संधी होती पण..

Submitted by vaiju.jd on 30 April, 2013 - 14:10

॥ श्री ॥

(विवेकानंद केन्द्र, डोंबिवली यांनी घेतलेल्या समस्यापूर्ती स्पर्धेतली माझी प्रथम क्रमांकाची कविता )

समस्या – तेव्हाच संधी होती पण !
नोकरीच्या मुलाखतीत नापास झालेला
एक तरुण चौपाटीच्या कठड्यावर बसला,
त्याला तसा बसलेला पाहून
समोरच असलेला गर्दभ हसला
तरुण म्हणाला,
बाबा रे , असा हसू नकोस
जखमेवर मीठ चोळू नकोस
तुमचं आपलं बरं आहे
ज्याला बुद्धी कमीत कमी
त्याला काम मिळते आहे
नाही तर आम्ही?
घेऊन एवढाल्या डिगऱ्या
हिंडतो आहोत,
पण मिळत नाहीत नोकऱ्या
कसलंही काम करायला तयार
पण, विचारातच नाही कोणी यार!
काय देवाघरचा न्याय आहे?
हा तर शुद्ध अन्याय आहे.
गाढव म्हणाले,
कां रे बाबा आता का रडतोस?
‘त्या’च्या नावांनी का खडे फोडतोस?
आठवतं का,
ब्रह्मदेव जेव्हा वाटत होता बुद्धी,
अधाशीपणे जमवलीस कशी ती
मी रांगेत तुझ्या मागेच होतो
तुझा साठा पाहून अस्वस्थ होत होतो
माझा वाटा पाहून तू कसा हसला होतास?
आज मला हसू येतंय
त्या दिवशी अधाशीपणे अक्कल घेतलीस
त्यानेच पुढची वाट अडली
सारेच तुम्ही हुशार, सारेच पुढे पुढे धावणार!
धावता धावता हळूच शेजाऱ्याचा पाय ओढणार!
बुद्धीजीवी वर्गाचीच झालीय जाम गोची
निर्बुद्ध आमच्यासारखेच खरे सुखी!
आमच्यापासून कुणाला काय भीती?
असा विचार करून नोकरीला ठेवून घेती
आनंदात आम्ही करून काम
तुमचा मात्र आराम हराम!
आम्ही अल्पसंतुष्ट,
इमान इतबारे करतो कष्ट.
म्हणून आज बरे दिवस दिसतायत
तुमच्यासारखे रखडरखडतायत.
परिस्थितीवर नाही राहिला ताबा
आता कां रडतोस बाबा?
चांगली संधी आली होती
अधाशीपणाने गमावलीस तू ती
त्यादिवशीच ब्रह्मदेवाकडच्या रांगेत
जरा विचारानं वागला असतास,
तर आज सुखी असतास,
माझ्या जागेवर तू असतास,
माझ्या जागेवर तू असतास!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पटलं खरयं

आपण सारीच अकलेने वाढलेली माणसे आहोत... उगीचच..

सुखामध्ये यश शोधायचे तर यशामध्ये सुख शोधतोय..