नात्यातील भुतांचा बंदोबस्त

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2013 - 23:23

natyatil_bhute_3.png“A promise is a promise : Time for action to end violence against women"
ही आहे संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलेली, इ.स. २०१३ची 'आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम!

गेल्या काही महिन्यांमधील घटना बघता अतिशय समर्पक आणि समयोचित असे हे ध्येयवचन आहे. म्हणूनच जरासा धाडसी परंतु अत्यंत नाजूक आणि काळजीचा असा 'कुटुंबांतर्गत महिला सुरक्षेचा' हा विषय आपल्यापुढे चर्चेसाठी ठेवत आहोत. आशा आहे की त्यातून महत्त्वाची माहिती तर मिळेलच, शिवाय या विषयाबद्दलची आस्था, सजगता व कृतिशील उपायांची जाणीव वाढण्यास व संवाद निर्माण होण्यास हातभार लागेल.

माणसाला समाजाची पहिली ओळख आपल्याला होते ती आपल्या कुटुंबापासून. इथेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा, आपल्या विकासाचा मूलभूत पाया रचला जात असतो. घरातील इतर सदस्य, नातेवाईक, स्नेही, परिचित ह्या सर्वांकडून आपण प्रेम, विश्वास आणि सुरक्षिततेची अपेक्षा करतो. पण ज्यांच्यावर तुम्ही एवढे विसंबून आहात, विश्वास दाखवत आहात त्या सुरक्षित वाटणार्‍या तुमच्या नातलगांनीच जर तुम्हाला असुरक्षेच्या, भीतीच्या आणि विश्वासघाताच्या खाईत लोटले तर? ज्या विश्वासाच्या पायावर तुमच्या आयुष्याची इमारत उभी राहते त्या पायालाच जर कोणी उध्वस्त केले तर काय अवस्था होईल?

ज्यांना आपल्या घरातच किंवा नात्यात, ओळखीत लैंगिक अत्याचाराचा, लैंगिक छळाचा सामना करावा लागतो अशा कित्येक स्त्रिया, तरुण-तरुणी व लहान मुलांची अगदी हीच अवस्था होते!

एका सर्वेक्षणानुसार भारतात ५३ % अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार होतात. त्यात ३० % मुलांवर आणि किशोर-तरुण वयातील मुलींवर त्यांच्या नातेवाईकांकडून अत्याचार होत असल्याचे नमूद केले आहे. त्यातील ६४ % मुलामुलींवर त्यांच्या वयाच्या १० ते १८ वर्षांच्या टप्प्यात असे अत्याचार झाले. याशिवाय कितीतरी अधिक पटीने तरुण मुलींना आपल्याच घरात, नात्यांतल्या लोकांकडून नकोशी अंगलगट, नकोसे स्पर्श, नजरा, द्व्यर्थी बोलणे इत्यादी सहन करावे लागते, त्यांच्या लैंगिक चाळ्यांना सामोरे जावे लागते हेही तितकेच कटू वास्तव आहे. दिल्लीत केलेल्या एका सर्वेक्षणात ७६% स्त्रिया- मुलींना आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशा प्रकारचे वर्तन समाजात सहन करावे लागले होते, आणि ४० % स्त्रियांना ते स्वतःच्या घरातील सदस्यांकडून सहन करावे लागले होते. हे प्रमाण नुसतेच गंभीर नव्हे, तर कुटुंबसंस्थेत एकमेकांच्या प्रती असलेल्या विश्वासाला तडा देणारे आहे.

कित्येकदा लहान मुलांचे किंवा किशोर वयातील मुलामुलींचे आईवडील अशा विश्वासघात करणार्‍या, आपल्या मुलांचा लैंगिक छळ करणार्‍या व्यक्तींवर नको इतका विश्वास टाकणारे, त्यांना आपल्या मुलांपाशी विनादेखरेख वावरू देणारे असतात हेही एक दुर्दैवी सत्य आहे. त्यांचा अशा व्यक्तींवर अंधविश्वास असतो. तसेच आपल्या मुलांच्या किंवा प्रियजनांच्या बाबतीत असे काही घडूच शकत नाही असेही त्यांना वाटत असते. जर कधी सत्य सामोरे आले तर या अंधविश्वासापायी आपल्या मुलांनाच किंवा स्वतःला दोष द्यायची त्यांची प्रवृत्ती असते. तसेच नातेसंबंध तुटू नयेत, घरात वादळ निर्माण होऊ नये म्हणून अशा घटना लक्षात आल्यावरही गप्प बसणारे, कोणतीच प्रतिबंधक उपाययोजना न करणारेही अनेकजण असतात. फार फार तर आपल्या अपत्यावर देखरेख ठेवतील, त्याला त्या व्यक्तीजवळ एकटे सोडणार नाहीत. परंतु त्या छळणार्‍या व्यक्तीने इतर कोणाला आपल्या अपत्यासारखे छळू नये, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये म्हणून सोक्षमोक्ष लावणारे तुलनेने फारच कमी लोक असतात.

सज्ञान मुली, स्त्रियांनाही आपल्या नातेवाईकांकडून अशा तर्‍हेचा त्रास सहन करावा लागतो आणि त्याबद्दल उच्चार केल्यास अनेकदा त्याचा संबंध थेट त्या मुलीच्या दिसण्या-वागण्या-राहण्याशी, तिच्या चारित्र्याशी जोडला जातो. कित्येकदा अशा नातेवाईकांबरोबर एकाच घरात राहायचे असते. अहोरात्र त्या व्यक्तीचा सहवास कितीही नकोसा असेल तरी सहन करण्यावाचून अन्य पर्याय नाही अशी परिस्थिती असते.

लैंगिक छळ म्हणजे तरी काय? तर ही एक प्रकारची दांडगाई, दादागिरी, जबरदस्तीच असते - फक्त लैंगिक प्रकारची! अश्लील बोलणे, अश्लील हावभाव, नकोसे स्पर्श, अंगलगट, जबरदस्ती, वासनायुक्त नजरेने न्याहाळणे, तुमच्या अत्यंत खासगी वस्तूंना किंवा कपड्यांना हाताळणे, तुमच्यासमोर स्वतःच्या गुप्तांगाला स्पर्श करणे वा हाताळणे, अश्लील चाळे करणे अशा अनेक प्रकारांनी हे गैरवर्तन केले जाते.

तज्ज्ञ, समुपदेशक सांगतात की अशा घटना स्वतःपाशी, मनात दडपून ठेवू नका. त्यांच्याबद्दल आपल्या विश्वासातील किंवा समुपदेशनातील प्रोफेशनल व्यक्तीपाशी बोला. मन हलके करा. त्यामुळे तुम्हाला मनावरचा ताण हलका करण्यास, डोके शांत ठेवून निर्णय घेण्यास, त्रयस्थ दृष्टीने त्या घटनेकडे बघण्यास मदत होईल. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर आहेच! परंतु याखेरीज अन्य पूरक उपायही असणार व असतीलच!

या प्रकारच्या सर्व केसेसमध्ये ती व्यक्ती कोणत्या देशात, कोणत्या संस्कृतीत राहत आहे, तिचा स्वभाव कसा आहे, घरचे वातावरण कसे आहे, अशा घटनांबद्दल जागरूकतेची असणारी पातळी या सारख्या अनेक गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात. अशा प्रकारचे वर्तन करणारा पुरुष अनेकदा यातून करून सवरून सहज सटकतो, परंतु त्याचे वर्तन सहन करायला लागलेल्या स्त्रीला व तिच्या गृहसदस्यांना त्यातून बाहेर यायला वेळ लागू शकतो. त्या घटनेमुळे राग, भीती, नैराश्य, चिडचिड, शरमेची भावना, अपराधी भाव, एकलकोंडेपणा, स्वतःला दोष देणे, धक्का बसणे, आत्मविश्वास आणि कार्यकुशलता डळमळीत होणे अशा पातळीवरचे मानसिक दुष्परिणाम दिसतात तर शारीरिक पातळीवर डोकेदुखी, निरुत्साह, पोटाच्या तक्रारी, निद्रानाश, दु:स्वप्ने, त्वचेच्या तक्रारी, लैंगिक आरोग्य ढासळणे, लैंगिक संबंधांबद्दल भीती, वजनात चढ-उतार, पॅनिक अ‍ॅटॅक्स हे परिणाम दिसू शकतात.

कित्येकदा अशा केसेस मध्ये पोलिसांची किंवा तिर्‍हाईतांची मदत न घेण्याकडे, त्या परस्पर मिटवण्याकडे कल असतो, कारण अनेकदा घरातला मामला असतो व वैयक्तिक बदनामीची तसेच कुटुंबाच्या बदनामीची भीती असते. या घटनांचे लिखित - मुद्रित पुरावे नसल्यास किंवा अन्य साक्षीदार नसल्यास त्या घटना सिद्ध करणे हेही अवघड असते. काही ठिकाणी आर्थिक संबंध गुंतलेले असतात. शिवाय मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे, तिची बदनामी, हेटाळणी हे तुलनेने खूपच सोपे असल्याचे दारुण वास्तवही आहेच! या सर्वाचा परिणाम त्या मुलीच्या संपूर्ण भविष्यावर होऊ शकतो, नव्हे होतोच!

ओळखीत, नात्यात जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून नकोशी लगट, अंगचटीला येणे किंवा नकोसे स्पर्श, द्व्यर्थी बोलणे, unwanted, unwelcome sexual advances अनुभवायला येतात, तेव्हा त्यांचा सामना कसा करावा? कशा प्रकारे तो प्रश्न सोडवावा? कशा प्रकारे मदत मिळवावी? कित्येकदा नाजूक, गुंतागुंतीचे नाते संबंध असतात, तर कधी बाकीचे लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत याची भीती असते. मनात असुरक्षितता असते. अपराधी भाव असतो - आणि तेही आपली काही चूक नसताना! त्रास देणार्‍या नात्यातील / ओळखीतील व्यक्तीला आपल्या देहबोलीतून, शब्दांतून, वागण्यातून योग्य तो संदेश कशा प्रकारे पोचवावा, त्या व्यक्तीला अटकाव कसा करावा....?? डूज व डोन्ट्स काय असतात/ असावेत? अशा अनुचित वर्तनाबद्दलची कुटुंबातील इतर व्यक्तींची भूमिका, कृती काय असावी? आपल्या घरातील कोणा व्यक्तीला असा त्रास होत असेल तर तिला तो त्रास व्यक्त करण्यासाठी किंवा गृहसदस्यांना मोकळेपणाने सांगण्यासाठी कशा प्रकारचे पूरक वातावरण घरात असावे असे तुम्हाला वाटते? ज्या व्यक्तीला असा त्रास होत असेल तिला कशा प्रकारे आधार द्यावा? तुमच्या माहितीतील किंवा मैत्रीतील एखाद्या व्यक्तीस अशा प्रसंगाचा सामना करावा लागला तर तिला कशा प्रकारे मदत करता येऊ शकते? याचबरोबर नात्यातील, विश्वासातील किंवा ओळखीतील व्यक्तीकडून अशा प्रसंगाला सामोरे जायला लागू नये म्हणून काय सावधानता, खबरदारी घेतली जाऊ शकते? याबद्दल आपण आपल्या कुटुंबीयांशी कशा प्रकारे संवाद साधू शकतो? कशा प्रकारे हा संवाद साधला जाऊ शकतो?

या विषयावर मार्गदर्शक, माहितीपर चर्चा-अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी, जागरूकता वाढवण्यासाठी उघडलेला हा बातमीफलक - नात्यातील भुतांचा बंदोबस्त !
-----------------------------------------------
'महिला दिन २०१३' उपक्रमासाठी हे पोस्टर तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल निनाद यांचे संयुक्ता व्यवस्थापनातर्फे मनःपूर्वक आभार.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्य व्यक्तीचा लैंगिक छळ करण्याची मानसिकता कशा प्रकारे रोखता येईल? >> लैंगिक छळ हाही एक dominance दाखवायचा भाग आहे हे लक्षात ठेवले कि त्याविरुद्ध प्रतिकार कसा करता येईल ह्याचा विचार करता येईल.

सल्ले देणं सोप आहे...खासकरुन भारतीय समाजात.
समजा असं काही घडलं आणि दोषी "आई वडीलांपासुन" मुलाला/मुलीला वेगळं केलं तर जबाबदारी कोण घेणार? आपल्याकडे फॉस्टर होम वगैरे प्रकार नाहीत अन (माहीती वाचली तर )बालसंगोपन केंद्र हा सुरक्षित पर्याय वाटत नाही.
तिथेच मुलांवर अत्याचार होण्याची शक्यता जास्त कारण त्यांना कोणीच वाली नाही. सुरक्षीत पर्याय असल्याशिवाय पोलिसांना कळवा, अमकं करा तमकं करा या सल्ल्यांना फारसा अर्थ उरत नाही.

समाजानेच अशा विकृत लोकांशी संबंध ठेवले नाहीत तर फरक पडु शकतो.

विषयाची मांडणी आणि संकल्पना आवडली तरी फक्त नात्यातली वायोलन्स(मराठीत सुचत नाहीये शब्द) असे असले तरी
रँगिग द्वारा केलेले लैंगिक अत्याचार, शिक्षक, गुरखा, शेजारचे काका/आजोबा ह्यांनी केलेले असे बरेच जणांपासून कसे जपावे ह्याची चर्चा पण व्हायला हवी.

१३ व्या वर्षी रँगिग (हो शाळेत केले गेलेले) एका मुलाच्या मनावर खोल्ल परीणाम पाहिलाय.

त्यामुळे, हि चर्चा चहो बाजूंनी करायला हरकत नसावी..
------------------
काही पुर्वी चर्चिले गेलेले मुद्दे,
१)नको त्याला नको तितका मान/आदर, त्याच्यावर विश्वास फक्त वयाने मोठा आहे म्हणून हि विचारसरणी चुकीची आहे.
ह्या दबावाने मुले(दोन्ही लिंग) बोलत नाहीत. त्यांनी चुकीचे केलेय हे लक्षात येत नाही. कारण मोठी माणसे जे करतात/बोलतात ते बरोबरच असेही नकळत शिकवणे/बिंबवणे काहीसे चुकीच आहे.
२) मुलांशी सतत संपर्कात रहाणे. चर्चा करणे. त्याचे संपर्कात येणारे /जाणारे कोण तपासणे.... वगैरे.

लैंगिक छळ हाही एक dominance दाखवायचा भाग आहे हे लक्षात ठेवले >> फक्त डॉमिनन्स नव्हे तर विकृतीही आहे हेही लक्षात घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीने दुसर्‍या व्यक्तीबाबत आयुष्यात एकदाच असे वर्तन केले तर 'कदाचित' तो डॉमिनन्सचा भाग म्हणता येईल. परंतु वारंवार कोणाच्या बाबतीत असे वर्तन म्हणजे डॉमिनन्स की मनोविकृती?? असा रोग आहे हे तर अगोदर मान्य तर केला पाहिजे ना? मग त्याच्या इलाजाकडेही बघता येईल.

मला वाटतं प्रत्येकानं आपल्या आयुष्यात डोकावून बघण्याची खूप गरज आहे. ३ पायर्‍यांमध्ये आपण हे स्वपरिक्षण करू शकतो.

१. माझ्या हातून कोणाचे बाबतीत असे वर्तन घडत नाही ना? / मी कोणाच्या अशा प्रकारच्या वर्तनाला बळी पडत नाही ना? (ह्यात द्व्यर्थी कमेन्ट्स, नकोसे स्पर्श, लगट पासून जबरदस्ती पर्यंत सर्व आले....)

२. जर तसे वर्तन माझ्याकडून होत आहे / मी सहन करत आहे, तर त्या बाबतीत मी काय करू शकतो / शकते? ते वर्तन संपवावे असे खरोखरी वाटल्याशिवाय पुढची पायरी गाठता येणे अवघड आहे.

३. ते वर्तन संपविण्यासाठीचे उपाय : ह्यात पीडित व्यक्तीने करण्याचे व पीडा देणार्‍या व्यक्तीने करण्याचे उपाय नक्कीच वेगवेगळे आहेत. परंतु समुपदेशन दोघेही घेऊ शकतात.

आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन आपल्या कुटुंबात असे वर्तन कोणाच्या बाबतीत घडत नाही ना / कोणी करत नाही ना, हे पाहणेही महत्त्वाचे नाही काय? आपल्या घरात असणार्‍या स्त्रिया, किशोर / तरुण वयातील मुले-मुली यांच्या बाबतीत असे काही होत असेल तर तिथे आपली काय भूमिका पाहिजे? काय केले पाहिजे?

जी व्यक्ती इतरांना लैंगिक पीडा देते ती फक्त इतरांना डॉमिनेट करायच्या दृष्टीनेच पीडा देते हा निष्कर्ष चुकीचा आहे असे मला वाटते. ती व्यक्ती स्वत: मनोविकारग्रस्त असू शकते. अशी व्यक्ती जर आपल्या घरात असेल तर मग बाकीच्या गृहसदस्यांनी काय करायला हवे? त्यांची भूमिका याबाबतीत कशी असली पाहिजे? जर मनोविकारग्रस्त व्यक्तीकडून घरातील किंवा परिचयातील कोणाला त्रास होत असेल तर त्याबद्दल काय करायला पाहिजे?

लैगिंक अत्याचार हि एक मानसिक प्रवुत्ती आहे, कोणतीही भावना काही काळासाठी आपल्या मनावर गारूड होते...ती वेळ निघुन गेली की नंतर त्याचे विशेष काही वाटत नाही....अशा अत्याचाराची भावना मनात का निर्माण होते, हे अत्याचार करणार्‍याने स्वःताला विचारले तर त्यावर काही तो सहज उपाय योजना करु शकतो. कारण अशा प्रकार भावना काही काळासाठीच मनात निर्माण होत असाव्यात, एकदा ती वेळ निघुन गेली त्या व्यक्तीला आपल्या कुतीचा पश्चाताप होत असावा................. कारण दिल्लीत घडलेल्या त्या रेपमधे, जो त्या गाडी डायव्हर होता..... त्याने आज सकाळीच तिहार जेलमधे आपल्या अंगातल्या कपड्यांचा उपयोग करुन स्वतःला फास लावुन आत्महत्या केली...... कदाचित त्यालाही त्याने केलेल्या कुतीचा पश्चाताप झाला असावा..........

कारण दिल्लीत घडलेल्या त्या रेपमधे, जो त्या गाडी डायव्हर होता..... त्याने आज सकाळीच तिहार जेलमधे आपल्या अंगातल्या कपड्यांचा उपयोग करुन स्वतःला फास लावुन आत्महत्या केली...... कदाचित त्यालाही त्याने केलेल्या कुतीचा पश्चाताप झाला असावा..........>>>>

असेच काही म्हणता येणार नाही. कदाचित आता आपण पुरते फसलो, आता ह्यातुन सुटका नाही... ह्या भावनेनेही त्याने जीवन संपवले असेल.... चूक कळली असती तर उघड मान्य केली असती तरी समाजाने (कदाचित?) माफ केलं असतं....

बलात्कारी परक्या पुरूषाची मानसिकता वेगळी आणि नात्यातल्याच एखाद्या व्यक्तिची मानसिकता वेगळी. नात्यात जेंव्हा कोणी एखाद्या मुला/मुलीचा गैर्फायदा घेतो, गैर वर्तन करतो, उगाचच स्पर्श करतो तेंव्हा तो वेगळ्या मानसिकतेने केला जातो. " कोणाला काय कळणार आहे" "सहज उपलब्ध आहे" "कोणी काही म्हणणार नाही" " आपल्याला कोण बोलतय!! घेउया मजा" " त्यात काय झालं!!" .... हे जास्त गंभिर आहे... तोंड दाबुन बुक्क्यांचा मार आहे... भयंकर आहे... तो परका बलात्कारी नीदान "परका" असतो. त्या पासुन कसं वाचायचं ह्याचं शिक्षण देता येत/ देउ शकतो. पण ह्या घरातल्यांचं काय करायचं??? एकतर त्यांच्या कडुन अशा behavior ची अपेक्षा नसते. त्या मुळे बसणारा धक्का कल्पनातीत असतो. आमच्या नातेवाईकांपैकी एकजण होमो सेक्शुयल आहे हे आम्हा मुलांना इतक्या भयानक पद्धतिने कळलं की शिसारीच आली.... आता कोणीही बाय सेक्शुयल / होमो/ किंवा लेस्बियन व्यक्ति समोर आली, की तेच पुर्वीचं आठवतं आणि खुप अनैसर्गिक वाटु लागतं.... कितीही नाही म्हंटलं तरी मन ते स्वीकारायला तयार होतच नाही....

कॄत्य केल्यावर कितीही पश्चाताप झाला तरी जे चुरगळायचं ते चुरगाळलच ना !!! मग शिक्षा नको ? ज्याच्यावर / जिच्यावर हा अमानुष अत्याचार झाला आहे, त्यांनी समाजाकडे का म्हणुन निकोप वृतीने पहायच?

मोठ्ठ्या प्रमाणात जनजागृती करणे , मानसिकता बदलणे , भोग आणि भोग्य ह्या पेक्षाही जग आहे आणि ते सुंदर आहे. हा विचार रुजणे महत्वाचे आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून ह्यावर्षी 'कुटुंबातील सदस्यांकडून होणारे लैंगिक शोषण’ ह्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजन केले गेले. कुटुंबांतर्गत होणाऱ्या लैंगिक शोषणाचे प्रमाण लक्षणीय आहे असे सर्वेक्षण सुचवत असताना आपल्या समाजात मात्र ह्याबद्दल शक्य तितके मौन बाळगण्याची प्रवृत्ती दिसते. ह्यामध्ये कुटुंबातील सदस्यच गुंतलेला असल्याने त्याला पाठीशी घालणे हा एक भाग आहे तर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला म्हणजे ती आयुष्यातून उठली ह्या विचाराचा पगडा आपल्यावर असल्याने ते लपवणे हा दुसरा भाग आहे. त्यामुळे 'नात्यातली भुतं' ह्या समस्येवर विस्तृत चर्चा घडणे आवश्यक आहे.

सांगायला अतिशय खेद वाटतो की प्रस्तावनेत अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधले होते पण त्यातल्या कुठल्याही मुद्द्यावर नीट चर्चा होऊ शकली नाही.

इथे प्रतिसाद दिले नसले तरीही प्रत्येकजण ह्या विषयाबद्दल जागरुक राहील आणि आपल्या आजूबाजूला असे शोषण घडताना दिसले तर त्याचा प्रतिकार करेल, शोषित व्यक्तीला मदतीचा हात देईल अशी अपेक्षा करुया.

-संयुक्ता व्यवस्थापन

संयुक्ता व्यवस्थापन,
सत्यमेव जयतेचा एक भाग या विषयावरच होता आणि त्या भागावर मायबोलीवर व्यवस्थित चर्चा झालीही होती. मला असं वाटतंय की त्यामुळेही इथे फारसे प्रतिसाद आले नसतील.

माफ करा, वादोत्पादक असे कोणतेही विधान आपल्याकडून होऊ नये याची काळजी घ्यायची म्हणून बाकी काही लिहीत नाही आहे. फक्त...

>>>कुटुंबातील सदस्यच गुंतलेला असल्याने त्याला पाठीशी घालणे हा एक भाग आहे तर एखाद्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला म्हणजे ती आयुष्यातून उठली ह्या विचाराचा पगडा आपल्यावर असल्याने ते लपवणे हा दुसरा भाग आहे. पण ह्यामुळे ह्या समस्येचा सामना कसा करायचा, कुठले उपाय शोधायचे ह्यावर पुरेशी चर्चा होऊ शकत नाही.<<<

हे विधान आणि

>>>सांगायला अतिशय खेद वाटतो की हजारोंच्या संख्येने सदस्य असलेल्या मायबोलीसारखे संकेतस्थळही ह्याला अपवाद ठरले नाही. प्रस्तावनेत अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधले होते पण त्यातल्या कुठल्याही मुद्द्यावर नीट चर्चा होऊ शकली नाही.<<<

हे विधान, ही दोन विधाने चक्क इन्टरकनेक्टेड असल्यासारखी आलेली आहेत व त्याचा निषेध करावासा वाटत आहे.

या विषयावर नुकत्याच अनेक चर्चा झडून गेलेल्या असल्याने आणि त्या चर्चांमध्ये उघड उघड वाद झाल्याचे सर्वांना ठाऊक असल्याने एका चांगल्या उपक्रमात पुन्हा तसेच काही होऊ नये म्हणून सदस्यांनी न लिहिण्याचा निर्णय घेतलाही असेल असा माझा (फक्त) अंदाज आहे.

>> सांगायला अतिशय खेद वाटतो की हजारोंच्या संख्येने सदस्य असलेल्या मायबोलीसारखे संकेतस्थळही ह्याला अपवाद ठरले नाही.

वरदा +१
सांगायला आनंद वाटतो की मायबोलीवर या विषयावर प्रदीर्घ चर्चा नुकतीच घडली होती आणि माझ्या आठवणीनुसार या किंवा याच्या समांतर धाग्यावर काहींनी आपले व्यक्तिगत अनुभवही धैर्याने मांडले होते.

उपक्रमाची/विषयाची निवड चुकली असेल हे पूर्णतः किंवा अंशतः मान्य करायचं की नाही हा प्रश्न संसंचा. पण ते लपवायला मायबोलीकरांवर अशा टिपण्ण्या करणं केविलवाणं आणि निषेधार्ह वाटलं.

हो, सत्यमेव जयतेवरची चर्चा परत एकदा चाळून पहाताना असं लक्षात आलं की त्याआधीही या विषयावर माबोवरच चर्चा झाली होती

एकाच विषयावर तिसर्‍यांदा जर परत प्रदीर्घ चर्चा वगैरे झाली नसेल तर त्यावरून मायबोलीच्या सदस्यांविषयी असं मत व्यक्त करणं मला फारसं रुचलेलं नाही.

वरदा, स्वाती +१.

अजून एक मुद्दा: प्रस्तावनेत सगळेच मुद्दे येऊन गेल्याने मी आता इथे नवीन काय लिहीणार हा प्रश्न मलातरी पडला. प्रस्तावना म्हणण्यापेक्षा लेख म्हणणे जास्त योग्य ठरेल.

या विषयावर अगोदर मायबोलीवर चर्चा काही प्रमाणात झालेली आहे हे माहित असूनही या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्याचे आढळले नसल्याने हा विषय चर्चेला घेतला गेला. प्रस्तावनेत जे काही मुद्दे मांडले ते व त्यांव्यतिरिक्त संबंधित अन्य मुद्द्यांवरही चर्चा व्हावी अशी संयोजकांची अपेक्षा होती.

उदा :

घरगुती, कौटुंबिक पातळीवर करता येऊ शकणार्‍या उपायांची, खबरदारीची चर्चा जरी केली गेली असली तरी याबद्दल आणखी काय करता येऊ शकते? समाजातील, कुटुंबातील कोणते संकेत बदलले जावेत असे वाटते का?पालक, शिक्षक, संस्थाचालक, पोलिस, समुपदेशक, स्त्री-संघटना यांचा समन्वय साधून काही होऊ शकते का? मुलांचे, अल्पवयीन तरुण-तरुणींचे पीअर ग्रुप्स याबाबत एकमेकांशी खुला संवाद साधू शकतात का? हे प्रकार रोखण्यासाठी संघटनात्मक पातळीवर आणखी प्रयत्न होण्याची गरज आहे. ते कशा प्रकारे साध्य करता येऊ शकते?

पुरुषांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांबद्दल समाज आजही मौन बाळगून आहे. ते मौन भेदल्याशिवाय समस्येचा स्वीकार, त्यातील वास्तवाची जाणीव व त्यांवर उपाय हे शक्य होणार नाहीत. यांबद्दल सजगता, खुलेपणा कसा वाढविता येईल? आज अनेक स्त्रिया समाजात त्यांच्याशी गैरवर्तन झाल्यावर त्याबद्दल तक्रार करायला संकोचत नाहीत. परंतु पुरुष असे वर्तन त्यांच्या बाबतीत घडल्यावरही मौन राखतात. अब्रूनुकसानी, मानहानी, शरम किंवा भीती पायी असे गुन्हे दडपले जातात. कोणतेही गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हेगार मोकाट वावरतात. हे चित्र कसे सुधारता येईल?

असे गुन्हे नोंदवून घेताना पोलिसांचा किंवा तपास यंत्रणांचा अप्रोच संवेदनशील असतो का? पीडित व्यक्तीला पूर्ण सुरक्षा मिळते का? शाळा-कॉलेज-केअर गिव्हिंग संस्थांमध्ये संस्थाचालक - शिक्षक किंवा अन्य कर्मचार्‍यांनी कोणती पथ्ये पाळायला हवीत? काय उपाययोजना करायला हव्यात? निरोगी वातावरणासाठी काही विशेष प्रयत्न घ्यायला हवेत का? यूथ ग्रुप्स किंवा तरुण संघांची याबद्दल काय भूमिका असावी? त्यांच्या सहभागाने असे गुन्हे रोखण्यास मदत केली जाऊ शकते का?

आधुनिक तंत्रज्ञानाचा असे गुन्हे रोखण्यासाठी कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो?

हे व आणखी असे बरेच सारे मुद्दे चर्चेत आले नाहीत किंवा त्यांवर चर्चा झालेली नाही.

वर काही प्रतिसादांत सुचवला आहे तो अर्थ निघू शकेल हे आधी लक्षात आले नाही. मसुदा संपादित केला आहे. कुणी दुखावले गेले असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत.

पुरुषांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांबद्दल समाज आजही मौन बाळगून आहे.>> वरची संयुक्ताने लिहिलेली प्रस्तावना पाहिली तर तीही जवळपास पूर्णपणे स्त्रीवरच केंद्रित आहे... निमित्त महिला दिनाचे आहे हे मान्यच आहे पण खुलाश्यात हे वाक्य आल्यामुळे की विसंगती दाखवायला लागली.

उपाययोजनांच्या बाबतीत अकुच्या धाग्यावर खूप सविस्तर माहिती आलेली आहेच. व्यक्ती ते समाज या सगळ्या पातळ्यांवर काय आणि कोणती खबरदारी, उपाययोजना करता येईल, कायदेशीर माहिती, व्याख्या, आकडेवारी असं सगळंच तिथे ऑलरेडी आहे.

शिवाय सत्यमेव जयते या धाग्यावरही काय करता येईल, पालकांनी कशी काळजी घेतली पाहिजे वगैरे गोष्टी चर्चेला आल्याच होत्या.

राहिता राहिला आधुनिक तंत्रज्ञानाचा मुद्दा. तो मान्य आहे. इतर मुद्दे असतील (त्या दोन धाग्यांच्या पलिकडचे) तर ते आत्ता सुचत नाहीयेत.
मुळात ही समस्या अतिशय गंभीर आणि सार्वकालिक आहे हे सगळ्यांना मान्य आहे. यावरची चर्चा अनंतकाळ चालू राहू शकते किंवा नाही.

इथे प्रतिक्रिया कमी आल्या, नाही आल्या याचं वकिली समर्थन करत नाहीये तर संव्य ने लिहिलेल्या पोस्टमधे मायबोली पारंपरिक मानसिकतेला अपवाद नाही हे वाक्य अतिशय खटकल्याने हे लिहित आहे. इतकं मोठं जनरलायझेशन करणं बरोबर नाहीच

मसुदा संपादित केल्याबद्दल धन्यवाद. जरी एकुणातच पोस्ट फारशी पटत नसली तरी खटकणारं वाक्य निघालं हे बरं झालं

संसं,

आपली आणि इतरांची मते वाचल्यावर वाटतं की, हा बाफ उघडण्यामागे समस्येच्या उपाययोजनेविषयी चर्चा करण्याचा उद्देश आहे. तसेच आपण तल्लख राहून संभाव्य शोषणाचा छडा कसा लावावा याविषयीही अधिक माहिती मिळवण्याचा हेतू दिसतो आहे. तर उपायकेंद्रित चर्चा अपेक्षित आहे का?

आ.न.,
-गा.पै.

>> मसुदा संपादित केल्याबद्दल धन्यवाद. जरी एकुणातच पोस्ट फारशी पटत नसली तरी खटकणारं वाक्य निघालं हे बरं झालं
+१

Pages