ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चित्रपट रविवारी आहे हे कळल्यापासुन घरातल्या एका मेंबराची वटवट चाललेली पहायचाय पहायचाय म्हणुन. मी मनातल्या मनात देवाला नवस बोलत होते की काहीतरी चमत्कार घडव म्हणुन...... नशीबाने संध्याकाळी एका हॅप्पी बर्थडे पार्टीचे बोलावणे आले आणि मी वाचले .....:) Happy

ललिच्या पोस्टला अ‍ॅडते माझे चार आणे.
अनुष्काचे गरजेपेक्शा जास्त कमी कपडे आणि सवंग भाशा.. आर्मी ऑफिसरला कुणी असं बोलतं का? कि किस करायचा असेल तरच जवळ घे वगैरे वगैरे? ते हि पहिल्यांदाच भेटलेला असतो, असं नाही कि बाबा वर्षानुवर्षाची घसटींग आहे.
इटरव्हूला लंडनला बोलवलं तर हा पठ्ठ्या इतक्या पटकन पोचतो? आर्मीत रजा बिजा काढावी लागत नाही का? Uhoh
शाहरूख एकदा या अंगावर एकदा त्या अंगावर असा दोनदा सांडतो, ते ही लंडन मध्ये.
येशू असा मारतो का लोकांना वचनं मोडली तर? आणि लंडनात काम करणारी बाई इतकी अंधश्रद्धाळू? Uhoh

कार्टुनपहाणार्‍या मुलीच्या कृपेने २/३ तुकडे पहायला मिळाले.
त्यात कधी शाखा/ कॅकै तर कधी शाका/अश अतिगंभीर चेहर्‍याने काय्/बाय बोलताना आढळ्ले. म्हटंल बरं झाल सुरुवात ते शेवट असा नाय पाहिला.

अत्यंत फालतू षिण्मा Angry
काहिच वास्तविक दाखवत नाहीत, अगदी आर्मी सुद्धा यांच्या बापाची जहागिर असल्यासारखी दाखवली आहे. बाँब तर काय निकामी करतो... आहाहा! अगदी एखादा दिवाळीतला फटाका फुसका करावा तसा...

शाहरूख अनुश्काला ढकलतो आणि स्वतः त्या कुठल्या १० वर्ष मागच्या शॉकात जातो, त्याचे दवाखान्याचे पैसे खरच कोण करतं? Uhoh

बाँब तर काय निकामी करतो... आहाहा! अगदी एखादा दिवाळीतला फटाका फुसका करावा तसा...
<<
दक्षे त्यापेक्षा रसपने परिक्षणात वापरलेल्या ओळी बघ किती चपखल वाटतात...

तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात!

Lol

या सिनेमात शाहरूख पन्नाशी गाठतोय ते मेकप करून सुद्धा नीटच लक्षात येतंय. निवृत्ती घे म्हणाव आता.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.>>>>>>>+१११११११

का का तू मी हा सिनेमा थेटर मधे पाहायच्या आधी रसग्रहण लिहिलं नाहीस Uhoh
Sad Sad यंदा भारतवारीत हा सिनेमा थेटर मधे कौतुकाने पाहायला गेले .. आणी खेटरं गमवून यावेसे वाटले. Angry

तरी मी संपूर्ण सिनेमा मन लावून पाहिला नाही म्हणून, नाहीतर अजून चिंध्या गोळा केल्या असत्याच.

खरं सांगू तर थोडं वैषम्य वाटतंय, निर्मात्यांकडे पैसे असतात, मोठ्या बॅनरचं मोठं नाव वाचून आपण सिनेमे पहायला थेटरात जातो, हजारो रूपये खर्च करतो.. (हो हो हजारोच, काढा हिशोब)
आणि पन्नाशीतला हिरो, एक चाळिशीतली हिरॉईन एक अल्लड प्रेमिका हे पाहून येतो. पदरात काय पडतं? फक्त निराशा.
याउलट खरोखरी उत्तम कथा असलेले सिनेमे निव्वळ आर्थिक पाठबळा आभावी आपल्या पर्यंत पोहोचतच नाहीत, याला काय म्हणावं?

दक्षिणा
तुझा संताप पाहून मला वाटतयं मी मिस केला हा सिनेमा. Happy
परवा मी मधेच कधीतरी थोडा पाहिला पण काही लिंकच लागेना.
आणि खरयं, कतरिनाच्या चेहर्‍यावरची रेषही हलत नाही. सतत लांब चेहरा घेऊन काय ती वावरत असते देव जाणे!

खरोखरी उत्तम कथा असलेले सिनेमे निव्वळ आर्थिक पाठबळा आभावी आपल्या पर्यंत पोहोचतच नाहीत, याला काय म्हणावं? >>

बाजारू भाषा में इसे **गिरी कहतें हैं !

पण खूप चांगला मुद्दा आहे. ह्या लोकांची नावं झाली आहेत, तर काही तरी वेगळं करून दाखवायची हिंमत करायलाच हवी. कंटाळा कसा येत नाही पुन्हा पुन्हा मूर्खपणा करायचा? चुकून तरी चांगलं काही तरी करा !! नाही तर काय उपयोग इतके अब्जावधी खिश्यात असून ? एक आयपीएल टीम घेतली की झाला दुनियेचा शहाणा ? जे कळत नाही, त्यात पैसे घालतात आणि जे कळतंय त्याची वाट लावतात.... देवा, उठा ले रे बाबा..!!

आता कळले की हे असे सिनेमे कसे चालतात. नुसता टीव्ही वर लागला तर एवढ्या पोस्ट मिळाल्या.
( मी तर हा सिनेमा सहकुटुंब सहपरिवार थेटरात जावून बघितला होता. )

चुकून तरी चांगलं काही तरी करा !! नाही तर काय उपयोग इतके अब्जावधी खिश्यात असून ? एक आयपीएल टीम घेतली की झाला दुनियेचा शहाणा ? जे कळत नाही, त्यात पैसे घालतात आणि जे कळतंय त्याची वाट लावतात.... देवा, उठा ले रे बाबा..!! >> Happy Happy जाऊ दे ना त्याच्यात धमक आहे म्हणून त्याने घेतली आणी उलट एवढ्या साधारण परिस्थितून वर येऊनही घेतली ते बरच आहे ना मल्ल्या आणी नीता अंबानी पे़क्षा .
रच्याकने , नीता अंबानी फेमस आहे कारण ती मुंबई इंडीयन्सची ओनर आहे , केकेआर फेमस आहे कारण शाहरूख त्याचा ओनर आहे Happy

नीता अंबानी फेमस आहे कारण ती मुंबई इंडीयन्सची ओनर आहे , केकेआर फेमस आहे कारण शाहरूख त्याचा ओनर आहे >> आं??????? प्रेस क्लिपिंग्ज काही वेगळंच सांगतात. नीता अंबानी मुंबई इंडियन्सची ओनर होण्याआधीपासूनच प्रसिद्ध आहे. पण असो.

जाऊ दे ना त्याच्यात धमक आहे म्हणून त्याने घेतली<<< टीम त्याने एकट्याच्या जीवावर घेतली नाही. जय मेहता (मि. जुही चावला) याचा पैसा जास्त आहे आणि शाहरूखची इमेज प्लस थोडाफार पैसा. आयपीएलच्या मोहाली, राजस्थान (या टीमचे तर भारीच झोल आहेत) टीम्स अशाच कोलॅबरेशनमधे घेतल्या आहेत. मोहाली टीमसाठी प्रीटी झिंटा इमेज म्हणून आणि पैसा डाबरचा. राजस्थानमधे नंतर शिल्पा शेट्टीला असंच सहभागी करून घेण्यात आलंय. मुंबई इंडियन्स नीता अंबानीने नाही तर मुकेश अंबानीने घेतली.

सिनेमाबद्दल बोला. रविवारी यामधला एकच सीन पाह्यला. शाहरूख कतरीनाचा बाबा शोभावा इतका म्हातारा दिसत होता. म्हातारं दिसण्याबद्दल काही नाही, ते तर आमचे संजय दत्त, अजय देवगण पण दिसतात पण किमान दाढीला कलप तरी करतात. शाहरूखची दाढीची खुरटं काळीपांढरी दिसत होती.

दक्षिणा, तुझा शब्द न शब्द पटतोय.

मला अजून एक वाटतं - की सिनेमा बनत असताना कुणालाच, अगदी एकालाही हे अंधूकपणेही जाणवत नाही का, की हे जे चाललंय ते काही खरं नाही, सुमार दर्जाचं आहे. कुणीच संबंधितांना सांगू धजत नाही का, की वेळीच भानावर या. त्यांचे सल्लागार वगैरे नसतात का कुणी? बाकी कुणी नाही तर नाही, आदित्य चोप्रा आपल्या वडिलांना हे काही नाही का सांगू शकला?

मी ही यश चोप्रांच्या पूर्वीच्या सिनेमांची फ्यान आहे, पण तरी परवा मला जाणवलं, की नोकरीवाल्यांना जसं निवृत्तीचं वय असतं, तसं या सिनेमावाल्यांनाही असलं पाहिजे.
आपल्या नायिकांना अतिशय समर्थपणानं सादर करणारे यश चोप्रा, त्यांना कतरिनाच्या अभिनयाचा दगडपणा जाणवला नाही?? अरे, त्या 'सांस में तेरी' गाण्याच्या सुरूवातीला ती लंडनच्या रस्त्यांवरून, गल्ली-बोळातून पळत जाताना दाखवली आहे, त्या दृष्यात देहबोलीचा किती सुरेख वापर करता आला असता, आतुरता दाखवता आली असती, हा दगड नुसता धपाधप्प पळत जातो आणि शाहरूखला अंगावर जाऊन आपटतो!!!

अन्य अभिनेत्रींनी नकार दिल्यामुळे ही भूमिका कतरिनाकडे आली की काय असंही वाटलं मला...

अन्य अभिनेत्रींनी नकार दिल्यामुळे ही भूमिका कतरिनाकडे आली की काय असंही वाटलं मला...
>>> लले, मैने गॉसिप सुना था की शाहरूखला कतरीनाच हवी होती हिरॉईन म्हणून. सलमानसे कॉम्पिटिशन. दुसरं काय???

>>आता कळले की हे असे सिनेमे कसे चालतात. नुसता टीव्ही वर लागला तर एवढ्या पोस्ट मिळाल्या.<<

@मृणाल१,

हा लेख जुना आहे. सिनेमा रिलीज झाला, त्या वेळचा ! Happy

सरसावल्या का लेखण्या परत?
तुम्हाला कोणी आमंत्रण देतं का की या आणी शाहरुखचे सिनेमे पहा म्हणून?
आमच्यासारखे असतात ना ज्यांना "शाहरुख" सिर्फ नामही काफी असतं, त्यांच्यासाठी असतात हे सिनेमे आणि आम्ही पाहिलाही जातो...कितीही वेळा
आता सलमानचंच घ्या ना. त्याच्या माकड उड्या पाहीला मी थेटरात जात नाही आणी येऊन त्रागा करुन शिव्याही घालत बसत नाही.
तुम्ही पण असच का नाही करत?

Pages