प्रारब्ध (गोष्ट) - भाग २

Submitted by पारिजाता on 21 March, 2013 - 08:56

पहिल्या भागाची लिंक
http://www.maayboli.com/node/40847

पुढे..

सम्राटचं लक्शच लागेना कामात. तो आलाय हे कळल्यामुळं भेटायला लोक यायला लागणार होते आता. दोघं तिघं येऊन पण बसले होते. पण त्याला सुचेचना. तो त्या लोकांशी जुजबी बोलला.
यश बाजूला लगबग करत होता. हा सम्राटचा सेक्रेटरी. आद्न्याधारक, हुशार आणि अतिशय चपळ. १९-२० वर्षांचा असेल. सम्राटनं त्याला बोलावलं आणि सांगितलं आज डोकं दुखतंय. आता सगळं
उद्याच बघू या. यशनी आधीच कामाचं सगळं हातात घेतलं होतं. पण सम्राटचा चेहरा बघून तो म्हणाला, " होय बापू, लय दमलाय दिस्तंय. जावा निवांत. उद्या होतंय सगळं. ते तेवडं दुबईच्या द्राक्षांचा हिशोब बग्ता का? म्हन्जे हिशोब नंतर बगा. पण चांगली बातमी आहे ती ऐका. यावेळी एक पण रिजेक्शन न्हाय. " यशचा चमकता चेहरा बघून सम्राटला हसू आलं.
" तू आहेस म्हणून चाल्लंय बाबा सगळं" तो यशच्या खांद्यावर थोपटत म्हणाला आणि निघाला. यशचा चेहरा अभिमानानं आणि आदरानं फुलला होता.
तो इतक्या लौकर परत आत आलेला बघून अक्काआत्या सोप्यात आली. आधीच ते मगाचं. बोलावं का नकोच. पण सम्राटच म्हणाला.
"अक्कात्या डोकं दुखतंय खूप. जरा पडतो माडीवर जाऊन. कुणाला पाठवू नको. आणि जेवण पण नको आज. " पाय ओढत तो अंगणात आला. जिना चढून माडिवर गेला.
आक्रितच होतं आज. आल्याआल्या वाघासारखा कामाला लागणारा सम्राट, घरच्या जेवणावर तुटून पडणारा सम्राट. का बदल्लं असेल हे? आणि तो बदल चांगला नाही हे ही तिला कळत होतं.
काहीतरी बिनसलं होतं खरं. असं तिन्हीसांजा तोंडावर असताना झोपू नये कारणाशिवाय.
"सगुणा, ते बघ त्या कोपर्‍यातल्या कपाटात मधल्या खणात वेखंड आहे. ते उगाळ जरा." अक्काआत्या म्हणाली.
सम्राट, वर जाऊन पडला पण झोपेचं चिन्ह नव्हतं.
कसलं चक्र हे? कुणाकुणाची नशिबं आपल्याला जोडली गेलीत?
सगुणा. या असल्या अवतारात बघूनही हृदयात कळ उठलीच. इतक्या दिवसात डोक्यातही नसलेला भूतकाळ जोरात उसळी मारून वर आला आणि जमीनच हलली पायाखालची.
मैनाबाई कामाला घरी यायची. तिची मुलगी सगुणा. आईमागोमाग तीही यायची वाड्यावर. तिथंच खेळायची. सम्राट एकुलता. मित्रांबरोबर उंडारायला गेला नसेल तेंव्हा मागच्या अंगणात तिच्याशी खेळणं. मुलांच्या शाळेतल्या गमती तिला सांगून मुलींच्या गमती काढून घेणं. सम्राट घरात पण खेळतो आणि नजरेसमोर असतो म्हणून राधाई पण खूष असायच्या. गावातल्या उनाड पोरांपेक्षा मैनाबाईची पोरगी बरि. ते थोडे मोठे झाले. खेळणं कमी झालं पण सगुणा आली की सम्राट तिच्याशी गप्पा मारायचा. लहानपणाची मैत्रीण म्हणून एक माया होतीच त्याला. मग सातवीनंतर सम्राट शहरात मामाकडे गेला. सुट्टीत आला की घर, मित्र यातून वेळ नसायचा. तरीही अधून मधून भेटी व्हायच्या. राधाईनाही सगुणाचं कौतुक होतं. लागेल तेंव्हा मदतीला असायची म्हणून. आणि ती तिच्या वस्तीतल्या मुलींपेक्षा कितीतरी सभ्य आणि हुशार होती हे त्या मैनाला नेहमी सांगायच्या. "मैना, पोरीला उगाच कुठेही उजवून टाकू नको. देखणी, सोज्ज्वळ पोर आहे. शिकलेला जावई बघ. " सम्राटनी सुद्धा ऐकलं होतं. त्यानेही एकदा चिडवलेलं "बघू का माझ्या कॉलेजातला मित्र? "
सम्राट कॉलेजात होता. शेतकीची पदवी घ्यायची हे ठरलंच होतं. एवढा मोठा बारदाना होता. तो एकुलत्या मुलानं सांभाळावा म्हणून. उगाच इंजिनियरिंग वगैरेच्या भानगडीत पडेल, पोरीच्या प्रेमात पडेल आणि हातचा जाईल म्हणून ते आधीच मनावर ठसवलं गेलं होतं. पण शेतीची पदवी घेतल्यावर पण सम्राटनं पुढं शिकायचं म्हणल्यावर रावसाहेब घाबरले होते. पण सम्राटचं स्वप्न वेगळं होतं. त्याला शेतीचं व्यवस्थापन करायचं होतं. त्याला खात्री होती की, वडलांनी चालवला त्यापद्धतीचा कारभार चालवून आता फ़ार फ़ायदा नाही. बदलत्या जगाचा, शिक्षणाचा उपयोग करून घेतला पाहिजे. मग हळूहळू त्यानं रावसाहेबांना समजाऊन सांगितलं. मामाला गावी नेलं. शेवटी रावसाहेबांना पटलं. आणि पोरगं शेतीसाठीच पुढचं शिक्षण घेतंय हे शेवटी मान्य केलं.
कॉलेजात श्रीमंत जमीनदाराचा शिकलेला मुलगा या किर्तीमुळं खूप मुली त्याच्या अवतीभवती असत. पण त्यानं ठरवून टाकलं होतं ऐश वेगळी आणि आयुष्याचे निर्णय वेगळे. पोरीला हात लावायचा नाहि आणि गुंतायचं नाही. मदत करायची, चांगलं वागायचं, धमाल करायची हे तत्व पाळून खूप मित्र मैत्रिणी जोडले. या स्वभावाचे फायदे पुढेही मिळत गेले.
सम्राट नुकताच सिगरेट ओढायला लागला होता. वाड्यात तर प्रश्नच नव्हता. मग तो हळूच मागच्या बागेत जायचा. तिथल्या गच्च झाडीतून घरातलं काही दिसायचं नाही. त्यामुळे इथलंही काही दिसत नसेल हे त्यानी गृहीत धरलं होतं. तिथल्या एका पेरूच्या झाडाच्या एका खालच्या फांदीवर निवांत बसून त्याचे हे आनंदग्रहण चाले. एक दिवस तो बसलेला असताना मागून आवाज आला. " राधाईंना सांगू का सम्राट?" तो दचकून जवळजवळ पडल्यासारखा उतरला. वळला तर सगुणा. चेहऱ्यावर तेच सोज्वळ हसू आणि डोळ्यात मिश्किल चमक. लग्नावरून चिडवल्याची परतफेड करायचा प्लान सरळ दिसत होता. तो तिच्याजवळ आला. "प्लीज सगुणे नको ना सांगू . "
"बरं नाही सांगत पण तू ही सवय सोडून दे. चांगली नाही ती" ती म्हणाली.
"बरं. अगं जास्ती नाही ओढत मी. दिवसाला एखादी. आणि आहेस कुठं तू? आठवडा झाला येऊन. दिसली नाहीस. आईला विचारणारच होतो मी. " तो नेहमीच्या सहज सुरात बोलला.
"होय? आठवण तरी होती का माझी? उगीच आपलं देखल्या देवा दंडवत. परत पण गेला असतास सुट्टी संपली की. " ती खेळकरपणे म्हणाली.
" नाही अगं खरंच. मला कधी कधी तिकडं असताना पण येती तुझी आठवण " मग आपण काय बोललो त्याला कळलं. आणि तो गप्प झाला. पण सगुणानं फारसं मनावर घेतलेलं दिसलं नाही.
" होय का? अशी कधी कधी येती म्हणे?" ती पुन्हा चिडवण्याच्या सुरात म्हणाली.
त्यानी विचार केला की तिची आठवण येते हे ही लक्षात नव्हतं आपल्या. पण येती हे खरंच. कधी बरं? जेंव्हा तो कॉलेजातल्या मुलींचा विचार करायचा तेंव्हा बऱ्याचदा. म्हणजे तिचा वेगळा असा विचार नाही पण आपल्या स्त्रीमध्ये काय हवं याचा विचार करताना त्याला तिच्यातलंही काहीतरी पुसटसं जाणवून जायचं. आणि एकूणच हा विचार झटकून टाकायचा असं ठरवल्यामुळं त्याचा वेगळा फ़ार विचार त्यानी केला नव्हता. स्वप्नरंजन असा शिक्का मारून तो मोकळा झाला पण तिला काय सांगणार?
"येती गं. सुंदर मुलींबद्दल बोलतात ना पोरं तेंव्हा मी सांगतो आमच्या गावच्या पोरी काय कमी नाहीत. " असं सार्वत्रिक करून टाकता आल्याचं त्याला बरं वाटलं.
" खूप बोलायला शिकलास की. चल जाते मी. धुणं पडलंय माझं" म्हणून ती वळली.
आत्ता त्याच्या लक्षात आलं की ती बागेतल्या पाटाच्या पाण्यावर तिच्या घरून आणलेलं धुणं धूत होती जेंव्हा तो इथं आला तेंव्हा.
तो एकदम पुढं झाला.
" थांब की." ती थांबली पण आता पुढं काय बोलणार? आणि का थांबवलं आपण तिला?
काही कळायच्या आत सम्राटला आपण तिच्या किती जवळ आहोत ते जाणवलं. तिचा गंध जाणवला. तिचं सावळं, देखणं रूप जाणवलं. कॉलेजातल्या मुलींपासून वेगळं नैसर्गिक, बांधेसूद सौंदर्य समोर पाठमोरं उभं होतं. ती आपल्या स्वप्नरंजनात किती वेळ असायची हे त्याला तेंव्हा ठळकपणे जाणवलं.
आता एक वेगळीच शक्ती तिथं काम करत होती. रोखायचं म्हटलं तरी जमत नव्हतं. आवेग त्याच्या अस्तित्वाहून, मेंदूहून, विवेकाहून मोठा मोठा होत जाताना त्याला कळत होता. झोकून देण्याशिवाय आता पर्याय नव्हता.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चालु आहे कथा.. पण रिया म्हणते तसच माझही झालं.. आधीचा भाग विसरुन गेलेले.. पटापट पुर्ण कर आता..

पारे पार दीड दोन महिन्यांनी टाकलास भाग. पहिला पुन्हा वाचावा लागला मला.
छान झालाय भाग. पण पटापटा लिहि आता.

धन्यवाद दोस्त लोक. नवीन भाग टाकत आहे. लौकरच पूर्ण करते. थोडी मोठी झाली अपेक्शेपेक्शा त्यामुळे भागांमधे लिहीत आहे. वाचायला पण सोपे जावे म्हणून. Happy

Hi पारिजाता,
मी भाग १ वाचु शकत नाही मला खालील message येतो आहे

तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.

हे पान वाचण्यासाठी तुम्ही गुलमोहर - कथा/कादंबरी
या ग्रूपचे सभासद असणे आवश्यक आहे.

सियाली आता दिस्तेय का?
रिया चेक केले. पहिला भाग नव्हता सार्वजनिक. बाकीच दोन सार्वजनिक आहेत. ते कुठे करायचे तेच आठवेना आधी. Lol