खरंतर शालेय शिक्षण आणि त्यावर बोलावे हा माझा प्रांत नव्हे. पण काल रचनाशिल्प या मायबोलीकरणीशी फोनवर २ तास झालेल्या गप्पांनंतर आजकालच्या शालेय शिक्षणावर प्रकाश टाकणारा एक धागा उघडावा असं राहून राहून वाटत होतं.
थोडक्यात आजची शिक्षणपद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकललं जातंय. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अॅडमिशन्स अवलंबून आहेत.
पण या अशा 'बर्डनसम' शिक्षणपद्धतीत मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. परिक्षा, मार्कस आणि वाढत्या प्रेशरमुळे सरकारनेही नुकतंच परिक्षा न घेण्याचं तंत्र अवलंबलं आहे.
तुम्हाला काय वाटतं? आजची शिक्षणपद्धती कशी आहे? यातून विद्यार्थी तर जन्माला येतायत पण ती माणूस कधी बनणार? व्यवहारज्ञान म्हणून जे प्रचलित आहे ते खरंच पुस्तकी ज्ञानातून मिळतं का? माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी ते फक्त अनुभवातून मिळू शकतं.
सध्या पुण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था आहेत, ज्या ओपन स्कुलिंग करतात किंवा नो स्कुलिंग करतात. इयत्ता १०वी पर्यंत जे ज्ञान(??) आपण पुस्तकातून घेतो किंवा आपल्याला शिकवलं जातं तेच वेगवेगळ्या पद्धतीने मुलांपर्यंत खुद्द त्यांचे पालकच पोहोचवतात. (व्हॉलंटरी टिचिंग)
तुमचं मत काय? हे ओपन स्कुलिंग थोड्याफार प्रमाणात पुर्वीच्या गुरुकूल पद्धतीप्रमाणेच आहे फक्त थोडे सुधारीत. त्याला पुढे कितपत प्रतिसाद मिळेल? आपल्या पिढीतील किती लोक असं समजतात की आत्ताच्या लहान मुलांना अभ्यास हा अवाक्या बाहेर करावा लागतो आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी? की तुमच्या मते हे योग्यच आहे? करावेच लागेल?
किती पालक ओपन स्कुलिंग्/नो स्कुलिंगला 'फॉर' असतील?
मुलांना वाढवायला खरंच खूप पैसे लागतात का? कि आई-वडीलांचा अमूल्य वेळ लागतो? जे संस्कार (मूल्य) व्हॅल्यूज किंवा सामाजिक शहाणपणा आपल्याला उशिरा येतो, तो या ओपन स्कुलिंगच्या माध्यमातून मुलांमध्ये वेळिच येइल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?
चर्चा करूया?
तळटिप : खरंतर हा विषय अतिशय व्हास्ट आहे, जे सुचेल ते, आणि सुचतील तसे मुद्दे इथे हेडींग मध्ये टाकलेत. सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा प्रतिसादांमध्ये होईलच.
दक्षिणा, आधी तुझे मनापासुन
दक्षिणा, आधी तुझे मनापासुन आभार. आपल्या गप्पांतुन निघालेल्या विषयाचे रुपांतर तु बीबीत केलेस. या निमित्ताने बरेच वेगवेगळे दृष्टिकोन वाचायला मिळतील.
मला वाटतं मुळात शिकवण्याच्या पद्धतींबद्दल गोंधळ आहे.
मला जे कळले आहे त्यावरुन, (जे चुकीचेही असु शकते ) आणि हे वर्गीकरण ठोबळपणे केले आहे. दोन प्रकारांच्या मधल्याही काही शाळा, संस्था, ग्रुप्स असु शकतात.
मेन स्ट्रिम मधील शाळा - यात सगळे वेगवेगळे बोर्ड्स, सामान्या शाळा, अभ्यासाबरोबर इतर गोष्टींवर भर देण्यार्या शाळा
(थोड्या प्रमाणात) ओपन स्कुलिंग शाळा - यात काही निवडक प्रयोगशील शाळांचा समावेश होतो. जसे पुण्यातील अक्षरनंदन. इथे शालेय पाठ्यपुस्तकांबरोबर इतर अनेक गोष्टींतुन "अभ्यास" शिकवला जातो. पारंपारिक पाठांतरावर आधारलेली असलेली शिक्षण पद्धतीने इथे शिकवले जात नाही. पालकांचा सहभाग अपेक्षित असतो. काही प्रमाणात इथे अनुभवावरुन शिक्षण असते.
होम स्कुलिंग - यातही "अभ्यास" शाळेत न करता घरी केला जातो- करुन घेतला जातो. यातले पालक वेगवेगळ्या पद्धती वापरतांना दिसतात. काही प्रयोगशील पालक अनुभवातुन शिक्षण देतात तर काही घरी ट्युटर लावतात. स्पेशली मुलाचा काही निवडक अभ्यास करण्याकडे कल असेल तर शाळेतला खुप वेळ वाचुन त्या विषयाकडे जास्त लक्ष देता येते. पुण्यात असा विचार करण्यार्या पालकांचे ग्रुप्स आहेत. ते एकत्रित पणे होम स्कुलिंग करतात. माझा मुद्दा हा होता की सोशल कंडिशनिंगचे काय ? पण बोलण्यानंतर लक्षात आले, ही मुले रेग्यलर शाळेत जाणार्या मुलांपेक्षा जास्त सोशल असतात. कारण त्यांचा मित्र परिवार ठराविक वयोगटापुरता मर्यादित नसतो. बर्याचश्या शाळा पाहिल्यावर मी माझ्या मुलासाठी या पर्यायाचा विचार करत होते.
ओपन स्कुलिंग/ लर्निंग होम - ही शाळा नव्हे. ही संस्था असु शकते किंवा पालकांचे ग्रुप्स. इथे कोणतेही सरकारने ठरवलेले पाठ्यपुस्तक वापरले जात नाही. संस्थेने किंवा ग्रुप्सने त्या त्या वयोगटासाठी ठरवलेला अभ्यासक्रम थोड्या फार प्रमाणात म्हणता येईल की शिकवला जातो. इथे तास नाहीत. आज समजा खगोल शास्त्र विषय असेल आणि त्यात मुलांना शिकतांना मजा येतेय, त्यांचे कुतुहल मुलं प्रश्णांमधुन व्यक्त करत आहेत, तर तो विषय २-३ दिवसही चालु शकतो आणि कितीही खोलवर मुलांच्या क्षमतेनुसार जाऊ शकतो. पालकांचा पुर्ण सहभाग. शिकवण्यासाठी पालक काही ठिकाणी संस्थेचे शिक्षक आणि पालक. पालकांना आधी आठवड्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. पुर्णपणे अनुभवातुन प्रयोग करुन शिकणे. वास्तवाशी जास्त परिचय. मुलं बाहेरुन १७ नं. फॉर्म भरुन १० देऊ शकतात.
नो स्कुलिंग - ही फारच वेगळी संकल्पना आहे. आणि पचनी पडायला अवघडही. इथे काहीही "शिकवले" जात नाही. मुलांच्या प्रश्णाना उत्तर न देता त्यांना उत्तराच्या जवळ घेऊन जातील असे प्रश्ण विचारण्यात येतात. मुळात मुलांची "थि़ंकिंग प्रोसेस" विकसित केली जाते. कोणतेही instructions दिले जात नाहित. आता या वेळी काय करायचे आहे ते त्या मुलांवर अवलंबुन असते. पुर्ण निवड स्वातंत्र्य असते. "senses" develop करण्यावर भर असतो. तिथल्या मुलांचे एक उदा. दोरा कसा तयार होतो यावरुन गप्पा सुरु होत्या. काय काय शिवतो ह्यावर कपडा, पुस्तक, चपला पासुन अगदी त्वचा इथपर्यंत लाटरल उत्तर होती.
यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाणे सारखे सुरु असते. मी गेले तेव्हा इको-ट्युड मधली मुलं खडकवासला ला पक्षी बघायला जाऊन आली होती आणि दुसर्या दिवशी काळा घोडा ला जाणार होती. त्यांना तयार ताटाची सवय न लावणे, प्रचंड पेशन्स, मुलांना पुर्ण वेळ न पेक्षा क्वालिटी टाईम देण्याची तयारी हे पालकांकडुन mandatory.
'मेन स्ट्रीममधल्या शाळा' असं
'मेन स्ट्रीममधल्या शाळा' असं घाउक वर्गीकरण नाही करता येत. प्रत्येक सिलॅबसच्या आपापल्या चांगल्या-वाईट बाबी आहेत. मुळात सिलॅबसपेक्षाही त्या शाळेची 'टीचींग- लर्निंग प्रोसेस'बद्दलची विचारसरणी काय आहे ते महत्वाचे. 'थिंकींग स्कील्स' शिकवायला सिलॅबसची अडचण नसते, शाळा-शिक्षक-पालक-विद्यार्थी या सर्व स्टेकहोल्डर्सचा उत्तम संवाद मात्र हवा.
आगाऊ, हे मी वर म्हणाले आहे.
आगाऊ, हे मी वर म्हणाले आहे. अजुन सविस्तर लिहाल का ? मलाही उपयोगी पडेल. आम्ही मुलासाठी शिक्षण हे त्याच्या परिसर भाषेतुन द्यायचे ठरवल्यामुळे माझ्याकडे जास्त पर्याय नाहित.
इको-ट्युड च्या प्रेरणा वाळिंबे ( आर्किटेक्ट, गोल्ड मेडालिस्ट, स्वतःच्या दोन्ही मुली लर्निंग होम मध्ये, सोशल सेक्टर मध्ये १५ वर्षापसुन जास्त अनुभव) आणि योगेश कोडोलीकर ( ओपन युनिव्हर्सिटीमधुन मेकॅनिकल इन्जिनियर, स्वतःचा मुलगा लर्निंग होम मध्ये, सोशल सेक्टर मध्ये १० वर्षापसुन जास्त अनुभव ) ह्यांना माझा सलाम. हे दोघं मुलांसाठी इतकं करतात की आपण भारावुन जातो. ज्या पालकांना काही वेगळे प्रयोग करायची इच्छा आहे त्यांनी एकदा तरी या दोघांना भेटावे. ही त्यांची इकोटयुड चा ब्लॉग http://ecotude.wordpress.com/about/ आणि ही त्यांची संस्था इको-लॉजिक http://ecologitech.co.in/index.html
काश्मिरपासून
काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या खंडप्राय देशातील १ अब्ज+ लोकसंख्येमधील 'पालक' नामक जोडीला सदोदित भेडसवणारा प्रश्न म्हणजे आपल्या पाल्याचे [यात मुलगा/मुलगी दोन्ही घटक येतात] शिक्षण ! हा विषय सर्वच पातळीवरील लोकांसाठी किती जिव्हाळ्याचा झाला आहे हे दक्षिणाच्या [तसेच एका अर्थी रचनाशिल्पच्याही] लेखावरून आणि त्याला मिळालेले - मिळत असलेले - भरभरून प्रतिसाद वाचताना सहजी लक्षात येते.
ओपन स्कूलिंगची कल्पना अगदीच 'नॉव्हेल' नसली तरी ती काही महानगरे वगळता सर्वच ठिकाणी रुजली आहे...वा रुजत आहे... असे म्हणणे काहीसे धाडसाचे होईल. त्याला कारण काही सुशिक्षित पालक वगळता बाकीचे जवळपास सारेच पालक "एकदा का शाळेत पोराला पाठविले की आपण आपल्या नित्याच्या कामाला लागलेले बरे !" अशा भावनेनेच मुलांच्या शैक्षणिक भविष्याविषयी विचार करताना दिसतील....[विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागात हे विचार प्रकट होताना मी ऐकले आहेत].
याचाच सरळसरळ अर्थ की, बहुजन समाज "शिक्षक" नामक संस्थेवर गाढ विश्वास ठेवून आहे. फक्त मेट्रोत असे वातावरण जरूर आहे की, आपल्या पाल्याला 'शाळा" नामक आवारात न पाठविता त्याला खाजगी पातळीवरच पहिली आठदहा वर्षे असा तयार करायचा की तो त्यानंतर ज्या कायदेशीर शाळेत प्रवेश घेईल तिथे नक्की आपली चमक दाखवेल.
इंग्रज निबंधकार बेकन म्हणतो, "Reading makes a man full" नेमके हे 'ओपेन स्कूल' मध्ये घडत आहे पण शासनमान्य शाळेत या वचनाकडे दुर्लक्ष होते, त्याला कारण म्हणजे वाचन संस्कृतीचे संवर्धन प्राथमिक पातळीवरील शालेय अभ्यासक्रमाला करणे महत्वाचे वाटत नाही. अक्षरओळख झाली की पुरेसे असते. पण ओपन स्कूलमध्ये अशा नवनवीन प्रयोगशील कृतींचे स्वागत होत असल्याचे दिसून येईल....हा एक चांगला फायदा ठरू शकतो या पद्धतीच्या शाळांचा.
सरकारी शिक्षणधोरणांशी मी [नोकरीमुळे] काहीसा परिचित असल्याने इथे सांगू इच्छितो की, 'ओपन स्कूलिंग' ला शासनाचाही विरोध असण्याचे कारण नाही. किंबहुना २००९ मध्येच शासनाने पुढाकार घेऊन त्या दृष्टीने हालचाल केल्याचे त्या विभागाचे म्हणणे आहे. सोळा वर्षे वयापर्यंत सर्व मुलामुलींचे समान संगोपन करण्याची व सार्वत्रिक मूलभूत जीवन शिक्षण अगदी प्राथमिकच्या वर्गातूनच देण्याची हमी घेणार्या शिक्षण केन्द्रांची रचना करून ती केवळ शहरातच नव्हे तर गावोगावी परिणामकारकरित्या चालविण्याचा हा नवा प्रस्ताव लवकरच मूर्त स्वरूपात साकारेल.
त्यासाठी आवश्यक असणारे 'शिक्षक' मात्र 'तयार' करावे लागतील... वा व्हावे लागतील. गोची आहे ती आमच्या डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमात. या ठिकाणी आजतरी फक्त ठरलेले 'जोतिबाचे छाप' च तयार होताना दिसतात. समाजात चित्र असे आहे की, 'मी शिक्षक झालो....' यातील आनंदापेक्षा "मला नोकरी मिळाली...म्हणजे लग्नाला पात्र झालो....' ह्याचा आनंद जास्त आहे असे मानण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे ओपन स्कूलिंगसारखे प्रयोग खाजगी पातळीवरच जास्त प्रभावीपणे काम करतील असे मला वाटते.
[हा विषय मात्र खूप मोठ्या आवाक्याचा आहे..... प्रतिसादावरून दिसत्येच.]
अशोक पाटील
दक्षे, थ्री इडीयट मधे संवाद
दक्षे, थ्री इडीयट मधे संवाद आहे तसा आजचा विद्यार्थी प्रेशर कूकरमधे आहे. समाजाच्या आणि पालकांच्या फारच अपेक्षा असतात. आणि त्याही अपरिहार्य आहेत, कारण लोकसंख्या वाढीने स्पर्धा देखील वाढलीय, आपले असामान्यत्व सिद्ध करावेच लागणार. रुळलेल्या वाटांवर ( तू म्हणतेस ती क्षेत्रे ) चालायचे तर पर्याय नाही. त्यापेक्षा वेगळा पर्याय निवडला तरच ...
तशी उदाहरणे आहेतच ( कृष्णमेघ कुंटे ) पण अशी अनेक उदाहरणे पुढे आल्याशिवाय तो मार्ग, राजमार्ग होणार नाही.. आणि मग वेगळा मार्ग निवडताना, तिथेही "हटके" असे क्षेत्र निवडावे लागणार.
गोची आहे ती आमच्या डी.एड. आणि
गोची आहे ती आमच्या डी.एड. आणि बी.एड. अभ्यासक्रमात. या ठिकाणी आजतरी फक्त ठरलेले 'जोतिबाचे छाप' च तयार होताना दिसतात. >>> प्रचंड अनुमोदन, अत्यंत कालबाह्य, अपुरा आणि कोणत्याही प्रकारे 'व्यावसायिक' नसलेला हा अभ्यासक्रम आहे. आपल्या सर्व शिक्षणक्षेत्रातील विकेस्ट लिंक.
दक्शे छान विषयावर बोलायला
दक्शे छान विषयावर बोलायला घेतलस ...
सर्वांचे post छान ...छान माहिती मिळत आहे ..
शाळा कशी असावी हे मुलांपेक्षा
शाळा कशी असावी हे मुलांपेक्षा पालकांवर जास्त अवलंबून आहे. पालकांना वेळ आहे/नाही, ज्ञान आहे/नाही, शिकवण्याची इछ्छा आहे/नाही, शिकवण्याची कला, समज, धीर आहे/नाही, समविचारी गट जवळ आहे/नाही अशा अनेक बाबींचा विचार करून उत्तर ठरवावे लागते.
आर्थिक आणि दैनिक रहाटगाडग्यात अडकलेल्या (स्वतःहून वा अपरिहार्यतेने) पालकांसाठी मुक्त/गृह विद्यालये योग्य नाहीत असे वाटते. मुक्त विद्यालयांमधील मुलांचा विकास यावर पुरी संशोधन झाले नाही असे मला वाटते. जे झाले आहे त्यावर विश्वास ठेवून निष्कर्ष काढणे मला धोक्याचे वाटते. अशी काही उदाहरणे वाचण्यात्/एकण्यात आली की पालकांनी मुलांना शाळेत घातले नाही आणि घरीही नीट शिकवले नाही आणि त्यामुळे मुले मागे पडली. अर्थात असे शाळांमधेही होते.
मी स्वतः मुक्त-विद्यालयांचा पुरस्कार करत नाही भारतामधे तरी. माझ्या मुलांना पूर्ण मुक्त विद्यालयांमधे मी घालणार नाही. शाळांचे धोरण "मध्यम सम विकास" असे असते. त्यामुळे अशोक यांचे मत <<त्यामुळे ओपन स्कूलिंगसारखे प्रयोग खाजगी पातळीवरच जास्त प्रभावीपणे काम करतील असे मला वाटते.>> मला पटते.
ता. क. - थोडे वैयक्तिक मर्यादित अनुभव आहेत.
<<त्यामुळे ओपन स्कूलिंगसारखे
<<त्यामुळे ओपन स्कूलिंगसारखे प्रयोग खाजगी पातळीवरच जास्त प्रभावीपणे काम करतील असे मला वाटते.>>
१. 'प्रयोग' आपल्या मुलांवर करायचा आहे.
२. फसला तर पुन्हा सुरू करून प्रयोग नव्याने करता येणार नाहीये.
३. मुला/मुलीला ज्यात इंटरेस्ट असेल, ते शिकवण्याची कुवत / ज्ञान आपल्याकडे असेलच (होम स्कूलिंग बद्दल) असे नाही.. इ.
सुसुकुंच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.
बराच विचार केल्यानंतर आम्ही
बराच विचार केल्यानंतर आम्ही मुलाला लर्निंग होम ग्राममंगल http://www.grammangal.org/ मध्ये प्रवेश घेतला. तिथे प्रवेश घेणार्या मुलांच्या पालकांना प्रशिक्षण वर्गामध्ये भाग घेणं गरजेच आहे. पण इतरही त्यात भाग घेऊ शकतात. पुण्यातली कार्यशाळा १५ ते २० एप्रिल आहे.
साधारण ही रुपरेषा आहे
बालवाडी प्रशिक्षण पुणे
१५, १६ एप्रिल - भाषा - भाषा शिक्षणाचे स्त्रोत, भाषेची उद्दिष्टे, श्रवण-संभाषणाचे उपक्रम, लेखनपुर्व तयारी, वाचनपुर्व तयारी, व्याकरण खे़ळ
१७, १८ एप्रिल - गणित - गणनपुरक संकल्पना, संख्यासंबोध, गणिती भाषा, संख्येवरिल क्रिया, मापन, अपुर्णांक, भौमितिक आकार
- मुक्तखेळ - स्वरुप, उद्दिष्टे, उपक्रम
१९ एप्रिल - कलानुभव - तात्विक भुमिका, कलानुभवाची उद्दिष्टे, विविध माध्यमे, शिक्षकांची भुमिका, चित्रकला, रंगकामाची तंत्रे
- जीवन व्यवहार - स्वरुप, उद्दिष्टे, उपक्रम
२० एप्रिल - परिसर अभ्यास - परिसर अभ्यासाची उद्दिष्टे, प्रकल्प पद्धती, प्रकल्पाचा आराखडा व उपक्रम, प्रकल्पाचे नियोजन
शारीरिक खेळ -शारीरिक विकास, स्शूलकारक, सुक्ष्मकारक, वयानुसार खेळाचे महत्व, खेळांची प्रात्यक्षिके
प्रक्षिक्षण पद्धती - शैक्षणिक साधने, खेळ, गट अध्ययन, स्वयंअध्ययन पद्धती या अध्यय्न-अध्यापन पद्धतींचा वापर प्रशिक्षणातून केला जातो. तसेच भाषण, चर्चा, प्रात्यक्षिके, दृकश्राव्य माध्यम यांचा ही समावेश असेल.
या शिवाय प्राथमिक प्रशिक्षण शिबीर आहे. त्यात प्रकल्प पद्धती, भूगोल, इतिहास हे इअतर विषयांसोबत आहेत.
आणि रचनावादी प्रशिक्षण शिबीर देखिल आहे.
पुणे (ग्राममंगल http://www.grammangal.org/ ) आणि ऐना (डहाणु, ठाणे - ९७६५७०८७९३)
ऐना इथे निवासाची सोय आहे.
वेळ - सकाळी ९:३० ते सायं ५ :३०
खर्च- प्रतिदिवस प्रतिव्यक्ती ५०० रु.
काही कारणास्तव इतरांना पुर्ण प्रशिक्षण कार्यक्रम करणे जमणार नसेल तर ते ठराविक विषयापुरतं शिबीर करु शकतात. १० तारखेपर्यंत नोंदणी करायची आहे. ही सविस्तर पीडीएफ http://www.grammangal.org/pdf/Training_Brochure-2013_final.pdf
रचु सविस्तर माहिती बद्दल
रचु सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद. खूप पालकांना उपयोग होईल.
एकाहुन एक सरस प्रतिसाद !
एकाहुन एक सरस प्रतिसाद ! वाचुन आनंद झाला की अनेक लोकं असा वेगळा विचार करतात.
रच्याकने: बरेच वेळा मुला/मुली पेक्षा पालकच अभ्यास, स्पर्धा, ई. चा जास्त बाऊ करतात असं माझं मत आहे.>>>>>>>>>>> योग हे रच्याकने नसुन मुख्य मुद्दा असला पाहिजे.
पालकांनी मार्कांचं टेन्शन घेणे सोडलं पाहिजे. इंजिनिअरिंग वा तत्सम १२ वीच्या आणि त्यावेळच्या entrance exam वर अवलंबुन असताना ६ वी पासुन तयारी म्हणजे अतीच म्हणावं लागेल.
तसही आय.आय.टी. मधुन निघालेल्या इंजिनिअर्सनी entrepreneur व्हावं असं त्यांचं उद्दीष्ट होतं असं ऐकवीत आहे. असो. उत्कृष्टतेचा ध्यास, इतकंच पुरेसं वाटतं मला, मग ते कोणतेही क्षेत्र असो.
अनेकांना +१ लिहावं वाटतय. - बेफिकीर, इब्लिस, अशोक, आगाऊ, आणि सगळेच.
Pages