शालेय शिक्षण पद्धत - आजची आणि उद्याची.

Submitted by दक्षिणा on 8 February, 2013 - 04:37

खरंतर शालेय शिक्षण आणि त्यावर बोलावे हा माझा प्रांत नव्हे. पण काल रचनाशिल्प या मायबोलीकरणीशी फोनवर २ तास झालेल्या गप्पांनंतर आजकालच्या शालेय शिक्षणावर प्रकाश टाकणारा एक धागा उघडावा असं राहून राहून वाटत होतं.

थोडक्यात आजची शिक्षणपद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकललं जातंय. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अ‍ॅडमिशन्स अवलंबून आहेत.

पण या अशा 'बर्डनसम' शिक्षणपद्धतीत मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. परिक्षा, मार्कस आणि वाढत्या प्रेशरमुळे सरकारनेही नुकतंच परिक्षा न घेण्याचं तंत्र अवलंबलं आहे.

तुम्हाला काय वाटतं? आजची शिक्षणपद्धती कशी आहे? यातून विद्यार्थी तर जन्माला येतायत पण ती माणूस कधी बनणार? व्यवहारज्ञान म्हणून जे प्रचलित आहे ते खरंच पुस्तकी ज्ञानातून मिळतं का? माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी ते फक्त अनुभवातून मिळू शकतं.

सध्या पुण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था आहेत, ज्या ओपन स्कुलिंग करतात किंवा नो स्कुलिंग करतात. इयत्ता १०वी पर्यंत जे ज्ञान(??) आपण पुस्तकातून घेतो किंवा आपल्याला शिकवलं जातं तेच वेगवेगळ्या पद्धतीने मुलांपर्यंत खुद्द त्यांचे पालकच पोहोचवतात. (व्हॉलंटरी टिचिंग)

तुमचं मत काय? हे ओपन स्कुलिंग थोड्याफार प्रमाणात पुर्वीच्या गुरुकूल पद्धतीप्रमाणेच आहे फक्त थोडे सुधारीत. त्याला पुढे कितपत प्रतिसाद मिळेल? आपल्या पिढीतील किती लोक असं समजतात की आत्ताच्या लहान मुलांना अभ्यास हा अवाक्या बाहेर करावा लागतो आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी? की तुमच्या मते हे योग्यच आहे? करावेच लागेल?

किती पालक ओपन स्कुलिंग्/नो स्कुलिंगला 'फॉर' असतील?

मुलांना वाढवायला खरंच खूप पैसे लागतात का? कि आई-वडीलांचा अमूल्य वेळ लागतो? जे संस्कार (मूल्य) व्हॅल्यूज किंवा सामाजिक शहाणपणा आपल्याला उशिरा येतो, तो या ओपन स्कुलिंगच्या माध्यमातून मुलांमध्ये वेळिच येइल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

चर्चा करूया?

तळटिप : खरंतर हा विषय अतिशय व्हास्ट आहे, जे सुचेल ते, आणि सुचतील तसे मुद्दे इथे हेडींग मध्ये टाकलेत. सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा प्रतिसादांमध्ये होईलच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे - ओपन स्कुलिंग व नो स्कुलिंग यावर कोणी सविस्तर माहिती देईला का आधी ?

मुलांना वाढवायला खरंच खूप पैसे लागतात का? कि आई-वडीलांचा अमूल्य वेळ लागतो?>>>

खुप पैसे लागतात का ते माहित नाहीत पण हां.. पैसे जरुर लागतात... कारण आजकालची परिस्थीती व लोकसंख्या आपल्या आवाक्यात नाहीत...

आई वडिलांचा क्वालिटी टाइम लागतो हे मात्र नक्की...

बेफिकीर...

पोस्ट खुप आवडली... अंतर्मुख केलत....

मोहन की मीरा,
खूप छान पोस्ट.

१२ जून २०१० च्या लोकसत्ता - 'चतुरंग' मध्ये आलेल्या शुभदा चौकर यांच्या 'घरात शाळा' लेखाची लिंक देत आहे.
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...

मोहन की मीरा

उत्तम पोस्ट. प्रत्येक वाक्याला अनुमोदन. माझे आणि नवर्याचेही असेच विचार आहेत पण मला ते इतक्या मुद्देसुदपणे मांडता येणार नाहीत.

ओपन स्कुलिंग = नाही पुस्तक नाही नेहेमीची शाळा...... वेगळाच अभ्यास्क्रम वापरुन त्यांची १०वीची तयारी करवुन घेतली जाते. टॉपिक तेच पण पुस्तके वेगळी किंवा पद्धत वेगळी...

नो स्कुलिंग = शांतीनिकेतन टाईप... वेगळ्याच पद्धतीने शाळा चालवतात. ज्यात मुलांना विचार करायला भरपुर वाव दिला जातो. प्रॉजेक्ट वर भर. सध्या दहावीच्या बोर्ड बरोबर अ‍ॅफिलियेशन चे खुप प्रॉब्लेम्स आहेत...

हे वरचे नवे नवे प्रयोग आहेत...

मला अजुनही वाटतं की शाळे पेक्षा पालकांवर खुपसं अवलंबुन आहे...

माशा, छान लेख आहे.

अनिल अवचटांनीपण स्वतःविषयी मधे ह्यावर (शाळेचे विविध पर्याय) थोडे लिहिले आहे. मुलींना शाळेत घालताना त्यांनी केलेला विचार.

अशीच येक वेगळी शाळा " अमन सेतु " मला खुप आवडली होती शाळा पण घरच्यांच्या मतादिक्यापुढ आम्ही मुलाला रेग्युलर शाळेत टाकल. आताशी ज्युनिअर केजीला आहे. तसा अभ्यासाचा काही ताण नाहीये. शाळेत पण अभ्यासाव्यतिरीक्त इतर गोष्टींवरच जास्त भर आहे. ३ वेगवेगळ्या स्पोर्ट्स अ‍ॅक्टीव्हीटीज , डान्स , प्रोजेक्ट वर्क ई.

बेफिकीर , तुमचीही पोस्ट छान आहे.उल्लेख राहून गेला होता.
आता आमच्याकडे,

आमच्याकडे मुलीला डान्स , चित्रकलेची अतोनात आवड आहे. नव-याचे मत आहे की आधी शिक्षण 'चांगले' हवे
(म्हणजे मेडिकल्,इंजिनीअरिंग,एम.बी.ए. तत्सम) मग बाकी सगळे . मला ती कुठल्याही क्षेत्रात गेली तरी चालेल पण आर्थिक दृष्टया ती स्वयंपूर्ण असावी असे वाटते. व तिला जे करेल त्यात तिला आनंद मिळावा असे वाटते. मुलीला गणित अजिबातच आवडत नाही. मी तिच्या डोक्यावर बसून ते करून घेते. तीही नाईलाजाने ते करते. ती सध्या ५ वी त सी.बी.एस.ई . शाळेत आहे .(नव-याची नोकरी फिरतीची झाल्याने मुलीला सी.बी.एस.ई शाळेत घातले आहे).शाळा ठीक आहे.म्हणजे अभ्यासावर भर, अती हुषार मुलांचे (>९०%)कौतूक किंवा मग कमी पडलेल्या मुलांसाठी ज्यादा वर्ग ही घेतात. पण आमच्यासारख्या 'मध्यमवर्गीय' पाल्यासाठी( म्हणजे ७५% ते ८५% मधल्या) ही शाळा काही खास देत नाही. मुलाच्या टक्केवारीभोवतीच सगळी चर्चा असते. म्हणजे प्रोजेक्ट ला ३ स्टार्स मिळाले,ते तेवढ्यापुरतंच राहतं,चित्रकलेला फुल मार्क्स मिळाले,ते ही तेवढ्यापुरंतच. अल्टिमेट्ली एकूण टक्केवारीच मॅटर होते. आजूबाजूला टक्केवारीच्या चर्चा ऐकूनच धसकायला होतं.२ वर्षांपूर्वी मुलीला ९२ % मर्क्स पडले होते. मी तिच्या टिचर ला विचारले की पुढे किती जण आहेत ? तर पुढे ३० जण होते.तुकडीत मुले ५० होती. त्यानंतरच्या वर्षापासून शाळेने ग्रेडिंग द्यायला सुरू केले आहे.

मैत्रिणीचा मुलगा सहावीच्या उन्हाळी सुट्टीपासून I.I.T. एन्ट्रन्स कोचिंग क्लास ला जातोय. तो आता नववीत आहे. हे असं बघितलं की वाटतं आपली मुलगी पुढे जाऊन यात कुठे टिकेल?

तरीही मी शाळेतूनच मुलीला शिक्षण देईन. होम स्कूलिंग प्रकार खूप रिस्की वाटतो. म्हणजे मुलाच्या आयुष्याला पणाला लावून त्याला गिनिपिग करून हा प्रयोग करणं हे मला झेपणारं नाही. त्यासाठी मूल आणि पालक दोघेही असामान्य बुद्धीमत्तेचे हवेत असं वाटतं. कारण हे आव्हान मोठं आहे.

मैत्रिणीचा मुलगा सहावीच्या उन्हाळी सुट्टीपासून I.I.T. एन्ट्रन्स कोचिंग क्लास ला जातोय. तो आता नववीत आहे.>> हे पाहून आता वाटू लागले आहे की लोक बहुदा मुलांना जन्मतःच एखाद्या क्लासला लावतील की काय. हे बघून विचार येतोय की भारतात कशाला परतायचे. पोराचे इथे बरे चालू आहे. त्यालाही टेन्शन नाही आणि आपल्याला पण टेन्शन नाही. माझ्या मते खरा प्रश्न चांगल्या शाळा आणि पुढे चांगली कॉलेजेसची कमतरता. म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या आय आय टी सारख्या संस्था. आय आय टी आणि बाकीच्यांमध्ये फारच फरक आहे त्यामुळे सगळी मरमर. अजून काही पिढ्या बरबाद झाल्या की गडी रुळावर येईल बहुदा. कारण ह्याचे पूर्ण परिणाम अजून दिसायचे आहेत. मागच्या पिढीने काहीच उपभोगले नाही. आपल्या पिढीला ते दिसले म्हणून जसे एखाद्या भुकेलेल्याला पाकवान्नाचे ताट दिसल्यावर जशी अवस्था होते तसे झाले आहे. अजून एक-दोन पिढ्या ह्यातून गेल्या की हे कदाचित कमी होएईल.

६. हे वर्तुळ विचित्र असून यातून बाहेर पडण्यासाठीचा उपाय थेट फार पूर्वी महात्मा गांधींच्या तत्वांमध्येच सापडतो. (ही एक शोकांतिकाच).
<<
शोकांतिका का म्हणावी लागते? त्या माणसाचा मोठेपणा मान्य केल्याविना तरणोपाय नाही म्हणून??? अस्ल्या वाक्यांची कीव येते.

निषेध!

शोकांतिका ही आहे की त्यानंतर असे उपाय, जे सर्वांना खरे तर जमू शकले असते, देणारा कोणी प्रभावी नेता झाला नाही. दुसरे म्हणजे महात्मा गांधींची तत्वे लोकांनी पाळली नाहीत. अन्यथा काही प्रश्न खरोखरच निर्माणही झाले नसते. आणि तिसरे म्हणजे आता इतके पुढे आल्यानंतरही आपल्यासारख्या थोर (?) नेत्यांची परंपरा असलेल्या देशाला अजूनही गांधींच्याच विचारांचा चांगुलपणा मान्य करत बसावा लागतो, नवी उत्तरे कोणी देऊ शकलेले नाही.

कृपया, कोण नेमके काय म्हणते आहे याचे नीट आकलन झाल्यानंतर कीबोर्डावर बोटे टेकवल्यास उपकार होतील.

दक्षिणा - अवांतर पोस्टसाठी क्षमस्व!

शाळेकरता होम स्कूलिंगचा पर्याय मलातरी पटत नाही. सध्या तरी. कदाचित अजून विचार वाचले, ऐकले तर पटेलही.

शाळेत शैक्षणिक विषयांबरोबर इतर अनेक गोष्टी मुलं त्यांच्याही नकळत शिकत असतात. शिस्त, समाजातील विविध गटांतून आलेल्या मित्रमैत्रिणी जोडणं, सांघिक भावना, टाईममॅनेजमेंट, आत्मविश्वास, सभाधीटपणा इ. प्रत्येक शाळेची स्वतःचं एक तत्त्वज्ञान असतं - ते चुकीचं की बरोबर हा भाग वेगळा. पण त्यानुसार मुलं घडत जातात, त्यानुसार त्यांना विविध क्षेत्रातील गोष्टींचं एक्स्पोजर येतं, तशी त्यांची एक विचारसरणी घडते. मुख्य म्हणजे घरातल्या आईवडिलांपेक्षा समवयस्कांचा आणि इतर शिक्षकांचा प्रभाव त्या वयात जास्त असल्याने, त्यांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते.

माझी मुलगी मुळातच अतिशय बुजरी. पण शाळेत जाऊन ती बरीच बदलत गेली. समवयस्क मैत्रिणींकडून अ‍ॅप्रिशिएट केलं जाणं हे ही मुलांना खूप उत्साह देतं. कधी वक्तृत्व स्पर्धेत भाग न घेणारी माझी लेक तिची स्पेलबीकरता निवड झाली तेव्हा आख्या शाळेसमोर स्टेजवर जाऊन घडाघडा स्पेलिंग्ज बोलली. त्यानंतर उजळलेला तिचा चेहराच सगळं सांगून गेला. पण तरीही अजून वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत नाहीच. Happy पण हरकत नाही.

माझ्या लेकीला आर्टिस्ट, शेफ आणि समाजसेवक बनायचंय. या तीन गोष्टींची सांगड कशी घालता येईल या विवंचनेत ती असते. ते असो.

तिचा अभ्यास घेताना मला खूपच एनर्जी घालवायला लागायची. म्हणजे, मीच शाळेत काय शिकवलं विचारणार. त्यावर उत्तर असं की आता नाही, मग सांगेन / विसरले / डायरीत टाईमटेबल बघून सांगावं लागेल वगैरे. मग मीच बीबीएम वरून इतर समदु:खी आयांशी मेसेजिंग करून होमवर्क काय आहे ते शोधून काढणार. लेकीचा कल पाहून तिला अभ्यासाकरता चुचकारणार. मग ती माझ्यावर उपकार केल्यासारखा अभ्यास करणार / कंटाळणार / तिला भूक, तहान, इतर विधी सगळे सगळे त्याच वेळात लागणार ... असे अनेक प्रकारे माझं शोषण झाल्यामुळे मी आणि अभ्यासाचीच नावड असल्यामुळे ती, अशा आम्ही दोघी दमणार.

सध्या आम्ही घरी एक प्रयोग करतोय. तिला सांगितलं की आम्ही दोघंही तुला मदत करायला तयार आहोत. तुला जे हवं ते येऊन विचार पण बाकी सगळी जबाबदारी तुझी. गेले महिनाभर हा प्रयोग सुरू आहे. मध्येच पीटीए झाली त्यावेळी टीचर म्हणाली की ती हल्ली खूप खुश असते आणि वर्गात जास्त लक्ष देते (आधी ती खूप ड्रिफ्ट होत असे). ग्रेडसही साधारण तशाच मिळवत आहे. बघूयात पुढे काय होईल ते. अगदी काही जोर का झटका लागला तरी चालेल अशी मनाची तयारी ठेवली आहे.

>>त्या मुळे शिक्षणा मुळे सक्सेस मिळतो, पैसा मिळतो ह्या वर विश्वास नाही.. तुमचं काम तुम्ही कीती अत्मियतेने करता ह्यावरच तो सक्सेस अवलंबुन आहे.

वाह! अतीशय चोख... आवडलं सर्वच पोस्ट. अगदी मार्गदर्शक आहे नविन व भावी पालकांसाठी. ठाण्यात आमची शाळा मात्र सगळयात बेस्ट (होती) बरं का: स.से. (मराठी). Happy
रच्याकने: बरेच वेळा मुला/मुली पेक्षा पालकच अभ्यास, स्पर्धा, ई. चा जास्त बाऊ करतात असं माझं मत आहे.

>> तिचा अभ्यास घेताना मला खूपच एनर्जी घालवायला लागायची. म्हणजे, मीच शाळेत काय शिकवलं विचारणार. त्यावर उत्तर असं की आता नाही, मग सांगेन / विसरले / डायरीत टाईमटेबल बघून सांगावं लागेल वगैरे. मग मीच बीबीएम वरून इतर समदु:खी आयांशी मेसेजिंग करून होमवर्क काय आहे ते शोधून काढणार. लेकीचा कल पाहून तिला अभ्यासाकरता चुचकारणार. मग ती माझ्यावर उपकार केल्यासारखा अभ्यास करणार / कंटाळणार / तिला भूक, तहान, इतर विधी सगळे सगळे त्याच वेळात लागणार ... असे अनेक प्रकारे माझं शोषण झाल्यामुळे मी आणि अभ्यासाचीच नावड असल्यामुळे ती, अशा आम्ही दोघी दमणार. >> मामी सेम पिंच.

मी सध्या ऑनलाईन केलेल्या म्युझिक व क्रिएटिविटी कोर्समुळे बर्‍याच वेगवेगळ्या देशांमधील शिक्षक व शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या लोकांच्या संपर्कात आले आहे, तसेच जगात तंत्रज्ञानाच्या पातळीवर आणि वर्गातील प्रयोगांच्या पातळीवर शिक्षणात कसे नवनवीन प्रयोग घडत आहेत, हे लोक घडवून आणत आहेत याबद्दल बरेच काही त्यांच्याचकडून कळत आहे. त्याबद्दल नंतर सवडीने लिहीन. पण एक नक्की जाणवले, की अनेक प्रगत किंवा अप्रगत देशांमध्ये, अतिशय अद्ययावत सुखसोयींमध्ये किंवा जास्त सोयी नसलेल्या शाळेतही हे शिक्षक आपल्या वर्गात वेगवेगळ्या प्रकारे जे काही प्रयोग राबवित आहेत, ते खरोखरी कौतुकास्पद आहेत.

उदा., माझी क्लासमेट निकोलेट ही आफ्रिकेतल्या शाळेत म्युझिक शिकवते, तिने आमच्या वर्ल्ड म्युझिक क्लासमधून प्रेरणा घेऊन आयोजित केलेल्या मुलांच्या शैक्षणिक कँपमध्ये मुलांना ऑस्ट्रेलियन डिजरिडू वाद्याचे प्रात्यक्षिक, त्याची माहिती, त्यासंबंधी इतर ज्ञान दिले. मग हे वाद्य कोण वाजविते - त्या व्यक्तिसमूहाबद्दल माहिती - त्यांचा थोडासा भौगोलिक इतिहास इत्यादी... दुसरी क्लासमेट लिंडा हिने आपल्या वर्गातील मुलांना संगीतातील पॉलिफोनी चे प्रात्यक्षिक कळावे म्हणून त्यांना वेगवेगळे जेंबे, ड्रम्स इत्यादींवर पॉलिफोनी वापरून वेगवेगळे ताल - नाद वापरून संगीत निर्मिती करायला शिकवले. मग त्याच जोडीला जगात कोणकोणत्या देशांची, समूहांची पॉलिफोनी संगीताचा खासियत आहे, त्या व्यक्तीसमूहांबद्दलची - त्यांच्या पर्यावरणाची व राहणीमानाची माहिती, संगीताचा हा प्रकार पॉप संगीतात कोठे व कसा वापरला गेलाय याबद्दल असे बरेच काही ती त्यातून तिच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकली.

क्रिएटिविटी कोर्समध्ये तर अबब प्रकारे मुलांची कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती, निर्मितीशक्ती वापरून त्यांचे ज्ञान वाढवण्याचे, त्यांच्यातील प्रयोगशीलता व कुतूहल जागृत करण्याचे त्यांच्या शिक्षकांचे किस्से ऐकले आहेत - वाचले आहेत. सवडीने लिहीन. एक मात्र नक्की, शाळा कोणत्याही प्रकारची असो, शिक्षणक्रम कोणत्याही प्रकारचा असो, जर शिक्षक व पालक मुलांमधील कुतूहल, चौकस बुद्धी, निरीक्षणक्षमता, प्रयोगशीलता, कल्पनाशक्ती यांना खतपाणी घालणारे, पुरेसा वाव देणारे असतील तर त्यातून मुले उत्तम प्रकारे तयार होताना दिसतात.

मामी, <<माझ्या लेकीला आर्टिस्ट, शेफ आणि समाजसेवक बनायचंय. या तीन गोष्टींची सांगड कशी घालता येईल या विवंचनेत ती असते.>> :-))
माझ्या मुलाला क्रिकेटर आणि शेफ व्हायचय. शेफ चं मुलाना का एवढं आकर्षण? मास्टरशेफ पहाण्याचा परिणाम बहुतेक!

सर्वप्रथम दक्षिणा यांचे आभार, एका महत्वाच्या व आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्याबद्दल. शालेय शिक्षण पद्धत - आजची आणि उद्याची ह्या विषयाचा आवाका खरोखरच खूपच मोठा आहे.

शालेय शिक्षणातला सर्वात महत्वाचा घटक (अर्थातच माझ्यामते; पण सर्वांना मान्य होण्यास अडचण नसावी Happy ) म्हणजे शिक्षक. धाग्याच्या मूळ मजकूरात व इतरांच्या प्रतिसादात देखील ह्या घटकाची उपेक्षा झाल्याचेच दिसून येत आहे.

मी ज्या काळात शिकलो (१०वी - १९८६) त्या वेळेपर्यंत (माझ्या माहीतीत तरी) शिक्षकांना मान होता. त्यांचा आदर केला जाई. आमच्या शाळेतल्या (पुण्यातली सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला) एक 'आदर्श शिक्षक' पुरस्कार प्राप्त (आणि खरोखरच छान शिकवणार्‍या) शिक्षिका विद्या केतकर ह्यांनी स्वेच्छेने (अ, ब,तुकड्या हे वरचे वर्ग मानले तर) फ वगैरे सारख्या खालच्या वर्गातल्या मुलांना शिकवणे मागून घेतले होते. सहसा चांगले शिकवणारे शिक्षक हे अ, ब या सारख्या तुकड्यांनाच शिकवणार असा अलिखीत नियमच होता, असे असताना त्या शिक्षकांपैकी कोणीतरी माझी खरी गरज नापास होऊ शकणार्‍या मुलांना आहे असे वाटणार्‍या बाई आणि त्यांना तसे वागू देणारी शाळा (व्यवस्थापन) हे त्यावेळी (दुसरेही काही असू शकते असे माहितच नसल्याने) अप्रुप नव्हते, हे असेच असते असे गृहितच धरलेले होते. चांगले मार्क मिळवणार्‍या मुलांना अधिक सराव व्हावा व ती बोर्डात चमकावी म्हणून शिक्षक शाळेतच जादाचे तास घ्यायचे ते सुध्दा (माझ्या माहीतीप्रमाणे) मोफतच.

आज शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात अशा ध्येयवादी (बहुदा त्यामुळेच उत्तम) शिक्षकांची वानवा ज्या मोठ्या प्रमाणावर आढळते त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे (माझ्यामते) शालेय शिक्षकांप्रती संपूर्ण समाजातून जाणवेल इतका कमी झालेला आदर. सरकार व समाज ह्या दोहोंची मनोवृत्ती आपल्या भावी पिढीच्या जडण्-घडणी मधे शिक्षकाचे नव्हे मास्तरांचे काय स्थान? अशी झाली आहे. शिक्षक हा घटक आपल्या मुलांच्या जडणघडणीमधे, भावविश्वात, व्यक्तीमत्व विकासात महत्वाचा असतो हेच मुळी विसरले गेले... समाजातल्या हुशार मुलांनी करीअर म्हणून शिक्षकीपेशाचा विचार देखिल न करणे हे कशामुळे झाले असावे ह्याचा विचार केला असता ढळलेले सामाजिक स्थान हा घटक महत्वपूर्ण ठरेल असे वाटते.

ज्या समाजातील बहुतांश पालकांना आपली मुले, डॉक्टर, इंजीनीअर, मॅनेजर व्हावीत, गेलाबाजार सी.ए, वकील व्हावीत असेच वाटते त्या समाजातील शिक्षकी पेशा स्विकारती मुले ही ईतर काही करायला मिळाले नाही म्हणून शिक्षकी पेशाकडे वळली असण्याची शक्यता फार वाढते. कोणत्याही पेशाची/कामाची सुरुवातच जर आवडीने किंवा अग्रक्रमाने होत नसेल तर त्या व्यक्तीच्या काम करण्यामधे पाट्या टाकण्याचे प्रमाण अधिक दिसून येण्याची शक्यता जास्त. (मला सध्याच्या शिक्षकांच्या आस्थेविषयी / बौध्दीक पातळी विषयी अनादर अजीबात व्यक्त करायचा नाहीये.)

ह्या शिक्षकांना दिले जाणारे शिक्षणेतर काम जर का बघितले तर कोणताही शहाणा माणूस शिक्षक बनण्याच्या फंदात (हो असाच शब्दप्रयोग करावा लागेल अशी परिस्थिती आहे) पडणार नाही. जनगणना काय, माध्यान्ह खिचडी काय अन काय काय. माबोवरचे (असतीलच जर कोणी तर ते )शिक्षकच या विषयावर अधिक प्रकाश टाकतील. अशा खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करताना जे मुख्य काम म्हणजे शिकवणे ह्या कडे दुर्लक्षच होईल नाही तर काय?

मुलांना शिकताना आनंद वाटेल असे वातावरण जर का आणि जिथे असेल किंवा नसेल तिथे शिक्षकांचा त्यामधला वाटा किती असेल असे वाटते आपणास?

सुगत मित्रा (शब्दोच्चार कदाचित चुकला असेल, समजून घ्या) यांचे टेड.कॉम वरचे ''होल इन द वॉल'' प्रोजेटबद्दल दिलेले भाषण व मुलं स्वतःची स्वतःला किंवा एकमेकांना कशा प्रकारे शिकवू शकतात त्याचे समर्पक उदाहरण.

तुम्हाला काय वाटतं? आजची शिक्षणपद्धती कशी आहे?
प्रचण्ड लिहिण्यासारखे आहे.
व्यक्तिशः 'आजच्या' पद्धतीतूनच शिकून मी घडलेलो आहे.
माझ्या पाल्यांचेही 'शालेय' शिक्षण संपून ते पुढे निघून गेले आहेत. अन या अनुभवांत आजची पद्धत 'वाईट नाही' असेच माझे मत झालेले आहे.
***
यातून विद्यार्थी तर जन्माला येतायत पण ती माणूस कधी बनणार? व्यवहारज्ञान म्हणून जे प्रचलित आहे ते खरंच पुस्तकी ज्ञानातून मिळतं का? माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी ते फक्त अनुभवातून मिळू शकतं.

ऑफ कोर्स पुस्तकातून ज्ञान मिळतं. अभ्यासाच्या पुस्तकातूनही मिळतंच मिळतं.
किती 'विद्यार्थी' पुस्तक वाचायचे कष्ट घेतात? किंवा किमान मास्तर जे काय वर्गात बडबडतो तितके ऐकण्याचे कष्ट?
खरे तर हे लेखिकेचे प्रश्न 'शालेय' शिक्षणास लागूच नाहीत. शाळेत फक्त 'बेस' तयार केला जात असतो. मग कालेजात ३ स्ट्रीम्स आहेत. कला, वाणिज्य, शास्त्र. शाळेत भाषाच शिकवली नाही तर कलेत काय कराल? गणित शिकलाच नाहीत तर वाणिज्याचे काय? इ.
अन माझ्या स्वतःच्या अन माझ्या जेन-नेक्स्टच्या (एसेस्सी अभ्यासक्रम) अनुभवातून म्हणेन, 'अभ्यास' केला, तर ऑफकोर्स माणूस बनणारच. तो ही यशस्वी माणूस.

शिवाय माणूस बनवणे ही संपूर्णपणे शाळेची जबाबदारी कशी काय?

***

तुमचं मत काय? हे ओपन स्कुलिंग थोड्याफार प्रमाणात पुर्वीच्या गुरुकूल पद्धतीप्रमाणेच आहे फक्त थोडे सुधारीत. त्याला पुढे कितपत प्रतिसाद मिळेल? आपल्या पिढीतील किती लोक असं समजतात की आत्ताच्या लहान मुलांना अभ्यास हा अवाक्या बाहेर करावा लागतो आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी? की तुमच्या मते हे योग्यच आहे? करावेच लागेल?
किती पालक ओपन स्कुलिंग्/नो स्कुलिंगला 'फॉर' असतील?
>>>

सध्या तरी हे चोचले आहेत, असे म्हणतो.

***

मुलांना वाढवायला खरंच खूप पैसे लागतात का? कि आई-वडीलांचा अमूल्य वेळ लागतो? जे संस्कार (मूल्य) व्हॅल्यूज किंवा सामाजिक शहाणपणा आपल्याला उशिरा येतो, तो या ओपन स्कुलिंगच्या माध्यमातून मुलांमध्ये वेळिच येइल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

पैसे = वेळ.
वेळ = पैसा.

***

शाळेत शिकवतात त्यापेक्षा मी जास्त चांगले घरीच शिकवीन. गुरुकुल पद्धत. अ‍ॅप्रेंटिसशिप पद्धत. इ. मध्ययुगीन कल्पना वेडगळपणाच्या आहेत. हंटिंग अन फोराजिंग स्किल्स घरच्या घरी शिकवता येतील. फारतर उदा. खिळे जुळवून छपाई करणारा बाप पोराला ते स्किल शिकवू शकेल. पण ज्या दिवशी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी बदलून डीटीपी येईल, त्या दिवशी पोरगं उपाशी मरेल. हे होऊन चुकलेलं उदाहरण आहे.

स्पेशलायझेशनचा जमाना आहे. लेट टीचींग बी स्पेशलाईज्ड जॉब.

'माणूस' बनवणं, 'बर्डन' कमी करणं. 'इनोसंटली' खेळता येणं. सगळं लै झक्कास आहे हो. पण आई बाप 'गेल्या'नंतर ते इनोसंट बाळ पोट कसे भरणार?

वर बेफिंच्या प्रतिसादास मी फाटा फोडला, (इब्लिस असणे व गांधी विचाराबद्दल आदर असल्याने नाईलाज होता..;) ) पण, त्यांनी मांडलेला विचार बरोबरच आहे असे म्हणेन. ओव्हरॉल 'अ‍ॅफ्लुअन्स' (सार्वत्रिक सुबत्ता) असली तरच 'कमी शिक्षण वा फक्त शालेय शिक्षण' धकून जाऊ शकते. जसे, रिक्षा/ट्रक चालवून पोट भरणे.

ओपन स्कूलींग इ. करून (वर आगाऊंच्या आयबी पद्धती बद्दलचे लेख) पुढील शिक्षण परदेशी घेणे. १२० कोटी लोकसंख्येत किती लोक हे करू शकतील?

***

एक सांगू?

आज महिना अर्धा पाऊण लाख रुपये किमान कमविणारे पालक, ज्यांची मुले प्रिस्कूल मधे जाण्याच्या वयाची आहेत, व ज्यांची कमाई मुलांच्या वयासोबत वाढणार आहे, असा चर्चेचा 'स्कोप' असेल, तर ओपन व नोस्कूल ठीकाय. मग त्या दृष्टिने चर्चा करता येईल..

चर्चा जरूर करूया. पण आधी स्कोप डिफाईन केला तर?

अन हो,

निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावल्याशिवाय प्रौढ माणूस जन्माला येऊ शकत नाही. ते लोप पावायला लावण्यासाठीच तर "शिक्षण" असतं ना?

हर्पेन,

>>
ज्या समाजातील बहुतांश पालकांना आपली मुले, डॉक्टर, इंजीनीअर, मॅनेजर व्हावीत, गेलाबाजार सी.ए, वकील व्हावीत असेच वाटते त्या समाजातील शिक्षकी पेशा स्विकारती मुले ही ईतर काही करायला मिळाले नाही म्हणून शिक्षकी पेशाकडे वळली असण्याची शक्यता फार वाढते...
<<
असहमत.

स्वातंत्र्य मिळाल्या नंतरच्या २ पिढ्यांत सुशिक्षित तरूण बाय चॉईस शिक्षक बनले. माझ्या पिढीतल्या लोकांना अशा शिक्षकांच्या हाताखाली शिकायचे भाग्य लाभले. त्या काळी 'मागता येईना भीक, तर मास्तरकी शीक' अशी म्हण प्रचलित होती, कारण शिक्षकांस मिळणारे तुटपुंजे वेतन. ..अगदी राजपुत्रांचा मास्तर असला तरी द्रोणाच्या पोराला कणिक मिसळलेले पाणीच दूध म्हणून प्यावे लागे Wink

बाजारबुणगे या पेशात येऊ लागले, ते का, अन कधी पासून? लाखो रुपये डोनेशन देऊन डीएडला अ‍ॅडमिशन अन मग तितकेच डोनेशन देऊन प्रायमरी मास्तर होण्याची नोकरी कुणि का करतो? सिंपल रिझन : काम न करता भरपूर पगार. आज खेड्यापाड्यात जाऊन पहा. पूर्वी गावातला मारवाडी व्याजाने पैसे देत असे. आजकाल ते काम मास्तर करतो.

नवव्या यत्तेपर्यंत नापास न करणे, दहावी-बारावीच्या परीक्षेला इंटर्नल इव्हॅल्युएशनच्या गुणांना मिळालेले वाढीव महत्त्व यांचे परिणाम पाहतोय. कदाचित इथे लिहिणार्‍यांपैकी कोणाच्या पाहण्यात या वर लिहिलेल्या गोष्टींमुळे ज्यांना अभ्यास (व्हॉटेव्हर टाइप) करायची गरजच वाटत नाही अशी मुले आली नसतील.
इब्लिस : शहरांतला शिक्षकांची परिस्थिती वेगळी आणि काहीशी दयनीय आहे. निवडणूक, जनगणना, मतदार ओळखपत्र या सगळ्या कामांसाठी शिक्षकांना जुंपले जाते.६०-८० मुलांचा वर्ग हाकायला लागतो. खाजगी शाळांमध्ये हातात मिळणारा पगार पावतीवरील आकड्यापेक्षा कमी असतो. (इथेही खाजगी शिकवण्या घेऊन नोटा छापणारे शिक्षक असतातच.) पण डॉक्टर, इंजिनीयर इतकेच मूल्य (सामाजिक प्रतिष्ठेचे, आर्थिक) शिक्षकी पेशाला मिळायला हवे. They are human resource engineers. तरच शिक्षकी वृत्ती असलेले लोक हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारू शकतील.

'प्रचलित शिक्षा पद्धती सडक पे पडी कुतिया की तरह है, जिसे हर कोई लात मार के चला जाता है' श्रीलाल शुक्ल लिखित राग दरबारीतून साभार!
शिक्षणपद्धती काय आकाशातून पडत नाही ती समाजाच्या गरजेनुसार, त्याच्या सर्व बर्‍यावाईट प्रभावांखालीच बनते. शाळा ही समाजबदलाचा उगम ठरावा अशी अपेक्षा पहिल्या काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होती. पण ते शक्य झाले नाही. शाळांनी समाज प्रभावित करण्याऐवजी उलटे होत गेले आणि याला आपण सर्वच जबाबदार आहोत. त्यामुळे आता शाळा आणि शिक्षक लोकांना काय पाहिजे ते देण्यात गुंग आहेत.
'आजची शिक्षणद्धती' ह्यावर बोलताना 'आमच्या वेळी असं आणि आता काय हे' या रडगाण्याला काही अर्थ नाही. आमच्यावेळी- शिक्षकांचा आदर, पोरं निरागस, शिक्षणाचा आनंद, रॅट रेस नाही; हे सगळं असच्या असं आपल्या आई-वडीलांची पिढी आपल्याबद्दल आणि त्याआधीच्या बेचाळीस पिढ्या त्यांच्या नंतरच्या पिढीबद्दल बोलत आलेली आहे.
आणि हो, हे बर्डन मुलांवर टाकते कोण? ही पद्धती की पालक?

डॉक्टर, इंजिनीयर इतकेच मूल्य (सामाजिक प्रतिष्ठेचे, आर्थिक) शिक्षकी पेशाला मिळायला हवे<<
इतकेच नवे तर याहीपेक्षा वरचा दर्जा शिक्षकास हवा, असे म्हणतो.

Pages