पुणे-५२ - एक आगळी वेगळी गुप्तहेरकथा

Submitted by निंबुडा on 18 January, 2013 - 09:32

कुठल्याही चित्रपटाचे प्रोमोज पाहून त्याच्या कथानकाविषयी आपण काही आडाखे बांधून मनात तशी रुपरेषा कल्पून सिनेमा पहायला जातो. गुप्तहेराची कथा म्हटली की सर्वसामान्यपणे एखादा खून, दरोडा, ब्लॅकमेलिंग, काळा धंदा, स्मगलिंग इत्यादींचा छडा इतकेच कंगोरे आपल्याला सुचू शकतात. आणि मग अश्या कथानाट्यामध्ये गुप्तहेर म्हणजे एकदम हँडसम, ऊंच, प्रसंगी गुंडांशी दोन हात करून त्यांना यमसदनी धाडणारा, मदनिकांना घायाळ करणारा, उंची गाड्या चालवणारा, सर्व प्रकारची हस्तकौशल्ये अवगत असणारा, बोलण्यात चतुर वगैरे वगैरेच असावा लागतो. आणि म्हणूनच अनेक इंग्रजी सिनेमांमधले गुप्तहेर किंवा इंग्रजी/मराठी कादंबर्‍यांचे नायक म्हणून मिरवलेले गुप्तहेर हे सर्व कल्पनेतलेच (वास्तवाशी यत्किंचितही संबंध नसलेले) वाटत राहतात. ह्या पारंपरिक धाटणीला एकदमच छेद देत गुप्तहेरकथेचा सर्वस्वी वेगळा पैलू आपल्यासमोर आणणार्‍या पुणे-५२ ह्या चित्रपटाचे आणि असा चित्रपट निर्माण करण्याचे धारिष्ट्य दाखवणार्‍या लेखक-दिग्दर्शक नितिन महाजन व टीम चे कौतुक! धारिष्ट्य अशासाठी की चित्रपटाचा असा वेगळा बाज (फॉर्म), पारंपरिक क्रिस्प व चुरचुरीत सिनेमाचे फॅन असलेल्या बहुतांशी प्रेक्षकांसमोर मांडण्याची हिंमत ह्या टीमने दाखवली आहे.

वास्तव आयुष्यात गुप्तहेरही तुमच्या-आमच्यासारखाच साधा, सज्जन, पापभीरु, थोडा स्वप्नाळू, यशाने हुरळणारा तसेच अपयशाने निराशेच्या गर्तेत जाणारा मनुष्य असू शकतो, ह्या कथाबीजाभोवती बांधलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतो. अर्थात गुप्तहेरकथा म्हटली की रहस्यही आलेच! तसे ते इथे ही आहे. पण पारंपरिक रहस्यकथेनुसार आधी घटना घडणे आणि मग एक एक धागा उकलत रहस्यभेद करणे, अधून मधून प्रेक्षकांना पात्रांच्या संवादांतून थेट किंवा अप्रत्यक्ष हिंट्स देणे आणि मागाहून त्यांची उकल होणे ह्या प्रकाराला सरळ सरळ फाटा देऊन एका अतिशयच वेगळ्या ट्रीटमेंटने चित्रपट पुढे सरकत राहतो. बाहेरच्या जगात गुप्तहेर म्हणून वावरावे लागत असलेल्या अमर आपटेचे स्वत:च्या घरातले बायकोबरोबरचे व्यक्तिगत जीवन, संसारामधले खाचगळगे, दोघांचे खटके-प्रेम-वाद-वितंडवाद-लाडीगोडी, त्यांच्या संसारात बायकोच्या आईची अध्ये मध्ये होणारी लुडबूड ह्या सर्वांबरोबरच गुप्तहेरगिरीमुळे बाहेर त्याने स्वतःच ओढवून घेतलेले काही प्रसंग ह्यांची सुरेख चित्रमय गुंफण घालत चित्रपट पुढे सरकत राहतो. चित्रपटभर, आपण घडत असलेल्या प्रसंगांवरून मनातल्या मनात काही आडाखे बांधत जातो आणि प्रत्येक वेळी आपल्याला चकवा देत चित्रपट पुढे सरकतो. मानवी अथांग मनाचा थांग लावण्याचा आपला हर एक प्रयत्न हाणून पाडत चित्रपट शेवटाला प्रेक्षकांना एका वेगळ्याच अनुभूतीला पोचवतो. चित्रपट संपतानाही अश्या नोट वर संपतो की तो ही प्रेक्षकांना एक प्रकारचा धक्काच असतो. कारण रुढार्थाने ह्या चित्रपटाला शेवटच नाही. एक ओपन एंडेड कथा!

ही कथा घडते १९९२ सालात! अमर आपटे! हा पुणे - ५२ ह्या पत्त्याने ओळखल्या जाणार्‍या बंगल्याचा मालक. बंगल्याच्याच एका खोलीत त्याने थाटलेली 'सर्चिंग आय' नावाची 'वन मॅन शो' ही उपमा सार्थ ठरेल अशी डीटेक्टिव्ह एजन्सी! डीटेक्टिव्ह बनण्याचे ध्यानीमनीही नसताना केवळ योगायोगाने गुप्तहेर बनलेल्या एका साध्या स्वप्नाळू माणसाची ही कथा आहे. पेशाने वकील असलेल्या काकाला पुरावे गोळा करण्यासाठी मदत करता करता अमरचा गुप्तहेरगिरी हाच पोटापाण्याचा धंदा बनून जातो. गुप्तहेरगिरी हे पैसे कमवण्याचे साधन असले तरीही त्यापलीकडे तो एक हाडामांसाचा माणूस आहे. त्यालाही राग-लोभ-चीड-भीती इत्यादी सर्व भावनांची आंदोलने पेलावी लागतात. ह्या पेशात ब्लॅकमेलिंग, राजकिय व सामाजिक वर्तुळात वट व वजन असणार्‍या व्यक्तींसोबत संपर्क व उठबस इत्यादी करून पैसे कमवून गब्बर होण्याचा राजमार्ग उपलब्ध असूनही एका ठराविक मर्यादेचे उल्लंघन न करण्याचे सौजन्य त्याच्याकडे आहे. आणि त्यामुळेच घरात पैशाची सदैव चणचण, देणेकर्‍यांची थकलेली बिले, तुटपुंज्या पगारात घरखर्च चालवताना मेटाकुटीला आलेली बायको - प्राची, त्याच्या कामानिमित्त वेळी-अवेळी न सांगता घराबाहेर राहण्यामुळे आणि तिला न पटणार्‍या काही विचित्र सवयींमुळे दोघांत उडणारे खटके व त्यातून संवेदनशील अमरच्या मनात उठणारे भावभावनांचे आरोह आणि अवरोह ह्या दुष्टचक्रात दोघेही अडकलेले आहेत. असे असूनही प्राचीचे अमरवर आणि त्याचेही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. प्राचीच्या घरून ह्या लग्नाला विरोध असूनही अमरच्या डिटेक्टिव्ह असण्यावर (थोडक्यात तिच्या हिरोगिरीच्या कल्पनेत डीटेक्टिव्ह हे कॅरेक्टर फिट बसल्याने) भाळून प्राची त्याच्या प्रेमात पडते आणि दूषणे देत का होईना त्यांचा पडझड होत असलेला संसार - अध्ये मध्ये माहेरून आर्थिक, भावनिक मदत घेत - हिकमतीने रेटून नेते.

अशातच अमरच्या हातात एका बिझनेसमनची केस येते. आपल्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयाची खात्री करण्यासाठी तो बिसनेसमन, अमर कडे आपली केस घेऊन येतो आणि आपल्या बायकोचे तिच्या प्रियकरासोबत असतानाचे फोटो काढण्याची अमरला गळ घालतो. इथून पुढे एक एक प्रसंग असे घडत जातात की अमर आपसूकच त्या घटनाचक्रात कधी आपणहून गुंतत जातो तर कधी जबरदस्तीने गोवला जातो. ह्या चक्रव्ह्यूहातून बाहेर पडण्याचा एक मार्ग तयार होतो ना होतो तोवर तो मार्ग फिरून त्याच दुष्टचक्रात त्याला ढकलतो. ह्या सर्व घटनांचा त्याच्या मानसिकतेवर आणि संसारावर होणारा परीणाम चित्रपटभर दृश्य रुप घेत राहतो. चित्रपटातले रहस्य इथे सांगण्यात हशील नसल्याने तूर्तास इतकेच!

अमर आपटेच्या भुमिकेत जान ओतणार्‍या गिरिशच्या देहबोलीला दाद द्यावी लागेल. गुप्तहेराच्या तथाकथित व्यक्तित्वाला छेद देण्याच्या लेखक-दिग्दर्शक निखिल महाजनच्या स्वप्नाचे गिरिश ने अक्षरशः सोने केले आहे. अमरच्या बायकोच्या - प्राचीच्या भुमिकेत सोनालीने यथायोग्य रंग भरले आहेत. परिस्थितीने गंजून गेलेली, प्रसंगी परिस्थितीपुढे टेकीला येऊन शरण गेलेली , हसरेपणा लोप पावून सतत करवादणारी, लहान्-सहान सुखांनीही हुरळून गेलेली प्राची तिने छान उभी केली आहे. प्रसंगी तिचा अभिनय थोडा लाऊड वाटतो, पण तिचा एकंदरीत त्रागा लक्षात घेता तशी संवादफेक क्रमप्राप्त असल्याची सूट तिला देता येईल. भारती आचरेकरांनी रंगवलेली, प्राचीची, जहाल पण प्रसंगी मुलीच्या व जावयाच्या भवितव्याच्या चिंतेने भावुक होणारी आई बेतास बात. संवादलेखन स्वतः गिरिशनेच केलेले असून चित्रपटाच्या एकूण बाजाला पोषक आहे असे म्हणावे लागेल. संवादलेखनापेक्षा गिरिशने संवाद म्हणतानाचे केलेले आविर्भाव मला जास्त आवडले. रागाने आणि भीतीने होणारी घुसमट, गिल्टमुळे वाटणारी लाज, परिस्थितीपुढे आलेली हतबलता, मनाविरुद्ध गोष्टी बोलताना वा करताना शब्दच न फुटण्याची होणारी अस्वथा इत्यादी जेस्चर्स मला आवडले.

आता सिनेमाचे कथाबीज १९९२ मध्ये घडताना दाखवण्याचे विशेष कारण काय असावे हा प्रश्न प्रेक्षकांना पडणे स्वाभाविक आहे. ह्याचे कारण मला असे वाटते की ह्याच सुमारास भारतीय बाजारपेठेत जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. ग्लोबलायझेशन च्या युगाची नांदी झाली. खुल्या अर्थव्यवस्थेमुळे एकिकडे जिथे सभोवतालचे जग हळू हळू आपले रंग पालटत होते, तिथे सर्वसामन्यांचे व्यक्तिगत जीवनही नव्या बदलांना सामोरे जात होते. श्रीमंत माणूस एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे देशोधडीला लागण्याची किंवा कफल्लक माणसावरही लक्ष्मी अचानक प्रसन्न होण्याची करामत घडू लागली होती.

परिस्थितीनुसार नात्यांचे रंगही गहिरे किंवा फिके होत जातात. कालपरवा पर्यंत नाकर्तेपणाचा शिक्का आपल्या नावावर मारून आपल्याला दूषणे देणारी बायको, सासू हातात पैसा खुळखुळू लागल्यावर आपले गोडवे गाण्यात धन्यता मानताना अमर पाहतो. व्यवसायक्षेत्रातही पोलिस, अशील इत्यांदीकडून तोच अनुभव त्याला येतो. इतक्या सार्‍या बदलत्या वातावरणात अमरही बायकोच्या इच्छेसाठी स्वतःला बदलू पाहतो. पण मूळ स्वभावावर कुरघोडी करून ते साधणे त्याला शक्य होत नाही. आजूबाजूला होत असलेल्या बदलांना 'नाकारणे' शक्य होत नसलेला अमर (आणि म्हणूनच चित्रपटाची कॅच लाईन - 'तुम्ही नाही म्हणू शकता का?'), आतून तोच लहानपणीचा स्वप्नील मनाचा (हीरॉइझम च्या विशिष्ट कल्पना मनात घर करून असलेला) जुना अमर आणि त्यामुळेच भवतालच्या वातावरणाची जुळवून घ्यायला अपयशी ठरलेला, खचलेला, विमनस्क अमर हे व्यक्तिरेखेचे अनेक पैलू गिरिशने ताकदीने साकारले आहेत. सईने गिरिशच्या अशीलाची भुमिका केली आहे. तिच्या भुमिकेबद्दल जास्त खुलासा केल्यास रहस्यभंग होण्याची शक्यता असल्याने तो उल्लेख टाळत आहे. बाकी कलाकारांमध्ये किरण करमरकर, गोपी काका आणि स्वानंद किरकिरे (पाहुणा कलाकाराच्या भुमिकेत) ह्यांचा उल्लेख करावा लागेल. सर्व सिनेमाभर उल्लेख व वावर असलेले १० पैशाचे नाणे अमर आपटे ह्या व्यक्तित्वाच्या मानसिकतेचा पुरावा ह्या न्यायाने आपली भुमिका बजावते. पुणे-५२ ह्या पत्त्यावर आलेले पत्र की ज्याच्यामुळे अमरची कथा एक वेगळेच वळण घेते, त्याचा खुलासाही शेवटी अनपेक्षितरीत्या होतो. कसा, ते चित्रपटात पाहण्यातच हशील आहे.

चित्रपटाचे चित्रण करण्यासाठी थोडी वेगळी टेक्निक वापरलेली पहिल्यांदा जाणवली. बर्‍याच वेळेला ट्रॉलीवर फिरणारा व स्थिर राहणारा कॅमेरा वापरलेला नाही. पण त्यामुळे दृश्यांची फ्रेम सतत हलतानाचा अनुभव कधी कधी त्रासदायक वाटतो. पण एकदा कथेत गुंतल्यावर त्याकडे जास्त लक्ष जात नाही. पात्रांच्या खूप जवळून चित्रण करण्यामागचे प्रयोजनही समजले नाही. मोठ्या पडड्यावर बर्‍याचदा ते सीन एकदम अंगावर आल्यासारखे वाटते. दळवी काका (गोपू काकांनी वठवलेली भुमिका) ह्या पात्राचे प्रयोजन समजत नाही. कथेच्या अनुषंगाने ते पात्र नक्की कुठे फिट होते, हे मला तरी समजले नाही. सबंध चित्रपटात एकच गाणे असून ते पार्श्वसंगीताचा भाग म्हणून येते. पडद्यावर चालू असलल्या सीन्स मुळे गाण्याच्या शब्दांवर लक्ष केंद्रित करता आले नाही. चित्रपटाला 'A' रेटिंग देण्यात आलेले असून १५ वर्षांखालील व्यक्तीस चित्रपटास प्रवेश नाही. चित्रपटातील बोल्ड सीन्स कथेच्या अनुषंगाने येत असले तरी आवश्यकच होते, असे वाटले नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

एकंदरीत नेहमीच्या सरधोपट रहस्यकथांचे चाहते असलेल्यांना एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या चित्रपटाला एक संधी देण्यास हरकत नाही. ओपन एंडेड कथा असल्याने प्रत्येकजण चित्रपटाचा शेवट आपापल्या दृष्टीकोनातून अनुभवण्याची शक्यता आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Detective आणि Spy दोघानाही गुप्तहेरच म्हणतात का? म्हणजे शेरलॉक होम्स आणि जेम्स बाँड सारखेच?

परिक्षणावरुन बघावासा वाटतोय. आपली मराठीवर येईपर्यंत वाट बघावी लागेल.>>>> +११११११
आजकाल इतके चांगले आणि वेगळ्या विषयावरचे मराठी सिनेमे येत आहेत पण लगेच बघता येत नाहीत Sad याची फार खंत वाटते.

मस्त परिक्षण....

कीती कमी ठीकाणी लागलाय पण!!!! 'बीपी" ने ह्या सिनेमाचा स्लॉट खाल्ला बहुतेक.....

छान लिहिलंय. Happy

दळवी काका (गोपू काकांनी वठवलेली भुमिका) ह्या पात्राचे प्रयोजन समजत नाही. >>
ते सहजच आल्यासारखं वाटलं असलं (शिवाय त्यांच्याबद्दलच्या वाईट बातमीचा फोन येणं- यासाठी असल्यागत वाटलं असलं) तरी ते तसं नसावं. भारतातल्या नव्वदच्या दशकात लग्न करून संसार मांडलेल्या पिढीला अनेक बदलांना सामोरं जावं लागलं. हे बदल नुसतेच भौतिक आणि 'सो-कॉल्ड-मटेरियालिझम'शीच संबंधित नव्हते. सामाजिक वर्तणुकीतलं एकंदरच मोकळेपण, रोज नव्याने येणार्‍या वस्तू-उत्पादनं आणि त्याशी संबंधित असलेलं औत्सुक्याचं भावविश्व, या वस्तू आणि शिवाय स्वभावात मोकळेपण न आणता आल्याची खंत, त्यातून येणारं न्युनत्व.. अशा अनंत गोष्टी या लोकांनी अनुभवल्या. कुणी यांना सुदैवी म्हणतं तर कुणी दुर्दैवी. ७०-८० च्या दशकात त्या तुलनेत सारं काही साचेबद्ध, स्थिर, सुरक्षित म्हणता येईल असं होतं. २००० नंतरच्या पिढीबद्दल काय बोलावं? गेल्या दहा पिढ्यांनी बघितलं नसेल तेवढं त्यांनी दहाच वर्षांत बघितलं.

या ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या नवीन जोडप्यांकडे बघण्याचा वृध्दांचा दृष्टीकोन कधी अनुभवला आहे का? त्यांना ते कधी सुदैवी वाटतात, तर कधी दुर्दैवी. जागतिक बदलांचं वारं भौतिक आणि मानसिक विश्व ढवळून टाकत होतं, पण त्याची थेट झळ या वृद्धांना बसत नव्हती. साक्षीदार मात्र ते होते. 'सारं कही बदलतंय' ही भावना आणि वेग ते अनुभवायचा प्रयत्न करत होते. नवीन जोडप्यांच्या संसारातल्या घटनांच्या तागड्यात तोलून त्यांचं नक्की स्थान आणि महत्व ठरवण्याचा बरावाईट प्रयत्न करत होते.

दळवीकाका म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकात याच पिढीच्या- म्हणजे सांसारिक कामगिर्‍या नि जबाबदार्‍या पार पाडून वृद्ध झालेल्या आणि बदलाचं वारं तटस्थपणे न्याहाळत बसलेल्या, बदल नक्की किती महत्वाचा आहे, आणि कुठवर परिणाम करणार आहे त्याचा अंदाज घेत बसलेल्या पिढीचे प्रतिनिधी.

निंबुडे....तसाही हा पिक्चर पहायचं ठरवलंच होतं. आता तुझं इतकं मस्त परिक्षण वाचल्यावर नक्कीच!

धन्यवाद

चला मराठी सिनेमांची परीक्षण पण आता वाचायला मिळेल आणि मग ठरवता येईल की सिनेमा पहायचं की नाही

पुनश्च धन्यवाद

हा चित्रपट बघायचाच आहे. डिव्हिडी बाजारात येण्याची वाट बघतेय.

माझ्यासाठी हा खूप महत्वाचा चित्रपट आहे, कारण हा निखिल महाजनचा चित्रपट आहे. निखिल माझ्या भावाच्या खूप जवळच्या मित्राचा (सारंग महाजन -लेखक, लुवान ऑफ ब्रिडा) भाऊ. ५-७ वर्षांपूर्वी सारंग कडून निखिल ऑस्ट्रेलियाला गेलाय, चित्रपटाची कथा लिहितोय असं ऐकायला मिळायचं. आणि मग गेल्या वर्षी अचानक त्याचा चित्रपट येतोय हे कळाल्यापासून उत्सुकता वाटतेय.

निंबुडा, परिचयासाठी धन्यवाद.

Pages