एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)

Submitted by केदार on 25 January, 2013 - 05:48

एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अ‍ॅलिस अल्बेनिया

अ‍ॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.

एम्पायर्स ऑफ इंडस हे नाव वाचून मी हे पुस्तक हातात घेतले तेंव्हा नाव वाचून माझी एक अपेक्षा तयार झाली की ह्यात, सिंधू पासून सरस्वतीकडचा प्रवास (भारतीय संस्कृती / वैदिक संस्कृती) कसा झाला आणि सिंधू संस्कृतीने जो जगावर प्रभाव टाकला आहे, त्या काळचे, त्यावेळचे राजे / सम्राट कोण असतील? ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित ह्या पुस्तकात मिळेल असे वाटले. पुस्तक वाचताना माझ्या ह्या गृहितकाची पार वाट लागली आणि माझी ह्या बाबतीत घोर निराशा झाली. पुस्तकातील ७० % भाग हा पाकिस्तान आणि तेथील मुस्लिम संस्कृतीचे वर्णन करणारा निघाला.आणि मी मात्र वाट पाहत होतो सिल्क राउट, सम्राट अशोक, बौद्ध धर्माचा सिंधू खोर्‍यात पडलेला प्रभाव आणि मग पुढे आजची सिंधू आणि आजच्या पाकीस्थानातिल त्या जुन्या एम्पायर्सची स्थिती. पण त्या सर्व अपेक्षांऐवजी हाती न लागता हाती लागला तो एक ट्रॅव्हलॉग ! लेखिका सिंधू नदिच्या समुद्रामिलनापासून पाठीमागे, भारत, तिबेट असा प्रवास करते, तो प्रवास आणि त्याचे वर्णन. त्यामुळे हे पुस्तक माझ्यासाठी एक मोठा ट्रॅव्हलॉग आहे.

अलेक्झँडरचा प्रवास मात्र मस्तच उतरला आहे, त्याने जळावू सरपण म्हणून वापरलेले तत्कालिन लोकांचे वुडन कॉफिन्स, सिंधू खोर्‍यात आल्यावर त्याला दिसणारे न्यास आणि न्यासाची जागा, प्रत्येक घरात असणार्‍या वायनर्‍या (ज्या स्वात खोर्‍यात आजही आहेत) आणि Dionysus ज्या जागेपर्यंत आला ती जागा देखील पार केल्याचा अभिमान हे सर्व वाचायलाही सुंदर वाटतं.

ह्या प्रवासात अनेकांना (ज्यांनी अर्थातच इतिहास वाचला नाही अशांना) अनेक नवीन गोष्टी कळतात, उदा पाकिस्तानात सिद्दीलोकांचे वास्तव आहे, पण ज्यांनी भारताचा आणि खासकरून महाराष्ट्राचा अगदी थोडाही इतिहास वाचला त्यांना सिद्दी आजही भारतात आहेत ह्या नवीन काही वाटत नाही.

सिंधू नदीच्या प्रवास करायचा असेल तर वैदिकांनंतर भारतात उदय पावलेला बौद्ध धर्म आणि बौद्धांचे सिल्करुट वरचे (अर्थात अशोकानंतर, सिल्करुट आधीही होताच) निर्विवाद वर्चस्व हे अलेक्झॅंडरप्रमाणेच उतरले असते तर ते वाचायला आवडले असते पण हा भाग अतिशय त्रोटक येतो. अर्थात पद्मसंभव ह्या महान योग्याचे (तांत्रिक योगी) आणि ज्याने बौद्धधर्म खर्‍याअर्थाने तिबेट मध्ये नेला त्याचे कार्य थोड्याप्रमाणात इथे लिहिले आहे. पण स्वात खोर्‍यात (पाक) आणि अफगाणमध्ये जिथे दर तासागणिक स्तुप आणि बौद्धनिवास होते / बौद्धमूर्ती होत्या, त्यांचा नाश कसा झाला, ह्या त्या फारच त्रोटकपणे मांडतात.

सिंधूसंस्कृती म्हणले की अर्थातच ऋग्वेद आणि हिंदू देव ओघाने आलेच. इंद्राच्या पेयावर (अर्थातस सोमरस) एका चाप्टर आहे. पण परत प्रकरण नामाप्रमाणे प्रकरणात फार माहिती नाही. अर्थात थोडा(साच) आढावा घेतला आहे. पार्वकलश्त ह्या गावी मिर हयात ह्यांनी एक ग्रेव्ह यार्ड शोधले आहे ज्याचे कार्बन डेटिंग १६०० BCE च्या आधीचे आहे (ज्यांचे देव दगडाचे आहेत) . त्या गावी, ते ग्रेव्ह यार्ड पाहायला लेखिका जाते आणि तिला सिंधू बद्दल ऋग्वेदकारांनी लिहिलेले हे श्लोक आठवतात. (पुस्तकात इंग्रजी भाषांतर आहे, ऋचा नाहीत) सिंधूला येथे ज्या अवस्थेत पाहिले, जी पाहून तिला वाटतं की यस दिस मेक्स सेन्स.

पर सु व आपो महिमानमुत्तमं कारुर्वोचाति सदनेविवस्वतः |
पर सप्त-सप्त तरेधा हि चक्रमुः परस्र्त्वरीणामति सिन्धुरोजसा ||
पर ते.अरदद वरुणो यातवे पथः सिन्धो यद वाजानभ्यद्रवस्त्वम |
भूम्या अधि परवता यासि सानुना यदेषामग्रं जगतामिरज्यसि ||
दिवि सवनो यतते भूम्योपर्यनन्तं शुष्ममुदियर्तिभानुना |
अभ्रादिव पर सतनयन्ति वर्ष्टयः सिन्धुर्यदेति वर्षभो न रोरुवत ||
अभि तवा सिन्धो शिशुमिन न मातरो वाश्रा अर्षन्तिपयसेव धेनवः |
राजेव युध्वा नयसि तवमित सिचौ यदासामग्रं परवतामिनक्षसि ||

सिंधू नदिला ऋग्वेदात आणखी एक नाव होते ते म्हणजे हिरण्यमयी. ( ऋ १०-७५-८) हिरण्य म्हणजे सोने. ज्यातून सोने मिळते ती अशी हिरण्यमयी, सिंधू. तर हिरण्यवर्तिनी हे सरस्वतीसाठी वापरले आहे. लेखिकेने पात्रातून सोने काढले जात असल्याचा उल्लेख अनेकदा केला आहे पण हिरण्यमयी ह्या नावाचा नाही. पूर्ण पुस्तकात ऋग्वेदाचा उल्लेख पाच सहा वेळा असला तरी सिंधू संस्कृती (खरेतर आताची सरस्वती- सिंधू संस्कृती) ज्या लोकांनी तयार केली, तिची माहिती अगदी त्रोटक स्वरूपात वाचायला मिळते. ही ह्या पुस्तकाची मोठी उणीव होय.

ह्याच गावाचा आजूबाजूला एक कलश नावाचा एका धर्म (?) की समुदाय ह्यांच्या संस्कृतीचा धावता आढावा देखील घेतला आहे, जो मला आवडला.

पुढे जेंव्हा लेखिका तिबेट मध्ये येते, तेंव्हाचा तिचा प्रवास आणि सिंधूवर झालेले सांस्कृतीक चिनी आक्रमन वाचून लेखिकेसारखेच निराश व्हायला होते. ह्या भागात आजही चालणार्‍या अनेक प्रथा प्राचिन भारतात होत्या. उदा एक पत्नी आणि जास्त नवरे. (पोलिअ‍ॅण्ड्री) आणि ह्या प्रथेची कारणे. (त्या भौतीक भागामुळे आलेली आर्थिक कारणे) इत्यादींची माहिती लेखिकेने दिली आहे. महाभारताचे उदाहरणही त्यात आहे.

आणखी एक गोष्ट, थोडी न आवडलेली, किंवा लेखिकेच्या सिंधू अभ्यासातून राहिलेली म्हणजे, भारतात लडाख मध्ये असलेली धा आणि हाणू ही गावे, जिथे प्युरिस्ट आर्य आजही राहतात. ( प्रेग्नंसी टुरिझम आता ह्या भागात वाढत आहे) त्यांच्या केवळ उल्लेख आला आहे आणि त्यांच्या प्रथा-चालिरिती, तेच प्युअर आर्य का आहेत? ह्यांचा अजिबात आढावा घेतलेला नाही. केवळ एक ओळीत ही गावं आहेत एवढेच येते. तसेच लडाख मधीलच चामथांग प्रांतातील काही नोमॅडिक जनता, जिचा उल्लेखही पुस्तकात नाही. चामथांग चिन मध्येही आहे, त्याचा उल्लेख आहे. खरे तर ल़डाखचा उल्लेख कारगिल युद्ध प्रकरणी आहे, पण लडाख, तेथील संस्कृती, सिंधू / झंस्कार (सिंधूची उपनदी) प्रभाव इत्याची अजिबात उल्लेख नाही. लेह मधील डायनेस्टीचा उल्लेख देखील नाही. ज्या संस्कृती भारतातून वाढल्या त्यांचे केवळ पुसट उल्लेख मला नक्कीच खटकले. शेवटी आजचा पाकही केवळ ६५ वर्षांपूर्वीचा भारत आहे हे विसरून कसे चालेल. फाळणीचे उल्लेख नक्कीच आलेत, पण ते सर्व पाक आणि तेथील संस्कृतीच्या निमित्ताने. एक गोष्ट मला पूर्ण पुस्तकभर वाटत राहते ती म्हणजे त्या पाक आणि मुस्लिम संस्कृती बायस आहेत. ह्या निष्कर्षावर पोचल्यवर मी ह्या पुस्तकाचा अजून शोध घेतला तर माझ्याच प्रमाणे अनेकांना असेच वाटले असे नेट वर वाचले.

सिंधू म्हणाले की भारतातून होणारा जल व्यवसाय. सिंधू नदी ही मुख्य व्यापार केंद्र होती. भारतातून सुमेरिया पर्यंतचा व्यवसाय / प्रवास सिंधू, सरस्वती सारख्या मोठ्या नद्यांमधून व्हायचा. जलवाहतूकीवर एखादे मोठे प्रकरण आणि माहिती नक्कीच पुस्तकाचा प्लस पाँईट ठरला असता. जलवाहतुकीचे उल्लेख अनेकदा आले पण ते खूपच त्रोटक आणि बेसिक वाटतात. महंमद घौरी आणि बाबुर वर खूप पाने खर्ची घालन्यापेक्षा मी जर लेखक असतो, तर मी सिंधू जलव्यवसायाबद्दल एक संपूर्ण प्रकरण लिहिले असते. आज इंडियन ऑर्कियॉलॉजीकडे भारतातून मध्यपूर्वेत होणार्‍या जलप्रवासाचे नकाशे उपलब्ध आहेत, त्याचा वापर नक्कीच झाला असता.

हे पुस्तक वाचावे का नाही? उत्तर अर्थातच हो आहे. पण ह्यातून सिंधू एम्पायर्स मिळत नाही तर उपशिर्षक असणारे द स्टोरी ऑफ अ रिव्हर हेच खरे ठरते.एक ट्रॅव्हलॉग म्हणून हे पुस्तक उच्च ठरावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार चांगले परिक्षण !
तुमचा अभ्यास तर बराच आहेच, जमल्यास तुम्हीच का लिहित नाही या विषयावर एखादे पुस्तक ? निदान आधी मराठीत तरी.

नाही हो, मी पुस्तक वगैरे लिहू शकणार नाही. तेवढे ज्ञान नक्कीच नाही. त्याला पूर्णवेळ अभ्यास लागतो. मी आपला हौशी अभ्यासक आहे.

केदार चांगले परिक्षण !
तुमचा अभ्यास तर बराच आहेच, जमल्यास तुम्हीच का लिहित नाही या विषयावर एखादे पुस्तक ? निदान आधी मराठीत तरी. >>> +१०००

पुस्तक नाही तर निदान एखादी लेखमाला तरी लिहा राव इथे... (माझ्या सारख्या अज्ञानी माणसाला सर्व नाही तरी निदान काही तरी कळेल अशाने...)

मी हे पुस्तक अजून वाचतेच आहे. Happy एखाद्या पानावर जे काही आहे ते गूगल करून बघणे. गूगल मॅपवरची ठिकाणे बघत जाणे. असे करत करत आठ दिवसाला एक पान या हिशोबाने जात आहे.

फाळणीचे उल्लेख नक्कीच आलेत, पण ते सर्व पाक आणि तेथील संस्कृतीच्या निमित्ताने. एक गोष्ट मला पूर्ण पुस्तकभर वाटत राहते ती म्हणजे त्या पाक आणि मुस्लिम संस्कृती बायस आहेत.>> याला अनुमोदन.

पण एकंदरीत पुस्तक वाचण्यासारखे नक्कीच आहे.