मराठी भाषा दिवस २०१३ - मनमोकळं

Submitted by संयोजक on 12 February, 2013 - 07:00

Poster_Maayboli_Manamokala_0.jpg

विषय क्रमांक १ - माझी आवडती साहित्य/ चित्रपट/ नाटकातली व्यक्तिरेखा

एखादा चित्रपट पाहून झाल्यावर, किंवा पुस्तकाचं शेवटचं पान वाचून ते मिटून ठेवल्यानंतरही त्यातलं पात्र आपल्या मनात रुंजी घालतं. त्या व्यक्तिरेखेत कधी आपल्याला आपल्याच स्वभावाचं प्रतिबिंब दिसतं तर कधी अख्खं आयुष्यच. प्रत्येक व्यक्तिरेखेचा साज वेगळा आणि त्यामुळेच प्रत्येक व्यक्तिरेखा मनात वेगवेगळे भावतरंग उमटवते. काही व्यक्तिरेखा बघताक्षणीच आपल्याला वेड लावतात, तर काहींचा कैफ ती पुन्हा पुन्हा बघितल्या / वाचल्यावरच चढतो. काही काळाच्या ओघात आवडेनाशा होतात. पुन्हा कधी ते पाहिलं / वाचलं तर प्रश्न पडतो - 'काय आवडलं होतं आपल्याला यातलं तेव्हा....?'

घरासाठी 'उंबरठा' ओलांडणारी सुलभा, का 'झोपी गेलेला जागा झाला'मधला साधाभोळा पापभीरू दिनू, का मंगला गोडबोले यांच्या कथेतील भाटे आजी-आजोबा? कोण भावतं तुम्हांला?

तुमच्या आवडत्या मराठी साहित्य/ चित्रपट/ नाटकातील व्यक्तिरेखेविषयी आम्हाला लिहून पाठवा.
साहित्य/ चित्रपट/ नाटक ही स्वतंत्र मराठी कलाकृती असावी.

विषय क्रमांक २ - लहान मुलांचे मराठी चित्रपट

हल्ली मराठी चित्रपटसृष्टीत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. नवनवीन प्रयोग होत आहेत. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली बालनाट्ये सोडली तर लहान मुलांच्या करमणुकीसाठी मात्र मराठी चित्रपटसृष्टीत फारसं आशावादी चित्र दिसत नाही.

का बरं मराठी बालचित्रपटापेक्षा 'छोटा भीम', 'जय गणेश', 'हॅरी पॉटर'ची जादू जास्त भुलवते? हिंदी-इंग्रजी चित्रपटांसारखी कार्टून सिरीज तर लांबची गोष्ट, पण 'चिंटू', 'डँबिस', 'टिंग्या', 'झिंग च्यक झिंग' असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके चित्रपट किती आईवडिलांनी आपल्या मुलांना दाखवले? किती मुलं हट्ट करतात आपल्या आईवडिलांकडे असे मराठी बालचित्रपट पाहण्यासाठी?

कुठे चुकतंय, कोणाचं चुकतंय? जिथे मोठ्यांसाठीच्या मराठी चित्रपटाला गर्दी नसते, तिथे लहान मुलांच्या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळणार, म्हणून जास्त प्रयोग होत नसतील? सगळी गाडी व्यावसायिक गणितापाशी येऊनच अडकते? आता बदलणार्‍या वार्‍यानुसार मुलांची आवड लक्षात घेऊन चित्रपट बनवले जातील असं आईवडिलांना वाटतं का?

मराठी बालचित्रपटांची आजची परिस्थिती आणि भविष्य या विषयावर आपली मतं आम्हाला लिहून पाठवा.

***

वरीलपैकी कुठल्याही विषयावर आपले लेख पाठवा sanyojak@maayboli.com इथे. विषयामध्ये 'मनमोकळं' असे नमूद करायला विसरू नका.

लेख पाठवण्याची अंतिम तारीख आहे २४ फेब्रुवारी, २०१३.

आपल्या लेखांची आम्ही वाट बघतोय..

..

विषय क्रमांक १ - माझी आवडती साहित्य/ चित्रपट/ नाटकातली व्यक्तिरेखा

व्यक्तिरेखा मराठी साहित्य/चित्रपट/नाटकातलीच हवी का/ना?

इन्टरेस्टिंग विषय. Happy
मयेकरांचाच प्रश्न +१. व्यक्तिरेखा मराठी कलाकृतीतलीच हवी का?

अनुमोदन, लोला! दुसर्‍या विषयातही मराठी बालसाहित्य हा विषय चालला असता, कारण तिथेही बरीच अनास्था आहेच.

धाग्याच्या माहितीमधला 'तोतोचान'चा उल्लेख खटकला, ते अनुवादित पुस्तक आहे. तसे तर मी पुस्तकातील आवडलेली व्यक्तिरेखा म्हणून 'मायकेल कॉर्लिऑनी'वर लिहीलेही चालेल पण मग ते उपक्रमाशी सुसंगत ठरणार नाही. जर फक्त मराठी सिनेमातील व्यक्तिरेखा अपेक्षित आहेत तर मग अनुवादित पुस्तकेही नकोत.

अनुवादित पुस्तकांमधल्या व्यक्तिरेखाही आपल्या उपक्रमात बसणार नाहीत.

हा मुद्दा आधी लक्षात आला नव्हता. परंतू इथे तशी सुचवणी केल्याबद्दल आभारी आहोत आगाऊ. वरच्या चित्रामधला 'तोत्तोचान'चा उल्लेख आता खोडणं शक्य नाही, परंतू नियमात त्यानुसार बदल करत आहोत.

एका लेखात एकाच व्यक्तिरेखेबद्दल लिहिणे अपेक्षित आहे की एकापेक्षा जास्त व्यक्तिरेखा चालतील?

नाटक - सिनेमा बाहेरच्या जगातही महाराष्ट्रात तरी मराठी थोड्याफार प्रमाणात बोलली जात असावी, असे मला वाटते. माबोवरील बहुतेक लेखनस्पर्धांत सिनेमा/नाटकेच का असतात?

मला त्यातले काहीच गम्य नाही, अन रसही नाही. म्हणजे अगदी अशा स्पर्धेत जिंकलेले लेखही मी वाचत नाही. याऐवजी इतर विषय नसतेच सुचले का? Sad

>>>अरे देवा, पुन्हा सिनेमा! कायम चित्रपट महोत्सव सुरु असल्यासारखं वाटतं.>>><<
गाथा चित्रशक्ती का झाले ना?
पुन्हा हाच का विषय? म्हणजे त्याच पठडीतला?

या कार्यक्रमासाठी लेख पाठवण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी, २०१३ करण्यात आली आहे.