बाईपण

Submitted by -शाम on 5 February, 2013 - 02:13

चुलीवानी रातदिन गेलं जगणं जळून
नको नको देवराया पुन्हा देऊ बाईपण...

माझ्या वाटणीचा घास भाऊ लाडेलाडे खाई
लई गुणाची गं पोर म्हणे कौतुकानं आई
घास घास कमी झाला रोज रोज कौतुकानं...

बाळे बाळे म्हणू म्हणू मला शिकवलं सारं
कसा घ्यायचा पदर कशी करावी भाकरं
नाही मरत म्हणाली चार हंड्याच्या वझ्यानं...

वसवसली नजर जायी काळजाच्या पार
बहरातल्या कळीचा लागे माऊलीला घोर
लेक उजवण्यासाठी बाप शिवारी गहाण...

बीज पेरून मस्तीत झाला साजन येगळा
भार नव्या अंकुराचा माथी मारून सगळा
उर फुटला तरीही कळा सोसल्या गुमान...

कधी मायबापासाठी कधी लेकरांच्यासाठी
श्वास राखून राखून गाडा संसाराचा रेटी
नाही मोडून पाहिलं चार भिंतीचं कुंपण...

देते फळ, देते छाया तरी बसतो दगड
झाड वठल्यावरीही चाले शेवटी कुर्‍हाड
तसं उरे नशीबात राख होऊन विझणं...

..........................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल शशांकने खूपच आग्रह केल्याने ही कविता पुन्हा पोस्टत आहे..... समग्र स्त्रीजीवन अगदी असंच आहे असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये... पण असंही काही आहे हे मात्र नक्की.

...............................शाम

छान ..... अगदी नेमकं..... पटण्यासारखं.

ग्रामीण विभागात तसेच शहरातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात हे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळतं.

>>माझ्या वाटणीचा घास भाऊ लाडेलाडे खाई
लई गुणाची गं पोर म्हणे कौतुकानं आई
घास घास कमी झाला रोज रोज कौतुकानं...

बाळे बाळे म्हणू म्हणू मला शिकवलं सारं
कसा घ्यायचा पदर कशी करावी भाकरं
नाही मरत म्हणाली चार हंड्याच्या वझ्यानं...

बीज पेरून मस्तीत झाला साजन येगळा
भार नव्या अंकुराचा माथी मारून सगळा
उर फुटला तरीही कळा सोसल्या गुमान...>>>
कमाल आहे शाम,इतक्या सहजतेने इतके विदारक वास्तव चितारलेत.. 'संघर्ष करावा की संयम '' मध्ये नागर शब्दात आलेले भाव इथे विशाल ग्रामजीवनाच्या/उल्हासजी म्हणाले तसं मागास शहरी संदर्भातही भेटले मला..

मात्र भाषा फारच कृत्रिम वाटतेय.>>>>८० % असहमत २०% सहमत(कौतिक ईझनं कुंपन दगुड,वठल्यावरीबी असे अधिक ग्राम्य , शब्दात साठवता आले असते )

भारतीताईंचा प्रतिसाद पट्ला !!

ग्रेट कविता अगदी एखाद्या अभ्यासक्रमात असायला हवी अशी !!

खूप आवडली
धन्स या कवितेसाठी

तू अस्सल लिहीतोस....
मातीतलं जगणं मांडतोस...

लिहीता रहा.. बस्स लिहीता रहा..

ही कविता वाचून खरोखर नि:शब्द व्हायला झालं आहे, शाम.. आणि तू म्हणतोस तसं अजूनही बर्‍याच ठिकाणी हे वास्तव आहे..

रातदिस, लाडीलाडी,शिकिवलं,पदुर,धनी,तरीबी ... असे कितीतरी अगदी ग्राम्य शब्द वापरणे शक्यच आहे..पण मित्रहो हे शब्द सगळीकडे सारखेच आणि त्यातही आजकाल फार वापरले जात नाहीत. असो शेवटी आपण रसिक मायबाप आहात!

धन्यवाद... बागेश्री, भारतीताई, समीर, वर्षा, वैभव आणि शशांक!!! Happy

मात्र भाषा फारच कृत्रिम वाटतेय.>>>>८० % असहमत २०% सहमत(कौतिक ईझनं कुंपन दगुड,वठल्यावरीबी असे अधिक ग्राम्य , शब्दात साठवता आले असते )

वैभवः
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. फारच ची आवश्यकता नव्हती.

शाम, गैरसमज नसावा.

खरंच छान. यथार्थ वर्णन. समीरशी काही प्रमाणात सहमत.
पण मित्रहो हे शब्द सगळीकडे सारखेच आणि त्यातही आजकाल फार वापरले जात नाहीत>>>>जेथे या शब्दांची जन्मभूमी आहे त्या मातीत अजूनही वापरले जातात. (कृ गै न)

तेच म्हंटलं की आधी एकदा ही कविता वाचलेली होती मग माबो प्रकाशनाची तारीख पाच फेब्रुवारी कशी!

मग ते प्रतिसाद वगैरे आठवले.

कविता सुंदरच.

अप्रतिम.....

अन्तर्मुख करुन गेली आप्ली कविता....

one of the best poems that i ever read.....

मला वाटते पुढील सत्यमेव जयते कर्यक्रमा साठी आपली कविता
१दम perfect...

Thanks.....

छान आहे रचना.
कृत्रिम भाषा (लयही अनैसर्गिक) हे खरंच .

कविता अभ्यासक्रमात असावी हे ही पटलं.

फक्त पुन्हा पुन्हा वाचून यात कविता कुठे आहे हे शोधतो आहे.

(पहिली ओळ आणि एक दोन ओळींतली उपमा उत्प्रेक्षा रूपक हे अपवाद. त्यांचंही घासून घासून गद्यात रूपांतर झालेलं. इतर ओळी तर सरळ सरळ गद्यच.) माझ्या कवितांतही हाच घोळ आहे बहुतेक.

अर्थात हे माझं वैयक्तिक मत. फार गांभिर्यानं घेऊ नये.
गैरसमज तर नसावाच नसावा.

Pages