स्मर्तृगामी प्रभू

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 19 January, 2013 - 00:24

काय तुझी देवा| सरली ती दया| मज गरीबा या| लाथाडीसी ||१||

अहो चक्रपाणी| कमंडलू धरा| पदीचा आसरा| द्यावा मज ||१||

नको धन मान| नको यशोगान| पायीचा तो श्वान| करी मज ||१||

बोधिले यदुशी| तैसे अंगीकारा| संसार पसारा| आवरा हा ||१||

स्मर्तृगामी प्रभू| ऐशी तुझी कीर्ती| आणि टाहो किती| फोडावा मी ||१||

विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती अंतःकरणापासून आळवणी केलीये... हृदयस्पर्शी...

बोधिले यदुशी| तैसे अंगीकारा >>> हे मात्र कळले नाही !!

संतकवींच्या सारखी रचना आवडली.
बोधिले यदुशी| > म्हणजे `अर्जुनाला उपदेश करून जसे तारून नेले, तसे`' असा तर अर्थ आहे का ?

विक्रांत प्रभाकर, सुंदर अभंग आहेत. पण ते बोधिले यदुशी कळलं नाही. बोधिले यादवे असं हवं होतं का?
आ.न.,
-गा.पै.

बोधिले यदुशी| तैसे अंगीकारा >>> हे मात्र कळले नाही !!>>>>>>..यदु हा ययाती देवयानीचा थोरला पुत्र .त्याला जेव्हा वैराग्य आले तेव्हा भगवान दत्तात्रेयांनी बोध केला, श्री.दत्तगुरूंचे २४ गुरूंचे जी सुपरिचित कथा आहे , ती श्री. गुरुदेव दत्त यदुला सांगतात . अन यदु हि मुक्त होतो.प.प.श्री .वासुदेवानंद सरस्वती महाराज लिखित श्री. दत्त महात्म या ग्रंथात अध्याय ४६ मध्ये हि माहिती मिळेल .

असो,शशांक,रवी,सिता रसप.गामा_पैलवान भारतीजी सर्वांना धन्यवाद .

सुंदर रचना Happy

संसार पसारा| आवरा हा || >>> अंतीम साध्याकडे जायची तयारी Happy

श्री दत्तात्रेयांचे २४ गुरु आणि त्यांच्यापासून आपण काय श्रेयस आणि काय प्रेयस हे शिकणे, हा एक फार मोठा विषय होईल Happy

का बरं ?
हिंदी शब्द वापरल्यास ते लक्षात आणून दिलेले पाहीलेत. मग इंग्रजी, उर्दू, पाली, अर्धमागधी, तमील हे शब्द ज्याला माहीत आहेत त्यानेही वापरायला हरकत नसावी. वै.मत

मराठी कवितेत संस्कृत शब्द असावेत का ?>>
मराठीतले संस्कृत शब्द काढले तर किती शब्द उरतील ?:)

चांगली कविता. प्रत्येक ओळीच्या शेवटी ||१|| आकडा का आहे?

तुमचा ब्लॉग पहिला.
देवाकडे पाहू नका http://kavitesathikavita.blogspot.in/2013/01/blog-post_12.html
ही आणी वरील कविता थोड्याश्या परस्पर विरोधी नाहीत का?

मराठीतले संस्कृत शब्द काढले तर किती शब्द उरतील ? >>

प्राकृत, इराणी, ग्रीक, इंग्रजी, कन्नड, पाली, अर्धमागधी इ. भाषांतून आलेले शब्द उरणार नाहीत का ? या भाषांमधील जे शब्द आज प्रचलित नाहीत ते वापरले तरी चालतील का ? (स्मर्तृगामी हा शब्द मराठीत प्रचलित आहे का ? असेल तर या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तरी चालेल ).

विक्रांतजी विषयांतराबद्दल क्षमस्व. माझ्याकडून पूर्णविराम.

अश्विनीजी, आकाश नील,धन्यवाद .
<<<<<<<तुमचा ब्लॉग पहिला.देवाकडे पाहू नका http://kavitesathikavita.blogspot.in/2013/01/blog-post_12.html
ही आणी वरील कविता थोड्याश्या परस्पर विरोधी नाहीत का?>>>>>>>>>>.

नाही,ज्ञानेश्वरीत एक ओळ आहे,रुसण्या रागावण्याने आईचे प्रेम अधिक वाढते .रोषे प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि .हे नेमके तसेच आहे .तुकारामाचा एक अभंग असाच काहीसा भाव घेवून येतो.

पंढरीचे भूत मोठे। आल्या गेल्या झडपी वाटे।।
बहू खेचरीचे रान। जाता वेडे होय मन।।
तेथे जाऊ नका कोणी। गेले नाही आले परतोनी।।
तुका पंढरीस गेला। पुन्हा जन्मा नाही आला।।

तेथे जाऊ नका कोणी। म्हणजेच देवाकडे पाहू नका ......

<<<स्मर्तृगामी हा शब्द मराठीत प्रचलित आहे का ? >>> आहे >>>>>>>> मराठीत तरी मी कुठल्या स्तोत्रात नाही वाचला ,दत्तबावनी मध्ये आहे .२o व्या ओळीत .मराठीत कुठे असेल तर कळवावे .

नि:शंक हो निर्भय हो मना रे... मध्ये 'स्मरणगामी' हा शब्द आहे. तो स्मृती- स्मर्तृ सारखाच आहे. तसेच मराठी गद्यातही श्री दत्तात्रेय किंवा त्यांचे अवतार किंवा एकंदरच सद्गुरुंना स्मर्तृगामी हा शब्द वाचनात आला आहे. नक्की कुठे ते शोधावं लागेल.

खूप सुरेख रचना.
स्मर्तृगामी हा शब्द असलेल्या ओळी तर भन्नाट आहेत.

अवांतरः स्मर्तूगामी हा संस्कृत शब्द मराठी काव्यात असावा का या प्रश्नाबद्दल.
तो शब्द एका संस्कृत स्तोत्रातून घेतला आहे.
स्मर्तृगामी समाऽवतु (प.पू. वासुदेवानंदसरस्वती महाराजांची रचना)
त्याचा संदर्भ देऊन हा शब्द रचनेत वापरला गेला आहे असे वाटते.
देवाला त्याचा ब्रीदाची आण घालताना, ब्रीदवाचक शब्द जसाच्या तसा वापरल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हेही त्यातलेच एक असे मानायला हरकत नसावी.

धन्यवाद,
चैतन्य.

तुमचे काव्या वाच्॑न सहज सुचले,

दत्तगुरु तुम्हा | दावतील मार्ग | झाले काहिजरी | चालावे तया ||
येति किती भक्त | पुर्विती मनोरथ | नाही राहनार मागे | तुम्हिकाही ||

अश्विनीजी, धन्यवाद ,मूळ रचना शोधून वाचली.
चैतन्य ,तुम्ही लिहलेले खरे आहे.फार सुंदर रचना आहे हि स्वामीजींची..
श्रीवल्लभ ,तुमच्या तोंडात साखर पडो.अधिक काय लिहू.
सर्वांना पुन्हा धन्यवाद .

केवळ आवडली म्हणणे औपचारिकता दाखवल्या सारखे वाटेल म्हणून म्हणत नाही आहे

दत्तात्रेयावर फार श्रद्धा आहे तुमची ...जशीच्या तशी दिसून येते आहे या अभंगांमधून
----------------------------------------------------------

स्मर्तृगामी प्रभू| ऐशी तुझी कीर्ती| आणि टाहो किती| फोडावा मी ||१||>>>>>> फिदा या अभंगावर !!!!

माझ्या काही ओळी आठवल्या .....ही माझीच , मला .....सर्वात आवडती कविता आहे
http://www.maayboli.com/node/31117
___________________________________________

स्मर्तृगामी>>>>> खूप सुंदर चपखल किंबहुना या कवितेतेल सर्वोत्तम शब्द आहे हा
प्रचलीत बिचलीत विचर करू नका शब्द आधी तयार होतो , वापरला जातो मग प्रचलीत होतो ..तसेही हा नवनिर्मित शब्द नाहीच आहे त्यामुळे वादच नाही
_________________________________________________

तुकोबारायांचा अभंग फार्फार आवडला धन्यवाद तो इथे शेअर केल्याबद्दल

-वैवकु