रिक्षावाला - ३

Submitted by मुग्धमानसी on 24 April, 2013 - 06:42

एक गंभीर श्वास सोडून बर्वे उद्गारले - "कळलं मला!"
"काय कळलं साहेब?"
"जे कळायचं होतं ते कळलं. उतरा राजे..." ते तुषारकडे पाहून म्हणाले.
"का? मी का उतरू?" - तुषार साशंक आवाजात म्हणाला.
"मी सांगतोय म्हणून. उ त र!!!"
तुषारने चमकून एकदा बर्व्यांकडे पाहिलं. पण त्यांच्या आवाजाची धार जाणवून तो निमुटपणे रिक्षातून उतरला. त्याच्यामागून बर्वे उतरले.
"बसा आता आत. या ताईंकडे थांबा जरा. आणि हे सांभाळा..."
"हे काय आहे?"
"माझं पाकिट आणि काही महत्त्वाचे कागद. जपुन ठेव हं.... माझ्या पेन्शनचे पैसे आणि कागद आहेत त्यात. बाहेर पावसात भिजतील नोटा तर तुलाही नाही आणि मलाही नाही... या पावसाला सगळा लगदा समर्पयामी होईल उगा!"
"तुम्ही कुठे चाललात?"
"कार्ट्या... मी इथंच आहे. चाक बदलायला हवं ना? या आजोबांना मदत करतो. चला आजोबा... काढा स्टॅपनी. का स्टॅपनीलापण काही नाव ठेवलंयत तुम्ही?"
रिक्षावाले आजोबा आता प्रसन्न हसले. त्यांच्या त्या हसण्यात बर्वेंना आणि तुषारलाही जाणवली एक विलक्षण शांतता!
"विश्वासाची जागा विश्वासच घेऊ शकतो साहेब! स्टॅपनीचं नावसुद्धा चिश्वासच! चला..." म्हणून आजोबा बर्वेंच्या पाठीवर हात थोपटत त्यांना घेऊन कामाला लागले.

रिक्षात नीता आणि तुषार काहिसे अवघडून बसले होते. काही क्षण असेच गेल्यावर काहितरी बोलायचं म्हणून तुषार बोलला... "काळजी करू नका ताई... तुमचं बाळ व्यवस्थित असेल. तुम्ही आता लवकरच पोचणार आहात तुमच्या बाळापाशी..."
’ताई’ हा शब्द ऐकून नीताला का कोण जाणे... भरून आलं! तिच्या डोळ्यात पाणी पाहून तुषार भलताच गोंधळला. आपण नक्की काय चुकलो ते त्याला समजेना. बाई रडायला लागली की भले भले पुरुष गोंधळतात तिथे तो तर फारच कोवळा होता अजून. तसे मुलींचे काही तुरळक पुसट गोडसर अनुभव होते त्याच्या गाठिशी... पण नीता काही मुलगी नव्हती. मोठी होती. विवाहित... एका बाळाची आई!
"क... क्काय झालं? तुम्ही रडताय का? म... म्हणजे सांगायचं नसेल तर नका सांगू... पण रडू नका! प्लीज!"
नीता रडता रडताच हसली. "अरे नाही. तू ’ताई’ म्हणालास ना... ते आवडलं मला. मी तुला ’अरे तुरे’ केलं तर चालेल ना?"
"हो... चालेल की." तुषार मनात म्हणाला - ’आवडलं म्हणून रडू आलं? अजबच आहे. बरं झालं ’काकू’ म्हणालो नाही...’
"तूही मला ए ताई म्हण मग."
"म्हणतो... पण असं मानलेली बहीण-भाऊ वगैरे गोष्टींवर अजिबात विश्वास नाही हां माझा! पण तुम्हाला... तुला आवडतं तर म्हणतो."
नीता हसली. पण पुन्हा गंभीर झाली.
"तुला माहितीये... माझा नवरा... माझ्या बाळाचे बाबा... सैन्यात आहेत. तिथे लांब बॉर्डरवर असतात. सद्ध्या गुजरातच्या सीमेवर आहेत."
"काय सांगता? मला फार आवडतात सैन्यातली माणसं! काय त्यांचा रुबाब... ते ताठ चालणं... त्यांची शिस्त... मलाही जायचं होतं सैन्यात. पण नाही जमलं.... ते जाऊदेत! तुम्हाला भारी वाटत असेल ना... तुमचे मिस्टर मिलिट्रीत आहेत!"
"मग!!! एकदम भारी!"... नीता बोलली खरी.. पण तिचा आवाज काही तुषारला फारसा उत्साही वाटला नाही. काहिवेळ थांबून तुषार म्हणाला...
"तुमचे... म्हणजे तुझे मिस्टर नसतात ना मग इथे? मग घरी.. तुमच्या बाळापाशी..."
नीताने तुषारकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तुषारला कहितरी वेगळंच दिसलं या वेळेस. शुन्य... भकासपण... किंवा... किंवा किंचित वेडसर झाक.......?

तेवढ्यात बर्वे आणि रिक्षावाले आजोबा हात झटकत आलेच. दोघेही भिजले होते. रिक्षावाल्या आजोबांच्या पाढर्याणशुभ्र दाढीवर पावसाचे थेंब चमकत होते.
"काका तुम्ही बसा साईडला आता. मी मधे बसतो." तुषार बर्वेंना म्हणाला.
"ठिक आहे." म्हणत बर्वे रिक्षात बसले.
"आजोबा... जाऊदे आता रिक्षा सुसाट. पाऊसही बराच आटोक्यात आलाय. रस्ता सुद्धा मोकळा आहे..." - बर्वे म्हणाले.
"रस्ता असा मोकळा आणि अगदी आपल्याला हवा तसा क्वचित सापडतो नै साहेब! पण असा रस्ता मिळाला म्हणून आपली गाडी सुसाट पळवता येत नै ना! शेवटी रस्ता आपला नसतो... गाडी आपली असते! आपला वेग आपण ठरवायचा. नहितर काय ना.... या रस्त्यावर पार वाट्टोळं झालेल्या अशा कित्येक गाड्या असतील साहेब. रस्त्याला काय त्याचं? आणि घाई तरी कसली असते साहेब? गाडीतलं संयम संपायच्या आत आपण पोचलो की झालं!"
"गाडीतलं संयम?"
"डिझेल साहेब..."
"डिझेल म्हणजे संयम? व्वा! धन्य आहात तुम्ही आजोबा." बर्वेंनी कोपरापासून हात जोडले. सगळे हसले. रिक्षातला ताण आता बराचसा सुटला होता. रिक्षा तिच्या वेगाने पळत होती.

"ओ काका, तुम्हाला माहितीये? या ताईंचे मिस्टर आर्मीत आहेत." तुषार बर्वेंना म्हणाला.
"अरे वा! छान आहे." -बर्वे म्हणाले.
"हूं...." नीताने फक्त एक हूंकार भरला आणि मान रिक्षाच्या बाहेर वळवली.
तो विषय तिथंच संपला. किमान बोलण्यात तरी...

"ओ काका..." एकदम दचकून तुषार म्हणाला... "हे घ्या तुमचं पाकिट... आणि हे तुमचे कागद. विसरलो मी तर वांदे होतील. मोजून घ्या पैसे."
बर्वे हसले. पाकिट घेऊन खिशात टाकता टाकता म्हणाले... "विश्वास नव्यानं टाकायला शिकवलंय मला आत्ताच आजोबांनी... काय आजोबा...?" बर्वे खळाळून हसले... आणि रिक्षावाले पुन्हा एकदा मिशितल्या मिशित!
"का रे बाळा... चांगल्या घरातला दिसतोस तू... असं कपडे वगैरे फाटेस्तोवर कुठे फिरत होतास? आई-बाप कुठेत तुझे?" -बर्वेंनी आता तुषारला लक्ष्य केलं होतं.
तुषार शांतच बसला. उत्तर द्यायचे कष्ट त्याने अजिबात घेतले नाहित.
"का रे ए? बोल की... का तुला पाहिजे त्याच विषयावर बोलायचं सगळ्यांनी?"
"ओ काका... बाकी काहीही विचारा... माझ्या घरच्याविषयी बोलू नका. प्लिज." त्रासून तुषार म्हणाला.
"का रे? काय घर सोडून पळून वगैरे आलायस कि काय? आई-वडिलांशी भांडून?"
"तुम्हाला एकदा सांगितलं ना... मला माझ्या घराविषयी, आई-वडिल वगैरे विषयी अजिबात बोलायचं नाहिये!" तुषार आता जरा उग्र झाला.
"का रे? का नाही विचारायचं? एवढं काय पाप केलंय रे तुझ्या आई-वडिलांनी? कि तुला जन्म दिला हेच पाप? केवढ्या सहज आपल्या आईबापांना नालायक ठरवून मोकळे होता रे तुम्ही? म्हणजे त्यांनी जे केलं ते कर्त्यव्य... आणि तुम्ही जे करताय ते?.... तुमची मर्जी?"
"उगाच हे जुनंच तुणतूणं वाजवू नका हो काका. मी माझं काय ते बघून घेईन. आणि तुमचा मुलगा तुमच्याशी वाईट वागला म्हणून माझ्यावर राग काढू नका. त्याला जाउन द्या जे उपदेश द्यायचेत ते!"
कानफाटात मारल्यासारखे बर्वे गप्प बसले.

काही क्षण चमत्कारिक शांततेत गेले.
"माझ्या रिक्षाच्या मागच्या दोन चाकांची नावं ठावूक आहेत का साहेब?" - रिक्षावाला उगाचच मधेच बोलला.
"...." मागून काहिच उत्तर नाही.
"ओ साहेब... झोपले काय?"
"नाही. आम्हाला कसं ठावूक असणार काय नावं आहेत ते तुमच्या कल्पनाच्या मागच्या दोन चाकांची?" - तुषार कंटाळल्यासारखा बोलला.
रिक्षावाले आजोबा आता गदगदून हसले. "खरंच की. पण मी सांगू का?"
"सांगू नका म्हटलं तर गप्प बसणार आहात का? पुन्हा काहितरी अध्यात्म ऐकवायची हुक्की आली असेल..." तुषार चिडून बोलला.
"अध्यात्म कसचं साहेब? आपण कुणाच्या अध्यात ना मध्यात!" - स्वतःच स्वतःच्या विनोदावर खूष होऊन रिक्षावाले आजोबा जोरात हसले.
"तर बरं का साहेब... उजवीकडचं मागचं चाक आहे ना... त्याचं नाव ’प्रेम’. आणि डावीकडचं आहे ते ’श्रद्धा’!"
"वा वा! छान छान!"
"त्याचं काय आहे ना साहेब.. ही दोन चाकं विश्वासाच्या मागून आपोआप येतात असं आपल्याला वाटतं. पण तसं नसतं ना साहेब. या दोघांचं धावणं वेगळं. समोरून दिसत नसली तरी ही दोघंच प्रवाश्याला तोलून धरतात साहेब. ही दोघं व्यवस्थित नसतीत तर अशा गाडिचं चालणं आणि तिच्यात प्रवाश्याचं बसणं... एकदम डेंजर! बरं यातल्या एकावर अवलंबून नाही ना रहाता येत. एकजरी चाक धावत असताना निखळलं तर बोंबललं ना! दुसरं असून काय करणारे? पण आपल्या गाडीत ना.. हि दोन्ही चाकं अजूनतरी मजबूत आहेत साहेब. तुम्हाला त्यांचं धावणं दिसत नाही. पण प्रत्येक धावत्या गाडीला ही चाकं असावीच लागतात."
"हं...." - बर्वे म्हणाले. तुषार आणि नीता सुद्धा नकळत आजोबांचं बोलणं ऐकण्यात गुंतले होते.
"नुसतं प्रेम असून काही उपयोग नाही साहेब. श्रद्धा नसेल तर प्रेम आंधळं असतं. आणि प्रेमाशिवाय श्रद्धा असेल तर ती अंधश्रद्धा.... आंधळेपण वाईटच नै का? काय बाबा?" रिक्षावाल्याने पहिल्यांदाच तुषारला ’बाबा’ अशी हाक मारली आणि बर्वे आणि नीता... दोघांचेही लक्ष तुषारकडे गेलं. तो अंतर्मुख झालेला दिसत होता. ’बाबा’ अशी हाक ऐकल्यावर तो किंचित दचकला.

"मला काही म्हणालात का?" - तुषार
"मी? म्हणालो नाही हो... सांगितलं. म्हटलं पटलं का माझं बोलणं?" - रिक्षावाले आजोबा.
"अं.... हो. खरंय तुमचं." तुषार गप्प बसला. पण मनात वादळ उठलं होतं त्याच्या. डोळ्यांसमोर आली त्याची आई. त्यानं तिला हुसकायचा प्रयत्न केला... पण ती काही तिथून जाईना.

’बापाशी भांडून घराबाहेर पडलो तेंव्हा मागून खूप वेळ आईच्या हाका येत होत्या. आपण एकदाही मागे वळून पाहिलं नाही.’ - तुषार अस्वस्थ झाला. रिक्षात आता शांतता होती. कधी कधी भवतालची शांतता आरसा होते आणि आपल्या आतल्या गोंधळाचं प्रतिबिंब आपल्यालाच दाखवत राहते... बघणार्यापला दिसत राहते शांतता... पण त्या आरशात पाहणार्यापला दिसतो तो फक्त मुर्तीमंत कल्लोळ!!!
’पाळणाघरातल्या मुलांसोबत लहानपण कसं निघून गेलं कळलं नाही. आई संध्याकाळी तिथून न्यायला यायची. ती यायची वेळ झाली की आपण खिडकीत तिच्या वाटेकडे बघत रहायचो. बाबांचं तर कधी फारसं दर्शनच घडायचं नाही. कधी घरी यायचे.. कधी जायचे... आत्ता एवढे पैसे आहेत त्यांच्याकडे... ते त्यांनी तेंव्हाच मिळवले असावेत. त्यांना मुलाच्या बदल्यात पैसे मिळाले. मला मात्र बापही नाही... आई नाही... पैसा तर नकोच होता. माझ्याकडे उरले फक्त अप्पा! त्या म्हातार्याडने जीव लावला म्हणून प्रेम काय असतं ते कळलं. मग आता मी फक्त अप्पासाठीच घरी गेलो तर काय चुकलं माझं?
पण मग आईच्या त्या हाका.... आत्ता का आठवताहेत? बाबांकडे माझ्यासाठी नव्हता तसा आईसाठीसुद्धा वेळ नसावाच फारसा. त्या दोघांना एकत्र पहायला मिळायचं ते फक्त कुठल्यातरी पार्टीला एकत्र जाताना किंवा येताना.... तसं असेल तर...
मी मोठा झालो तसा घरी कमीच रहायला लागलो. दिवसभर हुंदडून घरी आल्यावर रात्री उशीरापर्यंत जागलेल्या आईचे तांबारलेले डोळे दिसायचे. पण तिचे प्रश्न आणि बडबड असह्य होऊन मी तिच्याच अंगावर वस्सकन ओरडून निघून जायचो. बाबांकडे पैसे उरले. माझ्याकडे अप्पा आणि अप्पांकडे मी... आईकडे काय उरलं?
मी कोण आहे? मी आत्ता जसा आहे त्याला जबाबदार कोण? कि मी फक्त शोधतो आहे माझ्या असं असण्यासाठी जवाबदार धरता येईल अशी एखादी जागा... एखादी व्यक्ती... पण म्हणजे मी जो कुणी आहे... तो मी योग्य नाही हे मान्य आहे तर मला...
अप्पांशी... तिच्या सासर्‍यांशी आई वाईट वागते म्हणून मला आई आवडत नाही.
एकदा आईला याचा जाब विचारला होता तेंव्हा आई संतापाने ओरडून म्हणाली होती... ’नखाएवढ्या तुला पाळणाघरात सोडून जायचे तेंव्हा कुठे होते हे? मला, माझ्या संसाराला गरज होती यांची... तेंव्हा कुठे होते हे? आता इतक्या वर्षांनी आले आहेत नातवावर हक्क सांगायला. आणि तू मला विचारतो आहेस... मी अशी का वागते... तुला नाही समजणार!’
तुषारचा गळा आता दुखायला लागला होता. काही झालं तरी डोळ्यातून पाणी येऊ द्यायचं नाही...
’आईवर प्रेम आहे माझं? असेल... पण श्रद्धा नाही! आणि अप्पांवर? नुसती श्रद्धा... पण प्रेम? आणि बाबा? प्रेम... श्रद्धा...’ तुषार पुरता गोंधळून गेला. भिजून पुन्हा तसंच वाळल्याने राठ झालेल्या केसांमधून हात फिरवण्याच्या निमित्ताने त्याने भरलेले डोळे टिपून टाकले.
अचानक रिक्षातली विचित्र शांतता असह्य होउन त्याने शेजारच्या बर्वेंकडे पाहिलं तर त्यांचेही डोळे ओले असल्यासारखं त्याला वाटलं. मग त्यानं उजवीकडे नीताकडे पाहिलं.... तिचे डोळे तसेच कोरडे... शुन्यात!
मग काय करावं न सूचून त्यानं रिक्षावाल्या आजोबांनाच विचारलं...
"ओ रिक्षावाले... कुठवर आलो आपण? अजून किती वेळ लागेल?"
"अजून अर्धा तास तरी लागेल साहेब. असं गप्प बसून राहिले सगळे तर वेळ कसा जाईल? काईतरी बोला कि राव..."

कमाल आहे... याला वाटतंय इथे सगळे गप्प बसलेत!
_______________________________

क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान लिहिलय्....भावनिक चढ उतार मस्त जमलेत्..आणि कल्पना ,विश्वास्,प्रेम, श्रद्धा जाम आवडलं..
तुमची कल्पनेची भरारी मस्त आहे...पुढिल भागाची वात बघतेय...

खुप सुंदर लिखाण आणि वेग.<<असा वेग हवायं>>>
आणि रिक्षाच्या नावांचा जर भावपुर्ण अर्थ समजायचा प्रयत्न केला तर डोहाच्या खुप खोलवर गेल्यासारखं वाटतयं.
पु.ले.शु.

पुन्हा एकदा मस्तच . कथाही आणी भाग टाकायचा वेगही Happy असच चालू द्य:):) >>> +१००००!

गाडी सुसाट सुटलीये! Happy

नव्हे रिक्षा सुसाट सुटलीये! Happy

अ ति श य सुंदर लिखाण.
ज्या कल्पना शक्तीने एक एक मुद्दा मांडायचा प्रयत्न केल्या, अप्रतीम जमलंय. Happy

पुढच्या भागाचा थोडासा अंदाय आलाय, पण ते तुमच्याच... अहं... रिक्षावाल्या आजोबांच्याच भाषेत ऐकायचंय. तेव्हा पुढच भाग लवकर टाक. Happy

khup chan katha.. mastach....... kahitari vegal gheun aalat tumhi.... khup interesting....... Happy

छान.

नुसतं प्रेम असून काही उपयोग नाही. श्रद्धा नसेल तर प्रेम आंधळं असतं. आणि प्रेमाशिवाय श्रद्धा असेल तर ती अंधश्रद्धा....

>> हे कोणी समजवुन सांगेल काय? प्रेम आणि श्रद्धा म्हणजे काय? दोघांत काय फरक आहे?

छान लेखन. फार पूर्वी रिश्ते म्हणून एक मालिका लागायची झी वर, त्यात एक "लिफ्ट" म्हणून एक एपिसोड दाखवला होता. त्यात लिफ्ट्मनचे काम टॉम आल्टरने केले होते. कथा सुत्र तुमच्या रिक्षावाला या कथेसारखेच होते. अगदी तंतोतंत वाटते. चार प्रवासी आणि लिफ्टमन वरुन खाली येत असतात आणि मधेच लिफ्ट बंद पडते. अगदी सुंदर कथा होती ती. त्याच कथेवरून प्रोत्साहित झाला असाल असे वाटते. पण तरीहि तुमचे लेखनही सुंदरच आहे.