मुलांना घरातील कामाचे पैसे...?

Submitted by मोहना on 25 February, 2013 - 16:44

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील:-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात पठ्ठ्यांना याचा आणि शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेण्यासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून. नाहीतर पिगी बॅकेंत जमा करायचे."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
उरलेल्या मैत्रीणींचं म्हणणं, भारताबाहेर कपडे, धुणी किंवा इतर कोणत्याच कामासाठी माणूस सहजासहजी मिळत नाही. जोडीदार मदत करणारा नसेल तर मुलांच्या मदतीची अपेक्षा केली तर काय चुकलं?
"पण त्यासाठी पैसे?" माझी गाडी एकाच मुद्यावर अडलेली.
"काहीतरी आमिष द्यावच लागतं."
"मग मुलं तुम्हाला पैसे देतात?"
"कसले?"
"रोजचं जेवण, शाळेसाठी डबा तयार करुन देणं, गाडीने इकडे तिकडे नेणं आणणं.... खूप मोठी यादी होईल." मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.
माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना चांगली आहे. घरातल्या कामांचं मूल्य कळण्यास मुलांना योग्य वयात मदत होईल. स्वावलंबनाचं देखील महत्व त्यांच्या मनावर बिंबवलं जाईल. पैशाशिवाय दुस-या चलनाचा देखील विचार करता येईल. उदा. रोजच्या रोज मुलांना गुण देणे आणि महिन्याच्या अखेरीस सर्वात जास्त गुण मिळवणा-या मुलाला स्टार देणे हा प्रकार एका कुटूंबात पाहिलाय. पण पैसे कमावण्याचं शिक्षणही नकळतच मिळत जाईल. पैशाचा विनियोग मुलं कसा करतात याकडे विशेष लक्ष देणं मात्र गरजेचं आहे. गुजराथी / मारवाडी कुटूंबात मुलांना लहानपणापासून पैसे कमावण्याचे आणि त्याचा संचय करण्याचे , गुंतवणुकीचे शिक्षण मिळत असते. हल्ली अनेक गुजराथी कुटूंबात शिक्षणाचं महत्व दिसून येत असल्याने मुलांना व्यवसायात लहान वयात आणलं जात नाही. पण कॉलेजच्या दिवसातच शेअर मार्केट आणि इतर गोष्टींमधून पैसे कसे कमवावे याची ओळख करून दिली जाते.

आम्हाला लहानपणी(हायस्कूल) घरातल्या काहीकाही कामांचे पैसे मिळायचे.. मज्जा यायची.. भारी वाटायचं..
चुकीचा खर्च केला नाही कधी त्या पैशांचा मात्र.. एखादा वडापाव (१.५० रु) किंवा मॅक्स आईसक्रीम (५रु) ... बरेचसे बँकेतच जायचे. मस्त वाटायच मात्र.. ते कामही मनापासून केलं जायचं Happy
एका सुट्टीत बाबांच्या छोट्या हंगामी बिझनेस ला मदत करून ४५० रु कमवलेले.. त्या काळात, शिकत असताना it was a big amount..
नुसता पॉकेटमनी मिळण्यापेक्षा कष्ट करून पैसे मिळालेले जास्त चांगले..

माझ्या लेकाच्या शाळेत भेटलेली आई सुद्धा तिच्या मुलाला पैसे देते आणि त्या पैशातून मुलगा आपल्या आईकडून बेसिक गरजेच्या गोष्टी.. पेन्सिल .. इरेझवर वगैरे विकत घेतो.. मुलांना कॉइन्स पैसे समजण्या साठी हे करते म्हणे ती.

लहानपणी मी शेजारच्या एका काकूंना त्यांचे सामान आणून दिले होते, बदल्यात त्यांनी माझ्या हातावर चॉकलेटसाठी आठाणे ठेवले. घरी येऊन मोठ्या खुशीत आईला दाखवले तर ती खूप वैतागली, "असे मदतीचे पैसे घेतात का म्हणून" भले ते त्या काकूंनी सहज कौतुकाने का दिले असेना, माझ्या आईला ते आवडले नव्हते............... पण हे वाचून असे वाटते की माझी आई तेव्हा चुकीची होती की काय Sad

आणि हो, दुसरीकडे ते काका काकूंवर वैतागले, लहान मुलाला कशाला सामान आणायचे काम सांगितले म्हणून... कोणाचे काय तर कोणाचे काय..

माझा गोंधळ आहे.

काम करून पैसा कमावणे, पैसे हाताळणे, त्याचा विनियोग करणे अश्या गोष्टींसाठी हे उपयोगी आहे हे पटते पण स्वतःच्या घरातले काम करण्यासाठी वेगळे पैसे? मग आपले घर, आपली जबाबदारी ही भावना कशी निर्माण होणार? आपण या घराचा भाग आहोत, या घरात असण्याचे सर्व फायदे आपल्याला मिळतात (सुरक्षितता, अन्न, वस्त्र, निवारा, इतर अनेक कम्फर्टस इत्यादी) तर हे घर नीट आणि सुरळीत चालावे यासाठी आपले योगदान असायला हवे ही जाणीव कशी होणार? आईवडिल (दोघे किंवा एकच) घरासाठी पैसा कमावतात, अन्न शिजवणे, सफाई ठेवणे अशी सगळी व्यवस्था बनवतात ते आईवडिल दोघांचे काम आहे पण सगळ्या व्यवस्थेत घराचा एक घटक म्हणून छोटीशी का होईना आपलीही काही जबाबदारी आहे हे मुलांना कसे समजणार?
छोट्या छोट्या कामांसाठी मुलांना पैसे देणारे आईवडिल यासाठी काय प्रयत्न करतात?

ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे.

>>>> मान्य. १००%. मुलांनी आईवडिलांना घरातील कामात मदत करणे पैशाच्या रुपात मोजणे मलाही पटत नाही. आणी पैशाचे हिशेब, किंवा त्या पैशांची किंमत कळावी यासाठी वेगळे काहितरी उपाय असतीलच की.

अहो परोपकार नावाची काही गोष्ट शिकवाल की नाही? प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिकवू नका,
किंमत(price) आणि मुल्य(value) यातील फरक शिकवा मुलांना.

लहानलहान कामं मुलांनी केल्यावर त्यांना त्याबदल्यात पैसे देणं मला वावगं वाटत नाही. त्यामुळे पैशाची किंमत कळते, ७५ सेंट मिळवायला खोली आवरण्याचे कष्ट घ्यावे लागतात हे समजतं. आमच्या नातेवाइकांमध्ये पैशाची किंमत अजिबात न समजणारी मुलं मी पाहिली आहेत. आईवडील जे पैसे मिळवतात त्याच्यासाठी ते कष्ट करतात, हे मुलांना समजवण्याचा हा एक चांगला मार्ग मला वाटतो.

मुलांनी आपल्या घरातील कामं आपली जबाबदारी म्हणून करावीत, पैसे मिळतात म्हणून नाही, हे बरोबर आहे. मुलांना नीट समज आल्यावर हे त्यांना तपशीलवार समजावून सांगता येऊ शकतं की, घरातल्या कामांचे पैसे का मिळतात, परंतु घरातली कामं ही सर्वांची जबाबदारी कशी आहे आणि मुलांकडून काय अपेक्षित आहे.

प्रत्येक गोष्टीची किंमत करायला शिकवू नका,
किंमत(price) आणि मुल्य(value) यातील फरक शिकवा मुलांना.>>१११

मी सहसा असं सांगते, की तू शहाण्यासारखा वागलास आठवडाभर, आणि खेळणी, पुस्तकं आवरून ठेवलीस (जेवताना आप्लं ताट आपण आणणे आणि ते आपण मध्ये नेणे , हे अध्याऋत आहे Wink )
मला त्रास दिला नाहीस तर मी फ्रायडेला तुला खाऊच्या पैशांसोबतच गंमत आणायचे पैसे पण देईन, गंमत इन्वॉल्व्स काहीही पेपर पिना, इरेझर्स, कीचेन (आपल्या दृष्टीने नगण्य,फालतू पण पोरांच्या दृष्टीने ते ऑसम, अमेझिंग सुप्पर वगैरे काय काय असतं) Happy

किंमत(price) आणि मुल्य(value) यातील फरक शिकवा मुलांना.>>१११

आमच्या घरात, जी कामे मोठी माणसे "आपल्या" घरातील कामे म्हणून करतात, त्यासाठी मुलांनी मदत करावी अशी रास्त अपेक्षा असते. त्याबद्दल कुठलेही अमिष नसते पण नैतिक जबरदस्तीच असते.
पण जी कामे बाहेरुन करून घेऊ, त्याची जबाबदारी मुलांनी घेतली तर त्याबद्दल मात्र आवर्जून पैसे दिले जातात.
फावल्या वेळात, शेजार्‍यांची देखील कामे किंवा इतरही कामे करण्यासाठी ( बाग साफ कर, पेपर वाट वगैरे ) प्रोत्साहन दिले जाते. त्याबद्दलही शक्य असतील तर ( म्हणजे चॅरिटी नसेल तर ) पैसे मागायला उद्युक्त केले जाते.

पण पैशाचा हिशेब मात्र द्यावाच लागतो.

शाळेत असताना (साधारण आठवी, नववी इयत्ता) ''गाईड'' मधील समाजसेवा अभ्यासक्रमात आम्हाला 'खरी कमाई' करून आणायची असे त्याची आठवण झाली. त्या अंतर्गत शेजारी-पाजारी, ओळखीच्या किंवा कधी अनोळखी लोकांकडे जाऊन आम्ही त्यांची छोटी-छोटी कामे केली होती व त्यातून मिळालेले पैसे त्या उपक्रमा अंतर्गत शाळेत जमा केले होते. कामे काही खूप कष्टाची नसायचीच. कोणाच्या खोलीचा किंवा अंगणातला केर काढणे, धान्य निवडून देणे, वर्तमानपत्र वाचून दाखविणे, सांगितलेला मजकूर सुवाच्य अक्षरात पत्रस्वरूपात लिहून देणे अशी ती कामे होती. त्यातून मिळालेल्या पैशांचे प्रचंड अप्रूप वाटले होते व ते पैसे शाळेत जमा करताना ''कष्टाचे - घामाचे पैसे'' जमा करतोय या भावनेने आनंद झाला होता! Wink

कोणत्याही कामाचे ''रिवॉर्ड'' मिळणार आहे - भले ते पैशाच्या स्वरूपात किंवा एखाद्या ट्रीटच्या, लाडाच्या किंवा अन्य काही स्वरूपात - हे मुलांना मोटिव्हेट करायला कदाचित प्रभावी माध्यम ठरू शकते. परंतु दर खेपेला स्वतःच्या, इतरांच्या किंवा घराच्या कामासाठी - ते कामही दैनंदिन स्वरूपाचे - अशा प्रकारे मोटिव्हेट करावे का याबद्दल मी साशंक आहे. माझ्या माहितीतल्या काही घरांमध्ये वेगळ्या प्रकारे ''पेमेन्ट'' केले जाते. म्हणजे जर स्वतःचा कप्पा, कपाट आवरले तर वीकेंडला खेळण्यांच्या किंवा फुलांच्या प्रदर्शनाला घेऊन जाणे, पार्कमध्ये घेऊन जाणे वगैरे. आपली खोली जर रोज पसारा न घालता ठेवली तर आई/बाबा गोष्टीचे पुस्तक आणतात - दूर फिरायला घेऊन जातात किंवा मित्र/मैत्रिणीच्या घरी खेळायला जायची परवानगी देतात - हे माहिती झाल्यावर त्यानुसार त्या घरांमध्ये बारगेनिंग होताना पाहिले आहे. मुलंही टफ निगोशिएटर्स असतात!! घरातील कामांच्या बाबतीत जर त्याचे पैसे मिळत असतील तर तसेही मुलांचे हिशेबही बरेच तयार असतात! आपल्याला बाजारातून कोणती गोष्ट आणायची आहे, त्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, आपल्याला कोणते काम केल्यावर किती पैसे मिळतील, त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल, कितीदा ते काम करायला लागेल - हे सर्व हिशेब ती अगदी चोख ठेवत असतात.

थोडे अवांतर आहे पण तरी..

अंजली वर्तक यांनी आपल्या आई म्हणजेच मृणाल गोरे यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्यात अशी आठवण आहे कि, बाजारातील अनेक वस्तूंचा मोह त्यांना लहानपणी व्हायचाच. तर त्यावेळी मृणालताई त्यांच्या हातात पैसे ठेवत आणि घरात काय काय सामान आणायचेय याची यादी देत. त्यातून पैसे वाचले तर हवे ते घे, असे सांगत. खुपदा पैसे वाचत नसतच पण पैश्याचे व्यवस्थापन मात्र अंगी बाणले ( हा पूर्ण लेखच वाचनीय आहे.)

मुलांच्या हातात पैसे दिल्यावर ते काय करतात हे बघणे पण महत्वाचे असते, नाही का ?

माझ्या मुली लहान आहेत त्यामुळे हा प्रश्न अजुन पडला नाही पण मोहनाने म्हटलय तसच मीही एका मैत्रीणीकडे अशीच चर्चा ऐकली आहे. दैनंदिन कामे मुलांनी केली किंवा त्यात मदत केली तर त्यासाठी पैसे देवु नयेत असे माझे स्पष्ट मत आहे. पण त्यांनी इतर कामे उदा. बागकामात मदत, गॅरेज आवरण्यात मदत केली तर त्यांना एखादी वस्तु, बाहेर जेवण अथवा सिनेमा दाखवायला घेऊन जावे.

अरुंधती मस्त पोस्ट.

पैशाचे व्यवहार किंवा कामाचे मूल्य कळायला आईबाबानी आम्हाला कधी घरातल्या कामाचे पैसे दिले नाहीत. पण प्रत्येक आठवड्याचे काम वाटलेले असायचे. यात पाणी भरणे, कपडे धुणे , घड्या करणे , भांडी घासणे, फरशी पुसणे अंगण सारवणे अशी सगळी कामे. ती घरातील प्रत्येकाला करावीच लागत.
लहानपणापासून घरात किरकोळ रक्कम वेगळी ठेवलेली असे आणि त्यातून गरजेच्या वरकड वस्तू आणून त्यांचा हिशोब आईला द्यायचा असे. एक पासबुकही होतं प्रत्येकाचं . स्कॉलरशीप ठेवायला आर डी अकाउंट असे.

आईबाबा सहज बोलल्यासारखे महिन्याला किती खर्च होतो, किती सेविंग होतं , मुलांच्या भविष्यासाठी किती पैसे आवश्यक हे सारे सांगत. (आणि सांगताना तुमच्यासाठी झिजतोय हाइरिटेटिंग टोन न लावता मॅटर ऑफ फॅक्ट सांगितल्यासारखा सांगत)
यामुळे तिन्ही भावंडाना पैशाबद्दल खूपच जाण आलीय. काहीवेळा लोक कंजूष म्हणतील इतकी.
Happy

घरातिल कामांसाठी मुलांना पैसे द्यायची कल्पना मला पटत नाही. उद्या हीच सवय लागली तर ती इतर नातेवाइकांकडे ( म्हणजे काका-काकु, मावशी, आजी आजोबा) ह्यांच्या कडे रहायला गेली व तिकडे काही कामे केली तरी त्यांच्या कडे पैसे मागतिल... त्यांनी दिले नाहीत वा टींगल केली तर हीच मुलं त्यांना कमी समजतिल. कधी कधी आई वडिलांच्या नको त्या व्यसनांना झाकण्या साठी मुलांचा वापर होइल, व पैश्याच्या आमिषाने बिचारी नको ती कामं करुन बसतिल.... ही आपली अशीच एक भिती... मुलांना पैशांचं महत्व आपण इतर अनेक प्रकारे करुन देवु शकतो.

माझी मुलगी लहान असताना हट्ट करायची, मी नाही म्हंटले तर आजी कडे मागायची. आजी लगेच घ्यायची. मग मी साबांना विश्वासात घेवुन माझ्या "नाही" म्हणण्याचे कारण सांगितले. त्यांना ते लगेच पटले. हळु हळु तिचे तिलाच समजायला लागले... आई कडे पैसे नाहीत म्हणुन ती नाही म्हणत नाही तर त्या वस्तुची गरज नाही किंवा ती जरुरी पेक्षा महाग आहे हे तिचे तिलाच कळले. ( कालच मी जयपुरला असताना उगाचच एक ड्रेस घेउ का नको ह्याचा विचार करत होते... हीने लगेच थांबवले " आई वाटत पण नाहिये २००० चा ... नको घेवु.. कशाला पैसे खर्च करतेस उगाचच..." मग मलाही वाटले जाउदे.... पैसे वाचले .. मां से बेटी सवाई )

घरातिल कामे आपण मोठे जर करत असु तर लहान मुले आपोआपच करतात. छोट्या छोट्या कामां बद्दल कौतुक मात्र नक्की करा पण प्रत्येक काम पैशात मोजणे नको....

मला वाटलेलं खूप मतं पैसे देवू नयेत अशी असतील पण दोन्ही बाजू वाचता आल्या. तरीही मला वाटतं तिसरी चौथीतली मुलं पैसे कमावण्याच्या दृष्टीने खूप लहान आहेत. इतक्या लहान वयात सगळं ’पैशात’ मोजण्याची सवय लागते मग. हायस्कूलमध्ये गेल्यानंतर हे ठिक आहे जेव्हा कष्ट पैसा हे व्यवस्थित समजायला लागलेलं असतं. तिसरी, चौथीत मुलांना, आई, बाबांना मदत करायलाच हवी हा विचार ठसवायला हवा.

मुलांना आई, बाबांना मदत करायलाच हवी हा विचार ठसवायला हवा. >>> अगदी बरोबर.
माझा मुलगा पहिलीत आहे आणी मी त्याला नेहमी आईला किंवा मला मदत करण्याची सवय लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे लहानसहान गोष्टी. पण कधीच तु अमुक केलेस तरच मी तुला चॉकलेट/मॅगी (हे त्याच्या आवडीचे पदार्थ आहेत Happy ) देईन अश्या प्रकारचे आमिष कधीच दाखवत नाही. कारण मला खात्री आहे की असे केले तर तो उद्या मला "तुम्ही माझ्यासाठी अमुक केले तरच मी पसारा आवरेन्/अभ्यास करेन" टाईप ब्लॅकमेल करेल.

आज पहिल्यांदा प्रतिसाद वाचले आणि मग लेख. लेखात मुलांना घरातील काम असा विषय आहे. तिसरी कि चौथीतली हा मुद्दा प्रमुख आहे असं कुठंही जाणवलं नाही. तसा उल्लेख जरूर आहे, मात्र ते उदाहरण असावं असं वाटलं. बाफकर्तीचा रोख आपला दृष्टीकोण(च) योग्य असा वाटतोय. प्रतिसादात पण तोच रोख कायम आहे. वादविवाद / चर्चेमधे माझी भूमिका तेव्हढीच बरोबर आणि इतर सगळे चुकीचे अशी भूमिका घेणं योग्य वाटत नाही. समोरच्याला निरूत्तर करणे हा ही चर्चेचा हेतू असू शकत नाही. चर्चेतून काही शिकता आलं तर पहावं असा हेतू असेल तरच असे प्रस्ताव मांडले जावेत. बरेचदा दोन्ही बाजू बरोबर असतात. कधी कधी एक बाजू चुकीची असते, मात्र बंद पडलेलं घड्याळही चोवीस तासात दोनदा बरोबर असतं.

नमनाला घडीभर तेल झालं खरं. मुलांना पैसे कमवायला शिकवणं यात गैर काही नाही असं माझं मत आहे. गुजराथी कुटूंबांचा उल्लेख झालाच आहे तर या कुटूंबात पैसे कमवण्याचं शिक्षण दिलं जातं हे खरंच आहे. म्हणून या मुलांवर संस्कार होत नाहीत असं कुणी सांगितलं ? उलट गुजराथी - व्यापारी समाजात एकत्र कुटूंबपद्धती आजही आढळते. वृद्धाश्रमात पालकांना ठेवण्याचं प्रमाण त्यांच्यात नगण्य असतं. सणासुदीला कुटूंबासाठी ते जो खर्च करतात तो आपण कधीही करू शकणार नाहीत. घरातल्या कामासाठी पैसे देणं याचा अर्थ ही कामं देखील प्रतिष्ठेची आहेत हे रूजवणं. कुठलंही काम हलकं नाही हा संदेश मुलांना मिळेल असं मला वाटतं. इंजिनियर होऊन बेकार फिरणा-या मुलांना कापडाच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करण्याची लाज वाटते. याउलट लक्ष्मी रस्त्यावर स्टाइल इन नावाच्या एका छोट्या दुकानाचे मालक असलेले श्री बाबूराव मिठापेल्ली यांनी आपली उमेदीची वर्षं सेल्समन म्हणूनच काढली. आज एका भव्य शोरूमचे ते मालक आहेत, शिवाय कापड उत्पादनाचा त्यांचा विचार काही वर्षांपूर्वी होता.

मुलं कुठंही अडली नाही पाहीजेत यासाठी या उपक्रमाचा उपयोग होईल का याचा विचार केला गेला पाहीजे. एखादी नवी कल्पना मोडीत काढण्याआधी किमान त्याचा ताळेबंद मांडला गेला पाहीजे.

मुलांना पैसे कमवायला शिकवणं यात गैर काही नाही असं माझं मत आहे. गुजराथी कुटूंबांचा उल्लेख झालाच आहे तर या कुटूंबात पैसे कमवण्याचं शिक्षण दिलं जातं हे खरंच आहे.
<<

माफ करा,
मुलांना पैसे कमवायला शिकविणे : यात आपण सांगितले त्या 'बिझनेस कम्युनिटीज' दुकानात काम करणे, व तो धंदा शिकणे अशाप्रकारे 'पैसे कमवायला शिकवतात. लेखिकेचा रोख आपल्याच घरात, आपल्याच घरासाठी, आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणू "पैसे" किमान इतक्या लहान वयात देऊ नयेत, असा आहे असे मला वाटते. रूम आवरली तर मम्मा आवडीचे रगडापॅटीस करेल, किंवा बाबा हॅरीपॉटरचा अक्खा चॅप्टर वाचून दाखवतील इ. प्रकारच्या रिवॉर्ड्स सेट करता येतात. घरातल्या कामासाठी "रोख पैसे" हा थोडा प्रॉब्लेम होईल असे मला वाटते.

यापाठी कोणतेही सेंटिमेंटल कारण नाही. (सेंटी=आईने दिलेले बिल वै फेबु स्टाईल कथा)

घराबाहेर सुटीत लहान मोठी कामे करून पैसे कमविणे हे पाश्चात्य देशात कॉमन कल्चर आहे. वर एक 'खरी कमाई' चे उदाहरण आहेच.

घरातच केलेल्या कामाचे पैसे द्यायचेच असलेत तर कसे, त्याबद्दलचा माझा अनुभव सांगतो.

४थी-५वी वयातल्या मुलांना बेसिकली पैसा काय चीज आहे अन त्याहीपेक्षा, तो कमवायला लागतो म्हणजे काय करावे लागते याची कन्सेप्ट नसते. बापाच्या मोबाईलवर पटकन नेट ऑन करून एकादा पेड गेम डाऊनलोड करण्याइतकी अक्कल मात्र यांना असते.

असे केल्यानंतर, तिथे खर्च केलेले ३०० रुपये "कमविण्यासाठी" घरी झाडूपोछा करणार्‍या मावशींना किती दिवस काम करावे लागते, तितके दिवस घर झाड/पुसायला लावण्यात आले, तर मनाला येईल तेव्हा खर्च करायचा असेल, तर आधी पैसा कमवावा लागतो, ही अक्कल येते.

मला (नेहेमीप्रमाणे) दोन्ही बाजू पटत आहेत.
माझ्या घरी माझी कामासाठी फुटकळ पैसे द्यायला काही हरकत नव्हती पण नवर्‍याची होती (वरचे इतरांनी मांडलेलेच मुद्दे) तर आम्ही कामाचे पैसे देत नाही. कामंही त्या नित्यनेमाने करत नाहीत ते सोडा.
आम्ही दर रविवारी थोरलीला $२ द्यायला सुरवात केली साधारण २ वर्षापूर्वी. तिला एक्सेल शीट सुरू करून दिलं. त्यात तिने दर रविवारी अपडेट्स करावे ही अपेक्षा. शीट मध्ये त्या पैशांची पर्चेसिंग पावर काय टॅक्स वजा जाता त्यासाठी फॉर्म्युला घातला होता जेणेकरून तो प्रकार पण असतो याची जाणीव व्हावी. पण ती रविवारी आठवण करून सुद्धा रविवारी ते काम करत नाही सबब तिचे फुकट मिळणारे पैसे बुडतात पण त्याचही तिला काही वाटत नाही.

म्हणून मला वाटतं की हा प्रत्येक पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात बरोबर/चूक असं काही नाही.

सर्वांना धन्यवाद. नक्कीच वेगवेगळे विचार, मतं आहेत सगळ्यांची.
@एकप्रतिसादक - माझंच बरोबर असं म्हणण्याचा हेतू नाही. म्हणून दोन्ही बाजू वाचायला मिळाल्या असं म्हटलं आहे मी. या बाजू वाचून, त्यावर विचार करुन आपली बाजू चुकीची तर नाही ना इथपर्यंत पोचायला काही काळ लागणारच ना? तोपर्यंत माणूस आपल्याला काय वाटतं हे पुन्हा पुन्हा सांगतो तसं झालं आहे माझ्या प्रतिसादात.
@ इब्लिस - <<<लेखिकेचा रोख आपल्याच घरात, आपल्याच घरासाठी, आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणू "पैसे" किमान इतक्या लहान वयात देऊ नयेत, असा आहे असे मला वाटते>>> बरोबर.

मलाही अजून दोन्ही बाजू पटत आहेत .. त्यामुळे "वाचते आहे" असा प्रतिसाद लिहायची खूप इच्छा होते आहे ..

पण इकडे मांडलेली मतं आणि स्वानुभव ह्या दोन्हींवरून मुलांनां पैसे मागण्याची अक्कल आली की केलेल्या कामाचा मोबदला म्हणून योग्य ते पैसे देणं आणि त्याचा विनीमय योग्य तर्‍हेने होत आहे ह्यावर लक्ष ठेवणं हे योग्य वाटत आहे ..

(किती ये "योग्य" :हाहा:, पण ह्याबाबतीत "वन साईझ फिट्स ऑल" असणं शक्य वाटत नाही त्यामुळे हे "योग्य" ची उपाधी लावली आहे ..)

शुम्पी >> फार चांगले करीत आहात. त्याची फळे लगेच आत्ता दिसली नाहीत तरी थोडी मोठी झाल्यावर दिसून येतील. मी ११ वर्षाची झाले आणि आईने मला दर महा १० रु (फार जुन्या कालची गोष्ट सांगतीये) फुकट द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी एक खाते बँकेत सुरु केले आणि सांगितले इतर शाळा स्पर्धातील बक्षिसे, पाहुण्यांनी हातावर दिलेले पैसे सगळे जमा कर. बँकेत न भरता काही खर्च केलेस तर मला सांग. आजही आठवते आहे सुमारे १.५ वर्षानंतर त्यात रु ३५० होते. Happy

वरील चर्चा वाचली. मुलांना घरकामाचे पैसे द्यावेत की नाही ह्या दोन गोष्टींमधे मीही काही वर्षांपूर्वी गोंधळून गेले होते. मग माझ्यापुरता मी त्यावर उपाय शोधला.
घरकामाच्या बाईची कामे सोडून बाकी दैनंदीन कामे आम्ही घरातल्या सर्वांनी जबाबदारी म्हणून वाटून घेतली आहेत. ती कामे करण्याचे वेगळे पैसे मी मुलीला देत नाही. परंतु जर का मी किंवा मुलीने महिनाभर कामवाल्या बाईचे काम घरात केले (पोळ्या करणे, केर फरशी करणे, किंवा गाडी पुसणे इ.ह्यापैकी काहीही), कपड्यांना घरात इस्त्री केली, जुनी पाठ्यपुस्तके वापरून नव्या पुस्तकांचा खर्च वाचवला, कधी मुद्दामहून विमान प्रवास न करता रेल्वेनी केला, कंटाळ्यावर मात करून हॉटेलमधे जेवायला न जाता घरीच बनवले, तर जे सेव्हिंग होईल, ते पैसे सगळ्यांचेच आम्ही एकत्र जमवतो व त्यातून घरासाठी काहीतरी आणतो. म्हणजे कधीतरी सिनेमा, पुस्तके, सीडी अगदी सोन्याचे कानातले वगैरे काहीही. ह्यातूनही कष्टाची व काटकसरीची किंमत चांगली समजते व घरकामाच्या जबाबदारीचेही भान रहाते.

८-९ वर्षाच्या वरील मुलांना कायमच पैसे द्यायला नकार दिलात, तर ती मुलं इतर मुलांकडे बघून कुढू शकतात Sad , हे खरं आहे! म्हणजे, माझ्या मित्राचे बाबा त्याला 'गंमत' घ्यायला पैसे देतात, पण माझे आईबाबा मी छान अभ्यास करून पण मला सदा नाहि म्हणतात, पैसे द्यायला, असा विचार येऊ शकतो.

शिवाय, माझ्या लहानपणी देखील मला रोजचे चाराणे/आठाणे मिळायचे, मी खाऊ घ्यायचे, आईने कधीच विचारले नाही की काय करतेस पैशांचे कारण तिला बहुतेक ते माहित असावे Wink
एखाद्या शनीवारी सामोसा खायचा असल्यास, २ दिवस फुटाणे खायचे नाहित म्हणजे सामोश्यापुरते पैसे जमा होतात, हे ही कळत होतं Happy

थोड्या वरच्या वर्गात गेल्यावर मुलांन्ना पोकेटमनी जरुर द्यावा, आणि त्याचं काय केलंस हे ही आवर्जून विचारावं असं मला वाटतं.

इकडे पॉकेट मनी किंवा रोजच्या शाळेतल्या यायला जायला लागणार्‍या पैश्यां बद्दल माझं काहीच म्हणणं नाही. ते तर आपसात ठरवुन द्यायलाच हवेत. उलट हल्ली च्या बेभरवशाच्या जगात थोडे जास्तच ठेवायला हवेत बरोबर...

मुलांना पैशाचं महत्व समजावं आणि त्याच्याशी नीगडीत असणार्‍या मेहेनतीचं महत्व समजावं म्हणुन घरातल्या कामां बद्दल पैसे देणं योग्य की अयोग्य? हा मुळ मुद्दा आहे. ह्यात त्यांच्या शाळाखर्च, पॉकेट मनी इ.इ. बद्दल काहीच वाद नाही किंवा काहीच भाष्य नाही ( मोहना... करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग)

पण स्वतःच्याच घरात स्वतःचेच काम ( खोली आवरणे, केर काढणे, कपडे वाळत घालणे, भांडी घासणे इ.इ.) करण्या करीता त्यांना पैसे मिळु लागले तर ती कामं त्यांना त्यांची वाटणारच नाहीत. तो त्यांचा "जॉब" होइल... ही वर सांगितलेली कामे ही घरात रहाणार्‍या सगळ्यांची असतात. माझा कप जेंव्हा मी विसळते तेंव्हा आजोबांचा ही कप विसळते, आजोबा आपली प्लेट उचलतात तेंव्हा बाबांचीही उचलतात... त्याचे त्यांना पैसे नाही मिळत. आणि मिळाले तर गैर आहे. कारण आपण कुटुंबात रहातो. हॉस्टेल किंवा पेयिंग गेस्ट म्हणुन नाही. आजही कामवाली येणार नसेल तर आम्ही कामं वाटुन घेतो. मी भांडी घासली तर मुलगी केर काढते, सासरे कपडे वाळत घालतात. त्या मुळे हे "आपलच" काम आहे... आपण नाही केलं तर मग कोण करणार? कामवाली पण "आपलंच" काम करते. त्या मुळे ती "परकी" आहे, तिला त्याचे पैसे मिळालेच पाहिजेत. तो तिचा "जॉब" आहे.

पण आपण "आपल्या" घरात रहातो. तिकडे 'आपलच" काम करतो. "आपलीच" खोली, घर, पसारा आवरतो... इथे जे काही आहे ते "आपणच" केलेलं आहे. इथली स्वच्छता "आपल्यालाच" हवी आहे.

मुलांना पैश्याचं महत्व समजावं म्हणुन त्यांना आपण खरेदीला नेतो तेंव्हा किमती किमतीतला फरक, क्वालीटी मधला फरक, आई बाबांची मेहेनत, त्यांच्या कामाचे तास आणि मिळणारे पैसे हे सगळं वयापरत्वे समजावुन सांगु शकतो. मग तिच मुल्म कधी कधी आपली उगाचच होणारी खरेदी थांबवतात....

<<<<मुलांना पैशाचं महत्व समजावं आणि त्याच्याशी नीगडीत असणार्‍या मेहेनतीचं महत्व समजावं म्हणुन घरातल्या कामां बद्दल पैसे देणं योग्य की अयोग्य? हा मुळ मुद्दा आहे. ह्यात त्यांच्या शाळाखर्च, पॉकेट मनी इ.इ. बद्दल काहीच वाद नाही किंवा काहीच भाष्य नाही ( मोहना... करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग)>>>मोहन की मीरा - १००% बरोबर :-).

Pages