"मे महिना - एक आठवण"

Submitted by अनुराधा म्हापणकर on 17 April, 2013 - 08:33

तुळशीमागला औदुंबर,
ते कौलारु मायेचं घर

कवठीचाफा.. सोनचाफा..
कर्दळ नी पिवळा चाफा
गावठी गुलाब.. लाल जास्वंद
टप्पोरं जांभूळ, चिकाची करवंदं

ते कोप-यातलं रायआवळ्याचं झाड
लाड करणारे ते हिरवे हिरवे माड

विहिरीत सोडलेला पोहरा
किंचित कुरकुरणारा रहाट
प्राजक्ताच्या सड्यांनी
तेव्हा उगवायची ती पहाट

पिकलेला आंबा,
झाडावरुन अवचित पडलेला..
रसाळ फणस,
आजोबांनी समोर बसून फोडलेला

आंब्याच्या रसाचे
कपड्यावर डाग पिवळे
गोड गोड पाण्याचे
शुभ्र मलईदार शहाळे

चूलीकडली धग, शेणाचं सारवण
वर्षाच्या बेगमीचं लाकडाचं सरपण
आजीच्या हातचं माश्याचं कालवण
रसातले शिरवाळे, आंबोळ्या नी घावण

रात्रीच्या अंधारातले आजोबांपुढले पाढे
आजीच्या गोष्टीसाठी मात्र सर्व पुढे पुढे

भावंडांचा धागडधिंगा..
भर ऊनातला तो दंगा

गोटी सोडा कधी लिमलेटची गोळी
आंब्याचे साट आणि फणसाची पोळी

आजीने बोटं मोडत काढलेली दृष्ट,
हळूच दिलेली ती खाऊसाठीची नोट
निघताना आजीचे पाणावलेले डोळे
मुके घेणारे तिचे ते सुरकुतले ओठ

लाल एसटीतून निघताना
मागे लाल धुरळा उडाला
आणि तो "मे महिना" आमचा
त्यातच कुठेसा हरवला..

अनुराधा म्हापणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर! मलाही अगदी आजोळची आठवण झाली. आजीसुद्धा सकाळी ६च्या एस्.टी.साठी आम्ही निघत असू तेव्हा बेढ्यापाशी निरोप द्यायला यायची तेव्हा असंच पोटाशी धरुन मुका घ्यायची. आई आणि तिच्या डोळ्यांना पदर लागलेला असायचा. मामाने रिक्षा आदल्या दिवशीच सांगून ठेवलेली असायची आणि तो रिक्षावालाही काही न बोलता, खोळंबा झाल्याचं काही वाटून न देता माहेरवाशीण निघाल्याचं दृश्य पहात रहायचा. आजीचं घर आता पाडून नविन दुमजली इमारत झाली पण रस्त्यावरच्या ज्या दिव्याच्या खांबाजवळ हे दोघींचं मुसमुसणं चाले तो खांब अजून आहे. आता दोघीही नाहीत पण तो खांब अजून ती दरवर्षीची आठवण सांभाळतोय.

अवांतर : पिवळा चाफा म्हणजेच सोनचाफा ना?

सुरेख !

रडवलंत..........:(

एनिवे....सकाळी उठल्यावर चुलितुन येणारा जळक्या लाकडांचा वास कोणी कोणी अनुभवलाय?????? तो वासच यायला लागला कविता वाचता वाचता....

धन्यवाद सर्वांचे !

अश्विनी, अगदी हे दृश्य अस्संच्या अस्सच दिव्याच्या खांबापासून ! पण आजोळचं घर आहे अजून.. तिथे मामा मामी राहतात.. पण सांसारिक आणि व्यावहारीक व्यापामुळे जाणं नाही होतं.. गेल्या दहा वर्षात एकदाच गेले. ह्या सगळ्या वरच्या आठवणींनी खूप हळवी झाले. आजही मामा घरचे आंबे आणि नारळ पाठवतो तेव्हा मुलांना सांगते.. माझ्या आजोळचे.. ह्या आंब्याला आणि नारळाला माझ्या आज्जी आजोबांनी पाणी घातलंय. माझ्यासाठी तो आंबा स्पेशल.. त्याची गोडी अगदी ६०० - ७०० डझन वाल्या एस्पोर्ट क्वालिटीच्या हापूस आंब्याला नाही.

हो.. पिवळा चाफा म्हणजे सोनचाफा नाही. एक आणखी पिवळसर चाफ्याचं झाड होतं. त्या चाफ्याचा वास मला फार आवडायचा. एक लाल चाफाही होता. आणि लांब पाकळ्यांचा सफेद चाफाही... ! पण अश्विनी.. कवितेत काय काय बसवायचं गं... ! बघ.. त्या चाफ्याचा सुवासही आला आणि पुन्हा सा-या आठवणीही !

आणखी एक कवितेत न दिलेली आठवण.. चुलीजवळ बसून पणजोबा आम्हा भावंडाचीच नव्हे तर आजी आजोबांपासून प्रत्येकाची रोज तिन्हीसांजेला मीठमोहरीने दृष्ट काढीत, आणि चुलाजवळच्या काजळीचे बोट कपाळावर टेकत.

रत्नागिरी भाषेत... "इल्याची गेल्याची.. वाट्याची तिट्याची.. झाडामाडाची कुणाची नजर लागली असेल तर जाऊदेत" आम्हा पणवंताची दृष्ट काढली की करपट वास आलाच पाहिजे त्यांना.. आणि म्हणायचे मग.. कुणा मेल्याचे डोळे फुटलेले !

सुरेख ,