मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग १..

Submitted by सेनापती... on 3 February, 2012 - 10:19

१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !

मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. अर्थात त्यांना पकडून देण्यात सर्वात मोठा हात होता 'गणोजी शिर्के'या त्यांच्याच म्हेवण्याचा. इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला.

१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभूराजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. घोरपडे खरंतरं पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण छत्रपति शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेवर असताना १६७७ मध्ये गोवळकोंडा येथून म्हालोजी घोरपडे यांना त्यांनी एक पत्र लिहिलेहोते. पत्रात राजे म्हणतात,'आदिलशाही पठणाचे हातात गेली. आता आदिलशाही कैची?' पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत झाले. संताजी-धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.

२ फेब्रुवारी १६८२ - छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...

३ फेब्रुवारी १८३२ - रामोशी जातीमधील 'उमाजी नाईक खोमणे' यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. १८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत ... !!!

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन सिंहगड स्वराज्यात परत आणला. गडावर किल्लेदार उदयभानु राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. अंधारातच त्यांनी कडा चढून सर केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता...

दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.

नकळत हात छातीकडे जात आपण म्हणतो ... 'मुजरा सुभेदार' ...!!!

५ फेब्रुवारी १७६६ - पेशवे माधवराव आणि हैदराबादच्या निजमाची कुरूमखेड येथे भेट.

८ फेब्रुवारी १७१४ - 'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपति शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह करवला.

८ फेब्रुवारी १६६५ - स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील 'बिदनूर'वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले.

१६६४ मध्ये सिंधुदुर्गाची पायाभरणी, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांची मजबूती वाढवल्यावर सिद्दी आणि पोर्तुगीझ यांच्यावर मराठ्यांची पकड़ बसू लागली होती. आपले सागरी वर्चस्व सिद्ध करण्याकरता अश्या मोहिमेची आवशक्यता मराठ्यांना होती. या मोहिमेत मराठ्यांनी 'बिदनूर' मधून विजापुरकडे जाणारा २ करोड़ होन इतका खजिना लूटत मोहिम यशस्वी केली.

क्रमश...
मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग २.

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सेनापती,
एखाद्या प्रसंगावर तू मोठा नाट्यपूर्ण लेख (कथेच्या अंगाने ) लिहू शकशील. त्यातले तपशील जबाबदारीने भरशील एवढे नक्की.
आता वरचेच चित्र बघ, त्यातले कपडे, भिंती, साखळदंड यांचे तपशील भरल्याने किती जिवंत वाटतेय ते !

आता या निमित्ताने माझी एक अपूर्ण इच्छा लिहूनच टाकतो. आपले गड ज्यावेळी नांदते होते, त्यावेळी तिथे काय काय होते याचे साधे कल्पनाचित्रदेखील मी कधी बघितले नाही. म्हणजे समज बाजार असेल, तर बाजारात काय विकायला असे. तो माल कसा मांडला असेल, त्यांचे कपडे कसे असतील, ग्राहक कसे असतील, वाहतूकीची, पिण्याच्या पाण्याची, करमुणीकीची काय साधने होती.

एखाद्या प्रसंगावर तू मोठा नाट्यपूर्ण लेख (कथेच्या अंगाने ) लिहू शकशील. त्यातले तपशील जबाबदारीने भरशील एवढे नक्की.

>> दिनेशदा.. इथे मी पन्हाळा, आग्रा प्रकरण आणि अश्या अजून १-२ महत्वाच्या गोष्टींवर असा लिहायचा प्रयत्न केलेला आहे. अजूनही नक्की लिहेन. तुमच्या मनात जे आहे 'गड राबता असणे' ते पण लिहायचा प्रयत्न करतो.. Happy

मंगेशा... देईन मी इथे एक धागा सुरू करीन त्यासाठी.. Happy

अगदी प्रभावी मांडणी आणि त्यामुळेच "इतिहास" या घटकाकडे सदस्य-वाचक खेचला जाऊ शकेल इतका अभिमानास्पद आवाका असलेला हा मागोवा म्हटला पाहिजे. इतिहासाची अशी महिनावार ओळख करून देताना लेखक श्री.सेनापती यानी वापरलेली भाषा ही त्यांचा या विषयाचा व्यासंग तर दर्शवितेच पण त्याचबरोबर वाचकाला आणखीन यापुढे अशा विषयावर जास्त वाचायला उद्युक्त करते हे एक फार मोठे यश असते, जे आलेल्या प्रतिसादातून सार्थ प्रकटले आहेच.

मी फार वेळाने हा धागा पाहिला. तारखानुसार घडलेल्या घटनांवर विविध मते आल्याचे पाहून आनंदही झाला. इतिहासाच्या गुहेत शिरताना आपल्याला फक्त हवा असलेलाच गारवा लाभतो असे नसून प्रसंगी काही कटू सत्यही पचवावे लागते. त्याला इतिहास काही करू शकत नाही. आपण केवळ ते असे का झाले किंवा का होऊ शकले नाही इतपतच मत मांडू शकतो.

श्री.सेनापती यानी वरील एका प्रतिसादात याला अनुलक्षून इतिहासाचा आणखीन् खोलवर शोध घेण्याचे अभिवचन दिले आहे, तितकी स्फूर्ती आणि उत्साह त्याना निश्चित लाभेल. क्षमता आहेच हे त्यानी या आणि 'पानिपत' धाग्यावर सिद्ध केले आहेच.

मला त्यांच्यासोबत या गुहेत प्रवेश करायला नक्की आवडेल.

अशोक पाटील

छान

अशोकदा.. Happy आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद.. Happy आपणही वेळोवेळी आमच्या ज्ञानात योग्य भर घालावी ही विनंती.. Happy
आपल्या सोबतचा इथला प्रवास निश्चितच मला अधिक सुजाण करून सोडेल यात मला शंका उरलेली नाही.. Happy

आज ४ फेब्रु ....

<<<<४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. अंधारातच त्यांनी कडा चढून सर केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला.>>>

तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा

धन्यवाद रोहन , सुंदर धागा

उत्कृष्ठ लेखमाला, दर महिन्याला येऊ द्यात !

रोहनराव काही लेखक (विश्वास पाटील) 'सूर्याजी जेधे' यांचे नाव घेतात तर काही लेखक (कमल गोखले) 'रंभाजी पवार' यांचे नाव रामसेजचा किल्लेदार म्हणून घेतात. तर बरेच लेखक म्हणतात कि तत्कालीन कागदपत्रात उल्लेख सापडत नाहीत.याबद्दल नक्की माहिती सांगता येईल का ?

तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा>>काल तान्हाजी चित्रपट पाहिला. काही ऐतिहासिक गोष्टींची पडताळणी करण्यासाठी हा धागा उघडला. छान लेख आहे.

Pages