१९८५ फ्रेंच ओपन फायनल.. ख्रिस एव्हर्ट विरुद्ध मार्टिना नवरातिलोव्हा.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जुन ८, १९८५ ची पॅरिसच्या वसंत ऋतुच्या उत्तरार्धातील एक दाट धुक्याची एक रम्य सकाळ.... त्या सकाळच्या दाट धुक्यातुत पॅरिसचा आयफेल टॉवर नुकताच डोके वर काढत होता व अचानक सर्व पॅरिसला पाहता पाहता काळ्या ढगांनी वेढा घातला. परत एकदा सबंध पॅरिस शहर त्या ढगांच्या छायेने अंधारुन गेले. पॅरिसमधे जुन महिन्यामधे येत असलेली व अल्पकाळच टिकणारी ही रेन स्टॉर्म्स पॅरिसवासीयांना नवी नाहीत.. पण अश्या रेन स्टॉर्म्स व त्या स्टॉर्म्समधे व त्यानंतर घोंगावणार्‍या वार्‍याने...पॅरिसमधे त्याच सुमारास होणार्‍या रोलँड गॅरसवरच्या फ्रेंच ओपन स्पर्धेच्या इतिहासात... भल्या भल्या टेनिस पटुंची भंबेरी उडवुन दिलेली आहे.आणी तुम्हाला त्याची साक्ष हवी असेल तर जा आणी विचारा त्या जिमी कॉनर्सला...नाही तर जॉन मॅकेन्रोला अथवा बोरिस बेकरला किंवा पिट सँप्रासला... आणी स्टिफान एडबर्गला... इतकच कशाला? जा विचारा त्या रॉजर फेडररला.. ते सगळे साक्ष देतील की ते कोणाशीही टेनिसमधे चार हात करायला कचरत नसतील.. पण या पॅरिसच्या वसंतातिल घोंगावणार्‍या वार्‍याबद्दल मात्र त्यांच्या मनात प्रचंड भिती(का घृणा?)आहे. त्या घोंगावणार्‍या वार्‍याने.. पॅरिसच्या रोलँड गॅरसवर त्यांच्या सर्व्ह अँड व्हॉली गेमची नेहमीच दैना उडवली आहे. त्याची साक्ष म्हणजे त्या सगळ्यात मिळुन ते जवळ जवळ ५० च्या वर ग्रँड स्लॅम चँपिअनशिप्स त्यांच्या गळ्यात मिरवत आहेत.. पण तुम्हाला त्यामधे एकही फ्रेंच ओपन चँपिअनशिप दिसणार नाही...

तर अश्या रेन स्टॉर्मने सुरु झालेल्या त्या दिवशी थोड्याच वेळाने रोलँड गॅरसवर..महिलांच्या टेनिसमधली अंतिम स्पर्धा सुरु होणार होती. त्या अंतिम स्पर्धेत एकमेकांसमोर उभे राहणार होते... प्रथम सिडेड मार्टिना नवरातिलोव्हा व द्वितिय सिडेड ख्रिस एव्हर्ट. आता १९७५ ते १९८७ पर्यंत ज्यांनी कोणी टेनिस फॉलो केले आहे त्यांना हे द्रुष्य अजिबात नविन नव्हते. त्या १२ वर्षात या दोघींमधेच बहुतेक फायनल्स व्हायच्या...किंबहुना त्या दोघांमधली रायव्हलरी स्पोर्ट्समधल्या कुठल्याही नावाजलेल्या रायव्हलरिजपैकी सर्वात गाजलेली रायव्हलरी म्हणता येइल. कदाचित मोहमद अली..जो फ्रेझिअर ही बॉक्सींगमधली किंवा जॅक निकल्स-आर्नॉल्ड पामर ही गॉल्फमधली किंवा लॅरी बर्ड-मॅजिक जॉन्सन ही बास्केटबॉलमधली रायव्हलरी.. या त्यांच्या जवळ जाउ शकतील पण सबंध स्पोर्ट्समधली ग्रेटेस्ट म्हणुन.. या दोघींमधली ही रायव्हलरी अजरामर झाली आहे. नुसते आकडेवरीच सांगायची झाली तर आजचा फायनलमधला त्यांच्यातला हा सामना त्यांच्यामधे होत असणारा ६४ वा सामना होता! त्या दोघी एकुण ८० सामने एकमेकांबरोबर खेळले व त्यातले ६० सामने हे अंतिम फेरीतले होते...

तर त्या साठातलाच एक... असा हा फ्रेंच ओपन फायनलचा सामना पाहायला माझ्यासारखे बरेच टेनिसप्रेमी जगभर टिव्हीला खिळुन बसले होते.१९७५ पासुन या दोघींमधल्या ज्या अनेक फायनल्स मी पाहील्या आहेत त्या प्रत्येक फायनलमधे का कुणास ठाउक पण मला नेहमी संयमी,शांत व एकदम फेमिनिन अशी ख्रिस एव्हर्टच जिंकावी असे वाटे. आजचा दिवसही त्याला अपवाद नव्हता. पण आजपर्यंत ग्रँड स्लॅम फायनल्समधे.. एक दोन अपवाद वगळता.. नेहमी मार्टिनाचीच सरशी होत असे. रोलँड गॅरसमात्र त्याला अपवाद होते. इथल्या स्लो कोर्टवर व विंडि कंडिशन्स मधे ख्रिस एव्हर्टला नुसत्या सर्व्ह अँड व्हॉलिच्या अग्रेसिव्ह खेळाने नमवणे सोपे काम नव्हते. ख्रिस एव्हर्टचे डाउन द लाइन मारलेले अचुक पासिंग शॉट्स व हलक्या हाताचे लॉब व ड्रॉप् शॉट्स हे इथल्या स्लो सरफेसवर आतापर्यंत तिला ५ फ्रेंच ओपन विजेतेपदे देउन गेली होती. त्यामुळे त्या दोघींमधे याआधी इथे झालेल्या २ फायनल्स त्या दोघींनी एक एक अश्या वाटुन घेतल्या होत्या. आजची फायनल ही त्या दोघींमधली इथली तिसरी फायनल होती.

पण हा सामना सुरु व्हायच्या आधीपासुनच का कुणास ठाउक पण मला असे सारखे इंट्युएशन होत होते की आजच्या फायनलमधे ख्रिस एव्हर्ट बाजी मारणार. १९८५ च्या वर्षाची सुरुवात माझ्या दृष्टीने खुपच चांगली झाली होती कारण नुकतेच ३ महिन्यापुर्वी आपल्या भारताने सुनिल गावस्करच्या धूर्त नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामधे जाउन बेन्सन अँड हेजेस हा मिनी वर्ल्ड कप जिंकला होता. व या वर्षी माझी आवडती ख्रिस एव्हर्ट फ्रेंच ओपनअमधे बाजी मारुन मला वर्षातला दुसरा सुखद अनुभव देणार असे मला राहुन राहुन वाटत होते. झालच तर आदल्याच दिवशी मी पुरुषांच्या उपांत्य फेरीमधे.. जॉन मॅकेन्रो व जिमी कॉनर्स या सर्व्ह अँड व्हॉलीमधे त्याकाळी सर्वोत्तम म्हणुन प्रसिद्ध असलेल्या...दोन्ही मात्तबर टेनिसपटुंचा... अनुक्रमे मॅट्स विलँडर व इव्हान लेंडलने... ३ स्ट्रेट सेट्समधे उडवलेला धुव्वा पाहीला होता. त्यामुळे सर्व्ह अँड व्हॉली मधे माहिर असलेल्या मार्टिनाची पण आज तिच गत ख्रिस एव्हर्ट करणार असेच मला वाटत होते.

पण असे वाटणे व त्या वाटण्यासारखे घडणे.. असे किती वेळा बरे आपल्या आयुष्यात होते? आतापर्यंतच्या त्या दोघींमधल्या लढतींवरून मार्टिनाचा तसा धुव्वा उडणे सोपे नाही याचा मला बोध न होण्याइतका दुधखुळा तेव्हा मी नक्कीच नव्हतो.. पण मन कसे असते बघा....तुम्ही आशावादी असाल तर आयुष्यात एखादा प्रयत्न करताना ९९ वेळा जरी अपयश आले तरी १०० वा प्रयत्न करताना आपल्याला वाटतच असते.. की या वेळेला आपण नक्कीच यशस्वी होउ! आज इथेही तसाच काहीसा प्रकार होता. आतापर्यंतच्या त्या दोघींमधल्या १० ग्रँड स्लॅम फायनल्स मधे ८-२ असे मार्टिनाचे पारडे जड होते. पण या दोघींमधले सामने बघताना मला नेहमी असेच वाटायचे की ऑन एनी गिव्हन डे.. या दोघींपैकी कोणिही जिंकु शकते.. जसे छापा.. काट्याच्या खेळात प्रत्येक वेळेला नाण उडवताना छाप्याची किंवा काट्याची प्रॉबेबिलिटी ५०-५० % असते.. जरि आधिच्या १० वेळापैकी ८ वेळा छापा आला असला तरी..

तर अश्या पार्श्वभुमीवर हा सामना ८ जुन १९८५ च्या दुपारी पॅरिसच्या १ वाजता सुरु झाला.आणी ३ तासानंतर जेव्हा हा अटितटिचा सामना संपला तेव्हा रोलँड गॅरसव हजर असलेल्या १०,००० प्रेक्षकांच्या व जगभर टिव्हीवर खिळुन हा सामना पाहणार्‍या कोट्यावधी दर्शकांना कळुन चुकले की आज ते या दोघींमधे आजपर्यंत झालेल्या सगळ्यात अटितटिच्या व रोमहर्षक सामन्याचे साक्षिदार होते! .. माझ्यासारखे ज्यांनी ज्यांनी या दोघींमधले १९७६ व १९७८ चे विंबल्डनचे अंतिम सामने, १९८१ चा ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना व हो.. १९८४ चा यु एस ओपनचा या दोघींमद्हला अंतिम सामना पाहीला होता.. त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते की या दोघींमधे त्या सामन्यापेक्षाही रोमहर्षक व अटिततिच्या सामन्याचे आपण परत साक्षिदार असु!

पहिला सेट सुरु झाला. पण पहिल्या गेमपासुनच मार्टिनाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पहिल्या ३ ही गेममधे मार्टिनाकडे गेम पॉइंट होता... मी व सर्व ख्रिसचाहते पॅनिक मोडमधे...पण त्याने ती पॅनिक झाली असती तर आयसिकल कूल ख्रिसी.. असे नाव ख्रिस एव्हर्टला उगीचच मिळाले असते का? व तिच्या टोपन नावाला जागुन तिने ते तिनही गेम पॉइन्ट्स वाचवले व स्वतः मार्टिनाची सर्व्हिस भेदुन उलट ख्रिस एव्हर्टनेच ते पहिले तिन गेम घेउन ३-० असा लिड घेतला. माझ्यासारख्या ख्रिस एव्हर्टच्या पाठिराख्यांना त्याने दिलासा मिळाला व सामन्याच्या सुरुवातीला होत असणारी नर्व्हस चुळबुळ कमी व्हायला त्याने थोडी मदत झाली:) पण त्या कमी झालेल्या चुळबुळीने पुढच्या ३ गेमनंतर परत उचल खाल्ली.... कारण पुढचे ३ गेम मार्टिनाने आपल्या चपळ कोर्ट कव्हरेजने व वेगवान सर्व्ह अँड व्हॉलीने.. डोळ्याचे पाते लवतो न लवतो तेवढ्यात गिळंकृत केले.. स्कोर ३-३! ही म्हणजे पुढे उलगडत जाणार्‍या बॅक अँड फोर्थ.. सि सॉ बॅटलची नांदीच होती. पण पुढच्या १५ मिनिटांमधे ख्रिस एव्हर्टच्या अचुक लॉब्स व डाउन द लाइन शॉट्सने मार्टिनाला कोर्टभर पळवले व हा हा म्हणत परत एकदा ख्रिसने पुढचे ३ गेम्स जिंकले व पहिला सेट ६-३ असा आपल्या खिशात टाकला.

दुसर्‍या सेटची सुरुवात प्रत्येकीने आपली सर्व्हिस गमावुन केली. खर म्हणजे त्या रोलँड गॅरसवरच्या घोंगावणार्‍या वार्‍याने मार्टिनाच्या सर्व्हिसचा र्हिदमचाच घोळ झालेला होता. तेवढेच नाही तर त्या वार्‍याची भिती बाळगत ती साइड लाइनला चाटुन जाउ शकतील अश्या संध्या असुनही तसे पासिंग शॉट्स न मारता ती ड्रॉप शॉट्सचा जास्त उपयोग करु लागली . बट ड्रॉप शॉट वॉज नॉट हर फोर्टे! व ख्रिसने आपल्या चपळाइचा उपयोग करुन तिचा प्रत्येक ड्रॉप शॉट हंट डाउन केला व हा हा म्हणता मार्टिनाचा सर्व्हिस गेम चालु असताना ४-२ व ४०-१५ असा लिड घेतला. पण परत एकदा सामन्याला अचानक कलाटणी मिळाली.. या वेळेला त्याचे कारण होते मार्टिनाला तिच्या वेगवान व भेदक सर्व्हिसचा सूर गवसला व त्याचा पुरेपुर उपयोग करत आता मार्टिनाने सेट तिच्या बाजुने फिरवला व बघता बघता ती ५-४ अशी पुढे गेली व १० व्या गेममधे ख्रिस एहर्टच्या सर्व्हिसवर तिच्याकडे दुसर्‍या सेटसाठि सेट पॉइंट होता . पण एका जबरदस्त व तिचे पॅटंट असलेल्या अश्या डबल हँडेड बॅक हँड शॉटने ख्रिस एव्हर्टने तो सेट पॉइन्ट वाचवला व तो गेम जिंकुन ५-५ असा सेट बरोबरीत आणला. पुढच्याच गेममधे मग ख्रिसने मार्टिनाची सर्व्हिस भेदुन ६-५ असा लिड घेतला व मॅचसाठी तिने १२ वा गेम सर्व्ह करायला चालु केला.. इथे मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.. की चला.. आता हा गेम जिंकला की गेम्-सेट- मॅच व चँपिअनशिप फॉर ख्रिस एव्हर्ट!

पण आपल्या आवडत्या टेनिसपटुने असा पटकन व सहजासहजी टेनिस सामना जिंकला म्हणा.. किंवा आपल्या आवडत्या क्रिकेट प्लेयरने... नव्वदित असताना.. आपला जिव इथे टांगणिला लागलेला असताना.. पटकन चौकार मारुन शतक पुर्ण केले म्हणा.... असे कधी झाले आहे का? छ्या....अजिबात नाही!तुम्हीही खर सांगा अश्या गोष्टी तुम्हीही अनुभवल्या आहेत का कधी?... असल्या असंख्य प्रसंगी...... म्हणजे बघा...आपला आवडता खेळाडु सामना जिंकेल की नाही .. किंवा या बाबाचे शतक पुर्ण होइल की नाही...... असा विचार करत टिव्हिसमोर बसलेले असताना...माझ्या मनाला लागलेल्या घोराने.. माझे आयुष्य.. कमीत कमी ५ वर्षांनी तरी घटलेले आहे अशी माझी ठाम समजुत आहे..:)

आणी तुमच्यापै़की बर्‍याच चाणाक्ष वाचकांनी लगेच ओळखल असेल ... मर्फिज लॉ प्रमाणे.. ख्रिस एव्हर्टने.. मॅचसाठी.. म्हणजे चँपिअनशिपसाठी सर्हिस करत असताना.. तो गेम ०-४० असा (लव्ह गेम) गमावला व दुसरा सेट टायब्रेकरमधे नेण्यात मार्टिनाला मदत केली.... व टायब्रेकरमधे जे व्हायचे तेच झाले.. मार्टिनाच्या प्रभावी सर्व्हिसच्या बळाअर तिने दुसरा सेट टायब्रेकरमधे घेतला व सामना वन सेट ऑल असा बरोबरीत आणला.....झाल... परत एकदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली... ग्रँड स्लॅमच्या याही अंतिम सामन्यात.. परत एकदा मार्टिनाच बाजी मारुन जाते की काय? मला तुमचे माहीत नाही पण मग असे विचार मनात आले की मला आवडत असलेल्या खेळाड्ची मलाच चिड येते.... ही मेंटली स्ट्राँगच नाही.. किंवा हा नेहमी ऐन वेळेला असेच अवसान गाळतो.. किंवा याला आलेल्या संधिचा फयदा कधिच उठवता येत नाही.. वगैरे वगैरे...

मग असे मनातल्या मनात ख्रिस एव्हर्टला बरीच नावे ठेवल्यावर परत एकदा मी सामन्याकडे मन लावुन लक्ष देउ लागलो. कारण तिसर्‍या सेटच्या पहिल्याच गेममधे ख्रिस एव्हर्टने मार्टिनाची सर्व्हिस भेदुन १-० असा लिड घेतला. व माझ्या मनातल्या आनंदाने परत एकदा उकळी घेतली. पण माझी ती आनंदाची उकळी उतु जायच्या आतच मार्टिनाने ख्रिसची सर्व्हिस भेदुन तिला ३-३ असे गाठले व मला परत आकाशातुन जमिनीवर आणले... असे ख्रिसला गाठताना तिने जिंकलेल्या प्रत्येक विनर्सला.. मार्टिना चित्कारुन.. यस्स्स्स्स्स.. असे म्हणत.. आपल्या मुठी क्लिंच करुन.. मॅचमधले आपले ते छोटे छोटे विजय साजरा करत होती. ख्रिस मात्र जाणुन बुजुन त्या चित्कारांकडे दुर्लक्ष करुन आपल्या चेहर्‍यावरचा नेहमीचा शांत व गंभिर भाव तसाच ठेवत होती. आत तिच्या मनात जरी चलबिचल व विचारांची घालमेल होत असली तरी ती वर चेहर्‍यावर कधीच दिसु न देण्यात ख्रिसचा हात कोणीच धरु शकल नसत... मॅचमधले स्वतःचे तसले छोटे छोटे विजय चित्कारुन किंवा मुठी क्लिंच करुन ती कधीच साजरी करायची नाही.

पण स्वतःचा पुढचा सर्व्हिस गेम हेल्ड केल्यावर ख्रिसने मार्टिनाची सर्व्हिस परत एकदा भेदली व ५-३ अशी पुढे गेली व आता ती मॅचसाठी परत एकदा सर्व्हिस करत होती व सबंध मॅचमधे प्रथमच तिने यस्स्स... असे ओरडुन व मुठी आवळुन.. स्वतःला झालेला आनंद सेलिब्रेट करायला वाट मोकळी करुन दिली.. इट वॉज सो अनचॅरेक्टरस्टिक ऑफ हर टु डु लाइक दॅट! बट अलास! पुढचाच व आपलाच स्वतःचा सर्व्हिस गेम ती हरली व स्कोर ५-४ असा झाला. मग मार्टिनाने आपला सर्व्हिस गेम सहज जिंकुन ५-५ अशी बरोबरी केली व नंतरच्या ख्रिसच्या सर्व्हिसगेमवर पहिले ३ पॉइंट्स घेउन ०-४० अशी पाळी ख्रिसवर आणली.. व परत एकदा माझे धाबे दणाणले... परक एकदा टिव्हिसमोरुन उठुन उभ राहुन माझ्या येरझार्‍या चालु झाल्या.. त्या सामन्यातल्या.. टिव्हीसमोरच्या त्या माझ्या कितव्या येरझार्‍या होत्या याचा मी काउंटच विसरलो... पण मी इथे असा नर्व्हस झालो असताना.. मार्टिना तिकडे.. नको तितकी.. रिलॅक्स झाली.. व परत एकदा ती.. तिला खास येत नसलेले.. कारण नसताना.. ड्रॉप शॉट्सचा उपयोग करु लागली . त्यात सपशेल तोंडघशी पडुन तिने मिळालेले अ‍ॅडव्हांटेज घालवले. ख्रिसने आपल सर्व्हिस गेम जिंकुन ६-५ असा लिड घेतला. असा हातातोंडाशी आलेला गेम घालवल्यामुळे त्याची परिणती मार्टिनाच्या फ्रस्ट्रेशनमधे झाली व तिच्या पुढच्या सर्व्हिस गेममधे स्कोर ड्युस(४०-४०) असा झाला. त्या स्कोरवर ख्रिस एव्हर्टने मग एक जबरदस्त फोरहँड क्रॉस कोर्ट रिटर्न केला . त्या रिटर्नवर मार्टिना फक्त बाहेर व्हॉली मारण्याशिवाय काहीच करु शकली नाही.. आता...गेम्,सेट,मॅच व चँन्पिअनशिप पॉइंट फॉर ख्रिस! मार्टिनाच्या सर्व्हवर.. त्या मॅच पॉईंट्ला मग ख्रिसने असा काही बॅक हँड डाउन द लाइन शॉट मारला की मार्टिना फक्त त्या टेनिस रॅकेटरुपी चाबकाच्या फटक्याने मारलेल्या बॉलकडे नुसते पाहतच राहु शकली .. व मान मागे करुन तिने मग एक दिर्घ उश्वास टाकला व लगेचच खिलाडुवृत्ती दाखवत नेटकडे धावत येउन .. तिला हरवणार्‍या ख्रिस एव्हर्टला येउन तिने अभिनंदनाची मिठी मारली...

इकडे टिव्हीसमोर .. गेल्या ३ तासात झालेल्या त्या सामन्यातल्या चढ उताराने.. मीच मेंटली एक्झॉस्ट होउन गेलो होतो. पण माझी आवडती खेळाडु जिंकल्याच्या समाधानाने मी तृप्तही झालो होतो. ट्रॉफि प्रेझेंटेशनच्या वेळचे ख्रिसच्या चेहर्‍यावरचे समाधानही बघण्यासारखे होते. तिचे ते ट्रॉफि उंचावुन.. व नंतर गुढ्घ्यात किंचित वाकुन.. प्रेक्षकांना बाउ डाउन करण्याचे ख्रिस एव्हर्टचे ते रुटिन.. माझ्या मनात कायमचे घर करुन गेले आहे.त्या रुटिनसारखेच हा सामनाही माझ्या स्म्रुतिपटलावर कायमचा घर करुन गेला आहे.तर असा हा अविस्मरणिय सामना.. माझ्या मते त्या दोघींमधलाच नाही.. तर आतापर्यंतचा महिलांमधला सगळ्यात अविस्मरणिय टेनिस सामना होय. अश्याच सामन्यांमुळे या दोघींची रायव्हलरी,, स्पोर्ट्समधली ग्रेटेस्ट रायव्हलरी म्हणुन ओळखले जाते.

विषय: 
प्रकार: 

ज..ब..री. अगदी डोळ्यासमोर संपूर्ण मॅच उभी केलीत. माझ्यासारख्या खेळाची फारशी आवड नसलेल्यांना तुमच्या लिखाणाने जर इतकी भुरळ पडत असेल तर मग क्रिडाप्रेमींबद्दल बोलायलाच नको.

अगदी डोळ्यासमोर संपूर्ण मॅच उभी केलीत. >> अनुमोदन. Happy ८५-८६ नंतरची टेनीस पाहणारी आमची पिढी. ख्रिस आणि मार्टीना, बोर्ग-मॅकेन्रो वैगरेंच्या सर्व मॅचेस पाहिल्या नाहीत. पण ज्या काही पाहिल्या, त्या मस्त होत्या.

४३-३७ अशी ही लढत सुटलेली आहे. पण कोणीही वर जाउ शकत होते. मार्टीना पुरूषी फटक्यामुळे मला जास्त आवडली नाही. Happy

कसले जबरी लिहिले आहेस! मस्त एकदम! Happy
पुढचा लेख कधी?

सही लिहिलंय मुकुंद... ख्रिस - मार्टिना रायव्हलरी जास्त बघायला मिळाली नाही पण स्टेफी - मार्टिना मात्र बघितली आहे...

मुकुंद,एकदम सही.. ती मॅच मला पहायला मिळाली नाही पण तुमच्या या लेखातुन ती मॅच अगदी डोळ्यासमोर उभी राहिली.. हा लेख लिहिताना त्या मॅचचा क्षण अन क्षण पुन्हा एकदा तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहिलाय हे पदोपदी जाणवलं... Happy

सुरेख लिहिले आहे, मुकुंद. खरंच मॅच डोळ्यासमोर उभी राहिली...

जमल्यास त्या दोघांचा एक एक फोटो टाका... लेख परिपूर्ण होईल... Happy

मस्त वर्णन आहे मॅचचे. या दोघीतील एक दोनच सामने बघायला मिळाले आहेत आणि तेव्हा एवढी माहिती नव्हती.

कमीत कमी ५ वर्षांनी तरी घटलेले आहे >>> त्या प्रत्येक हुकलेल्या, झालेल्या शतकांएवढ्या वेळा अनुमोदन Happy

जबरीच !!!! मस्त लिहिलय एकदम...

विचारांची घालमेल होत असली तरी ती वर चेहर्‍यावर कधीच दिसु न देण्यात ख्रिसचा हात कोणीच धरु शकल नसत >>>>> बर्‍याच प्रमाणात सँप्रस आणि थोड्याफार प्रमाणात स्टेफी ग्राफ पण.. Happy

गेल्या ३ तासात झालेल्या त्या सामन्यातल्या चढ उताराने.. मीच मेंटली एक्झॉस्ट होउन गेलो होतो. >>> आजकालच्या नदाल्-फेडरर मॅचेस पहाताना पण असच होतं..!

ख्रिस एव्हर्ट च्या मॅचेस मी कधी live बघितल्या नाहित... कधी कधी जून्या मॅचेस टिव्हीवर दाखवतात त्या आणि आता यु-ट्यूब वर मिळतील तेव्हड्या...
त्यामूळे तुमच्या लेखांमधून आम्ही मिस केलेलं बरच काही मिळेल असं वाटतय.. Happy

अप्रतीम लेख !
पूर्वी मिशिगनमधे असताना, तिथल्या लायब्ररीमधे ख्रिस वि. मार्टिना च्या जुन्या सामन्यांची कॅसेट मिळाली होती. त्यात ह्या सामन्याचे हाय-लाईट्स पाहिले होते. आणि हाय-लाईट्स असल्या कारणाने फारच थोडक्यात गुंडाळलं गेलं होत.
मात्र तुमचं लेखन एकदम रोमंचक आहे. आणि वाचून अगदी बाजूला बसुन सामना पाहिल्याच फिल आलं.

मुकुंद खूपच सुंदर लिहिता तुम्ही.
मी ख्रिसची खूप चहाती (फॅन) आहे. ख्रिस व जिमी कॉनर्स यांचे सत्तरच्या दशकातले अनेक फोटो व त्यांच्या त्यावेळच्या रोमान्सची वर्तमानपत्रातली कात्रणे अजून माझ्याजवळ आहेत. आता ते वाचताना खूप मजा येते.
हिस्टरी चॅनलवर ख्रिसवर खूप अप्रतीम एपीसोड केला होता.

अप्रतिम लेख... मी ही मॅच पाहिल्याचं आठवतंय Happy
पुन्हा एकदा पूर्ण सामना डोळ्यासमोर उभा केलात. धन्स..
आता यू ट्युबही बघतो.

मुकुंद,
पहील्या पानावर असलेले पहीले वाक्य आणी विषय वाचल्यावाचल्या खात्री पटली हा लेख तुमचाच म्हणून!
पुन्हा एकदा अप्रतीम!!!!

वा! मस्त! लेख खूप आवडला. आख्खा सामना डोळ्यासमोर उभा केलात, अगदी टीव्हीसमोर येरझार्‍या घालणार्‍या लेखकासकट. Happy

ज ब र दस्त !!

मस्त लिहीता तुम्ही मुकुंद !! डोळ्यासमोर उभे केलेत सगळे क्षण ! धन्यवाद ! Happy