वाचन आणि आपण

Submitted by भारती.. on 23 April, 2013 - 06:30

वाचन आणि आपण

आज,जागतिक पुस्तकदिनी मनात येतंय की खरंच किती रटाळ झालं असतं जगणं या पुस्तकांशिवाय.आपलं स्वतःचंच जगणं जगण्याची सक्ती. तेही तसं रोमहर्षक असतं म्हणा, उनसावल्यांचं,सुखदु:खांचं,स्थित्यंतरांचं,संकटांचं,संधींचं वगैरे वगैरे,पण आपल्यापुरतंच फक्त.

एखाद्याला (खरं तर प्रत्येकालाच) खूप भूक असते, एका जन्मात अनेक जगणी जगायची असतात, अनेक कथानकं भोगायची असतात त्यातल्या थरारांसकट.

म्हणून तर पुस्तकं भेटतात आपल्याला. प्रतिभेचे अनंत रंग घेऊन पुढे सरकत रहातं जगण्याचं महाकथानक, कधी महाकाव्य..

त्या वाचनप्रवासाचा हा एक धावता आढावा..

सुरुवातीला चिमुकली पुस्तकं भेटली होती बालपणावर जादू करणार्‍या जादुगारांसारखी..ते बालपण टी.व्ही.,सिनेमा अशा दृष्य माध्यमांपासून दूर होतं म्हणून काय झालं, मनाच्या रंगमंचावर किती पात्रं हजर होत होती..पर्‍या, जादुगार, भीतीदायक रा़क्षक अन चेटकिणी, सोनेरी महाल अन अंधारी रानंवनं, बंदिस्त राजकन्या अन धीट वनकन्या, शूर राजपुत्र अन चतुर लाकुडतोडे यांचं रंगीबेरंगी जग पुस्तकांमधून उघडू मिटू लागलं होतं. मालती दांडेकर, भा.रा. भागवत,ना.धों ताम्हनकर अशी कसदार मंडळी स्वनिर्मित साहित्याबरोबर अनुवादित बालसाहित्याचेही संस्कार करत होती. हॅन्स अँडर्सनच्या सुंदर वास्तवस्पर्शी परीकथांचे अनुवाद सुमती पायगावकरांनी केले होते. देशविदेशातील अनुवादित परीकथा, चार आण्यात मिळणार्‍या अद्भुत कथा ( यांचं सेकंडहॅंड मार्केट रद्दीवाल्याकडे होतं! नियमित खरेदीविक्री चाले उत्साही मुलांची !),इसापकथा,अरेबियन नाइट्स अन आपलं पंचतंत्र,पुराणकथा,रामायण,महाभारत,इंद्रजाल कॉमिक्स यांचे ते दिवस. कुमार,किशोर, चांदोबा व इतरही दर्जेदार बाल दिवाळी अंक आमच्या दसर्‍यादिवाळीच्या रोषणाईचा अविभाज्य भाग होता.

ही वेडी सरमिसळलेली ऊर्जा केवढं जगण्याचं इंधन पुरवणार आहे याचं काहीच भान नव्हतं.खूप खेळून दमून विस्कटलेल्या ध्यानाने घरी यावं,खूप वाचून तृप्त व्हावं असे साधे आनंद होते. माझ्या एका अगदी लहानपणी लिहिलेल्या कवितेत रविवारचं माशांचं जेवण अन परीकथांचं वाचन आनंदाची परमावधी म्हणून आलेलं आहे..

घरातल्या काळोख्या माळ्यावर बाबांच्या जुन्या पुस्तकांचा खजिना होता . त्यात महाभारताचे खंड,अनेक सानुवाद संस्कृत नाटकं अन व्याकरणाचीही पुस्तकं होती. नवव्या दहाव्या वर्षापर्यंत या सगळ्यातील वाचनीयतेचा साक्षात्कार झाला मला, अन माळ्यावरच्या अंधारात खजिन्याच्या गुहेत शिरल्यासारखे वाटू लागले.वडिलांना हा पत्ता लागल्यावर त्यांनीही मग मूळ संस्कृत पान वाचून मग मराठी अनुवाद वाचायची शिस्त लावली. आमच्या घरात इंग्लिश डिक्शनरीतले शब्द पाठ करण्यालाही बक्षीस होतं. दहा शब्दांना दहा पैसे वगैरे. नकळत भाषेची पायाभरणी होत होती. वाचना-संभाषणापुरता तरी इंग्रजीचा दबदबा वाटेनासा झाला मराठी माध्यम असून..

आठवी नववीत माझ्या वाचनवेडाला एक नवे परिमाण मिळाले.. कर्वेकाका हे ते परिमाण देणार्‍याचं नाव. त्यांच्याकडे खूपसे रिडर्स डायजेस्टने संपादित-संकलित केलेल्या कादंबर्‍यांचे संच होते. अक्षरश: शेकडो क्लासिक कादंबर्‍यांचा रतीब त्यांनी माझ्यापर्यंत पोचवला एक सीनियर समानधर्मी म्हणून.. आता सगळी नावंही आठवत नाहीत .Good bye Mr.Chips,One flew over the cuckoo’s nest,To kill a mocking bird अशी काही नावं आठवतात. नव्या ताज्या झुळुकांनी भारलेली पश्चिमेची खिडकी माझ्या मराठी मनात उघडली गेली होती..

एकीकडे स्थानिक वाचनालयं पालथी घालणं चालू होतं.. पौगंडावस्थेतल्या वाढत्या भुकेला नारायण धारप, नाथमाधव ,रत्नाकर मतकरींच्या भयकथा,त्या काळात रेलचेल असलेले ऐतिहासिक, प्रांतीय ललितलेखन खाद्य म्हणून मिळत होतं. अर्धवट वास्तव, अर्धवट फँटसी..आमच्या वाढीच्या संक्रमणकाळातल्या त्या सुंदर पडछाया होत्या.

गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे ,बाबासाहेब पुरंदरे,रणजित देसाई, शिवाजी सावंत, ना.सं.इनामदार,किती नावे लिहावीत ! मामा वरेरकरांनी अनुवादलेल्या बंगाली साहित्याची, त्यांच्या 'चरित्रहीन' 'श्रीकांत' मधल्या अभिजात जगाची गोडी लागू लागली.त्यातली स्त्रीपुरुषांचे वेगळेच भावबंध त्यातल्या रोमांचांसकट आम्ही अनुभवू लागलो होतो.

विनोदाचं समृद्ध दालन तर पु.ल.देशपांडे नावाच्या अवलियाने उघडून दिलं होतं अन कब्जाच केला घराचा. पु.लंचं घरात सामुहिक वाचन चालत असे.ओळीच्या ओळी पाठ असतानाही ही आवर्तनं चालू रहात.पी.जी.वुडहाउसची दीक्षाही पु.लंकडूनच मिळाली.पुढे अनेक तीव्र निराशांच्या कालखंडात मी मानसिक संतुलन साधण्याचं औषध म्हणून ज्या वुडहाउसकडे गेले तो माझा ग्रँड ओल्ड मॅन.चिरतरुण मिश्कील रोमान्सचित्रे रेखाटणारा.याशिवाय Richmal Crompton या ब्रिटिश लेखकाने विल्यम नावाच्या एका गोड गुंड मुलाची व त्याच्या व्रात्य मित्रचौकडीची एक उचापतमालिका लिहिली होती जी माझ्या अगदी फारफार आवडीची होती. विनोदाचा हा निरागस वाण गंगाधर गाडगीळांच्या बंडू मालिकेत अन चिं.वि.जोशींच्या चिमणरावांच्या चित्रमय जगातही सापडत होता.

आता महाविद्यालयीन दिवस आले होते.मनाचा तरुण वैश्वानर उफाळू लागला होता.आता सुरू झालं सत्र आत्मचरित्रांचं,चरित्रांचं,इतिहासाच्या काळ्या,सोनेरी पानावर केलेल्या लिखाणांचं , आयुष्याचा अर्थ लावणार्‍या तत्त्वदर्शनांचं.स्वदेशात महात्मा गांधी,नेहरु,टिळक,सावरकर,एकीकडे दुसर्‍या महायुद्धाच्या घुसळणीत झालेलं लेखन,चिंतन..उत्कट मानवी प्रवृत्तींची ही सर्व राजरुपं होती.टिळकांचं गीतारहस्य हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे,अनेकांनी ते वाचलं नसेल.अरुण साधू,वि.स.वाळिंबे यांच्या थरारक लेखनातून चे गव्हेरा,फिडेल कास्ट्रो, हिटलर अशा भव्य/ भयावहही (हिटलरचं नाव आलं म्हणून ) व्यक्तिमत्वांचा, रशिया,चीन,विएटनाम जगाच्या पाठीवर घडणार्‍या रक्तरंजित युद्धांचा क्रांतीचा परिचय होत होता..मार्क्स,सार्त्र,कामू हे शब्द आमच्या तरुणपणातली फॅशन व पॅशनही होते. पण इथेही माझ्या स्वभावानुसार सार्त्रच्या तत्त्वज्ञानापेक्षा त्याची Men without Shadows,The admirable prostitute सारखी नाटकं (मनोमंचावरच पाहिलेली ! म्हणून अधिक सूक्ष्मात अनुभवलेली !! ) ,कामूचं आउट्सायडर सारखं फिक्शन मला जास्त भावलं, जिवाच्या जवळ येणारं वाटलं.

या काळात व्हिक्टोरियन अभिजाततेतून पोसलेल्या, महायुद्धाच्या अनुभवाने डहुळलेल्या अशा अनेक कादंबर्‍यांचं मनन वाचन झालं.जेन ऑस्टिन, शार्लट व एमिली ब्राँटे भगिनींच्या अविस्मरणीय रचना .
इ.एम्.फोर्स्टरच्या कादंबर्‍या.कॅलिडोस्कोप हलवला की बदलणार्‍या आकृतीबंधांची आयुष्यचित्रं.'पॅसेज टू इंडिया'मधल्या डॉ. अझिझ व प्रोफेसर फील्डिन्ग्जचे आगळेवेगळे स्नेहबंध, .आत दबलेले वांशिक तणाव, भयाचं, भासांचं सुप्त मनातलं जग. दीर्घकवितेसारखी खर्‍या रोमान्सचा शोध घेणारी 'अ रूम विथ अ व्ह्यू '...
'हॉवर्ड्स एंड' मधील हेलेन व मार्गरेट श्लेगेल या अभिरुचीसंपन्न भगिनींचं आयुष्यातल्या ताणतणावांतून, योगायोगांतून बदलत जाणारं नातं.या सगळ्यामागे छाया धरून असलेली 'हॉवर्ड्स एंड' ही आयुष्याइतकीच गूढ वास्तू.आर्थर कोस्लरच्या कोसळवून टाकणाऱ्या महायुद्धकालीन क्रौर्यातही सकारात्म शक्तीचा सूक्ष्म स्तरावरील विजय चितारणाऱ्या ,प्रातिभ शक्तीने ओतप्रोत भरलेल्या कादंबर्‍यांच्या- (थीव्हज इन द नाईट , अरायव्हल अँड डिपार्चर ) -उल्लेखाशिवाय तत्कालीन वाचन-वसंतऋतू पूर्ण होणार नाही

पुढील आयुष्यात यातील अनेक क्लासिक्सची चित्रपट-रुपं पाहणं हा एक वेगळा शब्दातीत आनंद होता...

विराट रशियन उपखंडाच्या सावल्याही आता साहित्यातून जाणवू,लोभवू लागल्या होत्या. दोस्तोएव्हस्कीच्या कादंबर्‍यांनी माझ्या तरुणाईचं नैराश्य खोल आत्मिक आकांतापर्यंत पोचवलं.'क्राइम अँड पनिशमेंट' चं वाचन म्हणजे एक अंगावर आलेलं दुखणं होतं..दु:खविरेचनाचा पहिला अनुभव देणारं.तर 'ब्रदर्स कारमाझफ'मधून सामाजिक आणि व्यक्तिगत स्खलनकाळातही प्रकाशाची दिशा शोधणारी अल्योशाची निरागसताही टवटवीत राहिलेली दिसली. एका विलक्षण प्रगल्भ संस्कृतीतले ते महान प्रतिभावंत-दोस्तोएव्हस्की,टोलस्टॉय,चेकोव्ह,कितीतरी सोव्हिएत कवींच्या कवितांचे अनुवाद्,गद्य-पद्याच्या सीमेवरचा बोरिस पास्तरनाकचा 'डॉ. झिवागो.'

रा.आ.पोद्दार कॉलेजचे रसिकाग्रणी प्राचार्य प्रभुराम जोशी माझ्या भाग्ययोगात होते. वाणिज्य कॉलेजात माझ्यातली कवयित्री जाणून माझ्यापर्यंत बोरकर,रेगेद्वय,कुसुमाग्रज,बापट,पाडगावकर-,इंदिरा संत,मर्ढेकर,करंदीकर,भट ,ग्रेस यांचे उत्तमोत्तम मराठी कवितासंग्रह पोचवणारे. एक वेगळी आंतरयात्रा सुरु झाली होती,जी या लेखमर्यादेत येणार नाही,पण जिचा उल्लेख केलाच पाहिजे.

कवितेइतकंच तरल ललित व वैचारिक गद्य लिहिणार्‍या महान मराठी लेखिका इरावती कर्वे,दुर्गा भागवत,मग गौरी देशपांडे ,निर्मला देशपांडे,आशा बगे,सानिया वाचनात येत होत्या ..पुस्तकाच्या मधुर गुंगीत बुडून जावं असे ते दिवस.आणि ही गुंगी उडवणारं अस्वस्थ आक्रोशाचं दलित-कामगार साहित्यही.
. नामदेव ढसाळ, मल्लिका अमरशेख,दया पवार,नारायण सुर्वे,लक्ष्मण माने..

खरं तर कोणत्याही जातीवर्णभेदापलिकडचे ,परंपरा आणि आधुनिकता या संघर्षमय द्वैताने ज्यांचे संज्ञारिंग व्यापून गेले होते ते मर्ढेकर,करंदीकर,दि.पु.चित्रे ,गाडगीळ ,कोलटकर,नेमाडे आता माझ्या मनोविश्वाचे नवे नायक होते,त्यांचं बोट धरून पंचविशीत आम्ही संतसाहित्याच्या गुंफेत उतरायला सुरुवात केली होती..संत ज्ञानेश्वर,तुकाराम,रामदास,नामदेव,जना-मुक्ताबाई- माझ्या मराठी ओळखपत्राची खरी किंमत या अर्वाचीन-प्राचीनांच्या लेखनातून प्रथम कळली..

अगदी नेणतेपणापासून तिशी-चाळिशीपर्यंतच्या ललित लेखनाच्या वाचनप्रवासाचा (कारण त्यानंतर ते मंदावले) हा आढावा परिपूर्ण नाही.ठळक उल्लेख करतानाही काही त्रुटी राहिल्या असतील. पण हा एक आलेख आहे,एका प्रवासातले मुख्य मार्गबिंदू जोडणारा.

आता आज वाचनाचा पुनश्च हरि ॐ करताना, त्यासाठी आधी बेस्टसेलर्स कुतुहल म्हणून वाचताना त्यातलेही निखळपण लक्षात येते,भारतीय ललित-लेखकांमध्ये चेतन भगतचं चटपटीत लेखन,अरुंधती रॉयने उलगडलेले अस्वस्थ प्रांत,विक्रम सेठची दिपवून टाकणारी काव्यात्म तरल शैली,अलिकडे अमिशने घेतलेला शिवतत्त्वाचा शोध आजही कंपल्सिव्ह रीडिंग या वर्गवारीत येतील पण माध्यमांच्या गदारोळात,भयाकारी गतिमान जीवनशैलीत ते स्वस्थ सुंदर वाचनानंदाचे दिवस मधल्या काळात हरवलेत.

आज डोळ्यातल्या दमलेल्या ज्योती ऑफिसातल्या आकडेमोडीच्या, व्यावहारिक,व्यावसायिक वाचनाच्या ताणानंतर एखाद्या चांगल्या पुस्तकापेक्षा अभिजात चित्रपट पहाण्यात,नेटवर भ्रमण्यात जास्त रमतात हे वास्तव जाणवत रहातं.

दु:ख,अपराधभावना या सगळ्याच्या पलिकडे असतो काळाचा महिमा.

तरीही आयुष्याच्या अन वाचनाच्या दुसऱ्या पर्वातही तोच देहभान हरपून टाकणारा आनंद निरनिराळ्या पुस्तकांच्या काहीशा अनियोजित अन विस्कळित वाचनातही नव्याने अनुभवला तेव्हा 'आतून आपण बदलत नसतो तर!' असा आशादायक प्रत्यय आला. 'जीवन रसमय आहे ' असाही !

या विविध रसग्रहण-लेखांमध्ये तो असीम आनंद प्रतिबिंबित झाला आहे.

या आठवणींमधून, रसास्वादांमधून वेचक चांगली पुस्तके वाचत रहाण्याचा संकल्प माझ्याप्रमाणेच वाचनावर प्रेम करणाऱ्या, करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात जागा व्हावा एवढीच इच्छा, त्यासाठीच हा 'अक्षरांचा श्रम केला ' !!

इतिश्री !

भारती बिर्जे डिग्गीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा, एकदा वाचायला सुरवात केल्यावर शेवटालाच थांबलो पार ....

जबरी वाचन आहे तुमचे व आढावाही सुंदरच घेतलात अगदी..

शाळकरी जीवनात जे वाचनाचे वेड होते तसेच अजूनही टिकायला पाहिजे होते असे प्रकर्षाने वाटले - हा लेख वाचताना ....

शब्द मोहिनी, विचारसौंदर्य यांचे आकर्षण मात्र आयुष्यभर लुभावणारंच ...

बापरे!

तुमच्या दांडग्या वाचनाचा, व्यासंगाचा आणि एकुणच अधिकाराचा पुनःप्रत्यय आला. एवढेच बोलून थांबतो.

खूप छान लिहिलंय Happy
थोड्याफार फरकाने मला माझा वाचनप्रवास वाचतेय असं वाटलं. पण माझ्यासाठी यात आणखी दोन दालनं शाळकरी-कॉलेजच्या वयात फार आवडीची होती. एक म्हणजे वीरधवल, कालिकामूर्ती, इंद्रभुवनगुहा आणि अशाच अद्भुतरम्य कादंबर्‍यांचं आणि दुसरं म्हणजे सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, अर्नाळकर अशांच्या कादंबर्‍यांचं.

क्रॉम्प्टनच्या विल्यमचं मराठी रूपांतर/ प्रेरणा घेऊन लिहिलेली पुस्तकं म्हणजे वि वि बोकिलांची वसंता या बालनायकाची पुस्तकं. मला अगदी मनापासून आवडतात अजूनही.

माध्यमांच्या गदारोळात,भयाकारी गतीमान जीवनशैलीत ते स्वस्थ सुंदर वाचनानंदाचे दिवस मधल्या काळात हरवलेत>> ते असे कायमचे हरवत नाहीत भारती. वाचनाचा वेग/झपाटा पूर्वीसारखा रहात नाही पण ते बंद नाही होत. अभिजात चित्रपट पहायची मजा वेगळी, नेटची मजा वेगळी. पण झोपताना उशाशी आवडतीची एखाद दोन पुस्तकं असावीत आणि निदान १५ मि - अर्धा तास ती झोप लागायच्या आधी वाचता यावीत या परतं रिलॅक्सिंग आणखी काय असू शकतं?

पण झोपताना उशाशी आवडतीची एखाद दोन पुस्तकं असावीत आणि निदान १५ मि - अर्धा तास ती झोप लागायच्या आधी वाचता यावीत या परतं रिलॅक्सिंग आणखी काय असू शकतं?>> +१.

भारतीताई, छान आढावा, सुंदर लेख लिहिलाय.

फार वाचनीय लेख!! खूप आवडला. तुमच्या व्यासंगाला प्रणाम.

आज डोळ्यातल्या दमलेल्या ज्योती ऑफिसातल्या आकडेमोडीच्या ताणानंतर एखाद्या चांगल्या पुस्तकापेक्षा अभिजात चित्रपट पहाण्यात ,नेटवर भ्रमण्यात जास्त रमतात हे जाणवलं.>>>>>>> अगदी अगदी..

वा मस्त लिहिलं आहे. प्रवास आवडला.

अश्याच एका वाचनवेडीच ह्याच विषयवावर आधारित एक मस्त पुस्तक तुम्ही वाचायलाच हवं ते म्हणजे Ex Libris: Confessions of a Common Reader

आढावा आवडला. Happy

>>
आज डोळ्यातल्या दमलेल्या ज्योती ऑफिसातल्या आकडेमोडीच्या ताणानंतर एखाद्या चांगल्या पुस्तकापेक्षा अभिजात चित्रपट पहाण्यात ,नेटवर भ्रमण्यात जास्त रमतात हे जाणवलं.दु:ख,अपराधभावना या सगळ्याच्या पलिकडे असतो काळाचा महिमा.
<<
यात दु:खी/अपराधी वाटण्यासारखं काही आहे असं मला खरंच वाटत नाही. अभिजात चित्रपट पाहणं आणि पुस्तक वाचणं यात डावंउजवं कसं करायचं? माध्यमं बदलतात, माणूस तोच आहे. असो. Happy

सर्वासर्वांचे मनःपूर्वक आभार !
हा लेख लिहिल्यावर थोडी घाबरलेच होते की हे जास्त आत्मपर होतेय की काय ! व्यासंग वगैरे शब्द विद्वानांसाठी, मी फक्त आनंद घेतला /शोधला होता, शोधते आहे..त्यासाठी योग्य दिशा दाखवणारी वडीलधारी माणसे आयुष्यभर भेटली, त्यांचे ऋण या लेखात व्यक्त करायचे होते..

होय वरदा, नाथमाधवांचा उल्लेख राहिला. कवितांमध्ये भटांचा, ग्रेसांचाही राहिला. स्त्री आत्मचरित्रे राहिली. तत्कालीन वाड्मयीन नियतकालिके सत्यकथा,मौज,अभिरुचि राहिली.शरद्चंद्र चिरमुले ,एलकुंचवार,तेंडुलकर,गजानन मुक्तिबोध राहिले.

हा प्रवास न संपणारा, या नक्षत्रांची गणती एका लेखात मावण्यासारखी नाही.
स्वाती,तुझं बरोबर आहे, पण वाचन जरा मागेच पडल्याची खंत जात नाही.. भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे..आमेन !

सुंदर लेख
पु ल, ज्ञानेश्वर, तुकोबा, वि स आणि इतर यांच्या लिखाणावर उभ्या महाराष्ट्राच्या कित्येक पिढ्या पोसल्या.
एक प्रकारची वैचारिक प्रगल्भता ही या वाचनाची देणगी
पु लं चे हलके फुलके लिखाण, आणि त्यांचे लेख संपता संपता डोळ्यांच्या ओल्या होणारया कडा. चितळे मास्तर, अंतु बर्वा, नारायण, सखाराम गटणे, हरीतात्या इ इ व्यक्तीचित्रे मनात कुठेतरी घर करुन जातात. अंतु बर्व्याचे खपाटीला गेलेले पोट उगाचच माझ्याही मनात त्यांच्या वृद्धत्वाची जाणीव देउन जाते. प्रचंड ताकदीचे लिखाण आहे पु लंचे
जग उघड्या डोळ्यानीं बघण्याची कला शिकवली या वाचनाने. Happy

लेख वाचुन असे वाटले की पुस्तकांच्या प्रिझम मधुन मनाचे हर एक वयाच्या टप्प्यातले रंग उलगडुन त्याचा एक सप्तरंगी ईंद्र्धनुच उभा केला आहे.
पुस्तकाशी ज्याची मैत्री त्याला अजुन कोणाची गरज पडणार आहे.
स्वतःच्याच मनाशी संवाद साधायला या व्यतिरीक्त दुसरे सहज माध्यम तरी कोणते आहे?
आज तुमचा लेख वाचुन त्या अगणित पुस्तकांना आणि त्यांच्यापाठीमागील लेखणीला शतशः धन्यवाद द्यावेसे वाटतात.