बोटिंगचा मनसोक्त अनुभव : थेरगाव बोट क्लब

Submitted by ferfatka on 15 April, 2013 - 10:17

थेरगाव बोट क्‍लब

DSCN2362.jpg

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या काही पर्यटक प्रकल्पांमधील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून थेरगाव येथील बोट क्लब नावारुपाला येऊ लागला आहे. सुमारे 5 एकरावर पसरलेल्या या बागे शेजारी वाहणा:या पवना नदीत पर्यटकांना बोटिंगचाही मनसोक्त अनुभव घेता येऊ लागला आहे. त्या विषयी...

थेरगाव :
थेरगाव हे पवना नदीकाठी असलेले एक छोटेसे गाव. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेशानंतरचे हळूहळू विकसित होऊ लागले. बापुजीबुवा हे थेरगावचे ग्रामदैवत. पूर्वी थेरगावचे गावठाण पवनानदीकाठी केजुबाई मंदिर परिसरात होते. कालांतराने बापुजीबुवा मंदिर विभागात गावचे स्थलांतर झाले. येथील पदमजी पेपर मिल या कारखान्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला.
गावाच्या इतिहासाविषयी एक कथाही सांगितली जाते. फार पूर्वी शेतीला पाणी सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी थेरगावचे गावठाण नदीकाठी होते. येथील केजुबाई मंदिराजवळ सुसरींचे प्रमाण वाढले. पाळीव प्राण्यांसह ग्रामस्थांवरही सुसरींचे हल्ले वाढले. यामुळे सोळाव्या शतकानंतर गावठाणाचे स्थलांतर बापूजीबुवा मंदिर परिसरात झाले. प्रत्येक वर्षी चैत्रपौर्णिमेस गावामध्ये बापुजीबुवा देवाचा उत्सव भरतो. थेरगाव परिसर पिंपरी व चिंचवडला जवळ असल्याने अनेकांनी येथे गृहउद्योग उभारले आहे. वाहतूकदृष्टीने पुण्याकडे जाण्यास थेरगाव जवळ आहे.
बच्चे कंपनीला शाळांच्या सुट्टय़ा लागल्या आणि परिसरासतील बागा फुलू लागल्या. संध्याकाळी कुठल्याही बागेत जाण्यापेक्षा घरापासून तीन ते चार किलोमीटरवर असणा:या थेरगाव येथील बागेत जाण्यास निघालो. उन्हाळय़ात अंगाची लाहीलाही करून सोडणारे उन. उन्हामुळे बाहेर तर जाता येत नाही. मग अंगावर पाण्याचे थंडगार तुषारे घेण्यसाठी मस्त ठिकाण म्हणजे थेरगाव येथील हा बोटक्लब.
श्री मोरया गोसावी मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असणा:या या क्लबची उभारणी १६ फेब्रुवारी 2007 साली महापालिकेतर्फे करण्यात आली. थेरगावला शेती प्रमुख व्यवसाय. औद्योगिकीकरणानंतर येथील राहणीमानात फरक जाणवू लागला. मोठमोठे प्रकल्प, औद्योगिक वसाहतीमुळे थेरगाव रुप पालटू लागले. पवना नदी शेजारील सुमारे 5 एकर जागेवर महापालिकेने सुंदर बाग निर्माण केली आहे. या बागेचे वैशिष्ट म्हणजे येथून वाहणारा कृत्रिम धबधबा. सुमारे 400 ते 500 मीटर लांब असा येथे कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे. पाणी स्वच्छ असल्याने बच्चे कंपनीला येथे मनसोक्त पाण्यात खेळायला मिळते.

येथे झोकाळे, घसरगुंडी, खांबावरील विविध खेळ लहान मुलांसाठी उपलब्ध आहे. मात्र, काही हौशी पर्यटक लहान मुलांच्या झोकळय़ांवरती झोकळा घेऊन आपली इच्छा पूर्ण करताना दिसतात. मात्र, यामुळे नाहक खेळण्याची मोडतोड नक्कीच होणार आहे. या ठिकाणी पर्यटकांबरोबरच प्रेमी युगलांचाही वावर वाढल्याचे दिसते. झाडामागे, ओडाश्याला जाऊन प्रेमाचे चाळे करणारे प्रेमवीर ही आपणास पाहावयास मिळतात. असो.

टॉयट्रेन :

लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन ठरू लागली आहे. ट्रेन खाली बहुधा रिक्षाचे एंजिन जोडून रेल्वेसारखा गाडीला आकार दिला आहे. तरीही लहान मुलांना अर्थातच त्यांच्या पालकांनाही या ट्रेनमध्ये बसण्याचा मोह आवारता येत नाही. फक्त 5 रुपये तिकीट दर असल्याने येणारा प्रत्येकजण याचा अनुभव घेतोच. उद्यानातील प्रवेशद्वारापासून बागेच्या शेवटर्पयत एक फेरफटका मारता येतो.
लहान मुलांचे आकर्षण ही टॉयट्रेन
DSCN2414.jpg
बोटक्लब :

उद्यानाचे मुख्य आकर्षण ठरलेले हा बोट क्लब पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागला आहे. केजुदेवी बंधारा बांधल्याने पवना नदीत पाणी अडवून ठेवता येते. याच अडविलेल्या पाण्यावर येथे बोट क्लब सुरू केला आहे. हौशी पर्यटक येथे बोटिंगचा अनुभव घेतात. माणसी 30 रुपये पॅडल बोट 15 मिनिटांसाठी तर मोटार बोट 40 रुपये 15 मिनिटांसाठी आहेत. इतर बोटिंग क्लब पेक्षा या ठिकाणी दर कमी आकारणी आहे. त्यामुळे अनेक हौशी पर्यटक बोटिंग करतात.

DSCN2393.jpgकेजुदेवी मंदिर :
बोटक्लबच्या अलीकडेच वाहनतळाच्या ठिकाणी नदीकाठी आपल्याला एक मंदिर दिसते. हे केजुदेवीचे मंदिर. नवरात्रत या ठिकाणी मोठा उत्सव भरलेला दिसतो. पावसाळय़ात अनेकवेळा हे मंदिर पाण्याखाली जाते. या बंधा:यावर आजुबाजूच्या परिसरातील पोहणारे तरुण नदीत डुंबायला व पोहायला येतात. अनोळखी ठिकाण असल्याने या बंधा:यावर नवख्या माणसाने पोहण्याचा प्रयत्न करू नये. अनेकदा या बंधा:यावर दुर्घटना घडल्याच्या बातम्या वाचण्यात आलेल्या आहेत.

वेळ व दर आकारणी :

  • उद्यानात प्रवेश घेण्यासाठी लहान मुलांना 5 रुपये तर 12 वर्षापुढील व्यक्तीसाठी 10 रुपये प्रवेश फी आकारली जाते.
  • उद्यानाची वेळ : सकाळी 11 ते सायं. 7

कसे जाल :

  • जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवडगावात जाणा:या रस्त्याने थेट चापेकरचौकात जाऊन तेथून मोरया गोसावी मंदिरात गजानानचे दर्शन घेऊन धनेश्वरच्या महादेवाचे दर्शन घ्यावे तेथील जवळच्या पुलावरून सरळच आपल्याला थेरगाव बोटक्लबकडे जाता येते.

दुसरा मार्ग : पु

  • ण्यातून डांगे चौकातून येऊन उजवीकडे वळून चिंचवडगावाकडे जाणा:या रस्त्यावर डावीकडे बोटक्लबला जाता येते.
  • तिसरा मार्ग : चापेकर चौकातील नव्याने उभारलेल्या पुलावरून डांगे चौकाच्या अलिकडे डावीकडे बिर्ला हॉस्पिटलशेजारील रस्त्यावरून बोटक्लबकडे जाणारा रस्ता आहे.
  • पुणे ते चिंचवडगाव अंदाजे 18 किमी.
  • चिंचवड ते बोटक्लब : अंदाजे 3 किमी.

अजून काय पहाल

  • मोरया गोसावी समाधी मंदिर
  • धनेश्वर मंदिर
  • चापेकर वाडा

एकंदरीत एक दिवस वेगळय़ा ठिकाणी व निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आल्याने मन तरतरीत हे नक्की.
सकाळी लवकर घरून निघाल्यास पिंपरी-चिंचवड परिसरातील अन्य पर्यटन स्थळे ही पाहता येणे शक्य आहे.

अधिक फोटो पाहण्यासाठी पहा : http://ferfatka.blogspot.com/2013/04/blog-post_14.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users