जात आहे... भेटण्याची वेळ कळवाया तिला

Submitted by वैवकु on 7 February, 2013 - 07:19

जात आहे भेटण्याची वेळ कळवाया तिला
व्वा सबब !! ...भेटायच्या आधीच भेटाया तिला...

एकदा हातातला गजरा करूनी हुंगतो
एकदा मी बनवतो कानातला फाया तिला

भरजरी दिलखेच आणिक लाघवी आहे म्हणुन
मी तिच्यासम काफिया केलाय 'शेराया' तिला

कोणत्याही भावनेचा ड्रेस पेहरला तरी
ओढणी असते हवी हसरीच ओढाया तिला

जाणिवा फुलपाखरागत हालक्याफुलक्या तिच्या
मीपणा माझा कसा जमणार पेलाया तिला

विठ्ठलाचा शेर ऐकवताक्षणी बेभानुदे
वेड माझे लागुदे ..अपुलेच वाटाया तिला

__________________________________________

श्री खुरसाले यांची एक रचना वाचली त्याच जमीनीत ही गझल केली आहे
त्यांचे मनःपूर्वक आभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जात आहे ..भेटण्याची वेळ कळवाया तिला
(व्वा सबब !! ...भेटायच्या आधीच भेटाया तिला....)

लै भारी आणि वेगळाच मतला ! वाह ! खूप आवडला...

'या-अंती' शब्द हे मला कृत्रिम वाटतात. शेरात सहजता येण्यासाठी नी, या, मजला-तुजला हे हे शब्द कधी कधी टाळायला हवे, असे मला वाटते. खासकरून रदीफ/ काफिया म्हणून असे शब्द योजताना अनैसर्गिकता उद्भवण्याचा धोका संभवतो, अशी मला भीती वाटते.... ह्यावर तुझे मत काय आहे ?

(अर्थात... असे माझे मत असूनही ही गझल आवडलेली आहेच..!)

प्राजु आणि रसप यांच्याशी सहमत.

पहिले दोन शेर आवडले.
नंतरचे चारही शेर खूपच घाईत लिहिल्यासारखे वाटले.

विठ्ठलाबद्दलच्या शेरातूनही वैवकु दिसले नाहीत तेंव्हा काळजी वाटली.

कृपया गैरसमज नसावा.

वैभव,
>>एकदा हातातला गजरा करूनी हुंगतो
एकदा मी बनवतो कानातला फाया तिला>>>
खूप सुंदर..
>>भरजरी दिलखेच आणिक लाघवी आहे म्हणुन
मी तिच्यासम काफिया केलाय 'शेराया' तिला >>
हेही आवडले.
ड्रेस अन 'हालक्या' मात्र बदलण्यायोग्य वाटलेच.

मतला आवडला.

पण व्वा सबब!! ही पळवाट काही आवडली नाही. खयाल चांगला आहे.

'जमिनी' बघून शेवयांचे मशीन सुरू करू नये, गांभीर्याने शेर करावेत अशी विनंती.

सल्ला आवडला नसल्यास क्षमस्व!

'जमिनी' बघून शेवयांचे मशीन सुरू करू नये, गांभीर्याने शेर करावेत अशी विनंती.>>> Lol १००%सहमत

मतला अफाट झाला आहे वैभव..
म्हणजे भेटण्यातली मजा अगदी रंगून पुढे आली...

काही मिसरे मस्तच आलेत..

मीपणा माझा कसा जमणार पेलाया तिला >> वाह.. फारच खास

व्वा सबब बद्दल विदिपांशी सहमत.

जाणिवा फुलपाखरागत हालक्याफुलक्या तिच्या
मीपणा माझा कसा जमणार पेलाया तिला
>> सुंदर!

सर्वांचे आभार

होय कणखरजी माझ्या हातून तसे झाले आहे खरे गांभीर्यच नाही तर जरासा भावनिकताही कमी पडली शेर मनापासून पेक्षा डोक्याने जास्त झालेत

बेफीजींचा मुद्दा पटला कंस नकोच काढूनच टाकतो आहे त्यास

जितू व प्राजु विशेष धन्स ....... '

ड्रेस' त्यातल्या अर्ध्या "र " अर्ध्या मात्रेमुळे जीभेला बोजड करतो . इथे मी वेष असे करणार होतो पण मग साडी ते जीन्स काहीही येवू शकले असते असे वाटले जे खालच्या ओळीत ओढ्णीला सूट होत नव्हते एकतर ड्रेस ऊस्फूर्तपणे सुचलेला अन "पंजाबी ड्रेस" या अर्थी वापरलाय ...
....झालय काय की या इंग्रजी शब्दामुळे गांभीर्य पार लयाला गेलेय मी पुन्हा वेष बाबत विचार करतोय

शेराया हा शेर डोक्याचा वपर अधिक असा आहे
नवीन शब्द आहे हा ....चित्र चितारणे कापड विणणे.. मूर्ती घडवणे...तर शेर रचणे होय !!
इथे तिला शेरात / शेरस्वरूप साकारणे असे क्रियापद हवे होते मी शेरविणे असे केले त्याचे काफियाच्या गरजे नुसार इतर काफियांप्रमाणे रूप "शेराया" असे झाले
चूक अशी की या नवीन शब्दामुळ्;ए व त्यास तिच्यासम आहे हे दाखवण्याच्या नादात भरजरी इत्यादी विशेषणे देवून बसलो आहे जी आगावू जास्त व चपखल कमी वाटतात पुन्हा गांभीर्य हरवते खरेतर ती कशी आहे हे दाखय्वयच्या नादात काफिया भाव खावून जातो

पण हा शेर वाचकांनी अधीक मोठ्यादिलाने समजून घेत माझी चूक पदरात घालून वाचला तर बदलायची गरज नाही आहे असे वाटते

हालक्याफुलक्या मुळे तो हल्काफुल्का शब्दच जड होवून बसलाय खरा पण कुठेतरी "ते तेरी हासत जगा" असे वाचले त्यावरून हालक्या असे करावेसे वाटले व केल्यावर वावगे वाटले नाही
हलक्याफुलक्या हा शब्द (जरा हा ची सूट घेवून) ..तिच्या जाणिवा -'फुलपाखरागत' असणे.... माझा मीपणा तिला न पेलणे इत्यादी ; यासाठी अनिवार्य वाटतो बदलताही येईल्सा नाही वाटत आही सध्यातरी

जितू तू म्हणतोय्स काफिया बाबत .....
ते शब्द जरा ग्राम्यपणाचा फील देतात...तुला मी नेहमीच प्रमाण भाषेचा आग्रह धरताना पाहिले आहे
असे ग्राम्य / .इंग्रजाळलेले शब्द(_ ड्रेस_)हझलीश मानले जातात ..असेमानंणारा मोठा वाचकवर्ग आहे असे मी ऐकले आहे (इंग्रजी शब्द खास्करून उपरोध वगैरेही दाखवतात कधीकधी) पण तसे काही नसते
सुसंस्कृतपणा ग्राम्य शब्दातूनही व्यक्त करता येतो कित्येकांनी करूनही दाखवला असेल तुझे वाचन माझ्यापेक्षा कितीतरी जास्त व चांगले असल्याने तुला उदाहरणेही माहीत असतील .आठवतीलही
मी या गझलेत सुसंस्कृत्पणा आणायला कमी पडलोय हे ही जाणवूलागलेय
पण अशा काफियांबाबत तू मत बदलावेस व प्रमाण भाषेचाच आग्रह धरणे जमल्यास सोडावेस असे मला वाटते
(राजहंस मधील ती ग्रामीण बाजाचे शब्द असलेली तुझी एक कविता जरा कमी पडली असे माझे जे वैयक्तिक मत आहे त्याचे कारण मला हेच वाटते की ..असे शब्द तुला मनापासून आवडत नसावेत वा दुसर्‍याचे लिहिलेले वाचायला आवडत असतील पण स्वतास तसे लिहायला योजायला फारसे आवडत नसावेत)
पण इतकेच सांगेन की तसे वाटणे व्यक्तिसापेक्ष आहे
व तुला तसे वाटणे यास माझी हरकत नाही आहे
फक्त "आ"या अशा काफियाबाबत म्हणशील तर याच गझलेत फाया हा शब्द आलाय त्याचे उदाहरण बघ
अजून खोलवर फील हवा असेल तर माझी"झोपलेला देश आता जागवाया पाहिजे" ही कविता वाचच अन तुझे हे मत बदलले पण जर "कवितेत चालेल पण गझलेत असे नको" अशा प्रकारचे आहे असे तुला जाणवले समज ..मग तर बदलच असे म्हणेन मी Happy

असो बराच वेळ बोलतोय

थांबतो

वेगळ्याच भावातली गझल वाचायला खूप बरं वाटलं.
मतला जबरदस्तच.
बाकी शेरातले खयाल छान आहेत.
पण वरील काही प्रतिसादांत निर्देश केलेल्या शब्दांबाबत काही प्रमाणात सहमत.

jameen tich asli tari khayal vegle aahet ....aani changli rachna suchlyas tyach jameenit karayla kahich harkat nahi
ase maze mat aahe ...
Gazalevishayi , -- 'bharjari dilkhech' sher aavadla ...pn vitthalachya sherat vaivaku disle nahit , ya Rajiv jinchya matashi mi sahmat aahe ...
Baki chan

Dhanyavaad !!

उकाका जोशी साहेब धन्यवाद

खुरसाले विशेष आभार

विठ्ठलाच्या शेरात वैवकु न दिसणे अपणास जाणवले खटकले त्याबद्दल क्षमस्व
विठठलाच्या शेरात विठ्ठल दिसलाच पाहिजे असा माझा आग्रह असतो वैवकु दिसो न दिसो

त्या धेरात बेभानुदे लागुदे यातील लघु उकारामुळे जरा लवकर उरकल्यासारखा झालाय तो शेर
आधी असा नव्हता तो पण मला कधीकधी उगाचच बदल सुचतात व करावेसे वाटतात

हा शेर आधी असा होता

विठ्ठलाचा शेर ऐकवताक्षणी बेभानते
वेड माझे लागते ..अपुलेच वाटाया तिला

इथेही 'वेड माझे लागते' हा शब्दसमूह तिला माझे वेड लागते असा अर्थ दर्शवतो
मुळात 'विठ्ठलचा शेर' हे जे माझे वेड आहे ते तिला अपलेच वाटू लागवे /वाटू लागते असा अर्थ अपेक्षित आहे

तसा न प्रतीत होत असेल तर मीच कुठेतरी कमी पडलो क्षमस्व

धन्यवाद

________________________

छान गझल आहे.
वै.म. विचाराल तर
मला या-अंती शब्द खटकले नाहीत.
मला ड्रेसही अजिबात खटकला नाही.
मला फाया मात्र खटकला. गजर्‍याचे स्थान नक्कीच योग्य आहे वाचताना कल्पनाचित्र डोळ्यांसमोर आणताना रोमँटिक वाटतेच पण प्रेयसीला/तिच्या आठवणींना फाया बनवणे हे कल्पनाचित्र अजिबातच रोमँटिक वाटत नाही.

हालक्या जरासा खटकला परंतु "या तिच्या नाजूकशा फुलपाखरागत जाणिवा" असे जमू शकेल ( प्रचंड मोठे धाडस करून पर्यायी ओळ सुचविली आहे याची मला जाणीव आहे.)

>जमिनी' बघून शेवयांचे मशीन सुरू करू नये< हा प्रतिसाद मला एखाद्या कामयाब शेरासारखाच बहुपदरी वाटला.

गझल मात्र आवडली.

मुटे सर धन्यवाद

गझलुमिया दिल्खुलास् प्रतिसादाबाद्दल विशेष आभार
मायबोलीवर आपणास कालच पाहिले नवीन दिसत असलात तरी नाही आहात हे प्रतिसादावरून ताडलेच आहे
.....तरीही हार्दिक स्वागत Happy