बाजार हवा आहे

Submitted by वैवकु on 17 April, 2013 - 10:48

देईन मला मी जो आकार हवा आहे
आतून तुझा आधी आधार हवा आहे

शेजेत जरी आपण एकाच निजाया, पण...
नुसताच तुला माझा शेजार हवा आहे

सोडून दिली नाही पण घेतसुधा नाही
सुचवेल मला कविता तो बार हवा आहे

कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे

दमलोय अता पुरता पूर्तीत पुराण्यांच्या
नसतील नवी स्वप्ने तो पार हवा आहे

भेटेल तुला कोणी माझ्यासम ना मृत्यो
देहात तुझा ज्याला आजार हवा आहे

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिलकधारी आला आहे.

कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे

छान शेर आहे.

दमलोय अता पुरता पूर्तीत पुरण्यांच्या
नसतील नवी स्वप्ने तो पार हवा आहे

मात्रा चुकवू नकोस. तिलकधारी संतप्त होतो.

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे

अभिनव विचार आहे.

तिलकधारी निघत आहे.

धन्यवाद तिलकधारीजी

माझ्यामुळे आपणास राग आल्याबद्दल क्षमस्व !!......तो टायपो होता दुरुस्त केला आहे

पुनश्च धन्यवाद

सगळेच्या सगळे शेर आवडले. (पुराण्या अर्थ कळाला नाही)

रविवार - भन्नाट झालाय हा शेर.
या वेळचा विट्ठलाचा शेर असा का आला हे मी समजू शकतो. तुला हक्कच आहे तो रागवायचा.

-हस्वदीर्घांच्या चुका बोचणा-या वाटल्या, वृत्तशरणता डोकावताना दिसते! एका गुरूचे दोन लघू काहींना रसभंग वाटू शकतात.
आकार द्यायला आधार कशाला लागावा?
घेतसुधा..............हे काय बुवा?

माझ्यातिल की, माझ्यातील?
पुराण्यांच्या पूर्तीत?????? म्हणजे काय?

एकंदर शब्दकळा खडबडीत वाटली!

एकही शेर कोटेबल वाटला नाही!

>>
देईन मला मी जो आकार हवा आहे
आतून तुझा आधी आधार हवा आहे

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे
<<
शेर आवडले. ('विठ्ठलही विक्रीला काढेन कधी माझा' असं केलं तर चालणार नाही का?)

मतला वाचून कबीराचा दोहा आठवला :
गुरु कुम्हार, सिस कुंभ है, घडि घडि काढे खोट
अंतर हाथ सहार दे, बाहर मारे चोट

धन्यवाद अरविंदजी ,किरण ,स्वातीताई,
_____________________________________________________________
किरण तो शेर अर्थाच्या बाबतीत तसा साधाच आहे फक्त सोपा नाही आहे फक्त वाटतो जरा अवघड

एखादा माल खपवायचा असेल व त्याला किम्मतही योग्य ती मिळवायची असेल तर त्या त्या बाजारातच विक्रेता जातो जसे खवा बाजार कापड बजार असे त्या त्या वस्तूचे बाजार असतात

विठ्ठलाचा खप कसा करायचा व किंमत काय यायला हवी हे मला माहीत असून त्यासाठी "काळा" बाजारच हवा ..कारण विठ्ठल काळा आहे ना (आतूनही बाहेरूनही ) म्हणून .......... असा अर्थ आहे बघ

काळा बाजार = भेंडीबाजार सारखा अर्थ लावल्यास एक निश्चित अर्थ लागत आहेही पण तो अपेक्षित नाही
______________________________________________________________

स्वातीताई <<<'विठ्ठलही विक्रीला काढेन कधी माझा'>>>> असे चालू शकत नाही आहे
लय गागा गागा गा गागा गागा गा अशी मी योजली आहे

कबीराच्या ओळींसाठी धन्यवाद माझ्या मनातला मतल्याचा अर्थही खूपसा तसाच आहे

_______________________________________________________________

कर्दनकाळा.... गपे !!!! ( एss गप एss !!!) (चुप्प बस !!!)

तिकडे कणखरजींनी तुला काही म्हट्ले ते इकडे डकवू नकोस इथे ते अस्थानी आहे
(बूंद से गयी ...वो हौज(हौद) से नही आती मित्रा !!!!!!!!!)

मतला मलाही समजलाय अन् लोकानाही ! तुला नसेल समजला तर तो तुझा सौंदर्यबोध की काय ते असेल !!!!

बाकी मी तुला वावगे काही वदणार नाही असे ठरवले आहे म्हणून चलतो
प्रतिसादासाठी धन्स
_____________________________________________________________

पुराणे = जुने
पुराण्यांच्या =जुन्यांच्या
काय जुने तर स्वप्ने जुनी !!!
(अर्थाच्या कंटीन्युइटीसाठी खालची ओळ पहावी लागते आहे तिथे नवी स्वप्ने असा उल्लेख आला आहे ...... अशा प्रकारे जुनी स्वप्ने -नवी स्वप्ने हा विरोधाभास जपला आहे )

चांगली आहे गझल….

शेजेत जरी आपण एकाच निजाया, पण...
नुसताच तुला माझा शेजार हवा आहे
खूप आवडला हा शेर….

कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे
खयाल जुनाच असला तरी यातील खयाल मांडण्याची पध्दत आवडली

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे
सुरेख….

एकंदरीत मस्त गझल
शुभेच्छा

शेजेत जरी आपण एकाच निजाया, पण...
नुसताच तुला माझा शेजार हवा आहे <<< परवाची पुष्पकमधील चर्चा आठवली. Happy

कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे

दमलोय अता पुरता पूर्तीत पुराण्यांच्या
नसतील नवी स्वप्ने तो पार हवा आहे<<< मस्त शेर!

भेटेल तुला कोणी माझ्यासम ना मृत्यो
देहात तुझा ज्याला आजार हवा आहे<<<

यावरून माझ्या जुन्या दोन ओळी आठवल्या.

कोणी नसे जगी या तुझी वाट पाहणारा
मी वाट पाहिली पण आलास तू उशीरा (मृत्यूला उद्देशून)

धन्यवाद.

मस्तच!
कोणताही एक शेर असा स्पेशली कोट नाही करता येणार
सगळीच गझल आवडली..
दुसरा शेर फक्त मला फारसा कळाला नाही. पण ठिकेय!

किरण धन्स अगेन
________________________________________________
फाटक साहेब , कणखरजी ,बेफीजी , जयश्रीजी , रियुडी ....खूप खूप आभार
________________________________________________
@बेफीजी ...पुष्पक <<< अगदी खरे आहे अगदीच खरे

मृत्यो वरून तुम्हाला आठवलेल्या ओळी यथायोग्य आहेत पण मला एकंदर हा शेरच तुमच्या त्या ओळी वरून सुचला आहे बहुतेक<<<< देहास मनाची मग ही नाळ कशासाठी ?>>>>>> पूर्ण शेर आठवतनैये क्षमस्व

विशेष आभार बेफीजी
_________________________________________________

रिया शेज म्हणजे शैया. बेड. पलंग. आता तुला समजेल बहुधा

वैधानिक इशारा : शेर जरा चावट्गिरी करू पाहणारा आहे Wink
_________________________________________________

बूमरँग : परवाच आपली आठवण आली होती की अनेक दिवस तुम्ही कुठे दिसला नाहीत म्हणून !
पाहून खूप आनंद झाला म्हणून...नाहीतर आपला प्रतिसाद आपल्यावरच बूमरँग करणार होतो

Happy

प्रतिसादासाठी आभारी

असे आम्हा पामरांना प्रेरणा देणारे तुम्ही लिहीत रहा आणि आठवण काढ्ण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही याची खात्री बाळगा Proud

जमून आलीय गझल वैभव, काळा बाजार वरचा श्लेष आवडला ,दु:खांना रविवार देणे अभिनव तसेच शेजार, आजारही .

स्वातीताई धन्स
__________________________________________________
क.का.काका अहो वेगळी फूटपट्टी नकोय

तुम्हाला मी म्हणालो ना की ते इथे अस्थानी आहे म्हणून !!

अहो तुमच्या गझल्चे मीटर व माझ्या गझलचे मीटर यात बराच फरक आहे लांम्बी रुंदी मोजा हवी तर !!!

माझ्या मीटरात एक गोष्ट कटाक्षाने पाळायला हवी होती ती मी केली आहे ती म्हणजे गागाल लगागागा असे म्हणताना जो मधे ल-ल आहे त्याला गा करण्याचा मोह आवरणे
तुमच्या गझलेत उलटा मुद्दा होता गा चे ल-ल करण्याचा

तुम्हाला फरक समजला आहे असे मानून थांब्तो

___________________________________________________

भारतीताई विषेश आभार

रविवार भारीच!

विक्रीसहि विठ्ठल मी काढीन
कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे>>> विक्रीसहि म्हणजेच विक्रीलासुद्धा काढीन याच अर्थाने ना.??
हा शेर पण उत्तम !

Pages