पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी

Submitted by अनया on 22 March, 2013 - 03:25

पेट्रोल पंपावरील फसवा-फसवी
आपल्यातले बरेच लोक वाहन चालवत असल्याने पेट्रोल पंपांशी सतत संबंध येतो. पेट्रोल भरण्याचे अत्यावश्यक पण तरीही कंटाळवाणे काम करताना आपण बहुधा कुठूनतरी कुठेतरी जायच्या घाईत असतो. पंपावर सदैव गर्दी असते. त्या झटापटीतच दुचाकी असेल तर तिचा आणि स्वतःचा तोल सावरा, टाकीचे झाकण उघडा, तिथला शून्याचा आकडा नीट बघा, तेवढ्यात काहीतरी विकू पाहणाऱ्यांना किंवा लकी कुपन वाल्यांना तोंड द्या, सुट्टे पैसे घ्या अश्या असंख्य गोष्टींचे व्यवधान सांभाळावे लागते.
चार चाकी असली, तरी व्यवधाने असतातच. ह्या सगळ्या गोंधळाचा फायदा तिथल्या लोकांनी न घेतला, तरच नवल! मी मला आलेल्या दोन फसवणुकीच्या प्रयत्नांच्या अनुभवांनी सुरवात करते आहे. तुम्हीही तुमचे अनुभव लिहा आणि फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, तेही लिहा.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. तिथल्या माणसाने ७० रुपयांचे पेट्रोल भरले. ‘अहो, मी तीनशे रुपयांचे सांगितले होते.’ ‘हो का, मी सत्तर ऐकल. अजून टाकतो,’माणूस. अस म्हणून त्याने मला मशीनवर २३०चा आकडा दाखवला. ‘तुम्ही एकूण २३० रूपयांचच पेट्रोल टाकल’ माझा निषेध. ‘नाही हो ताई. मी झीरोनंतर २३० रूपयांच भरल’
माझ्या गाडीच्या इंडीकेटरवरून मला कळल, की तस झालेलं नाहीये. मी आवाज चढवून त्याला मॅनेजरला बोलवायला सांगीतल. तो लगेच नरमला. ‘ कशाला ताई, इथेच कळेल’ अस म्हणून त्याने मशीनवर काहीतरी खाडखूड करून चूक मान्य केली, आणि मला अजून सत्तर रुपयांचे पेट्रोल भरून दिले.

१ शहर: पुणे, टिळक रस्त्यावरील तोच पेट्रोल पंप.

मी माझ्या दुचाकीत ३०० रुपयांचे पेट्रोल भरायला सांगितले. मागच्या अनुभवावरून ऐकण्यात गोंधळ होऊ नये म्हणून विक्रेत्याकडून ३०० रुपये वदवून घेतले. पेट्रोल भरल्यावर १००० रुपयांची नोट दिली. त्याने त्याच्या हातात शंभरच्या सात नोटा मोजल्या. माझ्या हातात घाईघाईने कोंबल्या. ‘चला मॅडम, गाडी पुढे घ्या’ अशी घाई करायला लागला. मी ठामपणे तिथेच थांबून हातातल्या नोटा मोजल्या. त्या सहाच होत्या! मी तसे दाखवून दिल्यावर दात काढत त्याने खाली पडलेली एक शंभराची नोट माझ्या हातात कोंबली. ती चुकून खाली पडली होती की मुद्दाम टाकली होती? तुम्हीच ठरवा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅम्प मधील , लाल देऊळ शेजारील पेट्रोल पंप वरील सर्व कर्मचारी ठार बहिरे आहे.

रु.१०० सांगितले कि रु .२० चे पेट्रोल भरतात.

Pages