स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]

Submitted by मी-भास्कर on 10 December, 2012 - 20:47

स्वातंत्र्यवीर सावरकर कर्मभूमी दर्शन [पहिले विनायक: भगूर नाशिक] [ भाग पहिला-भगूर]
चला त्यासाठी भगूर्-नाशिकला!
** ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नव्याने टाकलेला आहे**
* ही खूण असलेला परिच्छेद मूळ लेखात नंतर लिहिलेला आहे.

temp1.jpg
' अष्टविनायकदर्शन' या नावाचे एक ई-बुक इंटरनेटवरून फ्री-डाऊनलोड करता येते हे कळल्यावर मी ते डाऊनलोड करून घेतले. वाटले होते कि ते असेल गणेशाच्या आठ स्थानांबद्दल ! पण या पुस्तकातील 'विनायक' आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर!
टीनेजर्सना वा त्याहून अधिक वयाच्या लोकांना सावरकरांचे चरित्र आणि अफाट कार्यकर्तृत्वाची अगदी प्राथमिक ओळख व्हावी या उद्देशाने तासादीडतासात वाचून होईल असे हे प्रकाशचित्रांसहीत ४० पानी पुस्तक लिहिले असल्याचे लेखकाने नमूद केले आहे. त्यातील पहिल्या भागाचे इंग्रजी भाषांतरदेखील इ-बुक स्वरूपात त्याच लेखकाने उपलब्ध केले आहे.त्याचे नाव मात्र 'स्वातंत्र्यवीर सावरकर' [इंग्रजी अक्षरे]' असे आहे आणी तेही फ्री-डाऊनलोड करून घेता येते.
पुस्तकातील पहिल्या भागात कृतज्ञता भावनेने केलेली भगूर्-नाशिक, पुणे, लंडन, ब्रायटन, मार्सेलिस, अंदमान, रत्नागिरी आणि दादर अशा आठ ठिकाणांची [लेखक त्यांना आठ विनायक म्हणतो] यात्रा घडविली आहे. ती घडवित असतांनाच चरित्र आणि कार्य यांचे दर्शन घडविले आहे.
दुसर्‍या भागात सावरकरांच्या व्यक्तिमत्वातील आठ पैलूंचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर मला या आठ विनायकांपैकी ज्या विनायकांचे दर्शन घेणे शक्य आहे तेथे जाण्याची इच्छा निर्माण झाली.
सात डिसेंबर २०१२ या दिवशी एका विवाहानिमित्त नाशिक येथे जायचे होते त्यावेळी पुस्तकात दिलेल्या भगूर्-नाशिक येथिल ,'पहिल्या विनायकाचे दर्शन' घ्यायचे ठरविले. तो अनुभव [भगूरचा पहिल्या भागात आणी नाशिकचा दुसर्‍या भागात]येथे देणार आहे...
भगूर येथील सावरकर- जन्मस्थान : नाशिकपासून साधारण १६ किमि. चांगला रस्ता आहे. आम्ही पुणे-राजगुरुनगर्-सिन्नर-घोटी-पांडुरली- भगूर या मार्गाने जाऊन सहा डिसेंबर २०१२ ला साधारण १२ वाजता भगूरला पोचलो.
सावरकरांचे पूर्वज बळवंत रामचंद्र सावरकरांनी तलवार गाजविली होती. दामोदरपंतांच्या आईचे माहेर देखील क्षात्रतेज असणारे घराणे होते. जॅक्सनवधानंतर सावरकरांचा दुमजली वाडा ब्रिटिश सरकारने जप्त करून लिलावात विकून टाकला होता. लिलावात घेणार्‍याने तेथे खोल्या करून भाडेकरू ठेवले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर ते सावरकरांना सरकारने परत करावे या लोकांनी केलेल्या मागणीला काँग्रेसी सरकारांनी प्रतिसाद दिला नाही. पण युती सरकारच्या काळात माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठींब्यामुळे सरकारने तत्कालीन मालक-भाडेकरूंना नुकसान भरपाई देऊन ते ताब्यात घेतले आणि पुरातत्व खात्याकडे दिले. अत्यंत पडझड होऊन गेलेल्या त्या वाड्याला शक्य तित्के मुळचे स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या खात्यामार्फत करून ते आता लोकांना सकाळी १० ते ५ पाहाता येते. सोमवारी सुट्टी असते.
याच वाड्यात २८ मे १८८३ या दिवशी सावरकरांचा जन्म झाला. सावरकरांच्या नात्यातील एक पराक्रमी पूर्वज विनायक दिक्षित यांचे नाव या नवजात बालकाला दिले गेले. त्याची कथाही मोठी मजेशीर आहे. वाड्यातील तळमजल्यावरील जन्मस्थानाचे जागेवर तशी एक पाटी व सावरकरांचा परिचित फोटो आहे. कंपाऊंडच्या भिंतीच्याआतील वाडा बर्‍यापैकी मोठा आहे. आत शिरल्यावर समोर अंगण आहे. उजव्याबाजूच्या कंपाऊंडलगत त्यांचा अर्धपुतळा आहे. समोरच्या पडवीतून आतील खोल्यांमध्ये जाता येते. तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठीच्या अरुंद जिन्यांकडे जाता येते. आतील खोल्यांमध्ये सावरकर-कुटुंबियांचे आणि सावरकरांचे विविध प्रसंगी घेतलेल्या फोटोंना एन्लार्ज करून लावले आहेत. आतल्या खोलीला लागून लहानसे देवघर आहे. तेथे त्यांच्या घरी एकेकाळी असलेल्या अष्टभुजादेवीचा फोटो ठेवला आहे.

* दामोदरपंतांच्या आईच्या पूर्वजांनी लुटारू टोळ्यांचा पराभव करून त्यांच्याकडून अष्टभुजादेवी भगूरला आणली. आणि तीच सावरकर घराण्याची कुलदेवता झाली. तिला त्याकाळच्या प्रथेनुसार बोकडाचा बळी द्यावा लागत असे म्हणून मूर्ती खंडोबाच्या देवळात ठेवली होती पण सावरकरांच्या बालपणी ती समारंभपूर्वक घरात आणली गेली. पण बळी मात्र खंडोबाच्या देवळात दिला जाई. या कुलदेवतेसमोरच सावरकरांनी वयाच्या १५ व्या वर्षी सशस्त्र लढा देण्याची शपथ नाशिकला असतांना घेतली. *

वरच्या मजल्यावरील दालनात सावरकरांचे एक मोठे तैलचित्र आहे. भगूर सारख्या खेडेगावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला एक बालक मोठेपणी एका महाबलाढ्य जागतिक शक्तिला आव्हान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतो आणि त्यासाठी सर्व आयुष्य झोकून देतो ही गावासाठी केवढी तरी अभिमानाची बाब!
अशी व्यक्ति वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत ज्या घरात वावरली त्या घरात आपल्याला वावरायला मिळणे ही केवढी भाग्याची आणि चित्तथरारक गोष्ट आहे याची जाणीव सतत होत होती.
खरे तर सावरकरांचे ५वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या काळाचा हा वाडा साक्षिदार! त्यांच्या अनेक आठवणी त्या वास्तूशी निगडित. पण त्याविषयीची माहिती देण्यासाठी थोड्या फलकांशिवाय कोणी नाही ही उणीव जाणवली.
डिपार्टमेंटचा एक कर्मचारी देखभालीसाठी तिथे असतो. भेट देणार्‍यांचे नाव, पत्ता, सही वगैरे तो घेतो. पण शेवटी तो एक बदल्या होणारा सरकारी कर्मचारीच ! खरे तर अशा वास्तूत काम करण्याचे भाग्य आपल्या वाट्याला आले या आनंदात त्याने एक राष्ट्रीय कार्य म्हणून आपण होऊन सर्व माहिती मिळवावी आणि जिज्ञासूंना द्यावी. सावरकरांबद्दल आदर आणी माहिती असणारा एखादा स्थानिक उपलब्ध झाला तर फार चांगले होईल.

** एकदा भगूर गावालगत सावरकरांचा बालचमू धनुष्यबाण, तलवार घेऊन खेळत असतांना गोर्‍या शिपायांचा घोडदौड-सराव चालला होता. उजव्या हातावर भल्या मोठ्या विंचवाचे चित्र गोंदवलेल्या एका गोर्‍याने मस्करी करण्यासाठी बाबारावांच्या (थोरला भाऊ गणेश) हातातली तलवार काढून घेतली आणि तो निघाला. तेव्हा त्यांनी ती परत मागितली. तेव्हा त्याने बाबाला नाव विचारले त्यावर बाबाने त्यालाच नाव विचारले. त्याने ते सांगितले, ' जॉन पर्किन्स!'
मग बाबाने आपली आणि भावाची त्याच्याशी ओळख करून दिली.
त्याने विचारले,' ही तलवार कुणाची? आणि कुठून आणली ही?'
त्यावर विनायकानेच पुढे होऊन उत्तर दिले, ' आमच्या शूर घराण्याची तलवार आहे ही.'
यावर पर्किन्स तलवार विनायकाच्या हाती देत म्हणाला, 'मग आता तूही ही तलवार घेऊन पराक्रम कर!'
पुढे योगायोग असा कि सावरकरांना मार्सेलिसला पकडुन मुंबईस आणले तेव्हा याच पर्किन्सने त्यांना ताब्यात घेतले. लहानपणी पाहिलेले त्याच्या हातावर गोंदवलेल्या विंचवाच्या चित्रामुळे सावरकरांनी त्याला ओळखले. सावरकरांनी त्याला त्या जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि तो प्रसंग आठवून तोही चकीत झाला. **

शेवटी सोलापूर येथील सावरकर विचारमंचाने पुस्तिकेच्या स्वरूपात प्रकाशित केलेली त्याच लेखकाची 'अष्टविनायकदर्शन' पण जरा वेगळे ही पुस्तिका पुतळ्यासमोर अर्पण केली आणी तेथील कर्मचार्‍याला ती जमेल तितक्या लोकांना वाचायला दे अशी विनंति करून बाहेर आलो. जाता जाता नमूद करणे आवश्यक आहे की ही पुस्तिका सोलापूर येथील श्री विवेक घळसासी यांनी स्थापन केलेल्या सावरकर विचारमंचाने त्यांच्या कार्यालयात येणार्‍यास विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. ती मला मिळाली तेव्हां तरी विक्रीसाठी उपलब्ध केलेली नव्हती..

दुसरा भाग लवकरच येईल आणि तो नाशिक येथील अनुभवाचा असेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@महेश आणी दिनेशदा
धन्यवाद!
पण माझी कांहितरी चूक झालेली दिसते; कारण लेख अजून अपूर्ण आहे आणि सर्वांसाठी प्रकाशित केलेला नव्हता [ निदान अशी माझी समजूत आहे]. तेव्हां आता संपादित करून याला भाग पहिला करून दुसरा भाग नंतर टाकतो.] प्रचि आहेत पण ते अद्याप संगणकावर घ्यायचे आहेत. ते दुसर्‍या भागात देता आले तर पाहातो.

वा वा उत्तम माहिती. तिथे फोटो काढायला परवानगी नाहीयेका ?
नाशिकला "तिळभांडेश्वराच्या" गल्लीत अभिनव भारताचे कार्यालय होते ना?

@पुरंदरे शशांक | 12 December, 2012 - 14:50
तिथे फोटो काढायला परवानगी नाहीयेका ?<<

आत परवानगी नाही.

>>नाशिकला "तिळभांडेश्वराच्या" गल्लीत अभिनव भारताचे कार्यालय होते ना? <<
त्याबद्दल पुढील भागात देणार आहे.
धन्यवाद!

लेखात फोटो टाकायला आज जमले.
त्यामुळे आज लेखाच्या सुरुवातिलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मस्थानाचा फोटो टाकला आहे.

@chaitrali | 31 December, 2012 - 13:31 नवीन
... पण हे 'चालू घडमोडी' मध्य का दिसतंय? <<

कोठल्या सदरात टाकावे याचा निर्णय होईना म्हणून!

भारती बिर्जे डि... | 7 January, 2013 - 12:58 नवीन
वेगळेच अष्टविनायक. ही यात्रा तुमची सुफळ संपूर्ण होवो!!
<<
शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद!

@रेव्यु | 8 January, 2013 - 09:23
ती लिंक कोणती? डावूनलोड करण्याची
<<
धन्यवाद. सवड होताच ती लिंक शोधून इथे टाकीन.

खालील इ-पुस्तिका कोणालाही फ्री डाऊनलोड करून घेता येतील.
डाऊनलोड करतांना प्रथम बुकगंगाचा ई-बुक रीडर [जो फ्री डाऊनलोड करता येतो] डऊनलोड करून घेण्याचा मेसेज येईल. त्याप्रमाणे तो रीडर डाऊनलोड करावा. मग त्या रीडरमधून ही पुस्तके पण डाऊनलोड करता येतात.

मराठी इ-पुस्तिका
अष्टविनायकदर्शन लेखक : शशिकांत गोखले

www.bookganga.com/eBooks/Book/4687083064560258553.htm

इंग्रजी इ-पुस्तिका त्याच लेखकाची.

A Darshan of Swatantryavir Savarkar

http://www.bookganga.com/eBooks/Book/5499099720559123886.htm

अंदमानात साजरी झालेली सावरकर पुण्यतिथी. भारतातून त्यानिमित्त गेलेले ४०० लोक तेथे उपस्थित होते.
दि.म. ४-३-२०१३: बातमी
स्वा. सावरकरांच्या स्मृतिदिनी दि २६-२-१३ ला अंदमानातील पोर्टब्लेअर मधील महाराष्ट्र मंडळात आयोजित विशेष समारंभात अंदमानातील निवृत्त मुख्याध्यापक एम अहमद मुज्तबा यांनी लिहिलेल्या
Veer Savarkar- A Revolutionary political prisoner
या इंग्रजीतील चरित्राचे प्रकाशन झाले. मुज्तबा यांच्या पूर्वजांनी सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगली होती. सावरकरांनी तेथे भोगलेल्या यातना आणि तसेच कैद्यांच्या साक्षरतेसाठी केलेल्या प्रयत्नांचे दर्शनही पुस्तकात घडविले आहे असे लेखकाने या प्रसंगी सांगितले.

दि.म.:११-३-१३: वृत्तः
स्वा. सावरकरांच्या नाशिक या कर्मभूमीत दि १५ मार्च ते १७ मार्च १३ पर्यंत नाशिकमधील 'चोपडा लॉन्स' मध्ये २५ वे स्वा. सावरकर साहित्य सम्मेलन होणार आहे.
त्यातील मुख्य कार्यक्रम : अध्यक्षः यशवंत पाठक
१५-३-१३: दुपारी ४: अभिनव भारत मंदीर, वीर सावरकर मार्ग ते 'चोपडा लॉन्स' शोभायात्रा
सायंकाळी ६ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद् घाटन
१६-३-१३: सकाळी १०: सावरकरांवरील जीवनपट दाखवला जाईल.
सकाळी ११.३०: श्याम देशपान्डे व शुभा साठे यांचे 'साहित्यिक सावरकर' यावर भाषण
दुपारी १: 'सावरकर आणि हिंदुस्थानची संरक्षणसिद्धता' या विषयावर परिसंवाद
सहभागः कमांडर आगाशे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, ब्रिगेडियर हेमंत महाजन
१७-३-१३:रविवारः सकाळी १० : सावरकरांचा राष्ट्रवाद- व्याख्याते- रमेश पतंगे व अविनाश कोल्हे
सकाळी ११.३०: सावरकर हिंदुत्ववादी का बनले?
- वक्ते सुप्रसिद्ध सावरकर अभ्यासक श्री शेषराव मोरे
दुपारी १.१५: विज्ञाननिष्ठ सावरकर- वक्ते अरूण करमरकर
दुपारी ३.१५: तरुणांचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर- वक्ते वि ह धूमकर आणि वा ना उत्पात
सं ५ : समारोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बहुमोल विचार समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.. तसेच नाशिकजवळच असलेल्या सावरकरांच्या भगूर येथील जन्मभूमीलाही भेट देता येईल.