हळवी कातरवेळ

Submitted by मुग्धमानसी on 22 November, 2012 - 00:11

यमुनेकाठी रोज उतरतो कृष्ण वाजवीत पावा...
यमुनेच्या धारेला छेडीत राधा घेते धावा..

श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा
राधेचे प्रतिबिंब तयातून, मूर्तिमंत सोहळा

कृष्णाची बासरी आळवी 'राधा... राधा...' गीत
राधेच्या श्वासातून घुमते 'कृष्ण... कृष्ण..' संगीत

कुष्ण धावतो रेतीवरती, उमटतात पाऊले
राधा पळते सृष्टीवरती सांडत चांदणफुले

उष्ण श्वास अन् अधीर डोळे त्यात राधेचे बिंब
कृष्णाच्या डोळ्यात थेंब अन् तिकडे राधा चिंब

अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा

कातरवेळी रोजच राधा होई अशी बावरी
नेत्र सावळे, सृष्टि सावळी, सोनेरी बासरी

भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत

हीच अनामिक हुरहुर भरते आत आणि बाहेर
सांजवेळ मग होऊन जाते हळवी कातरवेळ

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ओळी सुंsssदरच उतरल्यात, काही ठिकाणी अर्थ नीटसा लागला नाही

श्रीरंगाला रंग अर्पूनी होई डोह सावळा

अवघ्या सृष्टिवरी पसरते मंतरलेली कळा
चंद्र जणू हो गोरी राधा गगन मुरारी निळा>> Happy

ग्रेट कविता आहे ही !!!
प्रतिसाद वाचले ....अशा कवितेत उणीवा शोधण्यात अर्थ नसतो !!अशी कविता वाचून फक्त एकच करावे त्या कवितेपुढे नतमस्तक व्हावे

___________/\____________

केवळ अप्रतिम.... केवळ अप्रतिम, मुग्धमानसी
भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत...

आता ह्यापुढे अजून काहीही वाचायचं नाही. (काही इतकं अतीव सुंदर, आतलं, गहन वाचलं की त्यापुढे त्यादिवशी अजून काहीही वाचायचं नाही... शक्यच नाही)

आवडली कविता.

---------------------------------------------------------

अवांतर...

श्यामल श्यामल मेघांसम का भरुन येती लोचन
राधिके येईल ग मोहन...राधिके येईल ग मोहन

गुपित सांगते राधे तुजला
तुझ्याविना ना चैन हरीला
याच घडीला, तव भेटीला
अधीर झाला असेल साजण

श्यामल श्यामल मेघांसम का भरुन येती लोचन
राधिके येईल ग मोहन...राधिके येईल ग मोहन

या गाण्याची आठवण झाली

----------------------------------------------------------

आहा ....
>>>भेटेना राधेला कान्हा जरी भरला सृष्टित
कृष्णाचे दशलक्ष हात पण राधा नाही कवेत <<< शब्दच संपले ! जिओ Happy

Happy