भांडार हुंदक्यांचे....!

Submitted by अभय आर्वीकर on 7 June, 2013 - 09:23

भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी

खस्ताच जीवनाचा पाया रचून गेल्या
आयुष्य ठोस केले कलदार आसवांनी

अश्रू कठोर-जिद्दी होताच निग्रहाने
भिरकावली निराशा तडिपार आसवांनी

बाबा तुझ्या स्मृतींचा केला पुन्हा उजाळा
फोडून हुंदक्यांचे भांडार आसवांनी

जे द्यायचेय ते दे, जादा नकोच काही
छळणे नकोच नशिबा हळुवार आसवांनी

जा सांग 'अभय' त्याला की त्याग आत्मग्लानी
बरसून दे म्हणावे अंगार आसवांनी

                                     - गंगाधर मुटे 'अभय’
-------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सर
अगदीच जान कुर्बान !!!!

मजा आला सर
फार भारी वाटते आहे ही गझल वाचून

धन्स !!

जे द्यायचे ते दे, जादा नकोच काही<<<असे वाचले वृत्तासाठी...चू भू द्या घ्या

मुटे साहेब कविता आवडली. खर तर कविता हा आमचा प्रांत नाही पण आपली कविता आवडली. आसवांचे अनेक अर्थ ल्यालेली कविता.

<<< बाजार, बेजार इत्यादी >>>

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

काफ़िया गंडतोय का?

बाजार, बेजार इत्यादी<<<<<

बहुधा त्या दोन्हीतील एक काफिया बदलून अधिक सशक्त अर्थ प्राप्त करून देणारा असा काफिया हवा होता बहुतेक असे काहीसे बेफीजी म्हणत असावेत

सहजच जे सुचले ते लिहिले चुकीचे वाटत असल्यास फार विचार करू नये ही विनंती

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी>>>
आवडले..

'जार" हीच न बदलणारी अक्षरे दोनही काफियात आल्याने (म्हणजे मतल्यातच असे झाल्याने ) जरा कन्फ्यूजिंग वाटते असे काही आहे का
त्या अक्षरांच्या आधीच्या अक्षरावर अलामत हवी असे काही .....

पण ज्या अक्षरावर अलामत आपण घेणार असू (मात्रेवर) ते व्यंजन समानच राखले तर चालणार नाही का ?
(कारण या बाबतीतला नियम माझ्यातरी ऐकीवात नाही )

म्हणजे याच उदाहरणात आसवांनी ही रदीफ आहे
बाजार -बेजार हे शब्द काफिये असणार मग दोन्ही शब्दात ब हे पहिले अक्षर ... एकात ए एकात आ हा स्वर म्हणजे ती अलामत नसणार असा कयास मी लावला मग पुढे दोन्ही शब्दात जा हे अक्षर त्यावर आ हाच समान स्वर !...मग मी त्यालाच मानले की ही अलामत असावी पुढे र हे अक्षर न बदलणारे मानले

मग उर्वरीत गझलेतही असेच पाळले गेले आहे का हे पाहिले

Happy

चू भू दे घे Happy

मतल्यात 'बाजार' आणि 'बेजार 'यांमध्ये 'जार' ही अक्षरे समान आहेत.
पण खालच्या शेरांतील काफिये (जसे की -आधार ,दिलदार, जलधार ) पाहता असे वाटते की , अलामत 'आ' असायला हवी .(कारण या काफियांमध्ये 'र' हे समान अक्षर आहे. ) .पण मतल्यातून मात्र ती स्पष्ट होत नाहीये.
मतल्यातच बेजार ऐवजी अभिसार, एल्गार इत्यादी प्रकारचे काफिये योजल्यास अलामत भंगणार नाही.
नवोदित असल्याने समजुतीप्रमाणे लिहिले आहे . चूक- भूल द्यावी घ्यावी.
Happy

गझल उत्तमच.

मी बेफिंच्या उत्तराची वाट पाहत आहे<<<

१. बेजार व बाजार हे काफिये मतल्यात, गझलेच्या बाराखडीतील नियमानुसार असू नयेत / असू शकत नाहीत. यात अलामत काय गृहीत धरायची हा प्रश्नच मुळात गैर आहे. यात अलामत भंगलेली आहे. 'जार' हे समान असताना त्याआधीच्या अक्षराचा स्वर हा समानच असायला हवा होता / हवा असतो. तसेच, ते केल्यानंतर पुढील प्रत्येक शेरात काफियामध्ये 'जार' हीच अक्षरे यायलाच हवीत. तसे काफिये उर्वरीत गझलेत आलेले नाहीत.

२. हे सगळे लिहून तेच तेच बाराखडीचे विषय रेटण्यात विशेष स्वारस्य यासाठी नव्हते की येथे तुमच्यासहितच कोणीच इतके नवोदीत नव्हे की अगदी अलामत म्हणजे काय येथपासून सुरुवात व्हावी. त्यामुळे निव्वळ मुद्दा लिहिला. तुम्ही स्वतः अनेक गझला व गझलतंत्रातील रचना केलेल्या आहेत. ही बाब तुम्हाला ठाऊक नाही असे नाही, किरकोळ नजरचुकीची बाब आहे. त्यामुळे माझा मुद्दा त्वरीत लक्षात येईल हे मी गृहीत धरलेले होते.

३. एवढे करूनही, निव्वळ मतल्यात अलामत भंगल्यामुळे इतर गझलेत काही अर्थच उरत नाही असे तर मुळीच नाही. शेवटी काव्यप्रकाराचे नियम (लिखित / अलिखित पण सर्वानुमते पाळले गेलेले) हे काव्यप्रकाराच्या सुशोभिकरणासाठी किंवा परिणामकारकता वाढवण्यासाठी असतात हे ढोबळमानाने मान्य व्हावे. त्यामुळे अगदी एक अलामतीचाच मुद्दा पुढे रेटावा असेही मला वाटले नाही म्हणून थोडक्यात लिहिले होते. अजुन तरी आपण सगळेजण भटसाहेबांची बाराखडी तंतोतंत पाळण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतो ही बाब सुखद आहे व ते आपण करत राहायला हवे असे वाटते. यातून गझलतंत्राची एक किमान शुद्धता अबाधित राहील असे वाटते.

४. बाकी या गझलेबाबत म्हणाल तरः

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी - शेर आवडला.

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी - जुना खयाल / येऊन गेलेला खयाल! अभिव्यक्तीनावीन्य आहे.

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी - वेगळा खयाल, पण आसवांना झुंजार म्हणणे मनात पटत नाही.

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी - अभिव्यक्ती चांगली पण सपाट खयाल!

खस्ताच जीवनाचा पाया रचून गेल्या
आयुष्य ठोस केले कलदार आसवांनी - पहिली ओळ चांगली. शेर वर्णनात्मक, कथनात्मक!

अश्रू कठोर-जिद्दी होताच निग्रहाने
भिरकावली निराशा तडिपार आसवांनी - काफियानुसारीत्व! सपाटपणा!

बाबा तुझ्या स्मृतींचा केला पुन्हा उजाळा
फोडून हुंदक्यांचे भांडार आसवांनी - चांगला शेर! 'बाबा' या शब्दाने अनावश्यक जातीयवाद डोकावू शकत आहे.

जे द्यायचेय ते दे, जादा नकोच काही
छळणे नकोच नशिबा हळुवार आसवांनी - अभिव्यक्तीत गफलत झाल्यामुळे खयाल थेट न येणे!

जा सांग 'अभय' त्याला की त्याग आत्मग्लानी
बरसून दे म्हणावे अंगार आसवांनी - मक्त्यातील तखल्लुसचे नैसर्गीक वजन 'लगा' असे आहे, त्यामुळे अडखळल्यासरखे होत आहे. तसेच, तखल्लुसचा वापर चपखल झालेला नाही. शेर 'रचायचा' म्हणून रचल्यासारखा झाला आहे असे माझे मत!

एकुणः

१. गझल तुमच्या शैलीतील सामाजिक विषयांना तोंड फोडणारी आहे.

2. मुशायर्‍यात सादर करण्यास अश्या गझला योग्य ठरतात.

३. रसिकाने गुंगावे, अंतर्मुख व्हावे असा शेर सापडला नाही. (सापेक्ष मत)

४. मतल्याबाबत चर्चा झालेलीच आहे

५. दुसर्‍या शेरातील खयाल हजारोवेळा येऊन गेलेला असल्याने माझ्यामते तो शेर चर्चेस पात्र नाही.

परखड मतासाठी क्षमस्व!

पुढील गझलेस शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

<<<<<< बेजार व बाजार हे काफिये मतल्यात, गझलेच्या बाराखडीतील नियमानुसार असू नयेत / असू शकत नाहीत. यात अलामत काय गृहीत धरायची हा प्रश्नच मुळात गैर आहे. यात अलामत भंगलेली आहे. 'जार' हे समान असताना त्याआधीच्या अक्षराचा स्वर हा समानच असायला हवा होता / हवा असतो. >>>>>

मला असे वाटते की, याचे नेमके उत्तर सुरेश भट लिखीत बाराखडीत नाही. अलिखित पण सर्वानुमते पाळले गेलेल्या नियमापैकी हा नक्कीच असावा, त्यामुळेच अशा तर्‍हेची अलामत माझ्याही वाचण्यात/पाहण्यात आलेली नाही. मात्र
बेजार व बाजार हे काफिये मतल्यात, का असू नयेत, याचे मात्र नेमके उत्तर अजून मला मिळालेले नाही. अलिखित पण सर्वानुमते पाळले गेलेला या उत्तराने गझलकारावर दबाव येतो पण प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकीच राहते.

या हिशेबाने वैवकुंची वरिल पोस्ट चांगली आहे. तेच माझेही मत आहे.

<<<<< पण ज्या अक्षरावर अलामत आपण घेणार असू (मात्रेवर) ते व्यंजन समानच राखले तर चालणार नाही का ?
(कारण या बाबतीतला नियम माझ्यातरी ऐकीवात नाही )
.
म्हणजे याच उदाहरणात आसवांनी ही रदीफ आहे
बाजार -बेजार हे शब्द काफिये असणार मग दोन्ही शब्दात ब हे पहिले अक्षर ... एकात ए एकात आ हा स्वर म्हणजे ती अलामत नसणार असा कयास मी लावला मग पुढे दोन्ही शब्दात जा हे अक्षर त्यावर आ हाच समान स्वर !...मग मी त्यालाच मानले की ही अलामत असावी पुढे र हे अक्षर न बदलणारे मानले
>>>>

असो. मी आणखी तपास घेणार आहे. नंतर गरज पडल्यास मतला बदलने कठीण नाही.

ना दाविला जगाला शृंगार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

किंवा

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
शय्यागृहात केला भडिमार आसवांनी

किंवा याला अनेक पर्याय मिळू शकतील.
मात्र

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

या शेराची बरोबरी पर्यायी शेर करू शकतील, असे वाटत नाही.

मला असे वाटते की, याचे नेमके उत्तर सुरेश भट लिखीत बाराखडीत नाही. अलिखित पण सर्वानुमते पाळले गेलेल्या नियमापैकी हा नक्कीच असावा, त्यामुळेच अशा तर्‍हेची अलामत माझ्याही वाचण्यात/पाहण्यात आलेली नाही. मात्र
बेजार व बाजार हे काफिये मतल्यात, का असू नयेत, याचे मात्र नेमके उत्तर अजून मला मिळालेले नाही. अलिखित पण सर्वानुमते पाळले गेलेला या उत्तराने गझलकारावर दबाव येतो पण प्रश्नाचे उत्तर मिळणे बाकीच राहते.

या हिशेबाने वैवकुंची वरिल पोस्ट चांगली आहे. तेच माझेही मत आहे.<<<

हे व असेच वाद सुरू होतात म्हणून थोडक्यात आटोपले होते. तूर्त असे म्हणावे लागेल की बाराखडी नीट वाचा, पण तसे थेट म्हणणे उर्मटपणाचे वाटेल म्हणून सौम्य पर्याय हा की भटसाहेबांच्या बाराखडीत हे व्यवस्थित नोंदवलेले आहे. मान्य करणे, न करणे, कवीचे स्वातंत्र्य म्हणून काही वेगळे करणे हे सगळे ज्याच्यात्याच्यापाशी!

-'बेफिकीर'!

<<< हे व असेच वाद सुरू होतात >>>

जिज्ञासेपोटी होणारी चर्चा आहे. वरिल कोणतीही पोस्ट वादग्रस्त आहे, असे मला वाटत नाही.

<<< भटसाहेबांच्या बाराखडीत हे व्यवस्थित नोंदवलेले आहे .>>>

नक्की वाचतो. पण सध्या सुरेशभट डॉट इन संकेतस्थळ बंद आहे.

जेष्ठ गझलकार श्री मिलिंद फणसे यांनी अन्य एका संकेतस्थळावर नोंदविलेले मत.

काफिया / अलामत ही एक 'ग्रे एरिया' आहे.

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

काहींच्या मते बाजार-बेजार घेतल्यावर '-जार' काफिया होतो व बा-बे ही अलामतीतून घेतलेली सूट आहे. हे मान्य केल्यास पुढे येणार्‍या शेरांतील -धार, -दार, -जार, -भार इत्यादी काफियेच चुकलेत असे म्हणावे लागेल. अर्थातच तुम्ही ह्या विचारसरणीस अनुसरून गझल रचलेली नाही. दुसर्‍या मतप्रवाहानुसार संबंधित शब्दाचे शेवटचे अक्षर हेच काफिया असते व त्याआधी येणारा स्वर हा अलामत. त्यानुसार ह्या गझलेत 'र' काफिया व 'आ' स्वर अलामत आहे. मतल्यात बाजार-बेजार जोडीतील 'जा' महत्त्वाचा नसून त्यातील 'आ' हा स्वर अलामत म्हणून ग्राह्य धरायचा. हे मानल्यास ह्या गझलेत अलामत भंगलेली नाही. अशा स्वरूपाची काही उदाहरणे देतोः

१)
फूल थे बादल भी था और वो हसीं सूरत भी थी
दिल में लेकिन और ही एक शक्ल की हसरत भी थी

जो हवा में घर बनाये काश कोई देखता
दश्त में रहते थे पर तामीर की आदत भी थी

कह गया मैं सामने उसके जो दिल का मुद्द्‌आ
कुछ तो मौसम भी अजब था कुछ मेरी हिम्मत भी थी

अजनबी शहरों में रहते उम्र सारी कट गयी
गो ज़रा से फासले पर घर की हर राहत भी थी

क्या कयामत है 'मुनीर' अब याद भी आते नहीं
वो पुराने आशना जिन से हमें उल्फत भी थी

- मुनीर नियाझी

पहिल्या विचारसरणीनुसार मतल्यातील "सूरत - हसरत"चा '-रत' काफिया मानला तर कवीने 'सू'-'हस' अशी अलामतीतून सूट घेतली आहे असे मानावे लागेल. परंतु पुढील शेरांमधले आदत, हिम्मत, राहत, उल्फत हे '-रत' काफियात बसत नाहीत. त्यामुळे 'त' काफिया व त्याआधी येणार्‍या 'र'चा 'अ' स्वर अलामत आहे हे उघड आहे.

२)
चांदनी को रुसूल कहता हूँ
बात को बाउसूल कहता हूँ

जगमगाते हुए सितारों को
तेरे पैरों की धूल कहता हूँ

जो चमन की हयात को डस ले
उस कली को बबूल कहता हूँ

इत्तेफाकन तुम्हारे मिलने को
ज़िंदगी का हुसूल कहता हूँ

आप की साँवली सी सूरत को
ज़ौकेयज़दाँ की भूल कहता हूँ

जब मयस्सर हो साग़र-ओ-मीना
बर्कपारों को फूल कहता हूँ

- सागर सिद्दीकी

इथे मतल्यात "रुसूल-बाउसूल" असा '-सूल' असला तरी नंतरच्या शेरांवरून गझलेत 'ल' काफिया व 'ऊ' स्वर अलामत आहे हे कळते.

३)
जब मेरी हकीकत जा जा कर उन को सुनाई लोगों ने
कुछ सच भी कहा कुछ झूठ कहा कुच बात बनाई लोगों ने

ढायें हैं हमेशा ज़ुल्म-ओ-सितम दुनिया ने मुहब्बतवालों पर
दो दिल को कभी मिलने न दिया दीवार उठाई लोगों ने

आँखों से न आँसू पोंछ सके होठों पे खुशी देखी न गई
आबाद जो देखा घर मेरा तो आग लगाई लोगों ने

तनहाई का साथी मिल न सका रुसवाई में शामिल शहर हुआ
पहले तो मेरा दिल तोड दिया फिर ईद मनाई लोगों ने

इस दौर में जीना मुश्किल है ऐ 'अश्क' कोई आसान नहीं
हर एक कदम पर मरने की अब रस्म चलाई लोगों ने

- इब्राहिम अश्क

ह्या गझलेत मतल्यात "सुनाई-बनाई" असले तरी काफिया '-नाई' नसून केवळ 'ई' आहे व अलामत 'आ' स्वर आहे हे नंतरच्या शेरांवरून स्पष्ट होते.

४)
वरील उदाहरणांवरून जर असे ठरवले की केवळ अंतिम अक्षरच काफिया होते तर खालील ग़ैर-मुरद्दिफ गझल त्या नियमाला छेद देते.

फूलों की टहनियों पे नशेमन बनाइये
बिजली गिरे तो जश्न-ए-चरागाँ मनाइये

कलियों के अंग अंग में मीठा सा दर्द है
बीमार निकहतों को ज़रा गुदगुदाइये

कब से सुलग रही है जवानी की गर्म रात
ज़ुल्फ़ें बिखेर कर मेरे पहलू में आइये

बहकी हुई सियाह घटाओं के साथ साथ
जी चाहता है शाम-ए-अबद तक तो जाइये

सुन कर जिसे हवास में ठंडक सी आ बसे
ऐसी कोई उदास कहानी सुनाइये

रस्ते पे हर कदम पे खराबात हैं 'अदम'
ये हाल हो तो किस तरह दामन बचाइये

- अबदुल हमीद अदम

ह्यात सकृतदर्शनी जरी मतल्यातील "बनाइये-मनाइये"मधला '-इये' हा काफिया व 'आ' स्वराची अलामत असल्याचे दिसत असले तरी असेही म्हणता येईल की '- ये' काफिया आहे व 'इ' अलामत आहे.

तेव्हा, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काफिया नक्की कशास म्हणावे हा चर्चेचा विषय आहे. ह्यावर एकमत दिसत नाही.
------------------------------------------------
मिलिंद फणसे सर, अत्यंत महत्वाची माहिती देऊन सविस्तर विवेचन केल्याबद्दल खूप धन्यवाद - गंगाधर मुटे

भांडार हा शेर आवडला.

पंचनामा हा शेरसुद्धा बरा वाटला पण दिलदार हाच काफिया का? असे वाटले.

सुटी घ्यावात पण एक्स्ट्रॉर्डीनरीली एक्सेप्श्नल शेर असल्यास!

सर्वप्रथम मी बेफीजींची व सर्व गझल प्रेमींची सपशेल माफी मागतो मला क्षमा करा

मुळात हा अश्या अलमतीचा मुद्दा मला अनेक दिवस भेडसावत होताच व मी इथे प्रतिसाद देताना जरा "उद्दामपणा " नाही ...पण "मुद्दामपणा " मात्र केला
दुसरी बाब म्हणजे अपूरे ज्ञान

मी लिहिलेला प्रतिसादातला मुद्दा मला व्यक्तिशः पटायचा म्हणून मी उपस्थित केला होता तसा मी तो अजूनही पूर्णपणे सोडून दिला नसला [ हेतू : स्वत:च्या बाजूने अधिक चिंतन मनन संशोधन करणे व मग ती बाब मनात पक्की करणे ]...तरी बेफीजींनी मला वैयक्तिक भेटीत जे मुद्दे पटवून दिले ते मला जास्त योग्य वाटले
म्हणजे माझा मुद्दा मला अगदीच चुकीचा वाटत नसला तरी बेफीजींचा मुद्दा मला नेमका बरोबर वाटतो

जार - जार ची मजा पुढच्या काफियांमधून यायला हवीच... जर मतल्यातच आपण असे करणार असू
आणि अलामत त्याच्या आधीच्याच अक्षरावर असणे रचनेला जास्त आल्हाददायक बनवते हे खरे आहे

नाहीतर मग बेजार बाजार असे मतल्यात आल्यावर झुंजार जार शेजार गोंजार असे काफिये घेवून पळवाटा काढता येतीलही पण असे करता येते याच एका उद्देशाने म्हणून केले तर मग गझलला फालतूपणा येईल असे मला आता वाटते आहे

माझा मुद्दा व बेफीजींचा मुद्दा यात दोनही मुद्दे मला स्वीकारार्ह वाटत असले तरी मी व्यक्तिशः माझ्यावर दोन्ही पैकी एक निवडायची वेळ आलीच तर बेफीजींच्या मुद्द्यास प्राधान्य देईन कारण तो मुद्दा गझलेला जास्त सुंदर बनवतो !!

माझे बाष्कळ बडबडणे ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद

माझ्या या अगोदरच्या प्रतिसादामुळे चर्चेला (वादच तो ) तोंड फुटले यास्तव पुन्हा आपली माफी मागतो आणि थांबतो

धन्यवाद

~वैवकु