मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग १..

Submitted by सेनापती... on 3 February, 2012 - 10:19

१ फेब्रुवारी १६८९ - 'छत्रपति संभाजी महाराज' मुघलांच्या तावडीत ... !

मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला. अर्थात त्यांना पकडून देण्यात सर्वात मोठा हात होता 'गणोजी शिर्के'या त्यांच्याच म्हेवण्याचा. इंग्रज, पोर्तुगीझ, मुघल अश्या बलाढ्य शत्रूंना पराभूत करणाऱ्या सिंहाच्या छाव्याला अखेर स्वकियांनी धोका दिला.

१ फेब्रुवारी १६८९ हां तो दिवस... ज्यादिवशी शंभूराजे कैद झाले आणि सरनौबत म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. घोरपडे खरंतरं पिढीजात आदिलशाहीचे चाकर. पण छत्रपति शिवरायांनी म्हालोजींना आपल्याकडे वळवले. 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेवर असताना १६७७ मध्ये गोवळकोंडा येथून म्हालोजी घोरपडे यांना त्यांनी एक पत्र लिहिलेहोते. पत्रात राजे म्हणतात,'आदिलशाही पठणाचे हातात गेली. आता आदिलशाही कैची?' पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत झाले. संताजी-धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.

२ फेब्रुवारी १६८२ - छत्रपति शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील 'रामशेज' किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार 'रंभाजी पवार' यांनी किल्ला १-२ महिने नव्हे तर तब्बल ६ वर्षे नेटाने लढवला. अखेर १६८८ मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला...

३ फेब्रुवारी १८३२ - रामोशी जातीमधील 'उमाजी नाईक खोमणे' यांना पुण्यातील मामलेदार कचेरीच्या आवारात इंग्रजांनी फासावर लटकावले. १८१८ नंतर संपूर्णपणे इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाल्यावर उमाजी नाईक यांनी आपल्या साथीदारांसोबत पुन्हा एकदा लढा सुरू केला. मात्र ते १८२६ साली पकडले गेले. त्यांच्यावर खटला चालवून त्यांना इंग्रजानी फासावर लटकावले. उमाजी नाईक हे खऱ्याअर्थाने स्वातंत्र्ययुद्धाचे पहिले हुतात्मे आहेत ... !!!

५ फेब्रुवारी १६७० - 'सुभेदार तानाजी मालुसरे' यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन सिंहगड स्वराज्यात परत आणला. गडावर किल्लेदार उदयभानु राठोड आणि त्याच्या हाताखाली सुमारे १५०० सैनिक होते. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य नवमी) रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. अंधारातच त्यांनी कडा चढून सर केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी हा किल्ला जिंकायचे प्रयत्न केले. हातघाईच्या लढाईमध्ये जबर जखमी होउन ते मृत्यू पावले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता. त्याक्षणाची राजे राजगडावरुन आतूरतेने वाट बघत होते. तो इशारा बघताच राजे कदाचित मनातल्या मनात म्हणाले सुद्धा असतील,'तानाजीने आधी कोंढाण्याचे लग्न लावलेच.' पण तेंव्हा राजांना माहीत कुठे होते की कोंढाण्याचे लग्न लावता-लावता त्यांचा बालसखा तानाजी आपला मुलगा रायबाचे लग्न न लावताच दूर निघून गेला होता...

दुसऱ्या दिवशी राजे सिंहगडावर पोचले तेंव्हा त्यांना ही बातमी मिळाली. अत्यंत दुख्खी अश्या राजांनी आपल्या तानाजीचे शव त्यांच्या 'उमरठ' (पोलादपुरजवळ) या गावी पाठवले. ज्यामार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता 'मढेघाट' या नावाने ओळखला जातो. तानाजी गेले त्या जागेवर त्यांचा 'विरगळ' स्थापन केला गेला आहे. शिवाय एक सुंदर स्मारक सुद्धा उभे केले गेले आहे. स्मारकामध्ये असलेला त्यांचा भरदार मिशांचा अर्धाकृती पुतळ्यासमोर उभे राहिल्यावर ऊर अभिमानाने भरून येतो.

नकळत हात छातीकडे जात आपण म्हणतो ... 'मुजरा सुभेदार' ...!!!

५ फेब्रुवारी १७६६ - पेशवे माधवराव आणि हैदराबादच्या निजमाची कुरूमखेड येथे भेट.

८ फेब्रुवारी १७१४ - 'सरखेल कान्होजी आंग्रे' आणि 'छत्रपति शाहू महाराज' यांच्यात वळवंड, लोणावळा येथे तह. १७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट (कोल्हापुर आणि सातारा गादी) पडल्यावर कान्होजी आंग्रे कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणे कारभार सुरु केला होता. पुढे त्यांचे बालमित्र असलेले 'पेशवे बाळाजी विश्वनाथ' यांनी त्यांचे मन वळवून सातारा गादी बरोबर तह करवला.

८ फेब्रुवारी १६६५ - स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील 'बिदनूर'वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले.

१६६४ मध्ये सिंधुदुर्गाची पायाभरणी, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग यांची मजबूती वाढवल्यावर सिद्दी आणि पोर्तुगीझ यांच्यावर मराठ्यांची पकड़ बसू लागली होती. आपले सागरी वर्चस्व सिद्ध करण्याकरता अश्या मोहिमेची आवशक्यता मराठ्यांना होती. या मोहिमेत मराठ्यांनी 'बिदनूर' मधून विजापुरकडे जाणारा २ करोड़ होन इतका खजिना लूटत मोहिम यशस्वी केली.

क्रमश...
मराठा इतिहास दिनविशेष ... फेब्रुवारी महिना... भाग २.

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे मधेच कधीतरी कुठे तरी लिहिण्यापेक्षा सलग एकत्र लिहून काढलेस तर मस्त काम होइल सेनापती.

सेना कलेक्षन माहीती मस्तच आहे ...पण एक फुकटचा सल्ला देवु का मित्र म्हणुन ?
सनावळ्यांमधे अडकलेला इतिहास कोणालाच आवडत नाही ....त्या पेक्षा त्या प्रसंगाला अनुसरुन एखादी छोटीशी कथा / लेख टाकलास तर फारच मस्त होईल.
.
(मागे माझ्या एका मित्राने १४ जानेवारी मकरसंक्रांतीच्या निमित्ताने एक लेख लिहिला होता ....पानिपतावर ...
त्याचा इतका मनावर प्रभाव झालाय की त्यानंतर एका ही संक्रांत्रीला तिळगुळ देवुन घेवुन तोंड गोड करायची इच्छा होत नाही )

मित्रा... मला मान्य आहे. ज्या घटनांवर लेख लिहिता येणे शक्य अश्या घटनांवर मी लेख लिहित असतो की.. Happy ह्यातीलही काही घटनांवर लिहेन पुढे... आणि अजून एक पानीपतवर पण एक लेख लिहितोय.. होईल बहुदा २-३ दिवसात तयार.. Happy

छान माहीती सेनापती. Happy
>>औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला.<<
माझ्या माहीती प्रमाणे 'मुकर्रबखान' ह्या अदिलशाही सरदाराला 'संभाजीला' पकडल्यानंतर, औरंगजेबाने "शेखनिजाम" हा किताब दिला होता.

अत्यंत छान माहिती. तानाजी मालुसरेंबद्दल वाचुन खरच मराठा असल्याचा अभिमान वाटला. Happy

जय जय महाराष्ट्र माझा!
गर्जा महाराष्ट्र माझा!

सेनापती,

बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांच्या बाजूने होता, नाहीका? कान्होजींचा समेट कोल्हापूरकरांसोबत घडवला गेला असला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

वेताळ... मुकर्रबखान ही पदवी आहे. तर शेखनजीब हे नाव आहे. (शेखनिजाम नव्हे) माझ्या वाचनात हीच माहिती आहे. आपल्या माहितीचा कृपया संदर्भ द्यावा..
वरील माहितीसाठी आपण बेन्द्रेंचे संभाजी नाहीतर जदुनाथांचे shivaji & his times बघू शकता.

गा.पै.
होय.. बरोबर. बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांच्या बाजूने होता. मी तेच तर लिहिले आहे वर. आणि मग समेट कोल्हापूर कारांबरोबर कसा घडेल? कळले नाही... बाळाजी कान्होजीचा समेट कोल्हापूरकरांबरोबर कसा करेल? त्याने तर 'धनाजी जाधव'ला सुद्धा शाहूकडे वळवले कारण एके काळी बाळाजी धनाजी जाधवचा सर कारकून होता.

ईनमीन तीन आणि टोकुरिका... धन्यवाद.. Happy

सनावळ्यांमधे अडकलेला इतिहास कोणालाच आवडत नाही ...>> अनुमोदन आणि सेनापती दिनविशेष (रोजचाच) जाणून घेऊन काय करणार? मग तो शालेय इतिहास होतो. इतिहास आवडतो तो त्या त्या घटनांमधून. ती काम करणारी माणसं कोणत्याही दिवशी तशी काम करून दाखवतील. डेट केवळ योगायोग. Happy

सेनापती,
मस्त! ईथे दिल्याबद्दल धन्यवाद! लगे रहो..
मला तरी हा विशेष घटना/तारखांचा फॉर्मॅट जाम आवडलाय.
गंमत म्हणजे घटना लक्षात राहिल्या नाही राहिल्या तरी कॅलेंडरवरील तारखांच्या रूपाने या घटना स्मरणात रहायला मदत होते. किंबहुना माझी एक नम्र विनंती. तुम्ही असेच तारीख अनुशंगाने लिहीत जा, नंतर त्याचे एकत्रीकरण करायला ईथलेच काही सभासद मदतनीस घेवून (विशेषत: ज्यांना इतिहासाबद्दल कळवळ आहे असे वर लिहीले आहे) एक विशेष फॉर्मॅट तयार करता येईल.
मी तर म्हणतो आपण सर्वांनी कालनिर्णय बरोबरच असे मराठा इतिहासाचे विशेष कॅलेंडर बनवून आपल्या भिंतींवर टांगावे. ईतर जयंत्या आणि पुण्यतिथ्या पहाण्यापेक्षा या विशेष घटनांच्या तारखा जरा स्मरणात ठेवुयात?

>>सनावळ्यांमधे अडकलेला इतिहास कोणालाच आवडत नाही ....त्या पेक्षा त्या प्रसंगाला अनुसरुन एखादी छोटीशी कथा / लेख टाकलास तर फारच मस्त होईल
प्रगो,
थोडा संकुचित वाटतोय दृष्टीकोन!

ज्ञानात अजून भर पडली,
सेनापती, इतिहासातील एक एक व्यक्ती उलगडून लिहिलीत तर ज्ञानात अजून भर पडेल.

ही शंका चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. कृपया दुर्लक्ष करणे! अधिक स्पष्टीकरण इथे आहे.

सेनापती,

बाळाजीने कान्होजींना शाहूच्या (कोल्हापूरकर) बाजूने वळवले. हे शाहूकडे वळवणं नक्की कश्या रीतीने पार पडलं? यामुळे शाहूचा राजेपदावरील अधिकार दृढ झाला हे नक्की. तर मग ताराबाईसोबर झालेला तह कोणत्या स्वरूपाचा होता?

मला वाटतं तह हा शब्द जरा गोंधळात पडणारा आहे. तह शत्रूशी करतात, नाहीका? इथे कान्होजी स्वतंत्र होते. मग ताराबाईशी (सातारकर) संबंध कसा आणि कुठे येतो? (मी वापरलेला) समेट हा शब्दही कदाचित गोंधळात टाकू शकतो. काही त्रिपक्षीय वाटाघाटी झाल्या का?

आ.न.,
-गा.पै.

केदार.. मान्य.. डेट केवळ योगायोग...

पण मग आपण वाढदिवस वर्षातून कधीही साजरे करतो का? तसेच आहे ना... प्रत्येक घटना आणि तारीख यांचा संयोगाने मिलाफ झालेला असतो. मला मान्य आहे की सनावळ्या कोणालाच आवडत नाहीत. अगदी शाळेत असताना मलाही आवडायच्या नाहीत.. Lol

मी घटना आणि व्यक्ती यांच्यावर लिखाण करायचा प्रयत्न करीन. अर्थात माझ्या माहिती आणि कुवतीनुसार.. Happy

सनावळ्यांमधे अडकलेला इतिहास कोणालाच आवडत नाही ....त्या पेक्षा त्या प्रसंगाला अनुसरुन एखादी छोटीशी कथा / लेख टाकलास तर फारच मस्त होईल

>>> काही लेख मी इतिहास विभागात टाकलेले आहेत आणि ह्यापुढेही लिहित जाईन... धन्यवाद.. Happy

योग... मराठा इतिहासाचे विशेष कॅलेंडर...

>>> असे एक पुस्तक गेल्यावर्षी बाजारात आले आहे. त्यात सर्व ३६५/३६६ दिवसांचे मराठी महत्व लिहिलेले आहे... मजेस्तिक मध्ये मिळेल..

बाळाजीने कान्होजींना शाहूच्या (कोल्हापूरकर) बाजूने वळवले.

>>> गामा... आपल्या दोघांचा शाहूबद्दल गोंधळ उडाला आहे का? Happy मी बोलतोय संभाजीचा मुलगा जो औरंगजेबाच्या ताब्यात होता आणि १७०७ ला सुटका होऊन छत्रपती पद मागायला परत आला. ह्याचा कोल्हापूर बरोबर काही संबंध नाही. हा सातारा गादीचा संस्थापक ठरला. सातारा आणि कोल्हापूर यांच्यामध्ये कुठलाही तह १७१८ आधी झाला नाही. वरती जो तह मी म्हणतोय तो शाहू (सातारा) आणि कान्होजी आंग्रे (मराठा आरमार - स्वतंत्र कारभार) यांच्यात झाला. यान्वये शाहूचे (सातारा) बळ वाढून ताराबाईचे बळ कमी झाले.

सेनापती,

माझी चूक! मी ताराबाईंना सातार्‍याच्या समजून चाललो होतो आणि थोरल्या शाहूंना कोल्हापुरी! खरंतर उलट आहे. ताराबाई कोल्हापूर गादीच्या संस्थापिका आहेत आणि थोरले शाहू सातार्‍याच्या गादीचे.

गोंधळाबद्दल क्षमा असावी!

आ.न.,
-गा.पै.

सेना, छान लिहील आहेस. इतिहास म्हटला की सनावळ्या टाळता येत नाहीत. शक्य झाल्यास प्रत्येक महीन्याचा एक लेख केलास तर उत्तम किंवा मग आठवड्याचा कालावधी घेऊन. तुला जे योग्य वाटेल आणि झेपेल ते. सल्ले द्यायला आमचं काय जातय ? Proud
प्रगो, पंतपणा दाखवून वंशावऴ मांडलीस आख्खी. Happy

प्रसाद.. Happy संपूर्ण वंशावळ हवीये का?

कौतुक.... ही आख्खी नाही बर का वंशावळ.. Wink
हो रे. शक्यतो एका महिन्याचे २ भाग करतोय. आधी काही महिन्यांचे विशेष दिले होते ते धाग्यात शेवटी टाकतो.. तेवढीच रिक्षा... Lol

प्रसाद, वरील वंशावळीत बरेच दत्तक असतील ना?
शाहू महाराज ३ रे, त्यांचे वंशज, व पुढे उदयनमहाराज यांचा कालखंड काय?
सवाई माधवरावांसाठी सातार्‍याहून पेशवाइची वस्त्रे आणवली म्हणे. तेंव्हा कोण होते सातार्‍यात महाराज? नि ताराबाईंना अटकेत टाकले, त्यानंतरच्या वंशजांनी काय केले? त्यांचा राजकारणात काय हातभार?

वंश कधी संपुष्टात आला?

सेनापती......... लाख धन्यवाद!!
सनावळ्यांचा तसे घाबरण्यासारखे नाही पण लेख वा त्यातील उतारे घटनेच्या क्रमाने आले तर लक्षात ठेवायला खुप सोपे जाईल.

चान्गले संकलन Happy चान्गला उपक्रम. जमेल तितके कराच!
>>>> सनावळ्यांमधे अडकलेला इतिहास कोणालाच आवडत नाही .... <<< मान्य, तरीही हे काम करुन ठेवणे देखिल अत्यावश्यक, कारण इतिहास कालसापेक्ष समजुन घेतल्याशिवाय त्यातुन अक्कल मिळणेही दुरापास्त, मिळालीच तर केवळ तत्कालिक करमणूक अन रक्त सळसळवुन घेणे, पुन्हा निद्रिस्त होण्यासाठी.

Pages