विसूनाना उवाच... (३)

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

नमस्कार मंडळी!!! कसे आहात? मजेत ना? मी? मीही मजेत. तुम्हीं हल्ली थिएटरमधे गेलय का मंडळी सिनेमा बघायला?? मी गेलोय. परवा, सहकुटुंब सहपरिवार सिनेमा बघायला जायचा योग आला. आता योग आला म्हणजे काय, की मला जवळ जवळ ओढूनच नेला घरच्यांनी!! हल्ली सहसा मी बाहेर पडत नाही, अन सिनेमा बघायला तर त्याहून नाही.

तसे कधी मधी टी.व्ही. वर पाहतो म्हणा आजकालचे सिनेमा. पार डोक्यावरून जातात हो ते माझ्या. काही म्हटल्या काहीच कळत नाही!! बर, आधी दाखवलेल्या सीन्सचा अर्थ लावावा म्हणेपर्यंत, पडद्यावर समोर काय चाललेय ते बघायचे राहून जाते अन मग पुढचा सिनेमा इतका काही संदर्भहीन वाटायला लागतो, की काय बोलावं!! एकूण काय, तीन तास काय गोंधळ चाललेला असतो, काहीसुध्धा कळत नाही बघा!! मग कशाला जायच? कोणाला हे पटेल तर ना पण!! आमची ही तर इतकी गुंगून जाते ते सिनेमे बघताना.... हसते, चिडते, अगदी रडते, कळवळते देखील!! त्याच्या निम्म्यानेही तिला माझी दया मात्र काही कधी आल्याचं माझ्या बघण्यात नाही बघा लोक हो!! यालाच विरोधाभास म्हणत असावेत काय??? ह्म्म... असेलही कदाचित... असो.

तर नेहमीप्रमाणे, मी सिनेमाला न येणंच कस बर आहे, याची कारणं दिली, पण आमच्या घरी नेहमीप्रमाणेच ती कोणालाही पटली नाहीत!! हे लोक सिनेमाला जातील अन मी एक मस्त झोप काढीन, अशी दृष्यं माझ्या डोळ्यांसमोर लगेच तरळायला लागली होती. माझी स्वप्नं पण अशी माफकच असतात हो... पण नाहीच!! माझ्या प्रत्येक वाक्याला आक्षेप घेण्यासाठी जणू आमच्या घरामधे चढाओढच सुरु असते जणू!! आणि मी काय ठरवतो ना, त्याच्या नेमक उलटं ठरवल्याशिवाय घरात कोणला सुखाची झोप लागत नाही जणू!! जस काही कोण जास्ती आक्षेप घेणार त्याला काही घबाड मिळणार आहे!! माणूस रिटायर्ड झाला की त्याला घरात काय किंम्मतच नसते बघा!! आता पोरं म्हणतात, नाना, तुम्हांला काहीपण कळत नाही बघा सिनेमातलं, तर या पोरांच्या आईनं म्हणाव ना की वडिलांशी बोलायची ही काय रीत आहे का म्हणून, तर उलटं हीच खसूखुसू हसत त्यांना आणखी प्रोत्साहन देते!! पोरांना काय, आईच पाठीशी घालतेय म्हटल्यावर चेकाळायला? त्यांना तर बरच झालं ना?? तर, असे मुलांचे अन त्यांच्या आईसाहेबांचे माझी टर उडवणारे प्रेमळ संवाद घडले, आणि शेवटी बाकी सिनेमा नाही समजला तरी, कधीतरी कुटुंबासोबत बाहेर पडाव कधीतरी, असा घरचा आहेर स्वीकारून बाहेर पडलो एकदाचा..... त्यातल्या त्यात, "नशीब, निदान काहीतरी समजत नाही, एवढ मान्य तरी केलत.. " हे ऐकायला मिळालच!! लग्नाच्या आधी काय या बायका कुठल्या क्लासला वगैरे जातात का हो, आयुष्यभर चिमटे कसे काढायचे हे शिकायला?? आणि कुठलाही चिमटा आमच्याकडे परत वापरला जात नाही!! असो.

तर, सिनेमाला जायचे ठरले. मीही आलिया भोगासी म्हणत आपला तयार झालो. करता काय?? रिक्षात बसून आम्ही आपले चाललो सिनेमा पहायला. आता रहदारी, रस्ते आणि रिक्षावाले यांच्याबद्दल फारसे काही ने बोललेलेच बरे, नाही का?? त्यामुळे जाऊंद्यात!! रिक्षावाल्याच्या कृपेने शेवटी एकदा थिएटरवर पोचलो अन थिएटरचं नव रुपड पाहून मी तर आ वासला, खरच सांगतो!! आमची ही म्हणालीच, "अहो, अस काय बघत बसलाय? म्हणून नेहमी जरा बाहेर फिरायला याव, जगात काय चाललय ते उघड्या डोळ्यांनी पहाव, म्हणजे मग असा गोंधळ उडत नाही!!" मुलं तर काय? त्यांना खिदळायला निम्मित्तच हवं! आणि बापाच्या जीवावर खिदळायला काय पैसे पडतात थोडेच? तेह्वा मुलांचा अन त्यांच्या मातोश्रींचा मला हसून घ्यायचा कार्यक्रम परत एकदा पार पडला! आमची ही, खर तर हरतालिका अन तत्सम उपवास का करत असावी असा मला बरेच दिवस प्रश्न पडलाय... म्हणजे अस बघा, इथे तर मारे नवर्‍यासाठी उपवास वगैरे करायचे अन तिथे तर नवर्‍याला शालजोडीतले घालायची एखी संधी सोडायची नाही!! बायकांच्या या स्वभावाची नोंद घेऊनच एका दगडात दोन पक्षी मारणे हा वाक्प्रचार अस्तित्वात आला असावा! नक्कीच!! असो. आणि नवीन थिएटरची माहीती असणं म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहणं??? ऐकूनच गार झालो! कठीणच आहे मंडळी, नाही का??

आमचे बाळराजे तिकिटं काढायला गेले, अन तिकिटं नाचवत थोडया वेळातच परत आले. सहज म्हणून मी तिकिटांच्या किमतीची चौकशी केली, अन बाळराजांनी सांगितलेला आकडा ऐकून त्याला ओरडणारच होतो!! माझी अगदी खात्रीच पटली होती, ह्या रेम्या डोक्याच्या मुलाला कोणीतरी गंडा घातला तिकिटांच्या खिडकीपाशी!! अजून साधे हिशेब जमत नाहीत!! शाळेत असताना नाहीतरी गणितात कधीच लक्ष नाही घातल कारट्यानं!! तिकिटांची किंम्मत पाहूनच आणि हातात पुरावा ठेवूनच लेकाला ओरडावं म्हणून तिकिटं पहायला मागितली. काय करणार? मी मायनॉरिटी आहे ना, त्यामुळे, ह्या मेजॉरिटीच्या असलेल्यासुद्धा चुका लक्षात आणून द्यायच्या म्हटलं ना, तरी मला खूप काळजी घ्यावी लागते हो!! शेवटी एकत्र रहायच असत हो मला त्यांच्याच बरोबर!! काय करणार?

तिकिटांकडे पाहिलं आणि खर सांगतो, तिकिटांच्या किमती पाहूनच मला ऐन थंडीतही घाम फुटला!! लेकानं बरोबर हिशेब केला म्हणून धन्यता मानावी की एवढे पैसे तिकिटांमधे उडवले म्हणून कपाळाला हात लावावा, हेच कळेना!! आता एवढे पैसे भरल्यावर सिनेमा कळला नाही तरी बघायला लागणारच होता... आत शिरायला वेळ होता म्हणून जरा इकडे तिकडे नजर टाकत होतो.... जमाना पारच बदलला हो!! आसपासचा बदललेला जमाना डोळ्यांमधे साठवून घेईपर्यंत, आत शिरायची वेळ झाली अन आम्ही आत शिरलो. तसही बदललेल्या जमान्याचे दोन नमुने माझ्याही घरात आहेतच म्हणा. लवकरच शिरल्यामुळे, तस व्यवस्थित उजेड होता, त्यात जागा शोधून एकदाचे बसलो. आताची थिएटरं पण बदलली हो बाकी!! तिकिटांचे पैसे भरमसाठ का, याचा शोध लागला लगेच. गुबगुबीत खुर्च्या, ए.सी. मधे बसून सिनेमा बघायला एवढे पैसे मोजत होतो आम्ही. आजूबाजूला गर्दी वाढतच होती अन पडद्यावर चित्रविचित्र संगीत, जाहिराती सुरु झाल्या होत्या, जाहिरातीतली माणसं, त्यांचे संवाद अन ज्यांची जाहिरात होत होती त्या वस्तू यांचा सुखासुखी एकमेकांशी काही संबंध दिसून येत नव्हता!! अर्थात, हे काय मला नवीन नाही म्हणा, आमच्या घरी हे असले एकूणच प्रसंग अन त्यांच्याशी पूर्णपणे विसंगत असे संवाद नेहमीच झडत असतात, अन मी ते ऐकत असतो, क्वचित प्रसंगी त्यात भागही घेतो.. नाहीतर आपलं तोंडापुढे वर्तमान पत्र धरतो, किंवा तोंडावर टाकून आरामखुर्चीत मस्त झोप काढतो!! तसच इथेही मस्त गारव्यात, गुबगुबीत खुर्चीत बसल्यावर कधी झोप लागली काही कळलच नाही बघा...

मधूनच थिएटरमधे कधी हास्याचे फवारे उडत होते, टाळ्या शिट्ट्या झाल्या की आपली मधेच जाग येत असे, पण त्याच त्या रंगीबेरंगी अर्थहीन जाहिरातीच सुरु असल्याने मी आपला परत झोपत होतो, आणि थोड्या वेळाने एक मस्त डुलकी काढून उठलो.

उठलो, तेह्वा, थिएटरमधे परत दिवे लागले होते. घ्या, म्हणजे आता मुख्य सिनेमा सुरु करणार होते वाटतं..... मी विचारलही आमच्या मेजॉरिटीला तस. एवढा वेळ जाहिरातींचा कार्यक्रम सुरु होता, अन लोकं त्यालाच दाद देत होते?? आजकाल जमान्याच्या आवडी निवडीही बदलत चालल्या आहेत, आणि असल्या बदलत्या जमान्याबरोबर धावताना माझी जरा दमछाक होते खर. नक्की कशाच्या मागे अन कशासाठी धावायचे हेच कळत नाही कधी कधी... सगळे धावतात म्हणून आपलं धावायच की काय, अस वाटत... तर, मी म्हटल हीला, चला, एक चहा मारुन येऊ सिनेमा सुरु व्हायच्या आधी... तर मेजॉरिटी परत फिसफिसायला लागली आपापसात!! काय झाल विचारल तर म्हणे, नाना, आत्तापर्यंत सिनेमाच तर सुरु होता!! आता संपला, घरी जायची वेळ झाली, चला आता!! तेवढ्यात आमच्या कन्यारत्नाला आपले बाबा कित्ती विनोदी बोलतात नै, असा शोध लागला!! त्यावर मल्लिनाथी आलीच, "बाकी काही नाही जमल तरी असले विनोद भारीच जमतात हो तुझ्या वडिलांना... कुण्णाला हसू येत नाही म्हणून बरयssss" ऐकून घेतल, अन काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता शांतपणे घरी निघालो.

आता तुम्हाला म्हणून खरखुरं सांगतो मंडळी, मीही त्या दिवशी एका दगडांत दोन पक्षीच मारले!! यांची तोंडं बंद करायला अन मनं राखायला यांच्या बरोबर गेलो अन, मला हवी तशी झोपही काढली!! सिनेमा बघण्यात मला काहीच रस नव्हता खर तर, पण बोललो असतो, तर उगाच मेजॉरिटीचा कलकलाट ऐकावा लागला असता, आणि आजकालची थिएटरं अगदी आरामदायी असतात हे ऐकूनच होतो मी!! फरक एवढाच, की, आमच्या काळी थिएटरं साधीसुधी, पण सिनेमे छान असत, आता थिएटरं भपकेबाज, पण जाहिराती अन सिनेमांमधला फरक बर्‍याचदा ओळखू येत नाही मला.....

आणि बरका, आता रिकामटेकडा असलो तरी कान अन डोळे उघडे ठेवूनच मी वावरतो!! पण यांना कशाला सांगू ते?? हो की नाही?? आमची पोरं एखाद्याबद्दल बोलताना आजकाल कधीतरी म्हणतात, अरे वो येडा बनके पेढा खा रहा हैं.. तसच काहीसं मी पण कधी कधी करतो कधी कधी मंडळी..... चालायचय, आता मायनॉरिटी बनून मेजॉरिटीबरोबर टिकून रहायच म्हणजे येवढ करावच लागत हो मंडळी... पटतय ना?? द्या टाळी!!!!

विषय: 
प्रकार: 

दे टाळी!

>>आता मायनॉरिटी बनून मेजॉरिटीबरोबर टिकून रहायच म्हणजे येवढ करावच लागत हो मंडळी.
:):)

स्वतःला काय विसूनानांच्या रोलमधे पूर्ण पणे वाहून घेतलं होतं का ?
विसूनानां १-२-३ एकदमच वाचून काढले अस वाटलं की प्रत्यक्ष विसूनानाच बोलताहेत की काय, अर्थात ही पण लेखकाचीच ताकद म्ह्न्णता येइल.
अशीच लिहीत रहा !!!

शैलजा जास्त जास्त बहरत चाललंय हे लिखाण. असामी असामी सारखं वाटतंय. एकदम आवडलं. लिहीत रहा.

आज योग आला बाई या नानांना भेटायचा. जबरी लिहितीयेस खरच विसुनानाच बोलतायत असं वाटतय.
आता उलटी गंगा, मागचे भाग वाचते :ड

शैलु मस्तच ग!! अगदी नानामय झालीयसः) बरं ते आश्रमवारीचं काय?????

चिन्नु, संदीप, संघमित्रा, नीलू, श्यामली सार्‍यांचे खूप खूप आभार Happy
नीलू, करते ग पूर्ण तेही Happy

रेम्या(?).... डोक्याच्या मुलाला कोणीतरी गंडा घातला तिकिटांच्या खिडकीपाशी!! अजून साधे हिशेब जमत नाहीत!! शाळेत असताना नाहीतरी गणितात कधीच लक्ष नाही घातल कारट्यानं!! >>
आवडले विसु नाना ...

श्यामली ला मोदक. विसुनाना स्वतःच बोलताहेत असेच वाटत रहाते शेवटपर्यंत. Happy

एकदम जमून गेलाय हा पार्ट. देव आनंद वगैरेंच्या (तारूण्याच्या) काळातील ६० वगैरे दशकांत चित्रपट पाहणार्‍यांना असेच वाटत असेल आत्ताचे पिक्चर्स पाहून. तू त्या पिढीतील असशील तर स्वतःचा अनुभव म्हणता येइल Happy नाहीतर तर तो 'टोन' मस्त पकडलाय. आत्ता पर्यंत च्या तिन्ही पार्टस पैकी हा सर्वात आवडला (पिक्चर बद्दल आहे म्हणून नाही Happy )

शलाका मस्त लिहीतेस. एखाद्या व्यक्तीरेखेत जाऊन पाहन्याची दृष्टी तुला लाभलीये त्यामुळेच विसुनाना फुलताहेत. एखादी मोठी कथा लिही ( घाई न करता) त्यात तुझी ही पात्र खुलवन्याची शैली आणखी वाढु शकेल.

विसुनाना उवाच ४ च्या प्रतिक्षेत.

लोपा, रुनी धन्स Happy लोपा, रेम्या डोक्याच्या म्हणजे अगदी मूर्ख, रिकामं डोक असलेली व्यक्ती. असा शब्द आहे.
अमोल, धन्स!! केदार, खूप धन्यवाद.

येत रहा, वाचत रहा, अन आपली मतं सांगत रहा!!