'माध्यम प्रायोजक' म्हणजे काय?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या वर्षभरात अनेक मराठी चित्रपटांच्या सुरुवातीला, आणि त्यांच्या पोस्टरांवर 'माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम' असं मायबोलीच्या लोगोसकट लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेलच. या चित्रपटांची प्रसिद्धी आपण मायबोलीवर केली होती. माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं म्हणजे काय, आणि ते आपण का करतो, याबद्दल -

आपण २०११ सालापासून मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारायला सुरुवात केली. सुरुवात झाली तेव्हा असा एखादा उपक्रम सुरू करायचा, अशी योजना नव्हती. ’देऊळ’ प्रदर्शित व्हायच्या आधी उमेश कुलकर्णी व गिरीश कुलकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेत आपण एकत्र काम करू शकू, हा मुद्दा पुढे आला, आणि मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर आपण इतरही अनेक चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी निर्मात्यांबरोबर काम केलं, आणि करत आहोत.

या उपक्रमात आपण माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या मराठी चित्रपटाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो, काही स्पर्धा, खेळ आयोजित करतो आणि निवडक मायबोलीकरांना चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहण्याची संधी देतो. चित्रपटाच्या सुरुवातीला आणि पोस्टरवर मायबोलीचा लोगो असतो.

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. अनेक निर्मात्यादिग्दर्शकांनी दर्जेदार चित्रपट निर्माण केले आहेत. अनेक तरुण मंडळी या क्षेत्रात नव्याने येत आहेत. मांडणी, आशय, तंत्र, अभिनय या सर्वच बाबतींत मराठी चित्रपटांनी उत्तम कामगिरी केली आहे. वेगळं काही करू पाहणार्‍या चित्रकर्मींच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या कामात अगदी थोड्या प्रमाणात का होईना, पण सहभागी होणं, चांगल्या चित्रपटांची माहिती मराठी प्रेक्षकापर्यंत पोहोचवणं, हे मायबोलीच्या ध्येयधोरणांशी सुसंगतच आहे. ’मराठीत दर्जेदार चित्रनिर्मिती होत नाही’, अशी तक्रार प्रेक्षक गेली अनेक वर्षं करत होते. चांगल्या चित्रपटांची योग्य ती प्रसिद्धी केली जात नाही, चांगले चित्रपट लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, अशीही तक्रार होती. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय आशादायक चित्र तयार झाल्यानं असे प्रयोग लोकांपर्यंत पोहोचावेत, हा मायबोली.कॉमनं मराठी चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारण्यामागचा हा महत्त्वाचा हेतू आहे.

तसंच मराठी भाषेशी संबंधित अर्थकारणाचा विकास मायबोली.कॉमच्या वाढीसाठी आवश्यक आहे. मराठी चित्रपट, पुस्तकं, नाटकं व इतर उद्योगांना लोकाश्रय मिळाला तरच मराठी भाषेचं संवर्धन होऊन मायबोली.कॉमसारखी संकेतस्थळं वाढू शकतील. म्हणूनच मराठी चित्रपट, नाटक, साहित्य, संगीत, उद्योग यांच्या वाढीस हातभार लावण्यासाठी मायबोली.कॉम सतत प्रयत्न करत असतं. शिवाय मनोरंजन, समाजकारण, राजकारण, पाककृती, दैनंदिन आयुष्याशी निगडित इतर अनेक गोष्टी मायबोलीवर असाव्यात, आणि प्रत्येक वाचकाला निवडीसाठी भरपूर वाव असावा, प्रत्येकाच्या अभिरुचीला साजेसा मजकूर मायबोलीवर असावा, हे गरजेचं आहे. त्यादृष्टीनं मराठी चित्रपटांचं व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारणं, हे पुढचं पाऊल आहे.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या कुठल्याही चित्रपटाचं अनुकूल परीक्षण मायबोली प्रशासन अथवा माध्यम प्रायोजक लिहून घेत नाहीत. चित्रपटांना अनुकूल असं परीक्षण लिहिण्याचा आग्रह केला जात नाही. चित्रपटांच्या प्रीमियरला उपस्थित राहणार्‍यांना ’चित्रपटाची ओळख अगदी थोडक्यात करून द्या, चित्रपटाची कथा अजिबात लिहू नका’, हे मात्र आवर्जून सांगितलं जातं. चित्रपटाची कथा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच लिहिल्याने प्रेक्षकांचा रसभंग होतो. शिवाय चित्रपटनिर्मितीमध्ये अनेकांची मेहनत असते. त्या चित्रपटातून मिळणार्‍या उत्पन्नावर अनेकांची घरं चालणार असतात. मराठी चित्रपटांचं अर्थकारण तर अतिशय नाजूक आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा, अशी चित्रपटाशी संबंधित सर्वांचीच इच्छा असते.

आपण ज्या चित्रपटांचं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे, तो प्रत्येक चित्रपट अगोदर पाहणं शक्य नसतं. मात्र निर्माता-दिग्दर्शकाशी बोलून, कथा-पटकथा ऐकून, चित्रपटाच्या दर्जाबद्दल खात्री करून घेऊन मगच माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलं जातं. काही चित्रपट लोकांना आवडतील, काही आवडणार नाहीत, याची आम्हांला पूर्ण कल्पना आहे. पण दर्जेदार, उत्तम चित्रपटांची प्रसिद्धी मायबोलीवरून केली जावी, हा मायबोली प्रशासनाचा प्रयत्न असतो. मायबोलीनं माध्यम प्रायोजकत्व स्वीकारलेल्या बहुतेक सर्व चित्रपटांना राज्य-राष्ट्रीय पातळीवर पारितोषिकं मिळाली आहेत, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये हे चित्रपट गौरवले गेले आहेत, आणि या चित्रपटांशी जोडलं जाण्याचा मायबोली.कॉमला अभिमान आहे.

मायबोलीवर आपण यापूर्वी प्रकाशकांशी, उद्योजकांशी भागीदारी करून काही उपक्रम सुरू केले आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला आहे. मराठी चित्रपटनिर्मात्यांशी भागीदारी हा याचाच पुढचा भाग आहे. यांसारखेच इतर काही उपक्रम येत्या काही दिवसांत मायबोलीवर सुरू होतील, आणि मायबोलीकर या उपक्रमांना उत्तम पाठिंबा देतील, अशी खात्री आहे.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

"कोंडके, कोठारे, पिळगांवकर, बेर्डे यांचे कंटाळा येईपर्यंतचे तेचतेच विनोद....."

अशोकराव, दादांना बाकिच्यांच्या रांगेत बसवताना १०० वेळा विचार करा,
बाकीचे वाईट आहेत अस नाही म्हणत मी पण . .
दादा फार जबर VISION असलेला निर्माता होता, त्यांना नीट ओळखा आणि योग्य सन्मान द्या.
धन्यवाद

माननीय प्रशासक,

लेखाबद्दल आभार! मला वाटतं खालील ओळ आपला हेतू स्पष्ट करते.

>> दर्जेदार, उत्तम चित्रपटांची प्रसिद्धी मायबोलीवरून केली जावी, हा मायबोली प्रशासनाचा प्रयत्न असतो.

चित्रपटाचे सर्वांगीण रसग्रहण करण्यास यापुढे कोणाच्याही मनी किंतु येऊ नये.

पुढेमागे जर काही कारणास्तव नकारात्मक रसग्रहणास मनाई करावी लागली (उदा. चित्रपटाशी असलेल्या आर्थिक संबंधांमुळे), तरीही त्यात काही वावगे नाही. मात्र तसे असल्यास ही बाब सदस्यांना आगाऊ माहित व्हावी. सदस्य आणि प्रशासक यांच्या पारदर्शकता असणे आवश्यक आहे. हे माझं वैयक्तिक मत. अशी वेळ येऊ नये, हे ओघाने आलंच.

पुढील वाटचालीस शुभेच्छा! Happy

आ.न.,
-गा.पै.

Pages