अवतार

Submitted by शैलेंद्रसिंह on 15 January, 2013 - 22:52

महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो....

सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का? पण दिखाऊपणा त्याला अजिबात आवडतच नाही....तो धावता धावता तीन तासात डोंबिविलीहुन पुण्याला सहज जातो...आरामात...आणि फ़ुकटात....घाम येऊन त्याचे कपडे खराब होतील असंही नाही.

एकदा त्याने शंभर दिवसांचा उपवास ठेवला होता...तीन महिने अन्न-पाण्यावाचुन राहिला...आणि एकदा एका लग्नाला बुफ़े जेवणाच्या वेळी तो तीन तास जेवत होता....शेवटी सगळं संपलं म्हणुन थांबला.

त्याला जगातल्या सगळ्या भाषा अवगत आहेत...तो नुसताच बोलु शकत नाही तर प्रत्येक भाषेच्या साहित्यावर लेक्चर देऊ शकतो. कुठलाही अंक त्याने एकदा पाहिला की तो विसरत नाही. त्याला संपुर्ण लॉग टेबल पाठ आहे १३ डिजीट्स पर्यत.

तो अनेकदा माउंट एव्हरेस्टवर जाऊन आलाय....जाऊन काय म्हणायचं...त्याच्या शिखरावरुन खाली येतांना तो धावत धावत आलाय.

खरंतर कलियुगात झालेला कल्की अवतार तो हाच. पण मला सोडुन कोणालाही ते कळालेले नाहीये. जगात असलेला त्याचा एकमेव मित्र...म्हणजे मी. त्याच्याकडे इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत की त्याला मित्र जमवायला वेळच मिळत नाही. अवतार असला तर काय झालं....काळाची बंधनं त्याला मनुष्यरुपात पाळावीच लागतात.

पण ह्या अवतारामधे कल्कीला नक्की काय करायचं आहे हे अद्याप कळालेलंच नाहीये. त्याला मी अनेकदा विचारायचा प्रयत्न केला..पण म्हणतो की खरंच त्याला कळालेलं नाहीये. त्याच्यामते तो जे ही करेल त्याने मनुष्यजातीचा उद्धारच होईल.

त्याच्याशी मी नेहेमी चर्चा करतो...समाजाच्या अवनितीबद्दल...भ्रष्टाचाराबद्दल... तो ऐकल्यासारखं करतो आणि लगेच विषय बदलतो. नितीमुल्यांचे अवमुल्यन हा जणु त्याच्यासाठी प्रश्नच नाही. द्वापारयुगात अर्जुनाला गीता सांगतिली, विश्वाचं रहस्य त्याच्यासमोर उलगडलं तसंच कधीतरी मलाही काही उपदेशाचे बोल ऐकायला मिळतील ह्या अपेक्षेत मी नेहेमीच असतो. पण त्याच्या विचारांमधे प्रगल्भता अशी कधी नसतेच. जे असते ते फ़क्त अचाट सामर्थ्याचे प्रदर्शन.

त्यादिवशी तो घरी आला. आम्ही गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता कंटाळा आला म्हणुन म्हटलं की चला जरा लॉंग ड्राइव्हला जाऊन येऊ.

तो गाडी चालवत होता..मी बाजुला बसलो होतो. अचानक समोरुन एक ट्रक भरधाव आला....अपघात अटळ होता...मरण निश्चित दिसु लागले...पण तेव्हढ्यात कल्कीने गाडी अक्षरक्ष: हवेत उंच उडवली आणि ट्रकच्या वरुन आम्ही पुन्हा रस्त्यावर आलो. फ़क्त काही क्षणांतच मरणाच्या दारात जाऊन परतल्यासारखे वाटत होते...हृदयाची स्पंदने वाढली होती...घाम फ़ुटला होता. कल्की ने रस्त्याच्या बाजुला नेऊन गाडी थांबवली. गाडीत असलेली पाण्याची बाटली मला दिली. पाणी पिऊन थोडं बरं वाटलं. एक कृतज्ञतेचा भाव माझ्या मनात दाटुन आला होता..कल्कीचे मी आभार मानु लागलो. खरंतर खुप औपचारिकता शब्दांमधे जाणवत होती....पण मला ते बोलावेसे वाटत होते.

"आज तु जर नसतास, तर माझी दुनियेतुन गच्छंती अटळ होती. तुझे आभार मानावेत तेव्हढे कमीच. खरं सांग तु माझ्यावर इतका कृपादृष्टी ठेऊन का आहेस? जगात तुला दुसरा मित्र मिळालाच नाही कधी?"

"गप रे...फ़ालतु मधे सेंटी नको मारुस. कृपादृष्टी, आभार...कसले मोठे मोठे शब्द वापरतोस रे. आणि आपली मैत्री काय मी निवडली आहे? आपण शेजारी...तुझ्यानंतर १५ दिवसांनी मी जन्मलो, एकत्रच वाढलो...एकत्र खेळलो..दुसरं कधी होतंच कोण?

"कोणीही नव्हतं? शाळा, कॉलेज, शेजारपाजारचे इतकी मुलं...कोणाशीच मैत्री करावीशी वाटली नाही? बघावं तेव्हा आपल्या दुनियेत. आज ह्या झाडावरुन उडी घेतली...उद्या कारबरोबर धावायची स्पर्धा केलीस..तुझं काहीतरी वेगळंच असायचं"

"बरं मग? मला त्यातच मजा वाटते..मी काय करणार?"

"खरं सांगु? तुझ्या बोलण्यावरुन कधीही तु अवतारी पुरुष वाटत नाहीस. अचाट ताकदीचा स्टंटमॅन वाटतो."

"बरं..मग?"

"मग काय? तु मलाच का सांगितलंस की तुच तो अवतारपुरुष कल्की आहे? खरं सांग. प्लिज"

"कसला चिवट आहेस रे तु..मी तुला सांगितलं कारण तु मला सगळ्यात जवळचा आहेस आणि तु हे कोणाला सांगणार नाहीस म्हणुन. माझ्या शक्ती मी तुझ्यापासुन लपवु नाही शकलो कधी."

"पण तुझ्या शक्तींचा उपयोग काय? कार डिलरशिप मधे सेल्स मॅनेजरची नोकरी करण्यात तुला आयुष्य वाया घालवायचं आहे का?"

"पोटापाण्यासाठी करावंच लागतं....आणि शक्तीचा उपयोग म्हटलंस तर आताच वाचवलंय मी आपल्या दोघाना"

"अरे पण इतके लोकं आहेत जगात...गरीबीने पिचलेले, इतके शोषित समाज आहेत. त्यांना काय उपयोग तुझ्या शक्तीचा?"

"किती वेळा हा प्रश्न विचारणार आहेस?"

"जोवर तु उत्तर देत नाहीस तोवर...आणि असली सामान्यांसारखी उत्तरं देऊ नकोस...तुच होतास ना गीता सांगणारा?"

"मग काय तुला पुन्हा गीता ऐकवू?"

"नाही...तु फ़क्त माझ्या प्रश्नांच उत्तर दे."

"तर ऐक मग...तुला जे जग दिसतं ते मला दिसत नाही. आपल्या जाणिवा वेगळ्या आहेत. ज्या ऐहिक दृष्टीकोनातुन सुख-दु:ख बघतोस तो मला हास्यास्पद वाटतो. कोणी गरीब म्हणुन तो दु:खी असं मला वाटत नाही."

"हे तर नुसते शब्दांचे बुडबुडे आहेत...ज्याला दिवसरात्र काबाडकष्ट करुन पोटभर खाताही येत नाही अशी लोकं एकीकडे...आणि ज्यांना जेवण पचत नाही म्हणुन डायट कंट्रोल करणारी लोकं दुसरीकडे...असं का?" माझ्यातला समाजवादी जागा झाला होता.

"बरं...मग तुला काय वाटतं? मी प्रत्येकाच्या पोटापाण्याची व्यवस्था करावी? अरे जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा हवा, पाणी ह्यांचा प्रबंध केलाच ना? स्वत:चे अन्न मिळवावे म्हणुन थोडे कष्ट पडले तर मला दोष?"

"प्रश्न नुसत्या अन्न-पाण्याचा नाहीये. श्रमप्रतिष्ठेचा पण आहे. मरमर कष्ट करणारा कष्टकरी...त्याची समाजात काय प्रतिष्ठा असते? लाचारीचं जीवन असतं त्याचं."

"प्रतिष्ठा, लाचारी वगैरे गोष्टी तुम्ही मानवांनी निर्माण केल्यात....आणि त्यात स्वत:ला गुरफ़टवुन घेतलंय..त्यात माझी काय चुक?" प्रथमच काहीतरी गुढ अर्थ असल्यागत कल्की बोलल्याचे मला जाणवले.

"बरं मग एक सांग....तुला स्वत:ला असं अपमानास्पद आयुष्य चालेल?"

"अपमानास्पद? हा शब्द मला लागुच होत नाही. पुन्हा सांगतो ह्या गोष्टी तुम्ही निर्माण केल्यायत. आणि तुम्हाला त्या करता येतात ह्याचं स्वातंत्र्यच मुळात मी दिलंय. नवनिर्मीतीचं स्वातंत्र्य मी मनुष्याला सर्वाधिक दिलंय. त्याचा बरावाईट उपयोग करणं हे तुमच्या हाती आहे...त्यातुनही सृष्टीचा तोल ढळला मी अवतार घेतोच सगळं ठीक करायला. मुळात तु जो विचार करतोयेस ना...तोसुद्धा माझ्याच निर्मीतीचा आविष्कार आहे. मनुष्य ही माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे."

"एक साधी गोष्ट आहे...तु काहींना खुप दिलंस आणि काहींना काहीही नाही. मेळघाटात कुपोषणाने बळी जातोय...इथे शहरांमधे खाऊन खाऊन लोकं माजलेत. हा पण तुझ्या नवनिर्मीतीचा आविष्कार म्हणायचा की काय?"

"मी दिलं?"

"काही श्रीमंत घरात जन्म घेतात, काही गरीब घरात...काहींना जन्मत: अपंगत्व असतं...हे कशामुळे?"

"हे बघ, मी फ़क्त ह्या सृष्टीचा रचनाकार आहे. मी फ़क्त प्रक्रिया बनवल्या आहेत ज्यामुळे ही सृष्टी टिकुन राहिल. जन्म-मृत्यु हा त्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्या प्रक्रियेमधे काय होतं ह्यात मी तोवर ढवळाढवळ करत नाही जोवर माझ्या सृष्टीला धोका निर्माण होत नाही. गरीब श्रीमंत ह्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत. अपंगत्वाबद्दल म्हणशील तर जीव जन्माला येण्याच्या प्रक्रियेतही काही अपघात होऊ शकतात, त्यामुळे तसं होऊ शकतं..जन्माला आल्यानंतर जसे लोकं अपघाताने अपंग होतात, तसाच हा काहीसा प्रकार आहे."

"आमच्या जीवनात ये काही होतं त्यावर तुझं काहीही नियंत्रण नाही असं म्हणायचंय तुला?"

"अर्थात...काहीही नियंत्रण नाही. मी सृष्टीची निर्मीती करतांनाच अशी योजना केलीय की सृष्टीतले प्रत्येक सजीव, निर्जीव, वातावरण हे एकमेकांना पुरक ठरुन सृष्टी टिकवुन ठेवतील. मानव हा ह्या सृष्टीत निर्माण केलेला निर्मीतीक्षम जीव. मी पुन्हा सांगतो सृष्टीला धोका निर्माण झाल्यावरच मी ढवळाढवळ करतो"

"तुच म्हणतोस ना...की मानव निर्मीतीक्षम आहे? हो आहोत आम्ही निर्मीतीक्षम...आम्हीच कदाचित आमच्या जीवनात नवनवे प्रश्न निर्माण केले आहेत. सुख-दु:ख सगळे आम्हीच आमच्या जीवनात निर्माण केलेत. आम्ही आमच्या मायावी जगात जगतोय. पण त्या जगाला ठिक करायची क्षमता आमच्यात नाही ना..आम्ही अतिमानवी शक्ती घेऊन अवतार नाही ना घेऊ शकत. ह्या आम्हीच निर्मीलेल्या आमच्या समाज-जीवनाला सुधरवायची क्षमता आमच्यात कुठे दिलीस तु?"

"तुला काय वाटतं? मार्क्स, गांधी कसे निर्माण होतात? तुमच्यातुनच एखादा उठतो आणि सुधार आणतोच ना? मार्क्स-गांधी निर्माण मी नाही करत. तुमच्याच समाजातुन ते निर्माण होतात. तुमच्याकडे क्षमता सगळ्या आहेत, फ़क्त काहींनाच त्याची जाणीव होते, काहींनाच नेमकं काय चाललंय ते कळते आणि ते तुमच्या जगाला सुखकर बनवायचा प्रयत्न करतात."

"म्हणजे आम्ही नेहेमीच कुठल्यातरी गांधीची वाट पाहत रहायची...नाही का?"

"तेच तर म्हणतोय मी...तुमच्या प्रत्येकात गांधी बनायची क्षमता मी दिलेली आहे. तुम्हाला जे बनायचंय ते तुम्ही बना. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही."

"बरं मग तुझं अवतार प्रयोजन काय? मला तर वाटायला लागलंय की देवही आता आमच्या मदतीला येणार नाही."

"माझ्या अवताराचं प्रयोजन? मी मानवजातीच्या उद्धाराला आलेलो नाहीये. धर्माच्या उद्धारासाठी आलोय?

"धर्म मानवनिर्मीत नाहीये?"

"धर्म म्हणजे तुला काय वाटतं?"

"धर्म म्हणजे नीती-संस्कार-आध्यात्म-नियम"

"वरवर पाहता हे तसंच वाटतं...पण ह्यांचा उगम कुठे आहे?"

"कुठे म्हणजे? आमच्या मानव-समाजात लोकांनी एकमेकांशी गुण्यागोविंदाने रहावे म्हणुन आम्हीच निर्माण केलेल्या गोष्टी आहेत ह्या"

"हेच सगळे तुमचे भ्रम असतात. धर्म ही मानवनिर्मीत गोष्ट नाही. मानवच काय ह्या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट सृष्टीच्या नियमांना बांधील आहे. ती तशी रहावी ह्याचा प्रबंध मी आधीच केलेला आहे. त्या प्रेरणा मी प्रत्येक सजीव-निर्जीवामधे टाकलेल्या आहेत. आणि त्या प्रेरणेतुनच धर्माचा उदय होतो. पण मानव ती प्रेरणा विसरत चाललेत...किंबहुना आपल्या नव्या जगात इतके गुरफ़टलेत की त्या प्रेरणा त्यांना महत्वाच्या नाही वाटत. त्यातुनच सृष्टीचा तोल ढळलाय"

"हे जरा विनोदी वाटतयं...इतकी मोठी सृष्टी...इतके ग्रह-तारे..मानवाला ह्या विश्वात स्थान तरी आहे का? तुझ्या सृष्टीचं रुप पाहिल्यावर किती खुजेपणा जाणवतो हे तुला नाही कळायचं...मानवामुळे सृष्टी धोक्यात येऊच शकत नाही...फ़ारफ़ार तर पृथ्वी धोक्यात येईल...आणि त्यामुळे काही फ़रक पडेल अशातला काही भाग नाहीये. आम्ही आधीही नव्हतो आणि नंतरही कदाचित नसु. सृष्टी तर चालतच राहिल"

"तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना?"

"असं कशावरुन?"

"मी म्हणतोय की मनुष्य माझी सर्वोत्कृष्ट निर्मीती आहे आणि तु म्हणतोस की मनुष्यावाचुन सृष्टी चालेल? अरे हे जे ग्रह-तारे दिसताहेत ना तुला...त्या सगळ्यांच्या प्रभावातुन मी पृथ्वी आणि त्यावरील मनुष्यसृष्टी निर्माण केलीय. ह्या पृथ्वीला नष्ट करु देईल मी?"

"मग तु काय करायचं ठरवलं आहेस? तुझं अवतार-कार्य काय?"

"माझं अवतार कार्य? ऐकायची हिंमत आहे?"

"हो..सांग"

"मनुष्यजातीचा अंत."

"काय? आताच तर तु म्हणालास की तुझी सर्वोत्कृष्ट निर्मीती?"

"हो..आजवरची सर्वोत्कृष्ट..पण यापुढे यापेक्षा चांगली निर्मीती होणार नाही असं नाही. मानवी समाजाचा अंत हेच माझं कार्य...एका नवीन जीवाचा उदय व्हायची वेळ आहे ही."

"मग? तो जीव निर्माण झालाय? कुठे आहे?"

"मीच तो. तुला मी अमानवी वाटतोय ना? आहेच मुळात...माझ्यात अनेक अमानवी शक्ती आहेत..माझे अवतारकार्य फ़क्त त्या शक्तींची चाचपणी करणे एव्हढंच आहे."

"म्हणजे आमचा अंत जवळ आहे तर."

"हो..अर्थात त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्हीच आपापसात लढुन मराल. पण त्याआधी तुमच्या मारामाऱ्यांना पुरुन उरेल असे सजीव सृष्टीत निर्माण करायला हवा."

"म्हणुन त्या नवीन जीवाला इतक्या शक्ती दिल्यात तर"

"फ़क्त तेच एक कारण नाहीये...मानवाला मी थोडे दुर्बल बनवले होते...तो सृष्टीवर खुप अवलंबुन होता...पण आपल्या अस्तित्वासाठी मग तो सृष्टीचेच लचके तोडु लागला. नवा जीव शक्तीशाली असेल. त्याला स्वत:च्या अस्तित्वासाठी सृष्टीला ओरबाडावे लागणार नाही."

"आता ह्यावर काय म्हणावं याला मी? आमच्याकडे किती वेळ आहे?"

"वेळ? मी आधीच सांगितलंय की तुम्ही आपापसातच लढुन मराल...त्याला जितका विलंब करता येईल ते तुमच्या हातात आहे. मी तुमच्या जीवनात ढवळाढवळ करणार नाही."

"ठीक आहे तर मग...चल परत जाऊ...घरी जाऊन निवांत मरायची वाट पाहतो मी"

"पाहिलंस? सत्य जाणुन घ्यायची तुला किती उत्सुकता होती? पण सत्याला सामोरे गेल्यावर कसा हिरमोड झाला तुझा."

"हिरमोड होणारच ना? जगात एकाच शक्तीवर विश्वास होता...तोही उडालाय आज. दु:ख आमच्या विनाशाचं नाहीये. तुच निर्माण केलं आहेस, तुच जीवन दिलंस..आम्हाला संपवायचा अधिकारही तुलाच आहे. पण आम्हाला आमच्यातच लढुन मारायचा काय अर्थ?"

"कारण एकच..मी आणि माझ्यापासुन निर्माण होणाऱ्या नव्या जीवांच्या समोर उदाहरण असावं..कसं जगु नये ह्याची माहिती त्यांना प्रत्यक्ष व्हावी. नाहीतर मानवांसारखे तेही वेद कोणी लिहिलेत ह्यावरुन मारामारी करायचे"

"उपरोध ध्यानात आलाय.. गाडी वळव कल्की...घरी जाऊयात"

कल्कीने गाडी वळवली. परत जातांना मी शांत बसुन होतो. काही बोलायची इच्छाच होत नव्हती. डोक्यात विचारांचे काहुर माजले होते. आज कल्की बरोबर गेलोच नसतो तर बरं झालं असतं असं मला वाटलं..कल्की कडुन खुप अपेक्षा होत्या मला...सगळ्यांनाच तडा गेला...महाभारतातल्या कृष्णार्जुनाप्रमाणे कल्की आणि माझी मैत्री आहे असं मला वाटायचं...मीच त्याचा एकमेव मित्र होतो. पण तो मला आणि माझ्या भाऊबंधाच्या मदतीसाठी आलेलाच नव्हता. उलट आमचा विनाश व्हायची वाट पाहत होता.
पण शेवटी पर्याय नव्हताच. मानवी विनाश टाळायला आता पुन्हा गांधी जन्मणे शक्य नव्हते.
कल्कीला माझ्या मनात काय चाललंय याची पुरेपुर माहिती होती. तो म्हणाला

"दुसऱ्या महायुद्धानंतर... ज्या दिवशी गांधीहत्या झाली....त्यादिवशीच मी हा निर्णय घेतला होता"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!!!