मुलांना घरातील कामाचे पैसे...?

Submitted by मोहना on 25 February, 2013 - 16:44

सगळ्या मैत्रींणी जमलो होतो. मुलांवरुन बोलताना एकजण म्हणाली,
"मी मुलांना प्रत्येक कामाचे पैसे देते. थोड्या पैशात किती कामं होतात."
"म्हणजे किती आणि कोणती कामं?" माझं कुतुहुल जागृत झालं.
"डिशवॉशरमधली भांडी लावली की ५० सेंट, केर नेऊन टाकला की २५ सेंट, स्वत:ची खोली आवरली की ७५सेंट अशी छोटी छोटी किती कामं असतात घरात."
पहिला विचार मनात तरळला तो सुट्टे पैसे खूप ठेवायला लागत असतील:-) हा. नंतर हेवा वाटला तो स्वत:ची खोली आवरल्याबद्दल पैसे मिळतात पठ्ठ्यांना याचा आणि शेवटी प्रश्न पडला की त्या पैशाचं तिसरी चौथीतली ही मुलं करणार काय? एकदा का पैसे हातात आले की त्यांना काय पाहिजे ते घेण्यासाठी ती हट्ट करणारंच. त्यावर ती म्हणाली.
"हो ना, दुकानात गेलो की गोळ्या, नाहीतर बबलगम घेतात मुलं त्या पैशातून. नाहीतर पिगी बॅकेंत जमा करायचे."
"कष्ट करुन मिळवलेल्या पैशांनी हे घ्यायचं म्हणजे तू चुकीची सवय लावतेयस असं नाही वाटत?"
"नाही. गोळ्या, बबलगम रोज खाणं बरोबर नाही हे तर माहितच आहे त्यांना. हळूहळू पैसे अशा गोष्टींवर खर्च करु नयेत हे ही कळेल."
उरलेल्या मैत्रीणींचं म्हणणं, भारताबाहेर कपडे, धुणी किंवा इतर कोणत्याच कामासाठी माणूस सहजासहजी मिळत नाही. जोडीदार मदत करणारा नसेल तर मुलांच्या मदतीची अपेक्षा केली तर काय चुकलं?
"पण त्यासाठी पैसे?" माझी गाडी एकाच मुद्यावर अडलेली.
"काहीतरी आमिष द्यावच लागतं."
"मग मुलं तुम्हाला पैसे देतात?"
"कसले?"
"रोजचं जेवण, शाळेसाठी डबा तयार करुन देणं, गाडीने इकडे तिकडे नेणं आणणं.... खूप मोठी यादी होईल." मैत्रीणीचं म्हणणं आपली कामं होत असतील तर या गोष्टीचा बाऊ करण्यात अर्थ नाही. पैसे देऊन आपण त्यांना स्वावलंबन शिकवतो, ते कसे वापरायला हवेत याचं शिक्षण देतो.
माझं म्हणणं, ही जी कामं आहेत ती मुलांनी घर त्याचंही आहे या भावनेतूनच, स्वत:ची कामं स्वत:च करायला हवीत या जाणीवेतून किंवा आई, बाबांना मदत म्हणून करायला हवीत, पैसे मिळतात म्हणून नाही. आणि ती भावना पालक म्हणून आपणच त्यांच्या मनात रुजवली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केला होता प्रयत्न असेच इतरांचे ऐकुन. तर मुलगी म्हणाली 'फक्त ५० पैसे देणार? १ रुपया तरी दे'. म्हटले 'बरं देते, जा ते काम तरी कर'. तर काम करता करता, 'आई मला नको पैसे' म्हणुन पळुन जाऊ लागली. म्हटले 'का?' तर म्हणते, 'मला कामच करायच नाही, खेळायचे आहे, त्यामुळे पैसेपण नको' असे उत्तर.. म्हटले, 'शाणे, काम कर तरच खेळायला मिळेल'.. तेव्हापासुन ती एक लाच कधीतरी द्यावी लागते, 'जे सांगितले आहे ते कर म्हणजे खेळायला सोडते', कधी ते चालते कधी चालत नाही.
पण घरकामाला पैसे देणे हे शक्यतो टाळणार आहे. पण तिला हिशोब समजवायला अजुन प्रयत्न करायची गरज आहे मला असे वरील काही प्रतिसादातुन जाणवले. व्यापार खुप खेळलो, दुकान दुकान कधीमधी खेळतो. अजुन प्रयत्न वाढवीन. धन्यवाद.
अजुन एक, आपल्याकडे किती पैसे आहेत हे मुलांनी विचारले तर तुम्ही काय सांगता?

सुनिधी - :-). आमच्याकडे दोन्ही मुलांची कामं ठरलेली आहेत पण ती एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न असतो सतत.
<<<किती पैसे?>>> २० डॉलर्स... पण मुलीने बर्‍याच वेळा सार्वजनिक ठिकाणी विचारलं आहे, "पण आपल्याकडे इतके पैसे नाहीयेत..."

अजुन एक, आपल्याकडे किती पैसे आहेत हे मुलांनी विचारले तर तुम्ही काय सांगता?

>>>> सुनिधी, जर मुलाने असा प्रश्न विचारला तर मी तरी सांगणार नाही. कारण उद्या एखादी वस्तु मागितल्यावर मी जर अरे ही वस्तु खुप महाग आहे, किंवा आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत वगैरे उत्तर दिले तरी मुल "मला माहित आहे तुमच्याकडे पैसे आहेत ते" असे उत्तर देईल.
आणी अशी उदाहरणे मी स्वतः पाहिली आहेत की ज्यात आईवडीलांपेक्षा मुले खरेदीचा निर्णय प्रभावित करतात की जे बर्‍याचदा अयोग्य असु शकते.

खूपच उत्तम चर्चा / संवाद - अनेक प्रॅक्टिकल मतं मांडली जात आहेत, अनेक बाजूंनी विचारमंथन होतंय.....

हे सगळं त्या मुलांच्याही कानावर जायला पाहिजे असं वाटतं - पालकांनी मुलांबरोबर मनमोकळा संवाद केला पाहिजे - त्यांचीही मतं जाणून घ्यायला पाहिजेत - त्यांच्या मित्र-मैत्रीणींचे यावर काय म्हणणे आहे / त्यांच्या घरी काय करतात, इ.

अजुन एक, आपल्याकडे किती पैसे आहेत हे मुलांनी विचारले तर तुम्ही काय सांगता? >>

यावर माझा अनुभव सांगावासा वाटतो.

मला लहान असताना एवढेच माहित होते की आपल्या घरातल्या भिंतीतल्या कपाटात आईबाबा पैसे ठेवतात व ते त्यातून हवे तेव्हा पैसे काढून घेतात. मी पहिली-दुसरीत होते तेव्हा. पैसे कसे मिळतात याच्याशी घेणंदेणं नव्हतं आणि तेवढी अक्कलही नव्हती. दर शनिवारी शाळेत कँटिन असायचे - म्हणजे बाहेरच्या एक बाई पिशवी-डब्यांमधून खाऊ घेऊन शाळेत यायच्या व तो खाऊ विकायच्या. त्यातल्या बॉबीजचे पाकिट तेव्हा १० पैशाला (की ५ पैशाला?) मिळायचे. मुली हाताच्या पाचही बोटांमध्ये त्या बॉबीज अडकवून इतरजणींना टुकटूक करत बॉबीज खायच्या. एके शनिवारी मलाही जाम इच्छा झाली, आपणही अशाच बॉबीज विकत घेऊन खाव्यात म्हणून. आईबाबा घरात नव्हते. घरी मला व बहिणीला सांभाळायला एक मुलगी यायची. मी तिच्याकडे पैसे मागितले. तिने माझ्या आईची परवानगी न घेता पैसे कसे द्यायचे, म्हणून मला पैसे देणे नाकारले. मग मी स्टुलावर चढून भिंतीतले कपाट उघडले. त्यातल्या बॉक्समधून दहा पैसे घेतले. मला सांभाळणार्‍या मुलीने हे पाहिले होते व माझ्या आईला ते सांगायची धमकीही मला देऊन झाली होती. पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त पिवळ्या धम्मक बॉबीज आणि त्या खाताना मी, असे दृश्य तरळत होते. मी तिच्याकडे लक्ष दिले नाही. शाळेत मधल्या सुट्टीत जवळचे दहा पैसे देऊन बॉबीज घेतल्या, त्या चाखत माखत खाल्ल्या. घरी आले तेव्हा आईला काम करणार्‍या मुलीने सर्व सांगितले होते. आई माझा हात धरून तरातरा मला त्या कपाटापाशी घेऊन गेली. कपाट उघडले. आतल्या बॉक्समधील नोटा, नाणी मला दाखवली. बँकेची पासबुकं, चेकबुकं दाखवली. आणि म्हणाली, ''हे सगळे पैसे तुझेच आहेत. तुला हवे तेवढे घे. सगळे घे.'' मला आजही आठवतंय की एवढ्या सगळ्या नोटा, पैसे एकत्र बघून आणि ते पैसे ''माझे'' आहेत हे ऐकून मला खूप खूप आश्चर्य वाटलं होतं.
''हे सऽगऽळे पैसे माझे आहेत?''
''हो, सगळे पैसे तुझे आहेत.''
''मी यातले कायपण पैसे घेऊ?''
''सगळे घे. पण तुलाच सांभाळायला लागतील ते.''
''पण मी काय करू एवढ्या पैशाचं! मला नकोत. तूच ठेव!''
''नको, तुला बॉबी खायला हवेत ना पैसे... मला किंवा बाबाला न विचारता घ्यायचेत ना पैसे.... मग तूच सांभाळ ते.''
त्या क्षणी मला एवढे सगळे पैसे आपल्याला सांभाळायला लागणार या कल्पनेने रडू फुटले होते. आणि एवढ्या पैशांच्या किती बॉबीज येतील याची कल्पनाच करवत नव्हती.
शेवटी मी रडत आईला सांगितले, ''माझं चुकलं. मी तुला न विचारता पैसे घ्यायला नको होते.'' आईने जवळ घेतले आणि कधी बॉबीज खाव्याशा वाटल्या तर तिच्याकडे पैसे मागायला सांगितले.

नंतर हळूहळू आई-बाबांबरोबर बँकेत, पोस्टात जेव्हा कधी जायचे तेव्हा ते तिथले व्यवहार मला कळतील अशा प्रकारे समजावून सांगायचे. दर महिन्याला माझ्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये ते ठराविक पैसे जमा करायचे व त्या पैशांची नोंद केलेले पासबुक मला बघायला द्यायचे. माझ्या व बहिणीच्या नावाची फिक्स्ड डिपॉझिट्स करतानाही त्यांनी मला आवर्जून ते कागद दाखवले होते आणि पाच वर्षांनी ही रक्कम दुप्पट होणार हे सांगितले होते. आपल्या नावे बँकेत एवढे पैसे आहेत आणि पाच वर्षांनी ते आपोआप दुप्पट होणार या कल्पनेनेच मी कितीतरी काळ आकाशात विहार करत होते. आईबाबांनी हेही सांगितलेले - की हे पैसे तुझ्या शिक्षणासाठी आहेत. तुला हवे तेवढे शिक.

आईबाबा आपल्या शिक्षणासाठी आतापासून एवढे पैसे बाजूला काढत आहेत हे पाहिल्यावर त्यांच्याकडे सटर फटर गोष्टींसाठी हट्ट करण्याचे माझे प्रमाण खूपच कमी झाले.

मी दहावीत जाईपर्यंत आई कधीतरी असेच खाऊसाठी म्हणून पैसे द्यायची. पन्नास पैसे - एक रुपया - दोन रुपये वगैरे. कितीतरी दिवस ते पैसे कंपासमध्ये एका कोपर्‍यात अदबशीर ठेवून दिलेले असायचे. रोज त्यांच्याकडे बघितले जायचे पण खर्च करायची हिंमत व्हायची नाही. मग कधीतरी शाळेतून घरी येताना खूप भूक लागली असेल तर शाळेच्या दारात उभ्या पेरूवाल्याकडून पेरू घेतला जायचा. क्वचित कधीतरी गाभुळलेली चिंच-बोरं-आवळे. खूप चैन केली असं वाटायचं तेव्हा. Happy

आमच्या मुलाला आम्ही घरातील कामाचे कधीच पैसे दिले नाहीत. घरातील कामाला प्रत्येकाने हातभार लावायचा असे आहे. त्याच्या एलिमेंटरी स्कूलमधेही आठवड्यातून एकदा कॅफेटेरिया ड्युटी असायची. शाळा आपली आहे तेव्हा डायनिंग हॉलची स्वच्छता करायला सगळ्यानी हातभार लावायचा असे होते. आफ्टर स्कूल अ‍ॅक्टिव्हिटीच्या बाबतीतही विझीटर टीम गेल्यावर होमटीमने मागले सगळे आवरायचे असे आहे. मात्र तो चार वर्षांचा असल्यापसून त्याला पॉकेट मनी द्यायचो. त्यात डॉलर मधले १०-१०सेंट सेविंग आणि चॅरीटी(गॉड) च्या डब्यात टाकायचे आणि उरलेल्या पैसे फन मनी असे होते. शाळेत ख्रिसमस सांता शॉप आणि फूड ड्राईव असायची. सेविंगच्या पैशातुन तो साधारण डॉलरचे काहीतरी गिफ्ट आमच्यासाठी घ्यायचा आणि गॉडच्या डब्यातील पैशातून पिनट बटर किंवा सुप कॅन फूड ड्राइवसाठी द्यायचा. तो जसा मोठा होत गेला तसा त्याचा पॉकेटमनी आम्ही वाढवत गेलो. तो तिसरीत गेल्यावर आम्ही त्याला सुचवले की फन मनीतले काही पैसे त्याने मोठे टॉय घेण्यासाठी बाजूला टाकावेत. तो जेवढे पैसे बाजूला टाकेल तेवढे आम्ही मॅच करु. सुरुवातीला असे पैसे बाजूला टाकाणे त्याला जमायचे नाही पण हळू हळू जमू लागले. याच सुमारास त्याला आम्ही त्याच्या कॉलेज फंडाची, आमच्या गुंतवणूकीची स्टेटमेंट दाखवायला लागलो. पे स्टब वर पगारातून टॅक्स कापला जातो ते दाखवले. कब स्काऊटची करवॉश वगैरे फंड रेझर असायची त्यामुळे दिवसभर कार धुवून किंवा वॉलमार्ट बाहेर पॉपकॉर्न विकून पैसे मिळवायला किती कष्ट पडतात ते त्याला प्रत्यक्ष अनुभवता आले. ६वी पासुन त्याला बाहेर काम करुन पैसे मिळवायची परवानगी होती. तो थोडेफार पैसे कमवायचाही. चौदा वर्षांचा झाल्यावर त्याचा पॉकेटमनी बंद झाला. आता बेसिक खर्च आम्ही करायचा आणि चैनीच्या गोष्टींसाठी त्याने जॉब करायचा असे आहे. त्याचा पॉकेटमनी बंद झाला त्याच सुमारास इथली इकॉनॉमी डळमळली त्यामुळे जॉब मिळवणे किती कठीण असते त्याचाही अनुभव त्याने घेतला.

छान चर्चा. मी पण घरकामासाठी पैसे याबद्दल "वाचते आहे" मोडात. Happy
गेल्या वर्षी मुलाला (वय -८) बँकेत सेव्हिंग्स अकाऊंट काढून दिलयं. त्यांच्या शाळेने बँकेत फिल्ड ट्रीप नेली होती तेव्हा तो मागे लागला होता. सध्या अधून मधून त्याच्या अकांउट मध्ये पैसे जमा करायला , काढायला जातो. डिपॉझिट स्लिप/ विथड्रॉल स्लिप भरणे , पैसे मोजून देणे - घेणे, रिसीट चेक करणे ह्या गोष्टी व्यवस्थित करतो. दुकानात कधी १-२ गोष्टी मुद्दाम त्याला कॅश देऊन घ्यायला सांगते. अर्थात इथे बाजारात हिशोब करून खरेदी हा प्रकारच नसतो. Sad

शाळेतून मनी स्मार्ट क्लास असतो. बँकेतील लोक जाऊन मुलांना बेसिक माहिती देतात.

घरातल्या कामांसाठी मुलांना पैसे देणे मला पटत नाही. घर सगळ्यांचेच आहे, मग प्रत्येकाने घरातल्या कामांचा भार उचलायला हवा ना? स्वतःच्याच घरातले काम करण्यासाठी पैसे कशाला? तसं बघितलं तर घरातल्या स्त्रीला किती पैसे मिळायला हवेत? घरातली जास्तीत जासत कामं बाईच्याच वाट्याला येतात सहसा Happy दिनूची आई गोष्ट आठवली.

मी स्वतः असे पैसे कधी लेकीला दिले नाहीत, शाळेत असताना मी तिला कधी पॉकेट मनीही दिला नाही, पण जेव्हा कधी काही हवे असेल तर घरी सांगायचे आणि योग्य असेल तर खरेदीही करुन दिली. अगदी नगण्य रक्कम मी तिच्यापाशी देत असे, कधी गरज लागलीच तर म्हणून. तिच्याच वर्गातल्या आठवी - नववीमधल्या काही मुलांना त्यांच्या घरुन १००० रुपये आणि अधिकही वगैरे पॉ. म. मिळायचा हे कळल्यावर तिला आणि तिच्याहून मला अवाक् व्हायला झाले होते. Happy

@शैलजा - <<<१००० रु....अवाक>>> खूप हसले. आमच्या लेकाला आम्ही एकदा स्पर्धेला गेला होता तेव्हा २५ डॉलर्स दिले होते. परत येताना सगळे शॉपिंग मॉलमध्ये खायला थांबले (फूड कोर्ट). बरोबरची सगळी गुजराथी. प्रत्येकाकडे १००-२०० डॉलर्स होते. ते कसे संपणार याची त्यांना चिंता आणि २५ डॉलर्स पुरले नाहीत तर...ही लेकाला काळजी. गमतीचा भाग वेगळा. पण आमच्या लहानपणी कुठे आई वडिलांनी घरातल्या कामाचे पैसे दिले? मागितले तर कशाला विचारुन मिळायचेच की. बाकी तू लिहलेले मुद्दे +१

@अरुधंती - आवडला अनुभव वाचायला. काही काही गोष्टी आपण कशा शिकतो नाही?

@बिल्वा- आम्ही पण मुलाला रोख पैसे देवून वस्तू घ्यायला आणि हिशोब करायला लावायचो.

@स्वाती - <<<शाळेत ख्रिसमस सांता शॉप आणि फूड ड्राईव असायची. सेविंगच्या पैशातुन तो साधारण डॉलरचे काहीतरी गिफ्ट आमच्यासाठी घ्यायचा आणि गॉडच्या डब्यातील पैशातून पिनट बटर किंवा सुप कॅन फूड ड्राइवसाठी द्यायचा.>>> किती छान.

@ शूम्पी

म्हणून मला वाटतं की हा प्रत्येक पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात बरोबर/चूक असं काही नाही.
+१. पोस्ट आवडेश

मुलांना कामाचा मोबदला देणं अथवा न देणं हा मुद्धा गौण आहे. प्रमुख उद्धेश त्यांना "डिग्निटि ऑफ लेबर" या कन्सेप्ट्ची जाणीव करून देणं हा सुद्धा असावा.

शाळेतून मनी स्मार्ट क्लास असतो. बँकेतील लोक जाऊन मुलांना बेसिक माहिती देतात.<<<
हे आपल्याकडे पण झालं तर किती बरं.

हे आपल्याकडे पण झालं तर किती बरं.>>>

अगं आपल्या कडे ही अशी योजना आहे. कारण मी स्वतः शाळेत असताना 'अल्पबचत" गटाचे ८वी ते १०वी काम केले. अगदी सगळ्या शाळेतल्या मुलांची बचतीची पास बुकं सांभाळणे, नोंदी करणे, पैसे गोळा करणे, त्याचं महत्व सांगणे ही कामं आम्ही केलेली आहेत. लली ला आठवत असेल .. आमचे पटवारी म्हणुन सर होते, त्यांच्या प्रोत्साहनानेच हा उपक्रम शाळेत चालु होता....

मोकिमी,
बरोबर. अगदी ३५-४० वर्षांपूर्वी देखिल हा उपक्रम होता. आजकालच्या सीबीएसी अन आय्सीएसी शाळांत बंद पडला असेल तर ठाऊक नाही. आमच्या शाळेत मुले अल्पबचतीचे खाते उघडत असत. अन मुलेच एक छोटी बँक चालवत असत. पासबुकात नोंद करणे, अन सगळ्यांची रक्कम एकत्र करून पोस्टात जाऊन भरणे इ. गोष्टी ९-१०वीची मुले शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करत असत.

आणखी एक आठवण म्हणजे शाळेच्या कोऑपरेटिव्ह स्टोअरमधे काम करणे. दुकानात काय करतात, याची थोडी आयडिया येत असे. हे व्हॉलंटरी होते. प्रत्येकास करावेच लागे असे नाही.

पुर्वी आमच्या शाळेत संचयिका, अशी बँक होती. पासबूक वगैरे पण असायचे. आता मुले ऑलरेडी मनी स्मार्ट असतात.
राजा शिवाजी विद्यालयात, बस स्टॉप, रेल्वे स्टेशनवर शैक्षणिक सहल नेत असत, व तिथले व्यवहार समजावत असत.

आम्ही घरी आधि ठरवुन लेकिला पॉईंटस देतो.

सकाळी लवकर उठुन दंगा न करता Happy आवरणे... १ ते ५

जेवण संपवणे ...२

अभ्यास वेळेत करणे ....२

ई ई....

आता या सगळया पॉईंट्स ना एकत्र करुन त्या प्रमाणे पैसे तिच्या पिगी मधे अथवा ईतके पॉईंट्स झाले की मग एक पुस्तक अथवा तत्सम काही मिळेल.

प्रत्येक आठवड्याचा चार्ट बनवुन ठेवायचा.

अजुन तरी लेक खुप लहान असल्याने मागत नाही काही, पण पॉईंट्स जमवणे हेच तिच्या साठी खुप महत्वाचे असते आणि त्यात आनंद असतो.

मला वाटते कि मुलांना घरच्या कामाचे पैसे देऊ नयेत. घर हे आपले आहे, तेव्हा घरातली कामे ही सर्वांनी करायलाच हवीत, ही शिकवण पालकांनीच मुलांना द्यायलाच हवी. घरातील कामाची वाटणी करुन द्यायला हवी. मुलांना त्यांची कामे....रुम साफ करणे, पसारा जो काढेल त्यानेच साफ करणे, शाळेतुन आल्यावर शुज, डबा जागेवर काढुन ठेवणे. ही कामे त्यांनीच करावीत हा नियम घालुन दिला पाहीजे. जर कामे केली नाही तर त्याबाबतीत पालकांनी कठोर व्हायला हवे. असे केल्याने वळण तर लागेलच आणि आपल्या कामाचा भार कमी होईल. आपली कामे कमी पैशात होतात म्हणुन मुलांना घरच्या कामाचे पैसे देउ नयेत.
मुलांना पैशाचे महत्व कळण्यासाठी ,त्यांच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना सुट्टीत कामे करु देत. शेजार-पाजारी, बिल्डिंग मधे बरेच सिनीअरस असतात्.....त्यांच्याकडे जाउन काही सामान आणणे, पुस्तक्,पेपर वाचुन दाखवणे , किचन मधे मदत करणे...यामुळे त्यांना पैसे तर मिळतीलच पण त्या आजी-आजोबाचे प्रेम मिळेल. दुसर्‍याला अडल्यांना मदत करण्याची वृत्ती वाढेल. मुलांना दुसरीही सुट्टीतली कामे करता येतील... सोसायटीतली झाडांची निगराणी, बॅकेची कामे, साफसफाई,गाडी धुणे...
रिमझिमचा पॉईंट्स जमा करण्याचा फंडाही छान आहे.

Pages