'माध्यम प्रायोजक' म्हणजे काय?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या वर्षभरात अनेक मराठी चित्रपटांच्या सुरुवातीला, आणि त्यांच्या पोस्टरांवर 'माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम' असं मायबोलीच्या लोगोसकट लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेलच. या चित्रपटांची प्रसिद्धी आपण मायबोलीवर केली होती. माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं म्हणजे काय, आणि ते आपण का करतो, याबद्दल -

आपण २०११ सालापासून मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारायला सुरुवात केली. सुरुवात झाली तेव्हा असा एखादा उपक्रम सुरू करायचा, अशी योजना नव्हती. ’देऊळ’ प्रदर्शित व्हायच्या आधी उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण एकत्र काम करू शकू, हा मुद्दा पुढे आला, आणि मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर आपण इतरही अनेक चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांबरोबर काम केलं, आणि करत आहोत.

या उपक्रमात आपण माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या मराठी चित्रपटाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो, काही स्पर्धा, खेळ आयोजित करतो आणि निवडक मायबोलीकरांना चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी देतो. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि पोस्टरवर मायबोलीचा लोगो असतो.

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. अनेक निर्मात्यादिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपट निर्माण केले आहेत. अनेक तरुण मंडळी या क्षेत्रात नव्याने येत आहेत. मांडणी, आशय, तंत्र, अभिनय या सर्वच बाबतींत मराठी चित्रपटांनी उत्तम कामगिरी केली आहे. वेगळं काही करू पाहणार्‍या चित्रकर्मींच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या कामात अगदी थोड्या प्रमाणात का होईना, पण सहभागी होणं, चांगल्या चित्रपटांची माहिती मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं, हे मायबोलीच्या ध्येयधोरणांशी सुसंगतच आहे. ’मराठीत दर्जेदार चित्रनिर्मिती होत नाही’, अशी तक्रार प्रेक्षक गेली अनेक वर्षं करत होते. चांगल्या चित्रपटांची योग्य ती प्रसिद्धी केली जात नाही, चांगले चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशीही तक्रार होती. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय आशादायक चित्र तयार झाल्यानं असे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावेत, हा मायबोली.कॉमनं मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारण्यामागचा हा महत्त्वाचा हेतू आहे.

तसंच मराठी भाषेशी संबंधित अर्थकारणाचा विकास मायबोली.कॉमच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मराठी चित्रपट, पुस्तकं, नाटकं व इतर उद्योगांना लोकाश्रय मिळाला तरच मराठी भाषेचं संवर्धन होऊन मायबोली.कॉमसारखी संकेतस्थळं वाढू शकतील. म्हणूनच मराठी चित्रपट, नाटक, साहित्य, संगीत, उद्योग यांच्या वाढीस हातभार लावण्यासाठी मायबोली.कॉम सतत प्रयत्न करत असतं. शिवाय मनोरंजन, समाजकारण, राजकारण, पाककृती, दैनंदिन आयुष्याशी निगडित इतर अनेक गोष्टी मायबोलीवर असाव्यात, आणि प्रत्येक वाचकाला निवडीसाठी भरपूर वाव असावा, प्रत्येकाच्या अभिरुचीला साजेसा मजकूर मायबोलीवर असावा, हे गरजेचं आहे. त्यादृष्टीनं मराठी चित्रपटांचं व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हे पुढचं पाऊल आहे.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या कुठल्याही चित्रपटाचं अनुकूल परीक्षण मायबोली प्रशासन अथवा माध्यम प्रायोजक लिहून घेत नाहीत. चित्रपटांना अनुकूल असं परीक्षण लिहिण्याचा आग्रह केला जात नाही. चित्रपटांच्या प्रीमियरला उपस्थित राहणार्‍यांना ’चित्रपटाची ओळख अगदी थोडक्यात करून द्या, चित्रपटाची कथा अजिबात लिहू नका’, हे मात्र आवर्जून सांगितलं जातं. चित्रपटाची कथा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच लिहिल्याने प्रेक्षकांचा रसभंग होतो. शिवाय चित्रपटनिर्मितीमध्ये अनेकांची मेहनत असते. त्या चित्रपटातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांची घरं चालणार असतात. मराठी चित्रपटांचं अर्थकारण तर अतिशय नाजूक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा, अशी चित्रपटाशी संबंधित सर्वांचीच इच्छा असते.

आपण ज्या चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे, तो प्रत्येक चित्रपट अगोदर पाहणं शक्य नसतं. मात्र निर्माता-दिग्दर्शकाशी बोलून, कथा-पटकथा ऐकून, चित्रपटाच्या दर्जाबद्दल खात्री करून घेऊन मगच माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलं जातं. काही चित्रपट लोकांना आवडतील, काही आवडणार नाहीत, याची आम्हांला पूर्ण कल्पना आहे. पण दर्जेदार, उत्तम चित्रपटांची प्रसिद्धी मायबोलीवरून केली जावी, हा मायबोली प्रशासनाचा प्रयत्न असतो. मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या बहुतेक सर्व चित्रपटांना राज्य-राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकं मिळाली आहेत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हे चित्रपट गौरवले गेले आहेत, आणि या चित्रपटांशी जोडलं जाण्याचा मायबोली.कॉमला अभिमान आहे.

मायबोलीवर आपण यापूर्वी प्रकाशकांशी, उद्योजकांशी भागीदारी करून काही उपक्रम सुरू केले आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला आहे. मराठी चित्रपटनिर्मात्यांशी भागीदारी हा याचाच पुढचा भाग आहे. यांसारखेच इतर काही उपक्रम येत्या काही दिवसांत मायबोलीवर सुरू होतील, आणि मायबोलीकर या उपक्रमांना उत्तम पाठिंबा देतील, अशी खात्री आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

अतिशय स्तुत्य उपक्रम.

सर्वार्थाने पाठींबा!

छान.......... उपक्रम..
..
अभिनंदन आणि पाठिंबा

या माहितीसाठी धन्यवाद.

उपक्रमासाठी काही करता येण्यासारखे काम असले तर हक्काने सांगावेत.

"माध्यम" संदर्भातील भूमिकेचा योग्य आणि स्वागतार्ह असा अधिकृत खुलास अ‍ॅडमिन टीमकडून झाला हे छान झाले. गेल्या काही दिवसात मायबोलीवर सातत्याने नवनवीन मराठी चित्रपटांचे परिक्षण येत आहेत.... ते जितके सविस्तर तसेच तांत्रिक अंगांचीही विचारपूस करणारे आहेत हे जसे दिसले तसेच हेही मी टिपले की काही प्रतिसादक 'माध्यम मायबोली' आहे म्हणून अनुकूल परिक्षण लिहिले जात आहे [किंबहुना तोच हेतू आहे की काय....] अशी त्याना वाटणारी शंका आपल्या लिखाणातून प्रकट करीत गेले. त्यामुळे झाले असे की, मूळ मुद्दा.... जो चित्रपटाच्या गुणवत्तेच्या संदर्भातील... तो राहिला बाजूला आणि विषयाची गाडी घसरू लागल्याचे चित्र दिसत गेले.

मला वाटते अ‍ॅडमिन टीम सदस्यांच्याही ही बाब ध्यानी आली असल्यानेच हा योग्य तो खुलासा वर प्रकट झालेला दिसतो. स्वागत आहे या भूमिकेचे.

लिखाणात म्हटले आहे, "...’मराठीत दर्जेदार चित्रनिर्मिती होत नाही अशी तक्रार प्रेक्षक गेली अनेक वर्षं करत होते...." ~ ही भूणभूण तर मराठी चित्रपटाच्या अगदी पाचवीलाच पूजल्याचा इतिहास आहे. 'प्रभात' आणि 'राजकमल' वगळता मराठी चित्रपटसृष्टीत 'बाई...बाटली...तमाशा...पाटीलकी' + माहेरच्या साड्यांची रडारड + कोंडके, कोठारे, पिळगांवकर, बेर्डे यांचे कंटाळा येईपर्यंतचे तेचतेच विनोद.....<याशिवाय काहीही निर्मिती होत नाही असेच सदानकदा म्हटले जात आहेच. पण गेल्या काही वर्षात नव्या उमेदीच्या तरूणाईने मराठीतील हे चित्र आमुलाग्र बदलून टाकल्याचे दिसत आहे आणि ते निश्चित्तच अभिनंदनीय आहे. माझ्या माहितीतील कित्येक चित्रपटप्रेमी असेही आहेत की मायबोलीवर झालेल्या चर्चांच्या अनुषंगाने ते ते चित्रपट पाहण्यास ही मंडळी थिएटरकडे गेली आहेत.... ही एक जमेचीच बाजू म्हणावी लागेल.

तेव्हा या तरुण आणि कल्पक रक्ताला जर 'मायबोली' मार्फत उत्तेजन [तेही शाब्दिक] मिळत असेल तर त्याचे स्वागत होणे कलाक्षेत्राच्या भल्यासाठी योग्यच म्हणावे लागेल.

अशोक पाटील

मराठी चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व घेणे हा योग्य वेळेला घेतलेला strategic निर्णय येत्या काही वर्षात मायबोलीला लाभदायक (आर्थिकच नाही तर इतरही दृष्टीने) ठरेल असं वाटतं. अनेक शुभेच्छा.

शुभेच्छा. आमच्याच नाही तर आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा मायबोलीवर वावरायला मिळेल अशी मायबोलीची भरभराट होत राहो.
नताशा +१

मायबोली चित्रपट निर्मितीत उतरतेय का ? असल्यास हार्दिक अभिनंदन
मराठी चित्रपटांना लोकाश्रयाची प्रचंड गरज आहे.

मायबोली चित्रपट निर्मितीत उतरतेय का ?>> वरचा मजकूर वाचून असा समज होतोय का?

माध्यम प्रायोजक (Online Media Partner) या उपक्रमाचे काम नवीन मराठी चित्रपटांची माहिती लोकांपर्यत पोचवणे तसेच त्यांची ऑनलाईन प्रसिद्धी (Publicity) करणे हे आहे.

मराठी चित्रपटनिर्मात्यांशी भागीदारी हा याचाच पुढचा भाग आहे. यांसारखेच इतर काही उपक्रम येत्या काही दिवसांत मायबोलीवर सुरू होतील, आणि मायबोलीकर या उपक्रमांना उत्तम पाठिंबा देतील, >>> होय ह्या वाक्यावरुन माझा तसा गैरसमज झाला होता.

अ‍ॅडमिन, या लेखासाठी शतश: धन्यवाद. मायबोलीचा हा माध्यम प्रायोजकत्व घेण्याचा निर्णय अतिशय योग्य आणि काळाशी सुसंगत आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटनिर्मात्यांनीदेखील ऑनलाईन मीडीया पार्टनर ठरवायला सुरूवात केली त्याबद्दल त्यांचेही आभार. मराठी चित्रपटांचे अर्थकारण, प्रसिद्धी योजना आणि लोकांपर्यंत पोचण्याचे मर्ग बदलत आहेत हे बघून बरं वाटलं. सध्या सोशल मीडीया हे पीआरसाठी एकदम योग्य मानले जात आहेत, कारण त्यांचे परिणाम ताबडतोब दिसून येतात आणि खर्चाच्या दृष्टीने ते परवडतेदेखील.

एक सूचना मात्र करावीशी वाटते: मायबोली.कॉमने आता ब्रँड डेव्हलपमेंटकडे थोडं अजून जास्त लक्ष द्यावं. चित्रपटाच्या सुरूवातीला लोगो येणे इथवर ठिक आहे, पण हळूहळू चित्रपट माध्यम प्रायोजकत्व हे खेळ-कोडी आणि मायबोलीकरांना चित्रपट मिळायला बघणं याच्यापुढे जाऊन क्रॉस मीडीया मार्केटिंग सेक्शनमधे मायबोलीचं ब्रँडिंज झालं पाहिजे. अर्थात याचा विचार मायबोली प्रशासन करत असेलच.

दुसरं म्हणजे, मायबोली.कॉम या ब्रँडला चित्रपटांव्यतिरीक्त पुस्तक प्रकाशन, टेलीव्हीजन, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे भरारी मारताना बघायला आवडेल.

दुसरं म्हणजे, मायबोली.कॉम या ब्रँडला चित्रपटांव्यतिरीक्त पुस्तक प्रकाशन, टेलीव्हीजन, शिक्षण, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमधे भरारी मारताना बघायला आवडेल. >> +१०००!!

मराठीसाठी काही तरी चांगलं घडतंय हे वाचून आनंद वाटला.
मायबोलीची अशीच उत्तरोत्तर प्रगती घडो हीच सदिच्छा!

Pages