बाईपण

Submitted by -शाम on 5 February, 2013 - 02:13

चुलीवानी रातदिन गेलं जगणं जळून
नको नको देवराया पुन्हा देऊ बाईपण...

माझ्या वाटणीचा घास भाऊ लाडेलाडे खाई
लई गुणाची गं पोर म्हणे कौतुकानं आई
घास घास कमी झाला रोज रोज कौतुकानं...

बाळे बाळे म्हणू म्हणू मला शिकवलं सारं
कसा घ्यायचा पदर कशी करावी भाकरं
नाही मरत म्हणाली चार हंड्याच्या वझ्यानं...

वसवसली नजर जायी काळजाच्या पार
बहरातल्या कळीचा लागे माऊलीला घोर
लेक उजवण्यासाठी बाप शिवारी गहाण...

बीज पेरून मस्तीत झाला साजन येगळा
भार नव्या अंकुराचा माथी मारून सगळा
उर फुटला तरीही कळा सोसल्या गुमान...

कधी मायबापासाठी कधी लेकरांच्यासाठी
श्वास राखून राखून गाडा संसाराचा रेटी
नाही मोडून पाहिलं चार भिंतीचं कुंपण...

देते फळ, देते छाया तरी बसतो दगड
झाड वठल्यावरीही चाले शेवटी कुर्‍हाड
तसं उरे नशीबात राख होऊन विझणं...

..........................................................शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कवितेचं कौतुक करणार्‍या सगळ्या दोस्तांचे मनःपुर्वक आभार!

@ बेफि..>>> तुम्ही कवितेचं काईपण केलं तरी छानच कराल ही खात्री आहेच.

@राजीव मासरूळकर |>>>

कृत्रिम भाषा (लयही अनैसर्गिक) >> १)न्यूनसिद्धांतक बर्नस्टाईनच्या मता नुसार कुठलीही भाषा पुर्णतः शुद्ध वा अशुद्ध असू शकत नाही तसेच ती पुर्णतः नैसर्गिक वा कृत्रिमही असू शकत नाही. प्रमाणभाषाही याला अपवाद नाही. मी वापरलेली भाषा ही माझी बोलीभाषा आहे. ग्रामीण भाषेचे हे बदलते स्वरूपही असेल... किंवा सहज प्रमाण आणि बोली यांची सरमिसळही. मात्र संदेशनाचा उद्देश सफल होत असेल तर मी लिहलेले कृत्रिम आहे असे मी कधीही मान्य करणार नाही. कवितेतील व्यक्तिविशेषाची गुणवैशिष्ट्ये मी या पेक्षा अधीक चांगल्या भाषेत प्रस्तुत करू शकलो नसतो असे मला वाटते.
२) लय म्हणजे शब्दोच्चाराचा वैशिष्ट्यपुर्ण ओघ, हा व्यक्तिपरत्वे वेगळा असू शकतो. ही कविता मी चांगल्या प्रकारे गाऊ शकतो. म्हणजेच ती लयीत आहे..शिवाय आकृती बंधातच हे अष्टक आहे हे सांगने न लगे.

चुलीवानी रातदिन
गेलं जगणं जळून
नको नको देवराया
पुन्हा देऊ बाईपण...

त्यामुळे अष्टकास असणारा नैसर्गिक ठेका किंवा लय या कवितेस साजेशी आहेच आहे.

फक्त पुन्हा पुन्हा वाचून यात कविता कुठे आहे हे शोधतो आहे,
पहिली ओळ आणि एक दोन ओळींतली उपमा उत्प्रेक्षा रूपक हे अपवाद. त्यांचंही घासून घासून गद्यात रूपांतर झालेलं,

आणि इतर ओळी तर सरळ सरळ गद्यच म्हणजे सरळ सरळ कविता पद्यच आहे असेच ना? तरीही
"कविता अभ्यासक्रमात असावी हे ही पटलं" म्हणता म्हणजे आपण नक्कीच भानावर नाही आहात...
माझ्या कवितांतही हाच घोळ आहे बहुतेक.>>> ते तुमचं तुम्ही पहा ना ? त्याचा इथं काय संबंध?

अर्थात हे माझंही वैयक्तिक मतच . फार गांभिर्यानं घेऊ नये.
आणि गैरसमज तर नसावाच नसावा. आपले मार्गदर्शन माझ्या काव्यप्रवासात मोलाचे ठरावे. असेच लक्ष असूदेत.
.........................................शाम

शाम सोप्प्या शब्दांत 'बाई'पणाचं एक विदारक रूप. मला अगदी पहिल्या शब्दापासून सापडली लय. सुरेख.. खरच सुरेख.

(पहिली ओळ आणि एक दोन ओळींतली उपमा उत्प्रेक्षा रूपक हे अपवाद. त्यांचंही घासून घासून गद्यात रूपांतर झालेलं. इतर ओळी तर सरळ सरळ गद्यच.) >>>>> Lol

.असेच लक्ष असूदेत.>>>> Rofl

......या पलिकडची कविता पहायला शिकाल अशी अपेक्षा करू का तुमच्या़ कडून मासरूळ्कर? Happy
असो !!

शामजी तुमचा प्रतिसाद आवड्ला Happy

Pages