नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

Submitted by डॉ. बंडोपंत on 13 March, 2013 - 01:46

नेत्रदान खर्‍या अर्थाने सार्थकी लागते काय?

नेत्रदान केल्याने गरजुला दॄष्टी देण्याचे महान कार्य होते हे महत्व पटुन अनेकांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केलेला आहे. कित्येकांनी नेत्रदान केलेही आहे.
नुकत्याच वाचनात आलेल्या बातमी नुसार शासनाच्या पेढीतुन ७० टक्के बुबुळे निकामी झाली आहेत. काहीच बुबुळे दॄष्टीहीन व्यक्तीला बसविली गेली आहे. तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे. असे शासनानेच जाहीर केले आहे.
असेच जर चालु राहीले तर भविष्यात नेत्रदानाला कितपत मह्त्व उरेल देव जाणे.
मध्यंतरी अशी बुबुळे कुठेतरी फेकुन दिल्याचेही वाचनात आले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! भयंकर आहे.

तर काही प्रयोगा दाखल वापरली आहे>>> असे असेल तर मात्र सार्थकी लागली म्हणायला हरकत नाही.

मृत व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याचे नेत्र सरकारला वा खाजगी पेढीला दिल्यानंतर ते कुणाला बसविण्यात आले याचा कसलाही विदा दिला जात नाही. शिवाय एका व्यक्तीचे दोन डोळे अंध व्यक्तीसाठी रोपण करीत असताना दोन्ही न करता एकाच डोळ्याचे केले जाते. म्हणजेच नेत्रदान झालेल्या दोन डोळ्यांपैकी 'अ' ला एक तर 'ब' ला दुसरा असा प्रकार असतो.... त्यामुळे मुद्दा हा की दिलेले दान ते सत्पात्री झाले की अपात्री....उपयोगात आले किंवा ना आले...याबाबतची कसलीही माहिती संबंधित दात्याच्या कुटुंबियांना होण्याची सुतराम शक्यता नसते.

सबब श्री.बंडोपंत यानी दिलेल्या बातमी-मजकुरांतील परिस्थिती जरी चिंतनीय असली तरी त्यामुळे 'नेत्रदान' च करू नये असे कृपया मानू नये. ते एक पवित्र कर्म आहे..... आपण तशी इच्छा प्रकट केली नसली तरी जे करतात त्याना नाऊमेद करणे योग्य नव्हे.

अशोक पाटील

नक्कीच सार्थकी लागते. हे अश्या बातम्या सोडा पण एल व्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूट, शंकर नेत्रालय वासन आयकेअर अश्या प्रायवेट संस्थांमध्ये प्रिझर्वेशन च्या चांगल्या सोयी असतात. आजिबात मनात किंतू आणू नका. अतिशय उत्तम कार्य आहे. माझ्या नवर्‍याचे दोन्ही डोळे आता कोणालातरी दृष्टी देत आहेत हे मनात आणू नच मला छान वाट्ते.

अश्विनीमामी

"....माझ्या नवर्‍याचे दोन्ही डोळे आता कोणालातरी दृष्टी देत आहेत हे मनात आणू नच मला छान वाट्ते....."

~ फार फार आनंद झाला मला तुमची ही भावना वाचून. माझी धाकटी बहीण अशीच अकाली स्वर्गवासी झाली....तिला मृत्यूची चाहूल लागली होतीच. पण तिने मृत्यूपूर्वी दोनच दिवस नेत्रदानाच्या फॉर्मवर थरथरत्या हाताने स्वाक्षरी केली होती. रोटरी क्लबच्या त्या विंगतर्फे तो सोपस्कार पारही पडला.... त्यानंतर मी कित्येक दिवस तुम्ही प्रतिसादात व्यक्त केलेल्या भावनेच्याच वातावरणात राहिलो होतो.

आपणास जे ठीक वाटते ते कार्य जरूर करावे.....त्याचे 'पोस्टमार्टेम' नकोच.

मी कॉलेज जीवनात तसेच नोकरीच्या कालावधीत दर वाढदिवसाला रक्तदान करीत असे. आता ब्लड बॅन्केला दिलेले ते रक्त खर्‍या गरजूला गेले आहे की त्याचा काळाबाजार झालाय, की ते खराब झाले म्हणून फेकून दिले... याच्याशी मला काहीच कर्तव्य नाही.

@ मुक्तेश्वर कुलकर्णी ~ थॅन्क्स फॉर सपोर्टींग माय व्ह्यूज.

अशोक पाटील

इब्लिस, लिंकबद्दल धन्यवाद. ही माहिती वाचनातून निसटली होती.

वर अशोक यांच्या पोस्टमधे सत्पात्री/अपात्री असे शब्द वाचले. या संदर्भात पात्रता म्हणजे काय आणि ती कोणी कशी ठरवायची काही कळलं नाही.

स्वाती....

"....या संदर्भात पात्रता म्हणजे काय आणि ती कोणी कशी ठरवायची काही कळलं नाही....."

~ माझ्या 'त्या' उल्लेखाचा संदर्भ सर्वप्रकारच्या 'दाना' साठी आहे, एकट्या नेत्रदानासाठी वा रक्तदानासाठी बिलकुल नाही. अन्य शब्दात असेही मी म्हणेन की 'दान' हे निरिच्छ वृत्तीने देण्याचाच प्रघात असावा. महाशिवरात्री तसेच तत्सम दिवशी ठिकठिकाणी 'महाप्रसादा'चे आयोजन करण्यात येते, कदाचित ते तुम्ही पाहिलेही असेल....त्यासाठी विविध लोक भरघोस देणग्याही देताना दिसतात. आता त्या दिवशीच्या मांडवात जेवणाच्या पंगतीत साधू बसतात की चोर येतात हे पाहाण्याची कसलीही यंत्रणा कार्यकर्त्यांकडे नसते....किंवा देणगी देणारा पंगतीत जाऊन ते पाहू शकत नाही....म्हणजेच थोडक्यात दिलेले दान हे सत्पात्री जाते की अपात्री याची खंत मनी बाळगू नये.

नेत्रदानाबाबतीत मला हेच अभिप्रेत होते....दिलेले नेत्र एखाद्या गरजू गरीबाला बसविले जाते की त्याचा काळाबाजार करून गर्भश्रीमंत घराण्यातील एखाद्या अंधाला दिले जाते....त्याची काळजी संबंधिताच्या नातेवाईकांना करण्याची गरज भासत नाही.

अशोक पाटील

बरोबर आहे अशोक.
माझ्या आजीचीही नेत्रदानाची ईच्छा होती पण ती कुठे कागदोपत्री रजिस्टर केली गेली नव्हती. वडिलांनी आजी निवर्तल्यानंतर तश्या प्रसंगातही तातडीने हालचाली करून नेत्रदान करून घेतले.
संस्थेने (दोन वेगळ्या व्यक्तींना डोळे बसवल्यानंतर ) रीतसर दोन्ही वेळेला पत्र पाठवून कळवले. नवीन डोळसांची भेट हवी असल्यास ती घडवून देण्याची तयारी दर्शवली. पैकी एक नवी दृष्टी मिळालेला आम्हाला भेटण्यासाठी फार ऊत्सुक होता पण वडिलांनी नकार दिला. त्यांचे म्हणणे असे होते की त्यांना ऊपकृत किंवा कृतज्ञ झाल्याच्या भावनेने भेटायला आलेल्या व्यक्तीला भेटून मोकळेपणाने बोलता येणार नाही आणि ह्या भावनेला चेहरा मिळाला की ती त्याच्या आणि आपल्याही मनातून लवकर जाणार नाही त्यामुळे नकोच. करा आणि विसरून जा.

अजून एक... माझ्या आजीला तिच्या वयाची शेवटची बरीच वर्षे एका डोळ्याने फार कमी किंवा आजिबातच दिसत नसे. अनेक डॉक्टरांचे सल्ले आणि ऊपचार घेऊन झाले होते पण कदाचित डोळ्यांच्या असेंब्लीतले ईतर स्नायू अशक्त झाल्याने फारसा फायदा होऊ शकला नाही. परंतू तो डोळाही नेत्रदानानंतर दुसर्‍या व्यक्तीला व्यवस्थित बसवता येऊ शकला.

मी ही नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे. माझ्या शहरातील नेत्रपेढीँचे फोन नंबर फोनमध्ये आहेत. माझ्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना हे सांगून ठेवले आहे, प्रत्यक्षात योग्य वेळ आल्यावर या लोकांनाच धावपळ करावी लागणार आहे.
राहता राहिला या लेखाचा मुद्दा, माझ्यासारखे (नेत्रदान करू इच्छिणारे) नाउमेद झाले तर टक्केवारी/आकडेवारी अजुन खाली येइल. मी सोइस्कर विचार करते, माझे डोळे योग्य व्यक्तींना दिले जातील आणि त्यांचे आयुष्य अधिक सुखकारक होईल.

@ इब्लिस....

डॉक्टर.... नेत्रदानासंदर्भातील सर्व प्रकारच्या 'टेकनिकल' माहितीने सजलेला तुमचा तो प्रतिसाद माझ्या वाचनातून हुकला होता....जो आज या निमित्ताने वाचला. खूप माहिती मिळाली.

पैकी... "...नेत्रदान स्वीकारले, तर सोबत मृत शरीरातील रक्ताचा नमूना आजकाल HIV टेस्ट साठी काढून घेतात. तो मिळाला नाही, तर काहीवेळा दान स्वीकारत नाहीत...."

हे काही समजले नाही. कारण मी जवळपास ५० पेक्षा जास्त 'नेत्र' काढून घेण्याच्या प्रक्रिया समक्ष पाहिल्या आहेत [अर्थात कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन शहरात] आणि कुठेच/केव्हाही/कोणत्याही डॉक्टरांच्या टीमपैकी एकाही सदस्याने HIV Test चा उल्लेख केला नाही, वा तशी विचारपूसही केल्याचे पाहिलेले नाही. याचा अर्थ मग टेस्ट संदर्भातील निर्णय हा ऑप्शनल असतो का ? किंबहुना हा हल्लीहल्ली प्रकार सुरू झाला आहे का?

दुसरा एक मुद्दा.... माझ्या एका नातेवाईकाचा आठ वर्षे वयाचा मुलगा रंकाळ्यात पोहणे शिकताना बुडून मरण पावला. दु:ख ओसरल्यावर दोघांनीही मुलाचे नेत्रदान करायचा निर्णय घेतला, ती जबाबदारी माझ्यावर आली....पण रोटरीच्या त्या विभागाला फोन करून मी स्वतः सांगूनही 'फॉर्म भरला नसल्याने टीम येऊ शकत नाही...' असे उत्तर मिळाले. आता ८ वर्षे वयाचा मुलगा कसा काय फॉर्म भरू शकेल ? किंवा त्याचे आईवडिलही मुलाच्या हयातीत तसा विचार करू शकणार नाहीत हे उघडच आहे. शेवटी वेळ जास्त होऊ लागल्यामुळे नाईलाजाने मुलाच्या दहनाची तयारी करावी लागली. असो.

मुद्दा असा की, फॉर्म भरलेला नाही, पण पालक राजी आहेत... तर मग संबंधित संस्थेला नेत्र घेण्यास कशी काय अडचण येऊ शकते ?

अशोक पाटील

चमन,
नवीन डोळसांची भेट हवी असल्यास ती घडवून देण्याची तयारी दर्शवली <<
हे एथिकल नाही. असे करीत नाहीत. कुणी केले असल्यास त्यांना योग्य ती समज देण्यात येईल. कृपया सदर तथाकथीत संस्थेचे नांव/पत्ता विरोपातून कळवाल काय?
***

पाटील सर,
१.
मृत शरीरात सरळ हृदयात लांब सुई घालून रक्त काढून घेता येते. रक्त पूर्ण गोठलेले नसते कारण मृत्यूनंतर ४-५ तासाच्या आत सॅम्पल घेतले जात असते.
ही पद्धत सुमारे किमान १५-२० वर्षांपासून तरी अवलंबली जाते.
हे न करता डोळे/कॉर्निआ हार्वेस्टींग करणे दुहेरी धोकादायक आहे. ते काढणार्‍या माणसासाठीही, व ज्यांना डोळा बसवायचा त्यासाठी देखिल.
नुसतेच काढून नेलेत, तर स्क्रीनिंग लॅबमधे केले जाते, व त्यात टेस्ट पॉझिटिव्ह आली तर अशाप्रकारे निरुपयोगी ठरलेले डोळे नष्ट करावे लागतात.
२.
रुग्णाने फॉर्म भरलेला असणे गरजेचे नाही.
रोटरीच्या फोन घेणार्‍या टेक्निशिअनला थोडे अधिकारवाणीने रागावून सांगणे गरजेचे होते.

***

त्या प्रतिसादाव्यतिरिक्त इतरही प्रतिसाद 'त्या' धाग्यावर आहेत.

उत्तम चर्चा.
नेत्रदानाच्या बाबतीत ते 'अपात्री' होण्याचा संभव कसा आहे, ते समजले नाही. Happy

मला वाटते मूळ लेखात दान केलेले नेत्र (बुबुळे) वाया जाण्याचा मुद्दा आहे, आणि जो बहुतांशी चुकीचा नाही. "दान केले ना, मग विसरून जा" असे भावनिक आवाहन करता उपयोगाचे नाही, कारण हा मुद्दा 'मॅनेजमेंट' चा आहे. आपल्या देशात इतक्या मोठ्या संख्येने अंध व्यक्ती असतांना दान केलेल्या प्रत्येक (निरोगी) बुबुळाचा वापर झाला पाहिजे, अशी दात्याची अपेक्षा असल्यास ती चुकीची म्हणता येणार नाही.

नेत्रदानाच्या बाबतीत ते 'अपात्री' होण्याचा संभव कसा आहे, ते समजले नाही.>>> +१

ज्याच्याकडे ज्या रास्त आणि अत्यावश्यक गोष्टीची कमतरता आहे आणि ती कमतरता ती व्यक्ती राजमार्गाने, कष्ट करुनही मिळवू शकत नाही, अश्या व्यक्तीला आपल्याकडील उपलब्ध गोष्ट (जास्तीची असो किंवा घासातला घास काढून दिलेला असो) आपल्या कुवतीनुसार पुरवणे एवढंच बघायचं.

पैसे, अन्न, कपडे इत्यादी बाबतीत आपण सत्पात्री किंवा अपात्री हे ठरवू शकतो. तो अंदाज आपल्याला धडधाकटपणा, आर्थिक परिस्थिती यावरुन येऊ शकतो.

डॉक्टर....

"...रोटरीच्या फोन घेणार्‍या टेक्निशिअनला थोडे अधिकारवाणीने रागावून सांगणे गरजेचे होते....."

.... येस, पटले मला. मी तसेही करायला हवे होते, पण फोन घेणारी व्यक्ती एकतर महिला होती {आणि तुम्ही तर जाणताच की फोनवर स्त्री शी वरच्या पट्टीत बोलता येणे काहीवेळा अशक्य वाटते...मॅनर्सचाही प्रश्न असतोच...} शिवाय त्या मुलाच्या थोरल्या दोन बहिणींचा इस्पितळात होणारा आक्रोश, आईवडिलांची कोसळलेली मानसिक स्थिती....आणि तेथील एकूणच उदास दु:खद वातावरण इकडे लक्ष देताना 'नेत्रदाना' चा तो मुद्दा जितका रेटायला हवा होता तसे झाले नाही माझ्याकडून हे मान्य.

या घटनेला आता जवळपास दोनेक वर्षे होऊन गेली असली तरी ते पवित्र म्हणावे असे कार्य आपल्याकडून झाले नाही याची खंत मात्र आजही माझ्या मनी आहेच.

अशोक पाटील

अशोक अश्या वेळी डायरेक्ट हॉस्पिटलच्याच स्टाफशी संपर्क साधला तर? रोटरी म्हणजे एक मधली स्टेप झाली. प्रसंग अवघडच आहे पण.

रोटरीचा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे आमच्या कोल्हापूरातील 'रोटरी क्ल्ब' तर्फे 'रा.शाहू ब्लड बॅन्क' आणि 'नेत्रदान पेढी' चालविली जाते....गेली २५ वर्षे. मी स्वतः महाविद्यालयीन रक्तदानाच्या मोहिमेत काम केले असल्याने त्या त्या कॅम्प्सच्यावेळी रोटरीच्या याच टीमला बोलावित असे....त्यांचाही छान असा प्रतिसाद मिळत गेला....रोटरीच्या या उपक्रमाचे स्थानिक वर्तमानपत्रातून वारंवार वेळोवेळी कौतुकही होत असते.... तुम्ही तर जाणताच की लायन्स असो वा रोटरी... या संघटनेतील बॉडीवर बरेच डॉक्टर्सच असल्याने अशा सेवाभावी कार्याला त्यांची तयारी नेहमीच जाणवत असते...... पण त्या दिवशी माझाच अप्रोच काहीसा चुकला म्हणावा लागेल. गोंधळाच्या वातावरणात धड टेलिफोन नंबर्सही आठवत नाहीत.

इस्पितळही आहेतच...त्यातही प्रमुख म्हणजे सरकारी....आता सरकारी खाक्या नको रे रामराया म्हणत असतात म्हणून तर रोटरीचा विचार आला होता.

तुम्ही म्हणता तसे काही प्रसंग अवघड असतात आणि भावनेच्या कल्लोळात अडकलेल्या माणसाचा घसा कोरडा पडलला असतो....होंडाही मला नीट चालविता येत नव्हती त्या दिवशी.... अगदी माझ्या अंगाखांद्यावर खेळलेला पोरगा होता तो....त्याचेही दु:ख अपार असेच होते.

अशोक पाटील