पाहावी लागतील

८) कतरा कतरा मिलती है>>> ( पडद्यावर अनुराधा, संगीत आर्डी )>>>

पडद्यावर रेखा आणि नसरूद्दिन शहा यांच्यावर हे गाणं चित्रीत झालंय. सिनेमात अनुराधा पटेल आहे, पण या गाण्यात नाही. चित्रीकरण कर्नाटकमधल्या कूर्ग भागातल्या कुद्रेमुख या ठिकाणी झालंय. (नाही, मी चित्रीकरणास उपस्थित नव्हते :फिदी:)

मस्त लेख
(यातल कतरा कतरा ओळखीच आहे. प्यासी हू मै वर आपण फिदा आहोत...)
बाकीची गाणी नवीन आहेत माझ्यासाठी+१

तरुण आहे..रात्र अजुनी मधले.....
बघ तुला..पुसतोSSSSSस आहे पश्चिमेचा गाSSSSSर वारा....

There is ONLY one Asha Bhosale!!!

छान धागा!

दिनेशदा... तुम्ही निवडलेला विषयच असे काही मंत्रमुग्ध करून टाकतो वाचकाला की त्याची तुलनाच करायची असेल तर इंद्रधनुष्यांच्या रंगांना नजरेसमोर आणावे लागते. पांढर्‍या सूर्यप्रकाशात सात रंग असतात हे न्यूटनने खूप वर्षापूर्वी सांगितले असले तरी एकच गळा गाण्यातील नऊही रस सहजगत्या दाखवू शकतो....अन् तो गळा म्हणजे आशा भोसले असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होत नाही....ही ईश्वरी जादूच जणू.

लता एकीकडे हिंदी संगीताची सम्राज्ञी बनत चालली होती तर आशाने सुधीर फडकेंच्या मार्गदर्शनाखाली मराठीत ते स्थान प्राप्त केले. बाबूजींनी दिलेल्या 'जगाच्या पाठीवर' मधली ग.दि.मां.च्या 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' या दोन गाण्यांना अक्षरशः अमरपणा लाभण्याचे कारण या तिघांची करामत म्हणावे लागेल. पु.ल.देशपांडे यानीही चंद्रकंस रागातील 'करु देत शृंगार सख्यानो' ही रचना वा 'नाच रे मोरा आंब्याच्या बनात' सारखी बालगीताची चाल आशाताईंकडून गाऊन घेतली होती.

मराठी चित्रपट संगीत असो वा नाट्यसंगीत तसेच हृदयनाथांनी बसविलेली भावगीते असोत...आशाताईं हे नाव प्रत्येक प्रांतात असे काही लिलया फिरले आहे की रसिकाला वाटत राहावे की नेमके ऐकावे तर काय ऐकावे?

अशोक पाटील

दिनेश, मस्त लेख.

माझ्या आवडीची आणखी काही:

१. वरती उल्लेख झालेल्या 'नमकीन' मध्येच आणखी एक गाणे आहे 'आकी चली बाकी चली' पुढे काही तरी अगम्य शब्द आहेत पण ते इतके सराईतपणे म्हटले आहेत आशाने की गाणे एकदा ऐकून मन भरतच नाही कधी.

२. ओपीच्या संगितात आशाने म्हटलेले 'चैनसे हमको कभी आपने जीने ना दिया' गाणे खर्जात सुरू होते आणि बर्‍याच वरच्या पट्टीत ध्रुपद संपते. इतक्या खर्जात इतके सुरेल गाणे खरच कठीण आहे. आपल्या दमसास असलेल्या आवाजाचे श्रेय ओपीच्या खर्जातल्या गाण्यांना देते आशा.

३. ए मेरे वतनके लोगो जरी आशा गाऊ शकली नाही तरी अण्णा चितळकरांनी तिला एक अप्रतिम गाणे दिलय - घरकुल चित्रपटातले 'मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे' तबल्याची लय वाढते आणि परत कमी होते पण आशा एकाच लयीत गात असते. कसली अजब कारागीरी केलीये अण्णांनी आणि आशाने मिळून. वेड लावते गाणे.

४. 'सदे'कडची आशा - चित्रपट ज्वेल थिफ! आशा सुरू करते 'रात अकेली है' ह्या! लय साधी चाल बांधलीये असं म्हणत आपण गुणगुणायला तोंड उघडणार तोपर्यंत आशा 'जो भी चाहे कहीये' पर्यंत पोहचलेली असते. आपल्या उघडलेल्या तोंडातून काहीच आवाज फुटत नाही. आपण कानाला हात लावत तोंड बंद करतो. ह्या गाण्याला 'घशातून रक्त आल्याची' दंतकथा कशी जोडली गेली नाही याचे आश्चर्य वाटते कधीकधी मला.

होतं काय, अशा अवघड रचना ती
इतक्या सहजतेने गाते कि आपल्याला वाटतं, फारच सोप्प आहे कि हे, पण ज्यावेळी आपण गुणगुणायला जातो
त्यावेळी मात्र, त्यातले अनवटपण जाणवते. >>>>>>>>>>>>>सेंट पर्सेंट!!

ही बाई एक कमाल आहे. कुणीही संगीत देवो....ही बाई त्याचं सोनं, प्लॅटिनम सगळं करते. बाबुजींनी दिलेलं संगीत आणि आशाबाईंचा स्वरसाज असलेलं अजरामर गीत............'जिवलगा कधी रे येशिल तू!!'............. काय अप्रतिम गाणं आहे!! सगळेच ग्रेट आहेत!! गीतकार, संगीतकार आणि गायिका सगळेच!!

आणि हृदयनाथांच्या चालींना आशाबाईंनी दिलेला न्याय बघितला की थक्क, अवाक सगळंच होतं!!

केवळ ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट!!!!!!.............

आशा लाडकीच आहे.
बरीचशी गाणी ओळखीची नाहीत. एकदा मिळवून ऐकली पाहिजेत.

शब्दखूणांत स्वतःचा आयडी टाकायची कल्पना अनवट आहे. Wink

>>>बरीचशी गाणी ओळखीची नाहीत. एकदा मिळवून ऐकली पाहिजेत>>>>> +१

पण आशा कायमच आवडती आहे. कितीही वेळा ऐकली तरी कान तॄप्त होत नाहीत. Happy

रैना +१

देर से ऐयो, बदरा बिदेसी पासून जे गूढ वातावरण तयार होते>>
फिरसे आइयो, बदरा बिदेसी.

देव नाही झोपलेला>>>
"देव नाही जेवलेला" असंय ते.
http://www.raaga.com/channels/marathi/moviedetail.asp?mid=ma000214
पुढचा भावार्थ अर्थातच चूक.

अकरावे, मुझे जीने दो मधले गाणे : 'मांग में भर ले रंग सखी री' असे आहे.
धर्मकन्यातले गाणे देवाला उद्देशून नसून पोसता येत नसतानाही मुलांना जन्म देणार्‍या आईवडिलांना उद्देशून असावे. मुलांना उपाशी झोपायला लागल्याने खंतावलेली आई(हंसा वाडकर) या गाण्यात दिसते.

मस्त आहे कल्पना, दिनेशदा. बरीचशी गाणी कधी ऐकलीही नाहीयेत. आता या लेखामुळे ऐकेन. लिंक्स असतील तर प्लीज द्या.

'निगाहे मिलाने को जी चाहता है' हे ही असंच कठीण गाणं. आशाताईंनी या गाण्याचं सोनं केलंय.

आशाची, माझी आवडती मराठी गाणी:
१. दिन तैसी रजनी (हे गाणं स्वतःशी गुणगुणायलाही येत नाही)
२. हरीनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
३. बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले (चित्रपटः सर्वसाक्षी, पडद्यावर स्मिता पाटिल. Happy )
४. या रावजी, तुम्ही बसा भावजी

अजुन, आठवली कि लिस्ट अपडेत करेन. Happy

छान लेख दिनेशदा.
शांकली +१
आशाची अजून काही आवडती गाणी -
१) मुझे रंग दे
२) दिल चीज क्या है
३) रुपेरी वाळूत माडांच्या बनात
४) ही वाट दूर जाते
५) चांदण्यात फिरताना
६) जिवलगा राहिले रे
७) गेले द्यायचे राहूनी
८) केव्हातरी पहाटे
तीसरी कसम मधलं - पान खाये सैया हमार
शिवाय ओ पी - आशा ची सगळीच गाणी.
सुरुवातीच्या काळात सगळी हिरॉईनची गाणी लताला तर व्हॅम्प/साईड हिरॉईन ची आशाला आली.तरीही तिने त्या गाण्यांचे सोने केले.

लेख आवडला! हा लेख वाचल्यापासून.. अकेली हूँ मैं पिया आओ मधलं ते आ चा ठसका कानात घुमतोय..
काही गाणी ओळखीची तर काही न ऐकलेली आहेत माझ्यासाठी..

सदाबहार आवाजाची ही गायिका.. तिच्या गाण्याबद्द्ल किती सांगावं ते अपूरच.. Happy

दिन तैसी रजनी (हे गाणं स्वतःशी गुणगुणायलाही येत नाही)>> अगदी अगदी जिप्सी..

०२ : या गाण्याचे शब्द आहेत - गुलजार गुलछडी नटुन मी खडी खडी नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा- ग बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा

रैना, क्षमा कसली ? नाही आवडला, नाही आवडला Happy

खरं तर प्रतिसादातून आणखी गाणी कळतील अशी अपेक्षा होतीच.

काल संदर्भ तपासायचे राहिले, आणि घाईत तसाच पोस्ट झाला.
तपशीलातल्या सुधारणा केल्या आहेत. खरं तर ही सगळी गाणी घरी राहिलीत, ( सध्या नाहीत इथे )त्यांची आठवण काढूनच लिहिले होते.

मामी, यावेळी भेट झाली तर एम पी ३ देतो सगळ्या गाण्यांच्या.

मला पण पायजेत!!!...................... (एम पी ३)

मी ही अशी भोळी कशी गं,
भोळी खुळी, मी लाजले,
जे मला वाटले, ते राहिले माझ्याचपाशी..

आणखी एक अवीट गोड आणि दुर्मिळ गाणं. माझं आवडतं.

आशाची, माझी आवडती मराठी गाणी:
१. पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे
२. जिवलगा राहिले रे
३. गेले द्यायचे राहूनी
४. केव्हातरी पहाटे
५ नाही खर्चिली कवडी दमडी... विकत घेतला श्याम
६.थकले रे नंदलाला
७.सखी गं मुरली मोहन मोही मना,
८.मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे'
हिंदीतील कित्येक!
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है

Pages