उरास मान लागली निलाजरा बनू कसा

Submitted by बेफ़िकीर on 17 April, 2013 - 17:14

उरास मान लागली निलाजरा बनू कसा
जगात दु:ख एवढे सुखात मी जगू कसा

अनंत धन्यवाद तू मला दिलीस नोकरी
घरी बसून अन्यथा तुला उभा करू कसा

अनेक लोक मानती अनेक तोतये तुझे
तुला अजून प्रश्न की स्वतःस सापडू कसा

असेल पाय मोडला नसेल फुफ्फुसांत दम
वडील चालतात, एवढ्यात मी थकू कसा

तुझ्याकडून हे कसब शिकायचेच राहिले
रडायचे असेल त्या क्षणासही हसू कसा

बरेच डाव जिंकले वजीर होउनी इथे
तरी सवाल राहिलाच उंट चालवू कसा

तुला नको असेल ते मला हवे असेलही
उगाच काय 'बेफिकीर'... मी कसा नि तू कसा

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेल पाय मोडला नसेल फुफ्फुसांत दम
वडील चालतात, एवढ्यात मी थकू कसा... चांगला शेर

वडील हा शेर सर्वात आवडला. ( लिंकची गरज नको होती हे वै.मत ).
उंट चालवू कसा ही ओळ खूप आवडली. वजीर आणि उंट दोघेही तिरके चालतात, पण शब्दशः अर्थ घेणं मंजूर नसल्याने भाव स्विकारला.
आवडली गझल.

सर्व शेर आवडले
सर्व शेरांची शायराने आयुष्यात कुठेतरी प्रचिती घेतल्याचे लख्खपणे जाणवते

मी थकू कसा>> सर्वाधिक आवडला
_____________________________________________
लिंक का दिलीये ते समजले नाही ते ओपन केल्यावर क्राईम पेट्रोल चा एक एपिसोड दिसतोय मला

तिलकधारी आला आहे.

उरास मान लागलीपेक्षा टेकली अधिक वाचनीय झाले असते. गझल प्रामाणिक आहे पण क्लासी नाही. लिंक बघून मग मतला वाचायचा का रे?

तिलकधारी निघत आहे.

बरेच डाव जिंकले वजीर होउनी इथे
तरी सवाल राहिलाच उंट चालवू कसा...................क्या बात है.... !! प्रचंड आवडेश !!

वडीलांचा शेर सुद्धा मस्तच !!

असेल पाय मोडला नसेल फुफ्फुसांत दम
वडील चालतात, एवढ्यात मी थकू कसा

तुला नको असेल ते मला हवे असेलही
उगाच काय 'बेफिकीर'... मी कसा नि तू कसा

सुंदर शेर!

गझल आवडली.

लिंक बघता येत नाहीये त्यामुळे रिलेव्हन्स समजला नाही Happy

>>
बरेच डाव जिंकले वजीर होउनी इथे
तरी सवाल राहिलाच उंट चालवू कसा
<<
Happy

तोतयाचा शेर कोणाच्या डुप्लिकेट आयडीजबद्दल आहे हो? Proud

बरेच डाव जिंकले वजीर होउनी इथे
तरी सवाल राहिलाच उंट चालवू कसा

ज्जेबात ! वडीलशेर आवडला.
तब्येतीची अवस्था होत असेल तरी गझल लिहायला हवी का ? मी सकाळी उठलो (आमच्याकडच्या). जीममधे दोन तास घालवले. स्विमिंग डे होता आज. आता वेळ जात नाही म्हणून मायबोलीवर आलो. खूप व्यायाम करा.

असेल पाय मोडला नसेल फुफ्फुसांत दम
वडील चालतात, एवढ्यात मी थकू कसा

तुझ्याकडून हे कसब शिकायचेच राहिले
रडायचे असेल त्या क्षणासही हसू कसा>>>>>
व्वा व्वा!
बेफिकीर स्टाईल गझल मध्येही बरीच फिकीर दिसली आज.....बहोत खूब!

बरीच फिकीर दिसली >>>>>>खुरसाले यालच तर बेफिकीर स्टाईल म्हणतात

तुम्हाला आज दिसली होय!! Happy

असो

जगात दु:ख एवढे सुखात मी जगू कसाअप्रतिम ओळ

असेल पाय मोडला नसेल फुफ्फुसांत दम
वडील चालतात, एवढ्यात मी थकू कसा

तुझ्याकडून हे कसब शिकायचेच राहिले
रडायचे असेल त्या क्षणासही हसू कसा

बरेच डाव जिंकले वजीर होउनी इथे
तरी सवाल राहिलाच उंट चालवू कसा

सुंदर शेर! आवडले
मतल्यतल्या सानी मिस-याच्या प्रेमात पडलो भूषणराव! तो मिसरा घेवून तरही लिहित आहोत!