प्रारब्ध- भाग ३

Submitted by पारिजाता on 25 March, 2013 - 10:59

आधीच्या भागांची लिंक

भाग १ - http://www.maayboli.com/node/40847

भाग २ - http://www.maayboli.com/node/42011

पुढे..

पण प्रश्न होता तो सगुणाच्या मनात काय आहे याचा. पहिल्यांदा मुलीला स्पर्श करायचा अशा बेभान अवस्थेत. तिला नाही आवडलं तर काय करेल ती?
आणि त्यातून आपली बालमैत्रिण. त्या उन्मादातही हे सगळे विचार सम्राटच्या मनात आले. पण आवेग वाढत होता. तगमग होत होती. मी तिला आवडेन का हे सोडून दुसरे काही आत्ता सुचत नव्हते. ती अजून पाठमोरीच होती. तो अजून जवळ आला. आणि त्याला एक क्षीण उसासा ऐकू आला. त्या क्षणी त्याच्यातल्या कुणीतरी त्याला पुढं ढकललं. त्याने तिच्या घनदाट केसांची वेणी बाजूला केली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि ओठ तिच्या मानेवर टेकवले. डोळे मिटण्याआधी क्षणार्ध त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिचे मिटलेले डोळे आणि विलगलेले ओठ त्याला सांगून गेले कि तिला तो आवडलाय. रूपगंधस्पर्शांचा एक उत्सव सुरू झाला आणि सम्राट परत जाईपर्यंत रोज दुपारी होत राहीला. तो बोलायचा. ती बोलायचीच नाही. तिचे डोळे, ओठ, बोटं बोलायची. आपण प्रेयसी मिळवली आणि मैत्रिण गमावली हे सम्राटच्या परत गेल्यावर लक्षात आलं. खूप आठवणी, उलघाल होत राहिली . जमेल तेंव्हा गावी जायचं असं सम्राटनं ठरवलं होतं पण एक दोनदा गेल्यावर राधाईंनी विचारलं "रावसाहेब म्हणत होते की इतके दिवस कारणं काढून इथं न येणारा. सम्राटला काय कमी पडत नाही ना बघा . या महिन्यात दोनदा येऊन गेला." तेंव्हा आता सारखं यायचं नाही हे ठरवून टाकलं त्यानी. पण काहीतरी करायला हवं होतं.
बागेत भेटल्यावर सम्राटनी सगुणाला सांगितलं, "माझं शिक्षण संपलं की लग्न करायचंय मला तुझ्याशी. तोपर्यंत थांब हां."
सगुणाच्या चेहर्यावर भीती पाहून तो म्हणाला, "अगं तू का घाबरतेस ? मी करतो सगळं. management केलंय. बरोबर जमवतो मी. "
सगुणा एकदम रडायला लागली. "नको, फार गोंधळ होईल. जीव बिव जायचे कुणाचे. मला माफ कर. परत नको भेटायला आपण." असं बरंच काय.
सम्राटनी तिचा हात धरून खाली बसवलं. "जीव कशाला जातोय? मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुलाही करायचं असेल असं मी समजतोय. नसेल तर आत्ता सांग. असेल तर मी बघून घेईन सगळं. "
" त्याचा काय प्रश्न आहे सम्राट? तू मालकांचा मुलगा. माझी लायकी इथं बागेत उभं रहाण्याचीच. अख्खं घर जळून जाईल आमचं. माफ कर मला. "
सम्राटच्या डोळ्यासमोर जग गरगरलं.
" म्हणजे तू लग्नाचा विचार न करता माझ्याबरोबर हे सगळं.. "
" म्हणजे काय? विचार करायची पण लायकी नाही माझी. तू मोठ्या घरचा. शिकलेला. उभं करतील का राधाई दारात तरी? "
" मग काय विचार करून हे दान मला देत गेलीस?" सगुणा मख्ख.
" मला वाटायचं तू मला तुझा पुरुष म्हणून स्विकारलंयस." सगुणा मख्ख.
" तुला मी आवडतो तरी ना. का मालकांचा मुलगा म्हणून सहन करत होतीस मला?" उत्तर नाही.
" म्हणजे मी श्रुंगार समजून बलात्कार केले तुझ्यावर. ठीक आहे. पण हे नकळत झालं. नाहीतरी तू घरातले म्हणतील त्या मुलीशी लग्न करणार आहेस ना. मग तो मी असलो तर चालणार आहे का तुला?"
आता मात्र सगूणानं त्याचा हात पकडला. "अरे मला तू का नाही आवडणार सम्राट? कुठल्याही पोरीनं लगीच मुंडावळ्या बांधून हार हातात घ्यावा असा आहेस तू. पण माझी लायकी नाही ती. हे सुखाचे दिवस पदरात घातलेस त्यावर आयुष्य काढीन मी. पण उगच माझ्या घरच्यांना त्रास नको."
सम्राट उठला. सगुणा धावली. "तुला माझी शपथ आहे सम्राट"
" सोड आधी ती शपथ. मी कुणाला काही न होऊ देता लग्न लावतो तुझ्याशी. विश्वास ठेव माझ्यावर."
आणि तो वेड्यासारखा ती शपथ सोडण्याची वाट पहात राहिला. सगुणा गप्प राहिली.
" तुझं माझ्यावर प्रेम आहे सगुणा?" त्यानं तिच्या डोळ्यात बघत विचारलं. तिनं मान फिरवली तसं तिला आपल्याकडं खेचत तो म्हणाला "बोल. आयुष्याचा प्रश्न आहे आपल्या ."
त्याच्या मिठीत पुन्हा बेहोष होत तिने मान हलवली.
" मग एकदा प्रयत्न करू दे ना मला. हे बघ तू बोलूच नकोस. तुला माहीतच नाही असं समज. मी करतो काय ते. तू फक्त पसंती विचारली तर हो म्हण. म्हणशील ना? " पण उत्तर द्यायची संधी दिलीच नाही त्याने तिला.
जाताना सगुणाने शपथ सोडली. सम्राटचं शिक्षण संपलं. त्यानं आल्याआल्या आईला सांगून टाकलं की मला सगुणा आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. राधाई दचकल्या. मग थोड्या वेळानं सावरल्या.
"तुमचं प्रेम आहे एकमेकांवर?" राधाईनी विचारलं.
"तिचं माहीत नाही. माझं आहे. " त्यानं ठरलेलं उत्तर दिलं.
"ठीक आहे. मी बोलते तुझ्या वडलांशी. मग बघू. " यापुढे एक शब्द नाही. सम्राटलाही बोलणं अवघडच होतं. तो निघालाच तिथून.
चार दिवस होऊन गेले. सगुणा बागेत आलीच नाही. घरी पण नाही. त्याने आईला विचारलं.
"मैनाला बोलावलंय वाड्यावर उद्या. "
काहीतरी जाणवून सम्राट म्हणाला "आई तुला किंवा बाबांना आवडलं नाही किंवा चालणार नाही असं काही आहे का?"
दोन क्षणांच्या शांततेनंतर त्या म्हणाल्या " आता तुला आवडलीच आहे तर काय करणार आम्ही? बघू या काय होतंय."
"पण आई मुलगी म्हणून चांगली आहे ना गं ती. " सम्राट म्हणाला.
" हं. आहे की. पण तो पण का लावलास पुढं?"
सम्राट थरारला. कसोटी होती आता.
दुसऱ्या दिवशी दिवशी आश्चर्य म्हणजे कुणीही चौथी व्यक्ती वाड्यावर नव्हती. नोकर सुद्धा नाही. ना पाहुणे, ना भेटीगाठीला कुणी. रावसाहेब, राधाई आणि सम्राट वाट बघत होते. मागच्या दारानं मैनाबाई, तिचा नवरा आणि सगुणा वाड्यावर आले. या वेळेपर्यंत सम्राट आणि रावसाहेब एकमेकांशी या विषयावर काहीही बोलले नव्हते. आणि आई आणि बाबा दोघांच्या चेहऱ्यावरून सम्राटला काहीही अंदाज बांधता आला नव्हता. पण एकूण परिस्थिती शांत होती त्यामुळे सम्राटनी जास्त चिंता करायची नाही हे ठरवलं होतं. आपले आईबाबा तयार आहेत म्हटल्यावर सगुणाच्या घरच्यांचं एवढं काही नाही असा एक सुटकेचा समाज त्यानं करून घेतला होता.
ते लोक आल्याबरोबर बाकी काही न बोलता रावसाहेबांनी मुद्द्याला हात घातला. "हणमा, आमच्या पोराला तुझी पोरगी आवडलीय. लग्न करायचं म्हणतो तिच्याशी. काय म्हणणं आहे तुझं? "
मैनाबाई आणि सगुणाची मान तर आल्यापासूनच खाली होती. हणमा पण खाली मान घालून बोलला " साहेब, इतकं नशीब चांगलं असंल पोरीचं हे म्हाईत नव्हतं ल्हान होती तवा. न्हायतर.. आमाला इचारायची बी गरज नव्हती. तुमी मालक. म्हनला की हुबी केली असती प्वार. पर.. "
"पर काय? " सम्राट न राहवून ओरडला.
" तिचं लगीन ठरल्यालं हाय सम्राट बापू . ल्हानपनीच. आत्याच्या पोराशी. आता करायचंच हाय औंदा. "
" मोडा मग ते. ठरलं म्हणजे काय झालं नाही ना ?" आता सम्राटचं MBA ज्ञान बाजूला पडलं होतं. तो थरथरत होता.
" न्हाई करता येत तसं मालक. आणि लगीन मोडलेल्या पोरीशी तुमी कसं लावाल लगीन?"
" सगुणा तुला काय वाटतं? " सम्राट थंडपणे म्हणाला.
सगुणानी उत्तर दिलं नाही. मान सुधा वर केली नाही.
" तिला काय वाटणार मालक? आता सांगायचं म्हंजी तसं झाल्यालंच हाय लगीन. निक्कं पोरीला सासरी नांदाया धाडायचंच बाकी हाय. सगळ्या पावण्यात बी ह्येच हाय की ह्या साली जवारी निगाली का पोरीला धाडायचं तिकडं. "
"सगुणा " सम्राटनी शेवटचा प्रयत्न करून पाहिला. ती बोलली नाही. पण मैनाबाई अन तिचा नवरा उठले तशी ती धाडकन जमिनीवर कोसळली.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त होतेय कथा. सगळे भाग वाचलेत पण फक्त येथेच प्रतिसाद देतोय. पटकन येऊ द्या पूढचे भाग.