नात्यातील भुतांचा बंदोबस्त

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:23

natyatil_bhute_3.png“A promise is a promise : Time for action to end violence against women"
ही आहे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेली, इ.स. २०१३ची 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम!

गेल्या काही महिन्यांमधील घटना बघता अतिशय समर्पक आणि समयोचित असे हे ध्येयवचन आहे. म्हणूनच जरासा धाडसी परंतु अत्यंत नाजूक आणि काळजीचा असा 'कुटुंबांतर्गत महिला सुरक्षेचा' हा विषय आपल्यापुढे चर्चेसाठी ठेवत आहोत. आशा आहे की त्यातून महत्त्वाची माहिती तर मिळेलच, शिवाय या विषयाबद्दलची आस्था, सजगता व कृतिशील उपायांची जाणीव वाढण्यास व संवाद निर्माण होण्यास हातभार लागेल.

माणसाला समाजाची पहिली ओळख आपल्याला होते ती आपल्या कुटुंबापासून. इथेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आपल्या विकासाचा मूलभूत पाया रचला जात असतो. घरातील इतर सदस्य, नातेवाईक, स्नेही, परिचित ह्या सर्वांकडून आपण प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेची अपेक्षा करतो. पण ज्यांच्यावर तुम्ही एवढे विसंबून आहात, विश्वास दाखवत आहात त्या सुरक्षित वाटणार्‍या तुमच्या नातलगांनीच जर तुम्हाला असुरक्षेच्या, भीतीच्या आणि विश्वासघाताच्या खाईत लोटले तर? ज्या विश्वासाच्या पायावर तुमच्या आयुष्याची इमारत उभी राहते त्या पायालाच जर कोणी उध्वस्त केले तर काय अवस्था होईल?

ज्यांना आपल्या घरातच किंवा नात्यात, ओळखीत लैंगिक अत्याचाराचा, लैंगिक छळाचा सामना करावा लागतो अशा कित्येक स्त्रिया, तरुण-तरुणी व लहान मुलांची अगदी हीच अवस्था होते!

एका सर्वेक्षणानुसार भारतात ५३ % अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. त्यात ३० % मुलांवर आणि किशोर-तरुण वयातील मुलींवर त्यांच्या नातेवाईकांकडून अत्याचार होत असल्याचे नमूद केले आहे. त्यातील ६४ % मुलामुलींवर त्यांच्या वयाच्या १० ते १८ वर्षांच्या टप्प्यात असे अत्याचार झाले. याशिवाय कितीतरी अधिक पटीने तरुण मुलींना आपल्याच घरात, नात्यांतल्या लोकांकडून नकोशी अंगलगट, नकोसे स्पर्श, नजरा, द्व्यर्थी बोलणे इत्यादी सहन करावे लागते, त्यांच्या लैंगिक चाळ्यांना सामोरे जावे लागते हेही तितकेच कटू वास्तव आहे. दिल्लीत केलेल्या एका सर्वेक्षणात ७६% स्त्रिया- मुलींना आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशा प्रकारचे वर्तन समाजात सहन करावे लागले होते, आणि ४० % स्त्रियांना ते स्वतःच्या घरातील सदस्यांकडून सहन करावे लागले होते. हे प्रमाण नुसतेच गंभीर नव्हे, तर कुटुंबसंस्थेत एकमेकांच्या प्रती असलेल्या विश्वासाला तडा देणारे आहे.

कित्येकदा लहान मुलांचे किंवा किशोर वयातील मुलामुलींचे आईवडील अशा विश्वासघात करणार्‍या, आपल्या मुलांचा लैंगिक छळ करणार्‍या व्यक्तींवर नको इतका विश्वास टाकणारे, त्यांना आपल्या मुलांपाशी विनादेखरेख वावरू देणारे असतात हेही एक दुर्दैवी सत्य आहे. त्यांचा अशा व्यक्तींवर अंधविश्वास असतो. तसेच आपल्या मुलांच्या किंवा प्रियजनांच्या बाबतीत असे काही घडूच शकत नाही असेही त्यांना वाटत असते. जर कधी सत्य सामोरे आले तर या अंधविश्वासापायी आपल्या मुलांनाच किंवा स्वतःला दोष द्यायची त्यांची प्रवृत्ती असते. तसेच नातेसंबंध तुटू नयेत, घरात वादळ निर्माण होऊ नये म्हणून अशा घटना लक्षात आल्यावरही गप्प बसणारे, कोणतीच प्रतिबंधक उपाययोजना न करणारेही अनेकजण असतात. फार फार तर आपल्या अपत्यावर देखरेख ठेवतील, त्याला त्या व्यक्तीजवळ एकटे सोडणार नाहीत. परंतु त्या छळणार्‍या व्यक्तीने इतर कोणाला आपल्या अपत्यासारखे छळू नये, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये म्हणून सोक्षमोक्ष लावणारे तुलनेने फारच कमी लोक असतात.

सज्ञान मुली, स्त्रियांनाही आपल्या नातेवाईकांकडून अशा तर्‍हेचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याबद्दल उच्चार केल्यास अनेकदा त्याचा संबंध थेट त्या मुलीच्या दिसण्या-वागण्या-राहण्याशी, तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. कित्येकदा अशा नातेवाईकांबरोबर एकाच घरात राहायचे असते. अहोरात्र त्या व्यक्तीचा सहवास कितीही नकोसा असेल तरी सहन करण्यावाचून अन्य पर्याय नाही अशी परिस्थिती असते.

लैंगिक छळ म्हणजे तरी काय? तर ही एक प्रकारची दांडगाई, दादागिरी, जबरदस्तीच असते - फक्त लैंगिक प्रकारची! अश्लील बोलणे, अश्लील हावभाव, नकोसे स्पर्श, अंगलगट, जबरदस्ती, वासनायुक्त नजरेने न्याहाळणे, तुमच्या अत्यंत खासगी वस्तूंना किंवा कपड्यांना हाताळणे, तुमच्यासमोर स्वतःच्या गुप्तांगाला स्पर्श करणे वा हाताळणे, अश्लील चाळे करणे अशा अनेक प्रकारांनी हे गैरवर्तन केले जाते.

तज्ज्ञ, समुपदेशक सांगतात की अशा घटना स्वतःपाशी, मनात दडपून ठेवू नका. त्यांच्याबद्दल आपल्या विश्वासातील किंवा समुपदेशनातील प्रोफेशनल व्यक्तीपाशी बोला. मन हलके करा. त्यामुळे तुम्हाला मनावरचा ताण हलका करण्यास, डोके शांत ठेवून निर्णय घेण्यास, त्रयस्थ दृष्टीने त्या घटनेकडे बघण्यास मदत होईल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर आहेच! परंतु याखेरीज अन्य पूरक उपायही असणार व असतीलच!

या प्रकारच्या सर्व केसेसमध्ये ती व्यक्ती कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत राहत आहे, तिचा स्वभाव कसा आहे, घरचे वातावरण कसे आहे, अशा घटनांबद्दल जागरूकतेची असणारी पातळी या सारख्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. अशा प्रकारचे वर्तन करणारा पुरुष अनेकदा यातून करून सवरून सहज सटकतो, परंतु त्याचे वर्तन सहन करायला लागलेल्या स्त्रीला व तिच्या गृहसदस्यांना त्यातून बाहेर यायला वेळ लागू शकतो. त्या घटनेमुळे राग, भीती, नैराश्य, चिडचिड, शरमेची भावना, अपराधी भाव, एकलकोंडेपणा, स्वतःला दोष देणे, धक्का बसणे, आत्मविश्वास आणि कार्यकुशलता डळमळीत होणे अशा पातळीवरचे मानसिक दुष्परिणाम दिसतात तर शारीरिक पातळीवर डोकेदुखी, निरुत्साह, पोटाच्या तक्रारी, निद्रानाश, दु:स्वप्ने, त्वचेच्या तक्रारी, लैंगिक आरोग्य ढासळणे, लैंगिक संबंधांबद्दल भीती, वजनात चढ-उतार, पॅनिक अ‍ॅटॅक्स हे परिणाम दिसू शकतात.

कित्येकदा अशा केसेस मध्ये पोलिसांची किंवा तिर्‍हाईतांची मदत न घेण्याकडे, त्या परस्पर मिटवण्याकडे कल असतो, कारण अनेकदा घरातला मामला असतो व वैयक्तिक बदनामीची तसेच कुटुंबाच्या बदनामीची भीती असते. या घटनांचे लिखित - मुद्रित पुरावे नसल्यास किंवा अन्य साक्षीदार नसल्यास त्या घटना सिद्ध करणे हेही अवघड असते. काही ठिकाणी आर्थिक संबंध गुंतलेले असतात. शिवाय मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे, तिची बदनामी, हेटाळणी हे तुलनेने खूपच सोपे असल्याचे दारुण वास्तवही आहेच! या सर्वाचा परिणाम त्या मुलीच्या संपूर्ण भविष्यावर होऊ शकतो, नव्हे होतोच!

ओळखीत, नात्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून नकोशी लगट, अंगचटीला येणे किंवा नकोसे स्पर्श, द्व्यर्थी बोलणे, unwanted, unwelcome sexual advances अनुभवायला येतात, तेव्हा त्यांचा सामना कसा करावा? कशा प्रकारे तो प्रश्न सोडवावा? कशा प्रकारे मदत मिळवावी? कित्येकदा नाजूक, गुंतागुंतीचे नाते संबंध असतात, तर कधी बाकीचे लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत याची भीती असते. मनात असुरक्षितता असते. अपराधी भाव असतो - आणि तेही आपली काही चूक नसताना! त्रास देणार्‍या नात्यातील / ओळखीतील व्यक्तीला आपल्या देहबोलीतून, शब्दांतून, वागण्यातून योग्य तो संदेश कशा प्रकारे पोचवावा, त्या व्यक्तीला अटकाव कसा करावा....?? डूज व डोन्ट्स काय असतात/ असावेत? अशा अनुचित वर्तनाबद्दलची कुटुंबातील इतर व्यक्तींची भूमिका, कृती काय असावी? आपल्या घरातील कोणा व्यक्तीला असा त्रास होत असेल तर तिला तो त्रास व्यक्त करण्यासाठी किंवा गृहसदस्यांना मोकळेपणाने सांगण्यासाठी कशा प्रकारचे पूरक वातावरण घरात असावे असे तुम्हाला वाटते? ज्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तिला कशा प्रकारे आधार द्यावा? तुमच्या माहितीतील किंवा मैत्रीतील एखाद्या व्यक्तीस अशा प्रसंगाचा सामना करावा लागला तर तिला कशा प्रकारे मदत करता येऊ शकते? याचबरोबर नात्यातील, विश्वासातील किंवा ओळखीतील व्यक्तीकडून अशा प्रसंगाला सामोरे जायला लागू नये म्हणून काय सावधानता, खबरदारी घेतली जाऊ शकते? याबद्दल आपण आपल्या कुटुंबीयांशी कशा प्रकारे संवाद साधू शकतो? कशा प्रकारे हा संवाद साधला जाऊ शकतो?

या विषयावर मार्गदर्शक, माहितीपर चर्चा-अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी उघडलेला हा बातमीफलक - नात्यातील भुतांचा बंदोबस्त !
-----------------------------------------------
'महिला दिन २०१३' उपक्रमासाठी हे पोस्टर तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल निनाद यांचे संयुक्ता व्यवस्थापनातर्फे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात घरातील प्रत्येक व्यक्ती... लहान मुले, 'स्त्रीया' या निःसंशय आदर करण्यायोग्य व्यक्ती आहेत हे लहानपणापासूनच, अगदी जन्मल्यापासूनच मनावर बिंबवण्याची सुरुवात घरातच झाली पाहीजे. मग घरातील म्हातारी आजी असो, किंवा आई, आत्या, कामवाली बाई, किंवा लहानमोठी भावंड, मुले वगैरे सर्व!

साधे उदाहरण द्यायचे तर घरात कुणी पाहूणे येऊन गेले कि सहजपणे आई मुलीला सांगते जा त्यांना दिलेले पाण्याचे ग्लास, बशा वगैरे उचलून आत आण. पण तिथंच जर मुली ऐवजी मुलगा असेल तर आई असे काही त्याला न सांगता स्वतः जाते आणि सर्व आवरते. हे सगळं सहज घडत असतं. पण नकळत मुलाच्या मनात नोंद होते की 'असली कामे मुलींनी करायची असतात. ही कामे माझी नाहीत, याचा अर्थ मी माझ्या बहिणीपेक्षा श्रेष्ठ आहे!' आणि त्याचवेळी मुलीचा मेंदू सुद्धा हे नोंदवून घेतो की 'मलाच ही कामे करावी लागणार. कारण मी स्त्री आहे.' - घरातील स्त्री आदरास, सन्मानास पात्र नाही ही भावना इथूनच रुजायला सुरुवात झालेली असते हे बर्‍याचदा घरातील सदस्यांच्या लक्षातही येत नाही.

किरण बेदिंचं एक वाक्य या निमित्ताने आठवलं. एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या - "हम घरमें ये जो शेर पालते है, वोही बाहर जाके शैतान बन जाते है।"

शिल्पा, असेही नि:संशय असू शकते. आपण आजूबाजूला अशी परिस्थिती पाहिली की आवाज उठवावा. चाईल्ड हेल्पलाईन किंवा पोलिसाना फोन करून कळवावे.

अत्यंत महत्त्वाच्या आणि समयोचित विषयास वाचा फोडल्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचे अभिनंदन.

वर्षानुवर्षे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असलेल्या कोवळ्या जीवांना याबाबत वेळीच जागरुक करणं, देव न करो असा प्रसंग आलाच तर प्रसंगावधान कसं राखावं आणि आईवडिल/पालक यांच्याशी मोकळेपणे या विषयी संवाद कसा साधावा याची जाणीव करून देणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्यच आहे. आणि हे सात्यत्यानं होणं गरजेचं आहे. केवळ एकदा सांगून लहान मुलांच्या मनात हे बसेलच असं नाही.

मुख्य म्हणजे वेगवेगळे possible scenarios (प्रसंगांच्या शक्यता) आपल्या बोलण्यातून त्यांच्या मनात ठसवाव्यात आणि त्यावर कशी उपाययोजना करता येईल याची शक्यता त्यांच्य मनात रुजवावी. समजा प्रसंग आलाच तर फारसं गोंधळून न जाता त्यांना सुटकेचा मार्ग शोधता येईल. हे म्हणजे एक प्रकारे मनाला 'मिलिटरी अ‍ॅलर्ट' बनवणं असतं.

याबाबतीत अमीरखानचा 'सत्यमेव जयते' चा या विषयातला एपिसोड उपयोगात आणता येईल. त्यात त्याने मुलांबरोबर हो संवाद साधलेला आहे तो मुलांना अधूनमधून दाखवायला हरकत नाही.

याबाबतीत अमीरखानचा 'सत्यमेव जयते' चा या विषयातला एपिसोड उपयोगात आणता येईल. >>>>> आमीर खानने वापरलेला डॉ. भुषण यांचा 'बॅड टच' शिकवण्याचा विडीयो: https://www.youtube.com/watch?v=6aH8Rwax09A

शिवाय त्या संदर्भात आलेली हि जाहिरातः https://www.youtube.com/watch?v=d31GbzRvrr8

सर्व महिलांना महिला दिना च्या शुभेच्छा !
आजच्या दिवशी संयुक्ता व्यवस्थापनाने मांडलेला विषय व
संकल्पना अतिशय स्तुत्य व आजकालच्या घडामोडीशी निगडीत असा आहे.

धन्यवाद संयुक्ता व्यवस्थापन !!

नुसत्या जाहिरातीवरून नीट संकल्पना कळली नव्हती. वाचल्यावर नीट कळली. रैना ला अनुमोदन.
फक्त त्या अनुभवातून प्रत्यक्ष जाणे आणि इमॅजिन करून सल्ले देणे यात थोडी गॅप असू शकेल असे वाटते. वर लिहिल्याप्रमाणे इतके संबंध गुंतलेले असताना त्याचा सामना करणे खरच अवघड आहे. सर्वांचे विचार वाचायला आवडतील.

सर्व महिलांना महिला दिना च्या शुभेच्छा !

मुग्धमानसी मी तुमच्या विचाराशी सहमत आहे. आणि बडवे मॅडम म्हणतात तसही समाजात घ्ड्त अस्त आपण खुप सुरक्षित जगात वावरतो तेव्हा आपल्याला या गोश्टी जाणवत नाहीत

>>आणि सो कॉल्ड आई वडीलच जर असे अब्युजिव असतील तर? मुलांनी काय करायचं?>>

मुलांनी शाळेतील शिक्षक, काउंसेलर, डॉक्टर, पोलिस, हेल्पलाईन यापैकी कुणाला तरी याबद्दल सांगावे. पण असे सांगण्यासाठी मुळातच जे काही घडत आहे ते योग्य नाही आणि ते थांबवण्यासाठी आपल्याला बाहेरचे जग मदत करेल हे मुलाला माहित हवे. यासाठीच अगदी प्रीस्कूल पासून मुलांना याबाबत शिकवणे महत्वाचे. तसेच शाळेतील टिचर ते मुलांचे डॉक्टर सगळ्यांनीच जागरुक असणे आवश्यक. अशा परीस्थितीत काय करायचे हे माहित नसल्याने मोठी माणसेही गडबडून जातात. त्यांच्यासाठी सुस्पष्ट नियमावली हवी. अमेरिकेत अशा प्रकारच्या अ‍ॅब्युझची शंका आल्यास टिचर्स, डॉक्टर्स, नर्सेस, काउंसेलर्स, प्रिस्ट वगैरेंना फॅमिली सर्विसला रिपोर्ट करावे लागते. https://www.childwelfare.gov/systemwide/laws_policies/statutes/manda.cfm या दुव्यावर या संबंधी माहिती आहे. असे काही भारतात नियम आहेत का?

संयोजकांचे आभार आणि सर्वांना महिलादिनामिनित्त शुभेच्छा.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मिशेल बॅचलेट यांचं भाषण वाचलं. त्या डिस्क्रिमिनेशन आणि व्हायलन्स या दोन्हींबद्दल बोलताना दिसतायत. स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह असेही मुद्दे स्पर्शिलेले दिसतात.

इथे लहान मुलांचं लैंगिक शोषण (जे दोन्ही लिंगांच्या मुलांच्या बाबतीत घडतं), स्त्रीभ्रूणहत्या, डोमेस्टिक व्हायलन्स या मुद्द्यांवरून 'सत्यमेव जयते' मालिकेच्या निमित्ताने प्रदीर्घ चर्चा अगदी नुकत्याच झाल्या होत्या, आणि तत्त्वतः या गोष्टी अयोग्य असल्याबाबत सर्वांचं एकमतही असतं, त्यामुळे त्या चर्चांचं पुढचं पाऊल टाकलं गेलेलं पहायला आवडेल.

उदा. डिस्क्रिमिनेशन हा डायरेक्टरबाईंचा मुद्दा लक्षात घेतला, तर या संस्थळावरच्या सुशिक्षित, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी स्त्रिया, ज्यांना हे व्यासपीठ उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे 'ग्लास सीलिंग'बाबतचे अनुभव (ज्यात पुन्हा छुपेपणाने लैंगिकता डोकावतेच), त्यांनी करून पाहिलेल्या उपाययोजना, त्यातल्या अडचणी इत्यादींबद्दलही लिहिलं तर चर्चा अधिक व्यापक होऊ शकते.

स्वाती२, माझ्या माहितीप्रमाणे दुर्दैवाने भारतात असे कोणतेही ठळक नियम नाहीत. आणि असतील तर त्यांबद्दल जागरुकता नाही.

नुकतीच टाईम्समध्ये आलेली बातमी सांगते की शिक्षकांनी जर मुलांच्या बाबतीत होत असलेल्या सेक्शुअल अब्यूज विषयी पोलिसांकडे तक्रार केली नाही तर त्यांना सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते.
ही ती बातमी.

>>
त्याचे वर्तन सहन करायला लागलेल्या स्त्रीला व तिच्या गृहसदस्यांना त्यातून बाहेर यायला वेळ लागू शकतो. त्या घटनेमुळे राग, भीती, नैराश्य, चिडचिड, शरमेची भावना, अपराधी भाव, एकलकोंडेपणा, स्वतःला दोष देणे, धक्का बसणे, आत्मविश्वास आणि कार्यकुशलता डळमळीत होणे अशा पातळीवरचे मानसिक दुष्परिणाम दिसतात तर शारीरिक पातळीवर डोकेदुखी, निरुत्साह, पोटाच्या तक्रारी, निद्रानाश, दु:स्वप्ने, त्वचेच्या तक्रारी, लैंगिक आरोग्य ढासळणे, लैंगिक संबंधांबद्दल भीती, वजनात चढ-उतार, पॅनिक अ‍ॅटॅक्स हे परिणाम दिसू शकतात.
<<

दिल्ली प्रकरणाच्या निमित्ताने वाचनात आलेला हा लेख या निमित्ताने शेअर करू इच्छिते.
बायकांनी स्वतःच शील, अब्रू इत्यादींच्या कल्पना लैंगिकतेशी जोडणं सोडून दिलं पाहिजे. इतरांच्या प्रतिक्रिया हा फार पुढचा मुद्दा. 'हे मरणाहून वाईट आहे' वगैरे कल्पनांना फार वर्षं (पिढ्यान्पिढ्या) कवटाळत आलो आपण. लैंगिकता हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, आणि पाकीट मारलं गेलेला पुरुष जसा जीवनातून उठत नाही तसंच विनयभंग झालेल्या स्त्रीनेही उध्वस्त व्हायचं कारण नाही.

>बायकांनी स्वतःच शील, अब्रू इत्यादींच्या कल्पना लैंगिकतेशी जोडणं सोडून दिलं पाहिजे.> सहमत!

मात्र

>>लैंगिकता हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, आणि पाकीट मारलं गेलेला पुरुष जसा जीवनातून उठत नाही तसंच विनयभंग झालेल्या स्त्रीनेही उध्वस्त व्हायचं कारण नाही.>>
ही तुलना पटली नाही. पर्स, चेन वगैरे मारली गेलेली स्त्रीही आयुष्यातून उठत नाही. पण लैगिक अत्याचाराला बाळी पडलेली व्यक्ती, मग ती स्त्री असो की पुरुष मानसिक दुष्परिणाम हे होतातच.

स्वाती२, हो हो. त्यात दुमत नाही. पण त्याकडे बघण्याचा एक ऑब्जेक्टिव्ह दृष्टीकोन तयार करायचा तर अशी काहीशी far fetchedसुद्धा उदाहरणं स्वतःलाच द्यायला हवीत.
विनयभंग झालेल्या व्यक्तीला दुर्वर्तनी ठरवणं जितकं अतार्किक तितकाच स्ट्राँग आत्मविश्वास असा अनुभव आलेल्या व्यक्तीचा कसा बिल्ड व्हावा?
मी चांगली व्यक्ती असणं हे माझं शील. विनयभंग झाला तरी मी तीच चांगली व्यक्तीच आहे हे पचनी पडायला हवं ना?

>>ओळखीत, नात्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून नकोशी लगट, अंगचटीला येणे किंवा नकोसे स्पर्श, द्व्यर्थी बोलणे, unwanted, unwelcome sexual advances अनुभवायला येतात, तेव्हा त्यांचा सामना कसा करावा? कशा प्रकारे तो प्रश्न सोडवावा? कशा प्रकारे मदत मिळवावी?
या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, काल की परवाच्याच बातमीपत्रात 'विवाहित जोडप्यात झालेल्या लैंगिक बळजबरीला बलात्कार म्हणता येणार नाही' अशी बातमी वाचल्याचं आठवलं.

संयोजक, कल्पना उत्तम आहे. शाळेतील शिक्षकांनी केलेलं गैरवर्तन देखील चर्चेस घेता येईल काय? माझ्या लहानपणी शाळेत असतांना असे काही प्रकार उडतउडत कानी यायचे! Sad
आ.न.,
-गा.पै.

अरुंधती कुलकर्णी,

आपल्या दुव्याबद्दल धन्यवाद! मात्र त्या पानावरची एक गोष्ट खटकली. लेखाखाली स्त्रीदेहाचं उत्तान प्रदर्शन मांडणारी तीन चित्रे आहेत. हेदेखील बंद व्हायला हवं.

आ.न.,
-गा.पै.

विनयभंग झालेल्या स्त्रीनेही उध्वस्त व्हायचं कारण नाही>>>>अगदी सहमत. अशा प्रसंगाला अपघात समजावं. शील, अब्रु गेली असं अजिबात समजू नये. करणारा भ्रष्ट होत नाही, उजळ माथ्यानं फिरतो.
तर जी अत्याचाराला बळी पडली तिच्या आणि समाजाच्या मानसिकतेत बदल व्हायलाच हवा!
लहान मुलांवर घरात अत्याचार होतात त्याबद्दल शाळेत शिक्षकांनी या विषयावर [ त्या त्या वयोगटातल्या मुलांच्या समजेच्या कुवतीप्रमाणे तश्या भाषेत] बोलावं. आणि मुलांना बोलतं करावं.
लहान मुलांवर शिक्षकांचा प्रभाव असतो त्यामुळे मुलं शेअर करतील असं वाटतं. तसंच शेजारी/आसपास राहणारं मूल खूप निराश दिसलं तरी, ''आपल्याला काय करायचंय.'' असं न म्हणता
कौशल्यानं त्याच्याशी बोलावं आणि कारण शोधावं. हे माझं मत!

हम्म! स्वाती, तुम्हाला काय म्हणायचे ते पोहोचले. Happy

मी यासाठी बरेचदा कुत्रा चावण्याचे उदाहरण वापरते. मनात नुसत्या विचारानेही भिती दाटून येते पण लाज वाटते का? नाही ना? तसेच हे ही प्रिडेटर्स! शील भ्रष्ट ते आहेत पिडित व्यक्ती नाही. भले तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असा. त्यामुळे तुमच्यावर झालेला अत्याचार जस्टिफाय होत नाही. तुमच्याशी वाईट वर्तन करण्याचा चॉइस समोरच्या व्यक्तीने केला. यात तुमच्या शीलाचा प्रश्नच येत नाही.

खूपच गंभीर विषय. परवा एका वृत्तपत्रात अनुष्का शंकर हिनेही आपल्यावर बालपणी कुटुंबातल्याच व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाले आणि ते आपण वर्षानुवर्षं सहन केलं असं म्हटल्याची बातमी होती.

फक्त स्त्रीच काय, पुरुषांचाही विनयभंग होतो, लैंगिक छळ होतो, बलात्कार होतात. परंतु घर, कुटुंब, समाज या पातळ्यांवर ह्या विषयाबद्दल बोलायला लोक का कचरतात? मुलगेही इतर मुलांकडून किंवा वयाने मोठ्या स्त्री-पुरुषांकडून छेडछाडीला बळी पडतात, पडू शकतात. अन्य व्यक्तीचा लैंगिक छळ करण्याची मानसिकता कशा प्रकारे रोखता येईल?

Pages