अंडा करी

Submitted by नंदिनी on 27 May, 2013 - 00:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

उकडून सोललेली अंडी ४ ते ६.
मध्यम कांदा उभा चिरलेला
टोमॅटो बारीक चिरून
आले लसून पेस्ट
गरम मसाला १ चमचा अथवा किचन किंग मसाला १ चमचा
नारळाचे दूध २ ते ३ वाटी. त्यामधे घट्ट नारळाचे दूध अर्धी वाटी हवं.
कुटलेली मिरी १ चमचा
कढीपत्ता २ ते ३ टहाळ्या
तेल, मोहरी, मीठ, लाल अथवा हिरव्या मिरच्या.

क्रमवार पाककृती: 

तेल चांगले तापवून त्यामधे कढीपत्त्याची १०-१२ पाने घालून चांगले तळून घ्या. ही पाने बाहेर काढून बाजूला ठेवून द्या.
उरलेल्या तेलामधे मोहरी घाला, ती तडतडली की कांदा घालून चांगले ५ मिनिटे परतून घ्या. मग उरलेला (निम्मा) कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट घालून परता.
मग त्यावर टोमॅटो घालून परत पाचेक मिनिटे परता.
आता यामधे नारळाचे पातळ दूध घालून ढवळा. (घट्ट दूध आताच घालायचे नाही.) दहा मिनिटे हे चांगलं मीडीयम आचेवर उकळल्यावर त्याम्धे सोललेली अंडी घाला.
एकदा पुन्हा उकळी आल्यावर त्यामधे मीठ, गरम मसाला, उरलेला कढीपत्ता, कुटलेली मिरी घाला.
आता नारळाचं घट्ट दूध घालून मिनिटभर मंद आचेवर शिजवणे.

वाढायला घेताना आधी तळून ठेवलेला कढीपत्ता सजावटीला वापरा. कोथिंबीर मात्र घालू नये.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी.
अधिक टिपा: 

अशीच सेम चिकन करी पण बनवतात, पण मला अंडा करी जास्त आवडली.
ग्रेव्ही अगदी सौम्य आणि रंगाला क्रीमी होते. यामधे शक्यतो हळद घालू नका.
कढीपत्ता जर ताजा असेल तर त्याची चव एकदम मस्त येते.
अंडं न खाणार्‍यांनी बटाटे, पनीर वगैरे व्हर्जन्स बनवायला हरकत नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
सेल्व्ही आणि इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, फोटो तुम्हीच टाका. Happy

योगेश, पावडरीचे कोकोनट मिल्क वापरण्यापेक्षा डाबर होममेडचं रेडीमेड कोकोनट मिल्क वापरा. त्या पावडरीने दोन तीन वेळा डिझास्टर केलेत माझ्या किचनमधे.

वेगळी पध्दत. छान आहे ही देखिल.

मी तेलावर मोहरी, हिंग मग टोमॅटो घालून झाकण ठेऊन शिजवून घेते. मग त्यात उकडलेल्या बटाट्याचे चौकोनी तुकडे, मीठ, तिखट (हळद नाही), थोडी आलं-लसणीची पेस्ट आणि तळला मसाला* घालून परतते. मग त्यात हवं तितकं पाणी आणि नारळाचं दूध घालून छानसं भरपूर उकळून देते. थोडं पातळच बरं. फारतर थोडे बटाटे कुस्करून ग्रेव्ही जाड करून घ्यायची.

जेवताना उकडलेल्या अंडं मधोमध उभं कापून वाटीत घालून त्यावर ही करी घ्यायची न गरमागरम चपातीबरोबर खायची. हीच सेम ग्रेव्ही शिंपल्यांच्या कालवणाकरताही वापरतात.

आजच करतेय. फोटो टाकेन नंतर.

* तळला मसाला : सुकं खोबरं किसून भाजून, कांदे उभे कापून तेलावर चांगले कॅरॅमलाईज्ड होईपर्यंत खरपूस भाजून मग हे दोन्ही जिन्नस मिक्सरमधून बारीक वाटून ठेवायचे. पाणी घातलं तर फ्रीजरमध्ये नाहीतर साध्या फ्रीजमध्ये. हा खास सीकेपी मसाला आहे. पण माझ्याकडे नॉनव्हेज नसल्यामुळे याला फारसा उठाव नसतो. म्हणून जास्त टिकवण्याकरता मी कांदा घालतच नाही. नुसतंच सुकं खोबर भाजून वाटते. चालतं तसंही.

वेगळी पध्दत. छान आहे ही देखिल.

<<< दाक्षिणात्य पद्धत. Happy नारळाचे दूध आयते तयार असेल तर या ग्रेव्हीला जास्त खटपट करावी लागत नाही. आमच्याकडे सकाळ सकाळ एक बाई "अग्यम्यम अग्यम्यम" असं ओरडत येते. तिला एकदा हाक मारून नक्की काय अगम्य विकत आहे याचा शोध घेतल्यावर ती सकाळीच केरळी ब्रेकफास्ट इडियाप्पम आणि पुट्टू विकत येते असं समजलं. चवीसाठी म्हणून मी तीन चार इडीयाप्पम घेतले; त्यावर थोडं टोमॅटो सॉस किंवा लोणचं घालून खायचा विचार होता. थोड्या वेळाने सेल्व्ही आल्यावर तिने "इडियप्पाम घेतलेत होय, मग त्यासाठी अंडा करी बनवते" असं मला (तमिळमधून) सांगितलं. मला त्यातले इडियाप्प्पम आणि मुट्ट करी (अंडा करी) एवढंच समजलं. मग तिने नारळ आणून तो फोडून खवणून वगैरे ही करी बनवली (तोवर मी माबोवर टीपी करत असल्याने) तिने नक्की कशी ग्रेव्ही बनवली ते समजलंच नाही. पण चवीला मात्र मला बेहद्द आवडली. नंतर सेम ग्रेव्ही चिकन घालून बनवली, ती इतकी आवडली नाही.

मग सेल्व्ही मधे दोन तीन महिने काम सोडून गेली, परत कामावर आल्यावर तिला अंडा करी बनव म्हटल्यावर तिने वेगळ्याच पद्धतीने बनवली. मग काल तिला परत "त्या दिवशी बनवली होतीस तशी इडियाप्पमसोबत ग्रेव्ही बनव" असं (तमीळमधून मोठ्या मुश्किलीने) सांगितलं आणि नेमकं समजलं तिला. आणि मग मी माबो वर टीपी करत करत ती काय करते ते बघून रेसिपी लिहिली.

म्हणून आज ही रेसिपी लिहिता आली. Happy

ती सकाळीच केरळी ब्रेकफास्ट इडियाप्पम आणि पुट्टू विकत येते >>> इथे पाठवून दे ना. लै लै आवडतं मला. पुट्टु आणि त्या बरोबर ती केरळी हरभर्‍याची आमटी. यम्मी!!!

नेक्स्ट टायमाला सेल्वीच्या पद्धतीनं करून बघणार. Happy

मस्त रेसिपी. परवाच अंडा करी करून झालीये, म्हणून पुढच्यावेळी अशाच पद्धतीने बनवेन Happy

हळद न घालण्याचं काय कारण ?

सेल्वी एकदम फंडू कूक दिसतेय , अजून काय काय बनवते ती ? Wink

संपदा, कलर चेंज होतो म्हणून, हळद्-लाल तिखट नको असं सेल्व्ही म्हणते.

सेल्व्ही तिच्या पद्धतीने अजून बरंच काही बनवते, पण पोळीभाजी कर म्हटलं की तिला वैताग येतो. लंचडिनरला तुम्ही टिफिन आयटम्स का खाता असं मलाच विचारते. आता तिच्याकडून एक एक रेसिपी शिकून घेऊन इथे टाकत जाईन.

तिच्या हातचं चिकन चेट्टीनाड ऑस्सम असतं. Happy

ना.दु करून घेणं ही एक कुटाण्याची कुणी मला करून देणार असेल तर मी अर्ध्या पायावर तयार आहे ही रेसिपी करायला. डाबरचं रेडिमेड नादू इथे अजून दिसलं नाहीये मला

@ वरदा : नादू करत बसण्यापेक्षा त्या नादी न लागलेलेच बरे? Wink

ना.दु. बद्दल एक शंका.
शहाळ्यातले कोवळे खोबरे डायरेक्ट मिक्सरमधे फिरविले, तर जे बनेल त्याला नारळाचे दूध म्हणून वापरता येईल काय?

<< कढीपत्ता २ ते ३ टहाळ्या >> हे वाचुनच वाटले, काहीतरी भन्नाट असणार. कढीपत्ता आणी नादु ने भन्नाट अंडाकरी बनणार यात शंकाच नाही. उद्या अंगारकी आहे त्यामुळे परवा बनवुन बघीतली जाईल.

वेगळी वाटतेय रेसिपी
मस्त लागेल चव

आमच्याकडे मामी ज्या पध्दतीने करते तस आई करते
अगदी त्या तळण्याच्या मसाल्यासकट

शहाळ्यातले कोवळे खोबरे डायरेक्ट मिक्सरमधे फिरविले, तर जे बनेल त्याला नारळाचे दूध म्हणून वापरता येईल काय?<<< नाही. कारण त्या कवळ्या खोबर्‍याची चव वेगळी अस्ते. Happy

नारळाचे दूध बिना खिटपिट काढण्यासाठी दोन एकात एक बसणार्‍या गाळण्या घ्यायच्या आणि लिंबू पिळायच्या यंत्रासारख्या वापरायच्या. एकदा घट्ट दूध काढून झालं की खोबरं परत पाणी घालून मिक्सरला फिरवायचं आणि परत गाळण्यांमधून पिळायचं, म्हणजे पातळ दूध मिळेल. ही आमच्या मंगलोरच्या रावआंटीकडून आलेली टिप. Happy