पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी

Submitted by अनया on 22 March, 2013 - 03:25

पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी
आपल्यातले बरेच लोक वाहन चालवत असल्याने पेट्रोल पंपांशी सतत संबंध येतो. पेट्रोल भरण्याचे अत्यावश्यक पण तरीही कंटाळवाणे काम करताना आपण बहुधा कुठूनतरी कुठेतरी जायच्या घाईत असतो. पंपावर सदैव गर्दी असते. त्या झटापटीतच दुचाकी असेल तर तिचा आणि स्वतःचा तोल सावरा, टाकीचे झाकण उघडा, तिथला शून्याचा आकडा नीट बघा, तेवढ्यात काहीतरी विकू पाहणाऱ्यांना किंवा लकी कुपन वाल्यांना तोंड द्या, सुट्टे पैसे घ्या अश्या असंख्य गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते.
चार चाकी असली, तरी व्यवधाने असतातच. ह्या सगळ्या गोंधळाचा फायदा तिथल्या लोकांनी न घेतला, तरच नवल! मी मला आलेल्या दोन फसवणुकीच्या प्रयत्नांच्या अनुभवांनी सुरवात करते आहे. तुम्हीही तुमचे अनुभव लिहा आणि फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, तेही लिहा.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. तिथल्या माणसाने ७० रुपयांचे पेट्रोल भरले. ‘अहो, मी तीनशे रुपयांचे सांगितले होते.’ ‘हो का, मी सत्तर ऐकल. अजून टाकतो,’माणूस. अस म्हणून त्याने मला मशीनवर २३०चा आकडा दाखवला. ‘तुम्ही एकूण २३० रूपयांचच पेट्रोल टाकल’ माझा निषेध. ‘नाही हो ताई. मी झीरोनंतर २३० रूपयांच भरल’
माझ्या गाडीच्या इंडीकेटरवरून मला कळल, की तस झालेलं नाहीये. मी आवाज चढवून त्याला मॅनेजरला बोलवायला सांगीतल. तो लगेच नरमला. ‘ कशाला ताई, इथेच कळेल’ अस म्हणून त्याने मशीनवर काहीतरी खाडखूड करून चूक मान्य केली, आणि मला अजून सत्तर रुपयांचे पेट्रोल भरून दिले.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील तोच पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. मागच्या अनुभवावरून ऐकण्यात गोंधळ होऊ नये म्हणून विक्रेत्याकडून ३०० रुपये वदवून घेतले. पेट्रोल भरल्यावर १००० रुपयांची नोट दिली. त्याने त्याच्या हातात शंभरच्या सात नोटा मोजल्या. माझ्या हातात घाईघाईने कोंबल्या. ‘चला मॅडम, गाडी पुढे घ्या’ अशी घाई करायला लागला. मी ठामपणे तिथेच थांबून हातातल्या नोटा मोजल्या. त्या सहाच होत्या! मी तसे दाखवून दिल्यावर दात काढत त्याने खाली पडलेली एक शंभराची नोट माझ्या हातात कोंबली. ती चुकून खाली पडली होती की मुद्दाम टाकली होती? तुम्हीच ठरवा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या इथल्या जवळ असलेल्या पेट्रोल पंपावर नेहमी पेट्रोल संपले आहे असा बोर्ड लावलेला असतो. रोज
पेट्रोलची गाडी (indian oil)येते मग पेट्रोल जाते कुठे?

डाव्या बाजूचा रिअरव्ह्यू मिरर नसेल, किंवा काही कारणाने बसल्या जागेवरून ते पेट्रोल / डिझेल नक्की कशात भरले जाते आहे ते दिसत नसेल, तर गाडीखाली उतरून पहाणे. पंपावर मिटर फिरत असते, पण पेट्रोल गाडीत न जाता दुसर्‍याच कॅनमधे भरले जात असू शकते. हे घडताना पाहिलेले आहे.

ज्वलन्त विषय!
फक्त रोज मरे (आपणच) त्याला कोण रडे (आपणच) असे होते म्हणून कोणीच काही बोलत नाही.
त्यातुन पेट्रोल पम्पावरचे कामगार म्हणजे "तुलनेत वंचित वगैरे" गटातील, तेव्हा त्याविरुद्ध काही बोलणे हा हल्लीचा समाजशास्त्रीय गुन्हा. म्हणूनही हा विषय ऐरणीवर येत नाही. शिवाय घाई/गडबड, वेळ नसणे, अन एकुणातिल लुबाडणू़ जबरदस्त असली तरी तत्कालीक लुबाडणूक दहावीस रुपयान्ची असे भासत असल्याने दुर्लक्ष होणे, मध्यमवर्गीय भिडस्त/घाबरटपणा इत्यादि अनेक कारणे हा विषय पुढे न येण्याला आहेत.
पण इथे या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद.
माझ्याकडे यावरचे अनुभव, जेव्हा पेट्रोल पन्चाहत्तर पैसे लिटर होते तेव्हापासूनचे आहेत. Proud कोळसा उगाळावा तेवढा काळाच आहे, आता धुवायचे कशाने हा प्रश्न पडला आहे.
वेळ मिळाल्यास या धाग्यावर पुन्हा येईन, ज्वलन्त पेट्रोलमागची सडकी मानसिकता अन राजरोस दरोडेखोरी सान्गायला! Happy

जेव्हा पेट्रोल पन्चाहत्तर पैसे लिटर होते >>>>>>>>>> ग्रेट..

पहिला अनुभव जवळपास सगळीकडे येतो..

झिरो सेट करायच्या वेळीच पी यु सी काढायचा आहे का? कॅश आहे की कार्ड? इ. विचारायला दुसरा माणुस येतो. शंभर चं टाकायला सांगितलं तरी १०० सेट न करुन ९९.५० वगैरेचे पेट्रोल भरतात, कधी मुड असेल तर ते १०० करण्याकरता भांडते, नाहीतर सोडुन देते. टाकी फुल करायला सांगितली की पेट्रोल अगदी बाहेर येइपर्यंत भरतात.. Sad

"....१०० सेट न करुन ९९.५० वगैरेचे पेट्रोल भरतात...."

.... हा डोकेदुखीचा कार्यक्रम तर पेट्रोल पंपावरील कामगार सर्वत्र एकदिलाने राबवित असल्याचे दिसत्ये. कोल्हापूरात तर "१०० ला १०० चे पेट्रोल देणारा कामगार दाखवा आणि १०० रुपये जिंका...." असे जाहीरपणे सांगितले जाते.

चिमुरी लिहितात, "...मुड असेल तर ते १०० करण्याकरता भांडते, नाहीतर सोडुन देते..." ~ हे सोडून देण्याचे प्रकार हमेशा घडतात हे ह्या अटेन्डंटना नेमके माहीत असते त्यामुळे जरी तुमच्यासारखे एखादे गिर्‍हाईक भांडून १०० रुपयाचे पेट्रोल घेत असेल तर बाकीची दहापैकी नऊ मुकाट असतात.

मी स्वतः अशा ९९.५० बद्दल तिथे जाग्यावरच वाद घालतो. पण संतापाची बाब म्हणजे त्या कामगारापेक्षा माझ्यामागे लाईनीत उभे असलेले बाकीचे टू व्हीलर्सवाले आणि रिक्षावाले जणू काही मीच मोठा गुन्हा केल्यासारखे मागून कोकलतात... "अहो भाऊ, जाऊ द्या ना....कशाला पन्नास पैशासाठी मन दाखविता ?" ~ म्हणजे मी वाद घालतो तो माझे ५० पैसे जातात याच कारणासाठी की काय ? एकीकडे सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात ३०-४० पैसे वाढ केली की मनमोहन सिंग पासून सार्‍यांना झाडून आपण शिव्या घालतो, पण पेट्रोल पंपावरील या राजरोस लुबाडणूकीविरुद्ध आवाज काढला तर हीच सुशिक्षित जनता आपल्याला मूर्खात काढते.

[या प्रवृत्तीबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांतून वारंवार 'वाचकांचा पत्रव्यवहार' होत असतोच, पण जिल्हाधिकारी वा तत्सम संबंधित अधिकारी वर्ग यानी आजअखेर कसलीही कार्यवाही केल्याच दिसून आलेले नाही....]

अशोक पाटील

अशोकराव, इथे मूळात पेट्रोलपंप मालकाच्या "उदासीनतेचा" संबंध आहे.
मालकाच्या दृष्टीने सकाळ संध्याकाळच्या मिटररिडींग मधील फरकायेवढ्या खपाबद्दलची रक्कम नोकरान्कडून मिळाली की त्याचे काम होते, बर तर बर, इंधन हे अत्यावश्यक असल्याने विक्रीकरता विशेष काहीच करायचे नस्ते. (म्हणजे कस्टमर स्याटिस्फ्याक्शन वगैरे थेरं इथे कुचकामी अस्तात), मग मालकालाच काही घेणेदेणे नस्ते म्हणल्यावर नोकर मोकाट सुटणारच! त्यातुन त्यान्च्या युनिअन्स वगैरे प्रकार.
शिवाय असा पैसा खायला मिळतो म्हणल्यावर, कमी पगारात देखिल माणसे मिळतात व मालकाच्या दृष्टिने कमी पगारात कामाला माणूस म्हणून तो ही फायद्यातच अस्तो व दुर्लक्ष करतो.

स्थळ : फेज थ्रीकडून हिंजवडीचौकाकडे येतांना भारत पेट्रोलिअमचा पंप, विप्रो सर्कलनंतरचा पहिलाच :
माझ्याआधीच्या माणसाने १०० चं पेट्रोल भरलेलं मी पाहिलं. मला केवढ्याचं भरायचंय हे विचारलं असता मी ३०० असं सांगितलं, त्यावेळी काहीतरी खुडबूड केली असावी. तो झिरो सेट करतोय असं पाहून मी पैसे काढले, पेट्रोल भरून, पैसे देऊन हवा भरायला थांबलो, तर काटा काही ३०० पर्यंत जाईना, रिझर्व्हवर लागल्या लागल्या पेट्रोल भरण्याची माझी सवय. चिडून भांडायला परत गेलो. तर शाहजूकपणे मलाच म्हणतो, सर तुम्ही पायचं होतं ना मंग, मी झिरो न्हाई केला ते... आणि गप १००चं पेट्रोल टाकून दिलं.

दुसर्‍यांदा पुन्हा तोच पंप, सेम तर्‍हा : आधीच्याने १००चंच पेट्रोल भरलेलं, मात्र यावेळी मी कार्ड काढलं होतं. त्यावेळी दुसरा माणूस हजारवेळा कितीचं? ३००चं? पाचशेचं करू? पाचशेचं करू? असं म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे वळवायचा प्रयत्न करत होता. चिडून त्याला म्हटलं, तीनशेचं सांगितलं ना, मग तेवढ्याचंच भरा... आणि तोपर्यंत इकडे काम साधून झालं होतं. पुन्हा तोच प्रकार. चिडचिड, भांडण आणि मग १०० चं पेट्रोल भरून देणं...

यानंतर एक धडा शिकलो : पैसे किंवा कार्ड आधीच काढून ठेवायचं नाही. त्यांनी झिरो करण्यासाठी कितीही वेळ घेतला, तरी ढळायचं नाही, मग भले मागचे शिव्या का घालोत... आणि आपला काटा हवा त्या ठिकाणी पोचेपर्यंत पेट्रोल पंप सोडायचा नाही. (त्यावरही साल्याने कोटी केली, की तुमचा काटा बरोबरच असेल याचा काय भरवसा? )
मॅनेजरपर्यंत पोचूच देत नाहीत ही भामटी लोकं, त्यामुळे कंटाळून पेट्रोलपंपच बदलला Angry

लिम्बुटिम्बु यानी हा 'उदासिनते' चा विषय छेडलाच आहे, तर त्यासंदर्भात विस्ताराने लिहितो.

"लाल बावटा निशाण' तसेच मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी या दोन पक्षांशी बहुतांशी कामगार [एम.आय.डी.सी. धरून] तसेच रिक्षा युनियन्सवाले आपली बांधिलकी मानतात. पेट्रोल पंप मालकांचीही एक साखळी असतेच असते. ही साखळी मग कामगारनेत्यांशी कसे संबंध जुळवून असतात ते सांगत बसलो इथे तर चॅनेल्सवरील एपिसोडस कमी पडतील इतके ते खोलवर गेलेले आहेत. आजच्या क्षणी कामगार क्षेत्रात "फुल्ली डीव्होटेड लीडर्स" नामक नेतृत्व शून्य झाले आहे आणि मुळात जिथे 'चळवळ' हा प्रकारच मृतावस्थेत गेला आहे तर कामगारपुढारीही अशा मालक-लोकांशी थेट वाकुडपणा घेत नाहीतच.

मुद्दा असा की पेट्रोल पंपावर काम करणार्‍या अटेन्डन्टना दहा तासाची सलग ड्युटी असते आणि यांचे वेतन शोचनीय असते हेही मी मान्य करेनच [मला ही आकडेवारी माहीत असल्याने....]. जेव्हा कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न येतो, त्यावेळी हेच पेट्रोलपंप मालक 'पगारापेक्षा मिळकत करता की लेकांनो, ग्राहकांकडून.." अशी टपली मारतात, तेव्हा या कामगारांकडे त्याला सडेतोड उत्तर नसते.... म्हणजेच हा ग्राहकाच्या खिशाला लुटायचा प्रकार मालक+कामगार या दोन्ही पक्षांसाठी सोयीची [आणि आता राजमान्यही] बाब झाली आहे हे उघडच.

१९६०-७० च्या 'सिनेमा' युगात 'काळाबाजाराने तिकिटे' घेणे सर्रास प्रकार चालू होते. पोलिस असो वा अन्य संघटना...काहीही फरक पडत नसे. तिकिटविक्री सुरु झाली की पाच मिनिटाच्या आतच "हाऊसफुल्ल' चा बोर्ड झळकत असे आणि थिएटरच्या आवारात कठड्याशी उभे असलेले टपोरी ब्लॅकवाले देव आनंद आपल्या खिशातून करकरीत तिकीट बाहेर काढून "पाच का दस, दस का बीस..." अशी गुर्मीत राजरोस विक्री करीत. म्हणजेच बुकिंग क्लार्क ही जमात या ब्लॅकवाल्यांचा ताटलीतील वाटा खात असे हे उघडच.... तेही कधी थांबू शकले नाहीत, कारण थिएटर कामगारांना किती अल्प वेतन मिळत असे हे सार्‍यांनाच ठाऊक....

शिवाय नोकरीची शाश्वतीही नसते या कामगारांना, त्याबद्दल शासन कडक कायदे करत असताना दिसत नसल्याने मालक लोकांचेही फावतेच.

थोडक्यात दोन्हीकडून 'ग्राहक' नामक भीडस्त घटक सदोदित चेपला जाताना दिसतो....आणि हे चित्र भविष्यात कधी बदलेल याची सुतराम शक्यता नाही.

अशोक पाटील

हर्शल, तो बोलण्यात गुन्तविण्याचा प्रकार तर नित्याचा!
अशोकराव, अनुमोदन.

अगदी असेच सगळे प्रकार मी सिंहगड रस्त्यावरच्या इंडियन ऑइलच्या पंपावर ४-५ दा अनुभवले.... आणि आता तिकडे पेट्रोल भरणेच सोडून दिले!

हे मी पुर्वी सर्व काही अनुभवलेलं आहे. Sad
आता ४० लाखाच्या डिझेलच्या गाडीतून जाते, इंधन भरती वगैरे सगळं ड्रायव्हर बघतो त्यामुळे चिंता नाही, मी आपली आरामात बसून जाते. Proud

मी माझ्यापरीने याला सोप्पा उपाय केला होता, साले असे नै त तसे पैशे जातातच, मग माझ्याच हाताने देऊन मी पुण्य तरी का कमावू नये? म्हणून चक्क दिवाळीत अटेन्डन्टला पन्नास पन्नास रुपयांची "दिवाळी" दिली होती! आता ते दोघ असले, तर मला चिन्ता नसते! Proud
(अगदी तश्शीच दिवाळी (मात्र विनाकारण हं) एटीएम बाहेरील रक्षकास दिली होती. पठ्ठ्या लईच खूश झाला होता. तेव्हा मात्र मनात विचार वेगळा होता, की या बिचार्‍यान्ना तर कोणीच वाली नाही, विचारणारेही नाही! किती तो अनुल्लेख होतो बिचार्यान्चा! अन मी अनुल्लेखाची होरपळ प्रत्यक्षात अनुभवली असल्याने, किती पैशे दिले यापेक्षा कुणीतरी आठवणीने काहीतरी दिले याला जास्त महत्व आहे हे ओळखून ते केले. )

७५ पैसे? बापरे लिंबु, तू मध्ययुगीन आहेस का पाषाणयुगीन? (हे फक्त तुझ्या जन्मसालाबद्दलच बोललो बरं का. :फिदी:) अगदी मामा, काकाच्या पुढ्यात जावा/येझ्दीवर बसण्याचा काळ आठवला, तरी १० रु.च्या खाली पेट्रोल आठवत नाही मला.

पेट्रोलमध्ये काटा मारण्याचे प्रकार सर्रास आणि सगळीकडे आहेत.
१) पंपावरच्या डिस्प्लेवर टाचणी / ब्लेडने स्क्रॅचेस करून ठेवणे. एलसीडी डिस्प्ले असला तर हे फारच सोपं. दिवसाही आकडे नीट दिसत नाहीत. रात्री तर आनंदीआनंद. अगदी एलईडी असला तरी दिवसा नीट दिसत नाही.
२) गाडी फार पुढे किंवा फार मागे घ्याला लावून डिस्प्ले नीट दिसणार नाही, अशी व्यवस्था करणे. दिसत असला तरी तिथे डिस्प्लेच्या ९० अंशावर पुठ्ठ्याचा काहीतरी बोर्ड लावलेला असतो आडोसा म्हणून.
३) एकाच मशिनवर दोन्ही बाजूला दोन दोन डिस्प्ले असले तर आपलं इंधन नक्की कोणता डिस्प्ले दाखवतो आहे, याबाबत जाणूनबुजून गोंधळ निर्माण करणे. कधी तर चक्क 'पलीकडे' जाऊन डिस्प्ले बघा, असंही सांगितलं जातं.
४) ५०० रु.चं इंधन हवं असेल, तर डिस्प्ले साधारण ४०० च्या वर गेला की पेट्रोल भरणारा महामानव बाजूला थांबलेल्या पीयुसीवाल्याला इशारा करतो. मग 'साहेब पीयुसी काढू का?' अशी नम्र विचारणा होते. 'नाही' म्हणलं, की पुन्हा विचारलं जातं, कमी दराचं अमिष दाखवलं जातं. आपलं लक्ष विचलित झालं, की चपळाईने नोझल बाहेर काढून डिस्प्लेवरचं मीटर रिसेट केलं जातं. कमीत कमी १०% पासून जास्त कितीही-असा तोटा होऊ शकतो. हे सारे उपद्व्याप माहिती असलेला माणुस, पंपावर त्यावेळी रजनीकांत आला तरी लक्ष विचलित होऊ देत नाही. असेच किस्से 'पॉलिशवाले', अ‍ॅक्सेसरीज विकणारे- यांच्या साथीनेही चालतात.
५) खूप वर्षांपुर्वी स्कुटर काही दिवस वापरली तेव्हा ऑईल आणि पेट्रोल यांच्या मिश्रणाचे आणि हिशेबातल्या लोच्याचे प्रसंग नेहेमीचेच. फोरस्ट्रोकने आता तो रम्य जमाना इतिहासजमा केला.
६) इब्लिस यांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल दुसर्‍याच ठिकाणी भरलं जाणंही अनुभवलं आहे.
७) कार्ड पेमेंट असेल, तर कार्ड स्वाईप करून या, तोवर मी पेट्रोल टाकतो- हेही अनुभवलं आहे. पण याला आता सहसा कुणी फसत नाही.
८) अनया यांनी म्हटल्याप्रमाणे आधी २०, ३०, ५० वगैरेचं पेट्रोल टाकलेलं असेल, तर मीटर रिसेट न करता पुढे मोजणी चालू करणे. ५००/१००० च्या पेट्रोलात तर हे अजिचबात कळत नाही.

आणि खराब / भेसळ असलेलं पेट्रोल तर आपण पामरं कसं ओळखणार? त्यात तर ब्रह्मदेवालाही फसवतील.

बाप्रे हर्शल आम्ही तिथुनच पेट्रोल भरतो आणि कधीच या सगळ्याकडे लक्ष दिलेलं नाही
आता नेहमी लक्ष देत जाईन

>>> ७५ पैसे? बापरे लिंबु, तू मध्ययुगीन आहेस का पाषाणयुगीन? <<< नाहीरे बाबा, मागल्याच शतकातला तर आहे!
फक्त मला अगदी ६४-६५ सालापासूनचे स्पष्ट आठवते
हा दर सान्गतोय तो ६६-६७ चेसुमाराचा असेल, टाकीवर बसलेलो अस्ताना वडीलान्नी चिंचेच्या तालमीपासच्या बाफना पम्पावर पेट्रोल भरले तेव्हा दर विचारला असताना, वडीलान्नी तुला काय करायच्यात चाम्भार चौकशा असे खेकसून, पण नन्तर पन्चाहत्तर पैसे (खरे तर तेव्हाच्या भाषेत बारा आणे) असे उत्तर दिले होते. वर ही माहिती देखिल दिली की आधी कधीतरी म्हणे पन्नासपैसे लिटर होते! Proud असो
दोन अडीच रुपयान्नी तर मी ७६-७७ मधेही भरले आहे.

पौंड रोडवरचा वनाझ च्या अलिकडचा तो पंप आहे तेथे मी असंख्य वेळा भरले आहे. तेथे मला कधी हा प्रकार दिसला नाही (तो पंप चांगला आहे असे ऐकूनच तेथे जात होतो मी). येथे पेट्रोल भरताना ज्या बाजूला आपण उभे राहतो (ज्या गाड्यांना उतरल्याशिवाय पेट्रोल भरता येत नाही अशा गाड्यांना) तेथून ते आकडे सहज दिसतील अशा रांगेमधे (म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे पंपाच्या उजवीकडे किंवा डावीकडे) गेलो की त्या आकड्यांवर नजर ठेवायला वेगळे काही करावे लागत नाही. या पंपावर झीरो सेट करणे आणि १०० सांगितले तर बरोबर १०० येइपर्यंत भरत राहणे बरोबर होत होते. माझ्या नकळत काही करत असतील तर कल्पना नाही.

पॉईंट मारणे असा काही प्रकार जुन्या पंपावर असतो असे ऐकून आहे. त्यामध्ये सलग पेट्रोल भरत नाहीत तर गचके मारत पेट्रोल भरले जाते. ड्यूटी संपल्यावर हिशो॑ब देताना त्याचा फायदा झालेला असतो.

तांत्रिक बाबींचे मला ज्ञान नाही पण अमेरिकेतल्यासारखे ऑटो पेट्रोल पंप का सुरू होऊ शकत नाहीत पुण्या मुंबईत ? ग्राहकांना स्वतःचे स्वतःच पेट्रोल भरता येईल असे. ?

पेट्रोल कमी जास्त भरण्यापेक्षा पेट्रोल मधली भेसळ जास्त चिंताजनक आहे असे वाटते. कोथरूड पेट्रोल पंप - कर्वे पुतळ्याच्या इत्या, तिथले पेट्रोल खूपच खराब क्वालिटीचे असते. रॉकेल जास्त प्रमाणात मिसळतात असे पुर्वी ऐकले होते.

अमेरिकेतल्यासारखे ऑटो पेट्रोल पंप का सुरू होऊ शकत नाहीत पुण्या मुंबईत

सगळ्या अमेरिकेत तसे नाहीये. आमच्या बाग राज्यात गिर्हाइकाला स्वतः गॅस भरायला परवानगी नाही. अटेंडंट नेच भरायचा. अर्थात तरी इतर राज्यांपेक्षा बराच स्वस्त आहे.

आणि मी इतकी वर्षे बाग राज्यात राहिल्यावर कधी इतर राज्यात गेलो तर माझा मला गॅस कसा भरायचा ते कळत नाही नि काहीतरी घोटाळा करून बसतो.

तसे इथे पंपावर काही फसवाफसवी होत असल्याचे ऐकीवात नाही.
भेसळ करत नाहीत ना, पंप व्यवस्थित काम करतात की नाही हे बघायला इन्स्पेक्टर असतात म्हणे.
विशेषतः तक्रारी झाल्या तर लगेच चौकशी होते, नि मग गिर्हाइकाला नाराज करायला नको म्हणून पंपांचे मालक नि गिर्हाइकपण आपसमे मिटा लो करून टाकतात.

बाकी इतर फसवणूक वगैरे अत्यंत कायदेशीरपणे होते. म्हणजे जास्त किंमत लावणे वगैरे सगळे कसे कायदेशीर. गिर्हाइकाने ठरवावे कुठे जायचे ते. जास्त गिर्हाइक आले नाहीत तर गॅस स्टेशन आपोआप धंद्यातून उठते.

ही फसवाफसवी भारतात चालते कारण चालवून घेतात. शिवाय अहो ते गरीब आहेत, त्यांचा नाइलाज आहे असे म्हणून लोक सोडून देतात.
उदार आहेत हो भारतातले लोक, नि किती सहृदयी. हे असे अमेरिकेत बघायला मिळत नाही फारसे.

पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील (एकमेव) सीएनजी पंपांवर नेहमी येणारा अनुभव:

गॅस कितीही किमतीचा भरलेला असु दे, राऊंड ऑफ करताना पुढच्या शून्यावरच केला जातो. उदा. दोनशे एक्काहत्तर रुपयांचा गॅस भरला तरी दोनशे ऐंशी घेतले जातात. दिवसाला कमीत कमी हजार गाड्या (रिक्षा आणि कार धरून) भरल्या जातात. सरासरी चार रुपये जरी धरले, तरी एका दिवसातली वरकमाई किती होते, हे बघा! त्या पंपावर इतर पंपांपेक्षा सीएनजीचा दरही (पन्नास पैशांनी) जादा आहे.

त्या पंपावर सीएनजी भरताना मी कायम नाणी खुळखुळत जातो.

बापरे भयानक आहे हे!! दहा वर्षापूर्वी कमी फसवणूक होती की मज पामरास काही कळत नव्हते हे देवच जाणे. नाही म्हणायला ऑइल नेहमी दाखवून टाकून घ्यायचे. लक्ष नसले की कमी टाकतात हे माहीत होते.

ते मध्ये मध्ये गचके देत भरल्याने पेट्रोल कमी कसे भरले जाते ?

बरेच दिवस झाले टू व्हिलरमधे पेट्रोल भरलेले नाही. म ८० च्या काळात ऑइल आणि पेट्रोल दोन्ही बघून वगैरे भरायचे. तेव्हा असा प्रॉब्लेम कधी आला नाही (की मलाच कळायचे नाही कुणास ठाऊक!)
हल्ली बहुतेकदा एक्स्प्रेस हायवे किंवा पार्ल्यातच भरते पेट्रोल. कितीही गर्दी असली तरी नेहरू रोडवरच्या पेट्रोलपंपावरची माणसे पहिले झिरो सेट करतात, तुम्हाला बघायला लावतात, कुठला आकडा बघायचा तेही सांगतात आणि मग पेट्रोल भरणे चालू करतात असा माझा तरी अनुभव. आणि त्या पंपावर अपरात्री/ अवेळी सोडले तर नेहमीच गर्दी असते.

Pages