महामार्ग पोलिसाचा आगळा अनुभव

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 20 March, 2013 - 02:18

दिनांक १०.०१.२०१३ रोजी मी पुण्याहून अहमदनगर, औरंगाबाद, वेरूळ मार्गे धुळे येथे येत होतो. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कन्नड घाट ओलांडून पुढे आल्यावर पोलिसांच्या तपासणी पथकाने माझे वाहन (मारूती ओम्नी एम एच १४ बीएक्स ६२८७) थांबविले. माझा वाहन चालविण्याचा परवाना मूळ स्वरुपात आणि वाहनाच्या दस्तऐवजांच्या प्रती छायांकित स्वरुपात तपासल्यावर तपासणी पोलिसाने मला वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात नसल्याबद्दल दंड भरावा लागेल असे सूचित केले. त्यावर मी खासगी वाहनाची नोंदणी कागदपत्रे मूळ स्वरूपात बाळगण्याची गरज नसून छायांकित प्रती चालतात हे त्यास सांगितले. तसेच यापूर्वी मला याच कारणाकरिता दंड आकारण्याची चूक करणार्‍या पुण्याच्या सी. एन. पवार या पोलिस उपनिरीक्षकाची मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून वाहतूक पोलिसांच्या उपायुक्तांनी चौकशी केल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकसत्ता वृत्तपत्रातील संबंधित बातमीचे कात्रणही मी त्यास वाचावयास दिले. ते वाचल्यावर या कारणाने दंड आकारणे शक्य नसल्याचे त्याच्या ध्यानात आले. मग त्याने दंड आकारण्याकरिता नवाच मुद्दा शोधला; तो म्हणजे मी वाहन चालवित असताना आसन सुरक्षा पट्टा न लावल्याचा. त्यावर मी त्यास काही समजावू लागलो असता त्याने मला त्याचे वरिष्ठांना भेटण्याचा सल्ला दिला.

महामार्गाच्या बाजूस थांबलेले पोलिस अधिकारी श्री. अंबादास सरोदे यांना मी भेटलो. आसन सुरक्षा पट्टा मी का लावू शकलो नाही याबद्दल मी त्यांना माझ्या परीने स्पष्टीकरण दिले. ते ऐकून त्यांनी मला दंड न आकारताच सोडण्याची तयारी दर्शविली. परंतू त्यांचा गैरसमज झाल्याचे माझ्या ध्यानी आल्याने मी पुन्हा त्यांच्याशी चर्चा करून माझा मुद्दा स्पष्ट केला. श्री. सरोदे यांस असे वाटले की मला मानेच्या मणक्यांचा काही आजार आहे व त्यामुळे मी आसनपट्टा लावण्यास असमर्थ आहे. तर मला असे सांगावयाचे होते की, सपाट रस्ता सोडून माझे वाहन इतरत्र धावू लागले की आसन पट्टा आपोआपच घट्ट होतो व त्यामुळे माझे खांदे, मान इत्यादी आसन पट्ट्याच्या संपर्कात येणार्‍या अवयवांना अस्वस्थता वाटू लागते. घाटात रस्त्याच्या विशिष्ट रचनेमुळे डावीकडील व उजवीकडील चाके वेगवेगळ्या क्षैतिजीय पातळीवर येतात. असे झाले म्हणजे माझ्या वाहनाचा आसनपट्टा अधिकच घट्ट होतो. घाटात वाहन चालविताना डावी उजवीकडे तसेच (डोंगरावरून दरड कोसळत नाहीये याची खात्री करून घेण्याकरिता) वर देखील पाहावे लागते. आसन पट्टा घट्ट झाल्यामुळे या कामी अडथळा येतो. मान अवघडल्यामुळे काही काळाकरिता आसनपट्टा सोडला तर पुन्हा वाहनाची दोन्ही चाके समपातळीत येईस्तोवर तो लावता येत नाही. त्यामुळेच मी घाटात एकदा सोडलेला आसन पट्टा पुन्हा वाहन सपाट रस्त्यावर येईपर्यंत लावू शकत नसल्याचे श्री. सरोदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्री. सरोदे यांनी मला हा वाहनाचा दोष असल्याचे व त्यास शक्य तितक्या त्वरेने दुरूस्त करून घेण्याचे सूचविले.

वास्तविक मलादेखील ही अडचण जाणविली होतीच. त्याविषयी मी वेळोवेळी माय कार या चिंचवड स्थित मारूती सुझुकीच्या अधिकृत विक्रेत्यास व विक्रीपश्चात सेवाकेंद्रास कळविले होते. परंतु त्यांनी मी सांगत असलेली बाब हा दोष नसून वाहनात दिलेले एक अधिकचे सुरक्षा वैशिष्ट्य (Safety Feature) असल्याचा निर्वाळा मला प्रत्युत्तरादाखल दिला असल्याने मी याबाबतीत काही करू शकलो नव्हतो. ही सर्व हकीगत मी श्री. सरोदे यांस कथन केली. त्यावर त्यांनी वाहनात असे कुठलेही सुरक्षा वैशिष्ट्य नसून हा माझ्या वाहनातील दोषच असल्याचे ठामपणे सांगितले. इतकेच नव्हे तर मारूती सुझूकी अथवा त्यांच्या विक्री पश्चात सेवा केंद्रांकडून हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचे मी लेखी स्वरूपात प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी मला सूचविले. तसेच या बाबत मला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देत स्वत:चा खासगी भ्रमणध्वनी क्रमांक (८३९०१४७०००) देखील दिला.

श्री. सरोदे यांच्या सल्ल्यानुसार मी धुळे येथे पोचल्यावर सेवा ऑटोमोटिव्ज या अधिकृत विक्री पश्चात सेवा केंद्रात वाहनात असलेला सदर दोष दाखविला. याही ठिकाणी अधिकार्‍यांनी हा दोष नसून सुरक्षा वैशिष्ट्य असल्याचा राग आळविला. तेव्हा मी लगेचच श्री. सरोदे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व अधिकार्‍यांना त्यांच्या सोबत चर्चा करण्यास सांगितले. श्री. सरोदे यांनी हे सुरक्षा वैशिष्ट्य असेल तर ग्राहक पुस्तिकेत (owner’s manual) त्याचा उल्लेख का नाही? अशी विचारणा केली. तसेच याविषयी काही अधिकृत माहिती छापील स्वरूपात अथवा संकेतस्थळावर (internet website) उपलब्ध असल्यास त्याचा तपशील देण्यास फर्माविले.

त्यानंतर सेवा ऑटोमोटिव्जच्या अधिकार्‍यांनी सुरक्षा आसन पट्ट्यासंबंधातील सदर बाब ही सुरक्षा वैशिष्ट्य नसून दोष असल्याचे मान्य केले. तसेच कुठलाही अतिरिक्त मोबदला न आकारता अर्थात पूर्णपणे मोफत (Free Of Cost) आसन सुरक्षा पट्टा बदलून दिला. आता या नवीन सुरक्षा आसन पट्ट्यामुळे मला कुठलाही त्रास न होता अतिशय सोयीस्कर रीत्या विषम पातळीच्या रस्त्यावरही वाहन चालविता येते. जराही अवघडलेपण जाणवत नाही.

हे सर्व श्री. अंबादास सरोदे, महामार्ग पोलीस चाळीसगांव यांच्या सहकार्यामूळेच शक्य झाले. श्री. सरोदे यांचा मी अत्यंत आभारी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंच छान अनुभव. शेयर केल्याबद्दल धन्यवाद!
अनेकदा काही अधिकार्‍यांच्या चुकीच्या वर्तनामुळे सगळे अधिकारीच वाईट असतात असाच सगळ्यांचा समज होतो, पण सगळेच तसे नसतात.

नमस्कार, चेतन सुभाष, गुगळे!

अंबादास सरोद्यांसारखे अधिकारी हेच जनतेचे आशास्थान आहेत. हा लेख सुवार्ता विभागात निर्देशित केला आहे!

हल्ली पोलिसांबद्दल कोण चांगलं बोलतो! मग ते वाहतूकवाले असोत वा आरक्षी. म्हणूनच अनुभव कथन केल्याबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

. हा लेख सुवार्ता विभागात निर्देशित केला आहे!>>

गा पै आणी सुवार्ता असं एकत्र बघुन दोनदा डोळे चोळुन पोस्ट पाहिली. Lol

अनुभव छान लिहिलाय.

अंबादास यांच कौतुक आहेच शिवाय तुमच्या चिकाटीचं कौतुक.

चेतन सुभाष गुगळे यांच्या "चुकीच्या प्रघाताविरुद्ध मी लिहिणार्/बोलणारच..." या प्रवृत्तीचे करावे तितके कौतुक कमीच होईल. कारण दहापैकी नऊ व्यक्ती 'नको ही पोलिसांची झंझटे...देवुन टाकू या दहावीस रुपये...' असे म्हणून त्या वैतागातून सुटका करून घेतात....[अशा नऊ पैकी मीदेखील एक आहेच, हे कबूल करतो].... पण श्री.चेतन यांच्या अशा संदर्भातील चिकाटीला सलाम.

किंबहुना त्यांच्यामुळेच पोलिस खात्यात श्री.अंबादास सरोदे यांच्यासारखे आपल्या कर्तव्याला जागणारे अधिकारी आहेत हे समजले असेच म्हणावे लागेल.

अनुभवकथनाची मांडणी तर एखाद्या सस्पेन्सफुल चित्रपटाला शोभणारी अशीच आहे.

अशोक पाटील

कृपया तो भ्रमणध्वनी क्रमांक काढून टाकणार का? दुसर्‍याचे खाजगी नम्बर त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय पब्लिक फोरमवर टाकू नये.

बाकी, अनुभव छान. सतत पाठपुरावा केल्याबद्दल विशेष अभिनंदन.

वेगळा अनुभव. हि बाब डिलर पेक्षा, मारुती उद्योग यांना कळवणे जास्त योग्य आहे.
तसेच तूम्ही, सुरक्षा पट्टा लावल्याशिवाय गाडी चालवू नये, हा मित्रत्वाचा सल्ला !

@ बागुलबुवा - लोकसत्ता मधील संबंधित वृत्त :-

https://docs.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQMTY4NTRiMjEtODk4OC00ZmMxLTg5...

@ नंदिनी -

श्री. अंबादास सरोदे यांनी ते स्वत: सामाजिक विषयांवर वृत्तपत्रांत लिखाण करतात व त्यांना जनतेशी संवाद साधण्यात रस असल्याचे सांगितल्यामुळेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक इथे नमूद केला आहे. अर्थातच ते पोलिस अधिकारी असल्याने त्यांच्या भ्रमणध्वनीवर कुणी संपर्क करून त्यांस त्रास देईल अशी शक्यता वाटत नाही. इतर कुणाचा (विशेषत: महिलांचा) संपर्क क्रमांक उघड करू नये हे मलादेखील पटते.

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व सभासदांचे आणि तसेच मूकवाचकांचेही आभार. विशेषत: माझ्या पूर्वीच्या प्रयत्नांचीही वाचकांना आजही आठवण असणे ही जाणीव समाधानकारक आहे.

फार छान. वाचून फार बरे वाटले. इन्स्पेक्टर सरोदे यांना बढती द्यावी. म्हणजे ते इतर सगळ्यांनाच आदर्श घालून देतील.

आपण दिलेली लिंक वाचली
त्या बातमीनुसार गुगळे यांच्या म्हणण्याशिवाय छायांकित प्रती चालतात या म्हणण्याला कोणताही आधार नाही

http://www.mahatranscom.in/faq.aspx

वरील लिंकवर आर टी ओ च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे

प्रश्न क्र. 11. - Do I need to keep the documents of vehicle with me while driving?
You must produce following valid document in original if demanded by police officer in uniform or an officer from motor vehicle dept.
I. Driving licence
II. Registration certificate
III. Taxation certificate
IV. Insurance certificate
V. PUC certificate
VI. Road permit and fitness certificate

मग नक्की खरं ते काय?
गाडीचे मूळ कागदपत्रं सोबत ठेवण्या पेक्षा कधीही झेरॉक्स कॉपीज बाळगणं सोपय! (अ‍ॅटेस्टेड बाय गॅझेटेड ऑफिसर वाल्या कॉपीज तरी चालायला हव्यात... मावैम)

@ बागुलबुवा आणि योगेश कुलकर्णी....

गॅझेटेड ऑफिसरने अटेस्टेड केलेल्या झेरॉक्स कॉपीज् ग्राह्य मानल्या जातात. मात्र कागदपत्रांची मागणी करणार्‍या महामार्गावरील पोलिस वा पोलिस अधिकार्‍याने 'ओरिजिनल' दाखविलेच पाहिजेत असा आग्रह केला [तसे ते करू शकतात....] तर कायद्यानुसार मूळ कागदपत्रे स्वखर्चाने सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदत मिळते....तसे कारच्या मालकाकडून स्पॉटवरच लिहून घेतले जाते.

मात्र "ड्रायव्हिंग लायसेन्स" कायमपणे ओरिजिनलच दाखवावे लागते... त्यासाठी झेरॉक्सची सूट नाही.

[अर्थात झेरॉक्सची ही सवलत वा नियम For non-transport vehicles साठी लागू आहे..... म्हणजेच अवजड वाहने, लक्झरीज् वा माल वाहतूक करणार्‍यांना लागू नाही...तिथे मूळ कागदपत्रेच सादर करावी लागतील.]

अशोक पाटील

मामा, धन्स.

पण समजा ते १५ दिवसांच्या मुदतीचं नाही मानलं एखाद्या ऑफिसरने तर तसा अधिकृत नियम असल्याचा पुरावा कुठे उपलब्ध आहे ?

शिवाय असं काही लिहून घेण्याची कागदपत्र हवालदाराकडे बघितली नाहीत कुठे.

माझ्या माहितीप्रमाणे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ताब्यात घेण्याचा अधिकार हवालदाराला नसून फक्त ईन्स्पेक्टरलाच असतो.

बागुलबुवा....

जिल्ह्याच्या आर.टी.ओ. कार्यालयात "User's Manual" नामक एक चोपडे उपलब्ध करून दिले जाते....मी पाहिलेले हे मॅन्युअल जवळपास ७०-८० पानांचे तरी होतेच....{अर्थात झेरॉक्स कॉपी होती....फारशी हाताळली गेल्याची लक्षणेही दिसली नाहीत....मात्र तिथल्या एका स्टेनोने मला वाचण्यासाठी दिले होते. किंबहुना त्या परिसरात थाटून राहिलेल्या आरटीओ एजंटच्या टपरीमध्येही असे मॅन्युअल पाहायला मिळते}. या क्षणी तरी मी इतके निश्चित सांगू शकतो की १५ दिवसांची मुदत अधिकृतरित्या तिथे नोंदविली आहे.

गाडीशी संबंधित कागदपत्रे मागण्याच्या अधिकार कुणाला असतो, त्याबाबत एक नियम आहे, तो म्हणतो....

The authorities empowered to demand vehicle documents for inspection are:
- any police officer in uniform
- an officer of the Motor Vehicles Department (RTO)

या ठिकाणी "पोलिस ऑफिसर इन युनिफॉर्म" ची व्यापक व्याख्या केल्यास त्यामध्ये पोलिस शिपाई वा हवालदार येत नाहीत हे तर उघडच दिसते. पण प्रत्यक्ष अशी कागदपत्रे मागणारे एकजात हवालदारच्या पातळीचेच असतात असेच दिसत्ये.

कळीचा मुद्दा हा की, जो हवालदार फक्त चिरीमिरी खाण्याच्या उद्देश्यानेच तुमचे वाहन अडवितो त्याच्या भाषेतील रांगडेपणाला आपल्यासारखा नाकासमोर चालणारा सिव्हिलिअन बिचकतो आणि समजा ती नियमावली जरी तुमच्याकडे त्या क्षणी असली तरी तिचा मतितार्थ त्या पांडू हवालदाराच्या बुद्धीच्या आवाक्यातील नसतो..... बा़की कशाने कारचालक बधत नाही असे दिसले तरी कार नंबरप्लेटची अक्षरे योग्य त्या साईझची नाहीत म्हणूनही तो दंड पावती करीन अशी धमकी देतो.....[हे मी अनुभवले आहे....]

अशोक पाटील

श्री. अशोक पाटील यांचे विधान योग्य आहे. पुरावा म्हणून वाहन नोंदणीपुस्तकाचे पृष्ठ क्रमांक १३ इथे सादर करीत आहे.

https://docs.google.com/file/d/0B9-2hmnBdOPQbVl6SkluWUhjdzQ/edit?usp=sha...

@ बागुलबुवा -

आपण दिलेल्या प्रश्नोत्तरांचा संदर्भ ट्रान्सपोर्ट व्हेइकलशी संबंधित आहे. टॅक्सेशन सर्टिफिकेटचा वेगळा उल्लेख केलेला आहे. खासगी वाहनाचा सर्व कर एकरकमी घेतला जात असतो.