कमल हासन आणि मराठी सिनेमा

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

कमल हासन हा कलाकार सर्वांच्याच परिचयाचा. हिंदी आणि तमिळ दोन्ही सिनेसृष्टीमधे त्याचे योगदान अपूर्व आहे. एकाच चित्रपटामधे अनेक व्यक्तीरेखा सादर करणे, मेकप आणि कॉस्च्युम तंत्राचा यथायोग्य वापर करणे याखेरीज इतर अनेक तांत्रिक अंगांचा वापर करून सिनेमा अधिकाधिक खुलवणे ही त्याची वैशिष्ट्ये. एक अभिनेता म्हणून तर त्याच्याबद्दल बोलायलाच नको. तब्बल चारवेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेला हा अभिनेता सध्या एका वेगळ्याच वादळासाठी चर्चेमधे आहे.

तसं कमल हासन आणि वादविवाद हे काही नविन नाहीत. त्याच्या व्यक्तीगत आयुष्यावरून तर किती गॉसिपवाल्यांची घरे बांधली आहेत कुणास ठाऊक. सध्यामात्र चेन्नई फिल्म डीस्ट्रीब्युटर्स त्याच्यावर चिडलेत ते वेगळ्याच कारणाने. कमल हासनचा महत्त्वाकांक्षी "विश्वरूपम" (हिंदीमधे विश्वरूप) हा सिनेमा रीलीजसाठी तयार आहे. सर्व सुरळीत असतं तर पोंगलच्या आठवड्यामधे सिनेमा रीलीज झाला पण अस्ता. पण सध्या त्याचा रीलीज पोस्टपोन झालेला आहे. याचं कारण कमल हासनला हा सिनेमा थिएटरमधे प्रदर्शित करायच्या आधी डीटीएचवर प्रदर्शित करायचा आहे. ज्या दिवशी हा सिनेमा थिएटरमधे प्रदर्शित होईल त्याच्या आदल्या दिवशी रात्री ९ वाजता डीटीएचवर या सिनेमाचे प्रदर्शन करण्यात येइल. एकच शो असलेल्या या सिनेमाला पर सेट टॉप बॉक्स १००० रू. चार्ज लावण्याची योजना होती. इतर प्रांतात राहणारे तमिळ भाषिक आणि थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहू न शकणारे प्रेक्षक यांच्यासाठी डीटीएच रीलीज फायद्याचा ठरला असता. अर्थात थिएटरमधे जाऊन सिनेमा पाहणार्‍यान्साठी भारतीय सिनेमामधे पहिल्यांदाच वापरली जाणारी ऑरा थ्रीडी साऊंड टेक्नॉलोजी वगैरे तांत्रिक आकर्षणे आहेत.

अर्थात चित्रपट वितरकांनी याचा पुरेपूर विरोध केला आहे. पोंगलसाठी ११ जानेवारीला रीलीज होणारा हा सिनेमा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रीलीज करण्यात येइल. डीटीएच प्रीमीयर केल्यास सिनेमा चित्रपटगृहांमधे प्रदर्शित न करण्याचा निर्णय वितरकांनी घेतला होता. सध्या या सर्व चर्चाचर्विणाचा निर्णय झाला की डीटीएच रीलीज २ फेब्रूवारीला - सिनेमा थिएटरमधे रीलीज झाल्यावर एका आठवड्यानंतर करण्यात येइल. अर्थात प्रेक्षकांचा फायदा असेलच आणि सध्या सिनेमा थिएटरातला बहुतेक गल्ला पहिल्याच आठवड्यात जमवत असल्याने वितरकांचादेखील फायदा आहे. डीटीएच रीलीजला विरोध करताना वितरकांनी हा सिनेमा एकाच वेळेला ५०० स्क्रीनमधे प्रदर्शित करण्याची तयारी दर्शवली होती. आता चर्चेचे फलित म्हणून घरबसल्या प्रेक्षकांना हा सिनेमा एक आठवडा उशीराने का होइना पण ऑफिशीअली बघता येइल. (पायरसीसाठी पण हा चांगला प्रतिबंध ठरेल)

चित्रपट क्षेत्राशी ज्यांचा थोडाफार संबंध येतो, अशा लोकांना चित्रपट वितरक नावाचे लोक ठाऊक असणारच. लहान लहान चित्रपटनिर्मात्यांना सर्वात जास्त त्रास होतो तो या वितरकांचा. प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोचलाच नाही तर सिनेमा यशस्वी कसा काय होणार? याचा अर्थ वितरक लोक व्हिलन असतात असे नाही, त्यांची धंद्याची गणितं ही सिनेमाच्या दर्जावर अवलंबून नसून जास्तीत जास्त पैसा कमावणारा सिनेमा यावर अवलंबून असतात.

मराठी सिनेमा बहुतेकदा रीलीजमधे मार खातो. कित्येक उत्तम मराठी सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाहीत. त्याऐवजी हा डीटीएच रीलीजचा पर्याय त्यांना स्विकारता येइल. ज्या प्रेक्षकांना सिनेमागृहामधे जाऊन सिनेमा पाहणे शक्य नाही, अशांसाठी तर हा पर्याय उत्तम ठरेल असे माझे मत. चांगला सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल. पायरेटेड डीव्हीडीवर सिनेमा पाहण्यापेक्षा तिकीट काढून घरी बसून सिनेमा पाहिलेला परवडला. शिवाय निर्मात्यांनादेखील एक सहज आणि हमखास आर्थिक स्त्रोताचा मार्ग मिळेल.

कमल हासनचा विश्वरूपम चे बजेट ९० कोटीच्या वर आहे, इतक्या प्रचंड बजेटचा सिनेमा असूनदेखील त्याने डीटीएच रीलीजचा वेगळा आणि प्रेक्षकांच्या दृष्टीने उपयुक्त निर्णय घेतला याबद्दल त्याचे कौतुक. त्याचबरोबर मराठी सिनेमासाठी या वेगळ्या आऊट ऑफ द बॉक्स थिकिंगचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हीदेखील इच्छा.

विषय: 
प्रकार: 

नंदिनी लिखाण आवडले,कमल हसन चा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे ,मात्र विश्वरुपम डी टी एच वर दा़खवण्याचा त्याचा प्रयत्न फसु ही शकतो कारण डी टी एच वर हा चित्रपट हिण्दी तुन बघण्यासाठी ५०० तर तामीळ साठी १००० रुपये मोजावे लागणार आहेत ,तसेच डी टी एच धारकांची संख्या ही कमी आहे ,कुठल्याही सिनेमाग्रुहापेक्षा हे दर जास्त आहेत्,तसेच रिलीजच्या १ आठवड्यानंतर एवढा खर्च करुन बघण्याची इच्छा फारच थोड्या जणांना होइल आणी मराठी सिनेमाला जर अशा पद्ध्तीने रिलीज केले तर त्याचा किती फायदा होइल हे सांगणे कठीण आहे (डी टी एच वरील प्रसारणाच्या दरामुळे असे म्हणतोय)

पायरेटेड सी डी ला आळा बसेल हे पटले नाही.. उलट, टीव्हीवरुन सहजपणे त्याची कॉपी केली जाईल.. इंटर्नल टी व्ही ट्युनर कार्ड असेल तर कॉपी सहज करता येते.

मराठी चित्रपट निर्मात्यांनी असा प्रयत्न करायला हरकत नाही. मराठी सिरियल्स लोक आवडीने बघतात पण तेच सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघ्णं टाळतात , कारण कदाचीत होणारी गैरसोय असावी. पण नंदिनी म्हणतेय तसं , जर मराठी सिनेमा डिटीएच वर यायला लागले तर लोक नक्कीच बघतील आणि आर्थिक दृष्ट्या ते बघणार्‍यांना फायदेशीर्‍ पण ठरेल. एका घरात चार माणसं जरी गृहित धरली तरी पर हेड खर्च सिनेमा गॄहांपेक्षा स्वस्त पडेल.
<<< मराठी सिनेमासाठी या वेगळ्या आऊट ऑफ द बॉक्स थिकिंगचा जास्तीत जास्त फायदा व्हावा हीदेखील इच्छा. >>> + १

एका घरात चार माणसं जरी गृहित धरली तरी पर हेड खर्च सिनेमा गॄहांपेक्षा स्वस्त पडेल.

???

आमच्या गावात षिनेमा २० रुपयात थेटरात दाखवतात.. हल्ली स्याटेलाइट मुळे पहिल्याच दिवशी म्हमईच्या क्वालिटीचा षिनेमा गावात बघायला मिळतो.. (हिंदी) .. मराठी षिनेमे मात्र नंतर येतात. ते स्याटेलाइट वापरत नाहीत का?

यात कमल हसनचे गणित काही चुकीचे आहे किंवा त्यामुळे वितरकांना [त्यातही तमिळ वितरक संघटनेला] काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाटत नाही. ही एक नवीन तसेच व्यवहारी कल्पना आहे आणि ती जर यशस्वी झालीच तर तिचे जनकत्व कमल हसनकडे जाईल तसेच पायरसीच्या विरोधात एक पायंडाही पडण्याची शक्यता आहे. डीटीएचची कल्पना ही फक्त एकाच शो साठी असून ही सेवा ज्यांच्याकडे आहे ती तमिळ जनता केवळ ३% असल्याचा दावा खुद्द कमल हसन यानेच केला आहे. शिवाय जगभर पसरलेले जे तमिळप्रेमी आहेत त्याना रीलिज दिवशीच चित्रपट पाहिल्याचे [रुपये १०००/- फी भरून] समाधान मिळेल आणि त्यामुळे थिएटर प्रदर्शनावर त्याचा [डीटीएचचा] काहीच विपरित परिणाम होण्याची शक्यता नाही.

अर्थात 'वाद' हा कमल हसनच्या व्यक्तिमत्वाचा बाय डीफॉल्ट भागच बनून गेला आहे की काय अशीच परिस्थिती आहे. चित्रपटाच्या 'विश्वरूपम' या शीर्षकालाच स्थानिक 'तमिळ प्रेमी' संघटनेने विरोध केला होता कारण कमल हसन हा तमिळविरोधी असून त्याने मुद्दाम संस्कृतमधील नाव निवडले आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांचीही निदर्शने चालूच असतात या अभिनेत्याच्याविरोधात.

नंदिनी यानी लेखात 'मराठी चित्रपटा' च्या विकल्पाचा उल्लेख केला आहे. पण कमल हसनच्या एका चित्रपटाचे ९० कोटीचे बजेट पाहिल्यावर मराठी चित्रपटसृष्टी अशा संकल्पनापासून किती दूर आहे वा राहील याची कल्पना केलेली बरी. कसे का असेना पण मराठीत चित्रपटनिर्मिती होते हेच महत्वाचे....डीटीएच वगैरे बाबीमध्ये कशाला इथले निर्माते पडतील?....आणि पडलेच व एखाद्या मराठी चित्रपटाचे डीटीएच चार्जेस १००० रुपये होणार असतील तर अशी किती मराठी घरे असतील जी इतकी रक्कम एका चित्रपटासाठी खर्च करायला तयार होतील?

अशोक पाटील

उलट, टीव्हीवरुन सहजपणे त्याची कॉपी केली जाईल.. इंटर्नल टी व्ही ट्युनर कार्ड असेल तर कॉपी सहज करता येते.>> मी वाचलं होतं त्यानुसार ही पायरसी केलीच तर त्याला लवकर पकडता येइल. कारण, डीटीएचवाले या सिनेमाच्या दरम्यान प्रत्येक सेट टॉप बॉक्ससाठी एक युनिक कोड सतत फ्लॅश करत राहणार आहेत. त्यामुळे कॉपी बनवलीच तर ती कुठे बनवली गेली हे पकडता येते. या प्रसारणादरम्यान, रेकॉर्डिन्गचा ऑप्शन डिसेबल केला जाईल. अर्थात काहीही करून पायरसी करणारे असतीलच म्हणा.

चित्रपटाच्या 'विश्वरूपम' या शीर्षकालाच स्थानिक 'तमिळ प्रेमी' संघटनेने विरोध केला होता कारण कमल हसन हा तमिळविरोधी असून त्याने मुद्दाम संस्कृतमधील नाव निवडले आहे असा त्यांचा दावा आहे. त्यांचीही निदर्शने चालूच असतात या अभिनेत्याच्याविरोधात.>>> मागच्या सिनेमाचे त्याचे नाव तमिळ असूनदेखील याच एका संघटनेने विरोध केला होता. त्या संघटनेचे ते फेवरेट कामच आहे म्हणे.

विश्वरुपम डी टी एच वर दा़खवण्याचा त्याचा प्रयत्न फसु ही शकतो कारण डी टी एच वर हा चित्रपट हिण्दी तुन बघण्यासाठी ५०० तर तामीळ साठी १००० रुपये मोजावे लागणार आहेत ,तसेच डी टी एच धारकांची संख्या ही कमी आहे ,कुठल्याही सिनेमाग्रुहापेक्षा हे दर जास्त आहेत्,>>> बेधुंद, एअरटेल डीटीएचने यासाठी मागणी नोंदवायला सुरूवात केली होती त्यांची आकडेवारी पाहता इट्स नॉट दॅट बॅड. रू. १००० मधे चार माणसांनी पिक्चर पाह्यला तर फायद्यात म्हणावे लागेल. (तीकीट दर्+येण्यजाण्यचाखर्च+ स्नॅक्स आणी इतर) वाटलंच तर पूर्वी रामायण्-महाभारत साठी अख्खी गल्ली जमायची तसे सर्व गल्ली एकत्र बघून पिक्चर बघेल (तरी फायद्याचाच सौदा!!!) तमिळ जनता जी इतर प्रांतांमधे आहे (ही संख्या लक्षणीयरीत्या जास्त आहे) त्या प्रेक्षकांचादेखील फायदाच आहे. उलट हीच जनता कमल हासनला सर्वात जास्त दुवा देइल.

आणि पडलेच व एखाद्या मराठी चित्रपटाचे डीटीएच चार्जेस १००० रुपये होणार असतील तर अशी किती मराठी घरे असतील जी इतकी रक्कम एका चित्रपटासाठी खर्च करायला तयार होतील?>> अशोककाका, मराठी सिनेमांनी पण १००० रूपये चार्ज करावेत असे नाही. तसेही सर्वच डीटीएचवर शोकेस अथवा मूव्ही ऑन डिमांड वगैरे विकल्प आजही उपलब्ध आहेत. मी 'अय्या, मॅन इन ब्लॅक, अव्हेंजर्स' इत्यादि सिनेमा रू ५० ते ७५ भरून पाहिलेत. त्यासारखाच हादेखील एक पर्याय असेल. वाहिन्यांना चित्रपटाचे हक्क विकल्यास निर्मात्याला ठराविक रक्कम मिळते पण वाहिन्या तोच सिनेमा महिन्यातून २५ वेळा दाखवून जाहिरातीचे उत्पन्न घेऊ शकतात. यामधेदेखील तसे बघायला गेले तर नुकसान निर्मात्यांचेच. डीटीएच पेनीट्रेशन जितके वाढत जाईल, तितक्या प्रमाणात असे पर्याय उपलब्ध होत जातील. अर्थात ही पूर्ण सेवा ग्राहक-केंद्रित असल्याने ग्राहकांचा जास्तीत जास्त पैसावसूल फायदा.

एकंदरीत विश्वरूपमला सरताशे विघ्नं काही पाठ सोडत नाहीत.

मुस्लिम संघटनांनी हा चित्रपट मुस्लिमांच्या भावना दुखावणारा आहे म्हणून विरोध केल्याबरोबर सिनेमाचा रीलीज थोपवून धरला गेला. केंद्र सरकारनेदेखील बॅन उठवण्यासाठी सूचना केली होती. त्यानंतर तीन दिवसांनी हायकोर्ट जजने सिनेमा पाहून त्यावर निर्णय देणे अपेक्षित होते. काल हा निर्णय
"आपाप्सांत समझोता करून तुम्हीच निर्णय घ्या" असा विचित्ररीत्या घेण्यात आला आहे.

मुळात सिनेमा काढताना प्रत्येक समाजाच्या भावना लक्षात घेऊनच सिनेमा काढायला हवा का? भावना दुखावतात म्हणजे नक्की काय होतं? मुद्दाम एखाद्याने अपमानास्पद विधाने केली असतील तर ती चूकच. पण जेव्हा सिनेमाची कथावस्तू आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि त्यावर आधारित असेल तर त्यामधे काही धर्मांचे अथवा ऑर्गनायझेशन संदर्भात काही असेल तर लगेच "पूर्ण धर्माच्या भावना दुखावतात" आणी भावना नुसत्या दुखवत नाहीत तर लगेच "कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो"? याआधी कित्येक सिनेमांमधे हा विषय येऊन गेलेला आहे. तरीदेखील आत्ता लगेच सिनेमाचा रीलीज पाडण्याचा हा प्रयत्न म्हणजे अडेलतट्टूपणा वाटत आहे.

सेन्सॉर बोर्डाने हा सिनेमा पास केला होता. ऑलरेडी अर्ध्या जगात हा सिनेमा रीलीज झालेला आहे. तरीदेखील तमिळनाडूमधील मुस्लिमांच्या भावना मात्र दुखावल्या गेल्या आहेत.आधी मला तरी हे प्रसिद्धीखेळ वाटत होता. पण एकंदरीत गेल्या दोन तीन दिवसांतले घटनाचक्र पाहता मला यामागे असलेल्या राजकारण फार महत्त्वाचं आहे असं वाटायला लागलंय.

भावना दुखावतात म्हणजे नक्की काय होतं?

तुमच्या भावना समजल्या. पण गंमत आहे नै, जेंव्हा शूद्र, ओ माय गॉड, देऊळ याला काही लोकान्नी विरोध केला होता, तेंव्हा मात्र तुम्हाला हा प्रश्न पडला नव्हता... आज 'त्यान्नी' विरोध केला तर मात्र प्रश्न पडला. Proud

न्युसन्स वॅल्यु प्रत्येकाकडे असते....

शूद्राला विरोध करणार्याकनी निदर्शने फार उग्र नसतील केली, पण सिनेमाला टॉकीज, चॅनेल मात्र मिळू दिले नाही.

देऊळचेही तसेच.... धार्मिक ठेकेदारानी टॉकीजच्या मालकाना मॅनेज केले, की लगेच शो बंद पडले.

जे दाखवले ते सत्य असेल किंवा कथानक म्हणून योग्य असेल, तर या सिनेमांनाही विरोध व्हायचे काही कारण नव्हते नै का?

पण गंमत आहे नै, जेंव्हा शूद्र, ओ माय गॉड, देऊळ याला काही लोकान्नी विरोध केला होता, तेंव्हा मात्र तुम्हाला हा प्रश्न पडला नव्हता... >>तेव्हाही सेम प्रश्न पडलाच होता. शूद्रच्या बाफवर मी त्या सिनेमाबद्दल मते लिहिली होती. आपण वाचली असालच. ओ माय गॉड आणि देऊळसारख्या सिनेमांना विरोध निव्वळ हास्यास्पद होता. इतकंच काय पण आजा नचले मधल्या एका गाण्यातल्या ओळींनी आणि बिल्लू बार्बर या सिनेमाच्या नावाने देखील लोकांच्या भावना दुखावतात तेव्हा नक्की काय होतं?

"त्यांनी" म्हणजे वगैरे बोलू नका. सरळ नाव घेऊन लिहा. तमिळ मुस्लिम संघटनेने विरोध केला आहे. (ही संघटना म्हणजे सर्व तमिळ मुस्लिम नव्हेत) या संघटनेने विरोध केला आहे आणि म्हणून राज्यामधे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होइल म्हणून राज्य सरकारने सिनेमावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात कमल हासन हाय कोर्टात गेल्यावर त्याला "आपापसांत निर्णय घ्या" असा अजब निर्णय मिळालेला आहे. म्हणजे नुकसान निर्माता म्हणून त्याचंच. शिवाय त्यानेच समझोता पण करायचा. सर्वच विचित्र. बळी तो कान पिळी!!!

आंबा४,

शूद्रविषयी माहित नाही, पण देऊळ चित्रपटात दत्तगुरूंची घोर चेष्टा होती. त्यातली गाणी अजाणतेपणी लहान मुलांच्या तोंडी येऊ शकतात. जो संदेश द्यायचा आहे तो धडपणे द्यावा अशी अपेक्षा आहे.

'विश्वरूप'मध्ये कुठल्याही इस्लामी दैवताचे विडंबन नाही. निदान तामिळनाडू मुस्लिम मुन्हेत्र कळघमने घेतलेल्या आक्षेपांवरून तरी तसं दिसंत नाही. केवळ मुस्लिम समाजाची आजची अवस्था चित्रित केली आहे. मी चित्रपट पहिला नाही, त्यामुळे माझं मत ऐकीव आहे.

देवतांचे धडधडीत विडंबन करणे आणि एका विशिष्ट जनसमूहाचे वस्तुनिष्ठ चित्रण करणे यातला फरक आपल्या ध्यानी यावा.

आ.न.,
-गा.पै.

पुढच्या वादविवादाचा आखाडा सुरू होण्याआधी एक रीमाईन्डर सर्वांनाच. हे माझे रंगीबेरंगी पान आहे. इथे लिहिताना भाषेचे भान ठेवा. इथे कुणाची अवहेलना अथवा कुचेष्टा करू नये ही विनंती.

बाकी चालू द्या!!

रंगीबेरंगीबाबत तुमचे फ़ार गैरसमज आहेत.

वर जो तुम्ही म्याटर तुम्ही लिवता, ती जागा तुमची असते. पण खालच्या प्रतिसादाची जागा ही मायबोलीची असते....... म्हणजे वरची जागा म्हणजे तुमचं घर, खालची जागा म्हणजे सरकारी रस्ता.

किंवा अगदी सिनेमाच्या भाषेत बोलायचंच तर तुम्ही वर लिवलेला टॊपिक म्हणजे सिनेमा. तो तुमचा.

खाली आहे ती जागा म्हणजे मायबोली थेटराची जागा.. तिथलं पब्लिक टाळ्या वाजवणं किंवा श्हिनेमा भुक्कड आहे अशी कॊमेंट करणं , यापैकी काहीही करू शकतं..... Proud

( माझे हे मत चुकीचे असल्यास अ‍ॅडमिन दुरुस्त करतील... अन्यथा, माझे मत खरे आहे, असे मानायला हर्कत नसावी. )

जामोप्या, इथे कमेंट्स टाकण्याबद्दल प्रश्न नाही. कुणाचीही कुचेष्टा अथवा अवहेलना करू नका ही विनंती आहे. नीट वाचत जा. धन्यवाद.

नंदिनी....

चेन्नई हायकोर्ट जस्टिस यानी दिलेला तो 'मध्यममार्गी समझोत्या' चा सल्ला... माझ्या मते.... विचित्र वाटावा असे नसून उलटपक्षी त्यानी तमिळनाडूच्या झाडून सार्‍याच्या सार्‍या ३१ जिल्हाधिकार्‍यांनी चित्रपट प्रदर्शनाच्यासमयी लागू केलेले १४४ कलम. त्यामुळे चित्रपट वितरक आणि थिएटर ओनर्स असोसिएशननेच निषेध व्यक्त केला, त्याचीही योग्य ती नोंद जस्टिस के. वेन्क्टरमन यानी घेतली. त्यानी निकालात हा १४४ कलमाचा निर्णय "appears to be strange" असल्याचे म्हटलेच आहे. काल 'बंदी का उठवू नये' अशी विचारणा सरकारला केली आहे. आता त्यावर तमिळ सरकार पुन्हा फुल स्टेटस बेन्चकडे अपील करीत आहे.
याचाच अर्थ राज्यातील मुस्लिम मताविरूद्ध आपण जात नाही हेच त्याना सुचवायचे आहे.

मुस्लिम समाजाचाही "इन टोटो" विरोध कमल हसनच्या 'विश्वरुपम' चित्रपटाला नसून त्यामध्ये अतिरेक्यांची जी पात्रे दाखविली आहेत ती 'कामगिरी' वर जाताना 'अल्ला मला माझ्या कामात यश दे !" अशी नमाजाच्यावेळी भाकणूक करताना दाखवितात, त्या दृष्यांना त्यांचा आक्षेप आहे. मौलवींच्या मते 'अल्ला पैगंबर भक्ताची प्रार्थना नेहमीच ऐकत असतो. याचा दुसरा अर्थ असा की तो जो अतिरेकी दाखविला गेला आहे त्याला त्याच्या कामात यश मिळाले तर मग असा प्रचार होऊ शकतो की ते निंदास्पद कृत्य करण्यास अल्लानेच त्याला शक्ती दिली.... म्हणजेच आमच्या देवतेचे/प्रार्थनेचे विकृतीकरण चित्रपटात जर होत असेल तर त्याबाबत आमचा विरोध राहील."

बाकी सेन्सॉरपेक्षाही रस्त्यावर उतरलेले सेन्सॉर बोर्ड आजकाल जास्त प्रभावी होत चालले आहे असेच चित्र दिसत आहे.

मराठीमध्ये येऊ घातलेल्या 'तुह्या धर्म कोण्चा ?' ह्या सुहृद गोडबोलेच्या चित्रपटाबाबतही अशीच राळ उडण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेतच.

अशोक पाटील

चेन्नई हायकोर्ट जस्टिस यानी दिलेला तो 'मध्यममार्गी समझोत्या' चा सल्ला... माझ्या मते.... विचित्र वाटावा असे नसून उलटपक्षी त्यानी तमिळनाडूच्या झाडून सार्‍याच्या सार्‍या ३१ जिल्हाधिकार्‍यांनी चित्रपट प्रदर्शनाच्यासमयी लागू केलेले १४४ कलम.<< हे मला नक्की समजलं नाही. अधिक विस्तारात सांगणार का?

जरूर नंदिनी....

त्या अपीलावर दिलेल्या [तसेच जस्टिस वेंकटरमण यानी स्वत: चित्रपट पाहून झाल्यावर केलेल्या भाष्याच्या अनुषंगाने....] निर्णयामध्ये जस्टिस म्हणतात की, 'चित्रपटातील केवळ तोच भाग....म्हणजे त्या मुस्लिम अतिरेक्याच्या अल्ला प्रार्थनेचा सार्‍या उद्रेकाशी संबंधित असून खुद्द भारतीय सेन्सॉर बोर्डावर एक मुस्लिम व्यक्ती असूनही..... मि.एम. जिन्हाह.... कोणत्याही टिपणीशिवाय तो चित्रपट पास होत आहे, तर मग सरकारनेच हकनाक त्यावर प्रतिबंध लावण्याविषयी जी भूमिका घेतली आणि वातावरण तप्त केले ते योग्य झाले नाही."

जस्टिस वेंकटरमण यांच्या मते तामिळनाडूमधील ३१ जिल्हाधिकार्‍यांनी विश्वरुपमच्या बाबतीत ज्या घाईने आपापल्या शहरात कलम १४४ लावले ती घटना ही विचित्र वाटावी अशीच आहे. निर्माता कमलहासन आणि मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणार्‍यानी समजुतीने आक्षेपार्ह वाटणार्‍या भागाबाबत विचारविनिमय केल्यास चित्रपटाचे प्रदर्शन शांतपणे होऊ शकते.

.... म्हणजेच तुमच्या मूळ प्रतिसादातील न्यायमूर्तींचा '"आपाप्सांत समझोता करून तुम्हीच निर्णय घ्या" हा भाग पूर्ण संदर्भाशिवाय आल्याने तो काहीसा विचित्र वाटतो हे सत्यच, पण वास्तविक त्यानी निकालात सरकारवरच टीका केल्याचे स्पष्ट दिसते. जस्टिस स्वतः 'सेन्सॉर बोर्ड' कमिटीत नसल्याने मुस्लिम समाजाला वाटलेला तो विशिष्ट ते भाग काढू शकत नाहीत, मात्र ते काम [वाटल्यास] कमल हासन करू शकतील असेच त्यांचे मत दिसते..... हा मध्यममार्ग विचित्र न वाटता योग्यच वाटतो, नंदिनी.

पाहू या...घोडामैदान जवळच आहे.

अशोक पाटील

जस्टिस स्वतः 'सेन्सॉर बोर्ड' कमिटीत नसल्याने मुस्लिम समाजाला वाटलेला तो विशिष्ट ते भाग काढू शकत नाहीत, मात्र ते काम [वाटल्यास] कमल हासन करू शकतील असेच त्यांचे मत दिसते..... हा मध्यममार्ग विचित्र न वाटता योग्यच वाटतो, >> ओके. आले लक्षात. पण तरीदेखील कमल हासन न्याय मागण्यासाठी सरकार आणि मुस्लिम संघटनेविरूद्ध न्यायालयात गेलेले असताना त्याला "तुम्हीच ठरवा" हा निर्णय कमल हासनलाच पिंजर्‍यात उभे करत आहे का? He as a producer suffering on every front, including financial and social. Why he should pay for the mess, which he has not made?

नंदिनी....

आत्ताच आकाशवाणीवरील बातम्या ऐकल्या....(सायंकाळी ६.०० च्या), त्यात म्हटले गेले की, जस्टिस वेंकटरमण यांच्या "मध्यस्थ मार्गा" च्या आवाहनाचा विचार करून निर्माता कमल हासन यानी 'विश्वरुपम' मधील 'तो' आक्षेपार्ह भाग स्वतःच वगळण्याचे आश्वासन मुस्लिम प्रतिनिधी आणि सरकारला दिले. त्यानुसार नवीन प्रिन्टस तयार केल्या जातील व सोमवारी पुन्हा त्यानुसार संबंधित प्रतिनिधी तो चित्रपट पाहतील.....

....त्यामुळे आता तुमच्या वरील प्रतिसादाला अनुसरून असेच म्हणावे लागेल की, He has considered wisely taking into consideration the probable suffering of financial loss.

शेवटी १०० कोटीचा आकडा अक्राळविक्राळ वाटणारच त्याला....आणि का वाटू नये?

अशोक पाटील

He has considered wisely taking into consideration the probable suffering of financial loss.
<< हो, मी विपुमधे म्हटलं तसं १०० कोटी म्हणजे हार्ट अ‍ॅटॅकचाच मामला. चला, आता तरी हा सिनेमा रीलीज होऊ देत. तसा ऑलरेडी रीलीज झालाय. पण आता तमिळनाडूमधे पण रीलीज होइल. या सगळ्या वादावादीमधे त्या डीटीएच रीलीजचे काय झाले कळायला मार्ग नाही. Happy एकंदरीत सिनेमाचे नाव विश्वरूपमच्या ऐवजी वादरूपम ठेवायला हवे होते.

नंदिनी....

माझ्या माहितीप्रमाणे "विश्व...." चा डीटीएचचा मुद्दाही या दरम्यान कमल हासन आणि थिएटर असोसिएशन यांच्या संयुक्त बैठकीनंतर निकालात निघाला आहे. त्यानुसार आता तामिळ आणि तेलुगु बेल्टमधील चित्रपटगृहात विश्व झळकल्यानंतर तो एक आठवड्यानंतर डीटीएच आवृत्तीत उपलब्ध होईल, तर उर्वरित देशात [हिंदी आवृत्ती] २ फेब्रुवारी २०१३ रोजी डीटीएचद्वारे पाहता येईल.

....बाकी तुम्ही म्हणता तसे 'वादरुपम' हे शीर्षकही आता योग्यच आहे म्हणा. अर्थात कमल हासनला अशा वैतागाचा अनुभव त्याच्या "मनमधन अम्बु" च्या वेळीही आला होताच.

अशोक पाटील

काका, निकालात निघाला आहे अजून टाटा स्काय वर काही माहिती येत नाही. आमच्याकडे टाटा स्काय आहे. डीटीएचच्या रीलीजसाठी एअरटेल फार अग्रेसिव्ह होते.

देश सोडून जाण्याची भाषा करणा-या अभिनेता कमल हसनला मद्रास हायकोर्टाने आज जबरदस्त दणका दिला. कमल हसनच्या दबावाला बळी न पडता त्याच्या वादग्रस्त ' विश्वरूपम ' चित्रपटावर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने दिला.

हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय कमल हसन यांनी घेतला आहे. त्यामुळे 'विश्वरूपम'चा वाद आता आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

कमल हसनची निर्मिती असलेल्या ' विश्वरूपम ' चित्रपटाच्या प्रदर्शनाला तामिळनाडूतील मुस्लीम संघटनांनी विरोध केला होता. या विरोधाचे लोण आंध्र व कर्नाटकातही पसरले होते. त्यामुळे शुक्रवारी येऊ घातलेला हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. याविरोधात कमल हसनने मद्रास हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने मंगळवारी त्याच्या बाजूने निकाल देत चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता.

या निर्णयाला तामिळनाडू सरकारने हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी झाली. सामाजिक सलोखा बिघडण्याची राज्य सरकारची भीती लक्षात घेऊन हायकोर्टाने या चित्रपटावर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

कमल काटछाटीला तयार ; पण सुप्रीम कोर्टात जाणार

मुस्लीम संघटनांशी झालेल्या चर्चेनंतर कमल हसनने चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लीम संघटनांचा विरोध मावळणार असला तरी न्यायालयाचा निर्णय आणि सरकारच्या भूमिकेचे काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

माझ्याकडेही "टाटा स्काय" च आहे. तशी टीप आलीच आणि तुझ्याअगोदर मी पाहिली तर कमल हासनला कळण्यापूर्वीच तुला कळवितो..... Biggrin Biggrin
डोण्ट वरी...!!

{गंमत म्हणजे, तुझा हा ताजा प्रतिसाद मी असा वाचला.... "काका निकालात निघाला आहे...." ~ गॉश्श, घाबरलोच !}

अशोक पाटील

काका, स्वल्पविराम महत्त्वाचा. Happy

उदयन, ही कुठे मिळाली बातमी तुला?

वरचीच बातमी इथे अशी दिली आहे. वरच्या बातमीत "देश सोडून जाण्याची भाषा.. दणका दिला" याचा आणि इतर बातमीचा संबंधच लागत नाहीये.

उदयन....

मी वाचली ही संबंधित बातमी. दोन सदस्य डिव्हिजन बेन्चने ती बंदी फक्त "तामिळनाडू" पुरती मर्यादित ठेवल्याचे दिसते, त्याला आता कमल सुप्रीम कोर्टात आव्हान देईल.

थोडक्यात बातमी [चेन्नई पेपर्समध्येच...] अशी :
Screening of Kamal Haasan's Vishwaroopam in Tamil Nadu has been deferred again with the Madras high court on Wednesday setting aside a single judge's order giving the green signal for the release even as the actor agreed to delete certain scenes considered offensive by Muslim outfits.

तुमच्या प्रतिसादात 'कायम' शब्द आला आहे, तो मला वाटते गैरलागू आहे. Deferred चा अर्थ कायद्याच्या भाषेत बंदी नसून 'स्थगिती/पुढे ढकलणे' असा होतो.

अशोक पाटील

सगळाच बिनडोकपणा.... भारतात चित्रपट बनवण्यार्‍या हासनला हे तर चांगलच माहीती असेल की यातील काही दृष्य आणि संवादांमुळे अडचणी येतील?

आणी न्याय मिळाला नाही तर परदेशात जाण्याची भाषा.... मागे असच कोणीतरी म्हणालं होतं ना ?

उगाच कोणाच्या भावना दुखावतील असं मुद्दाम का करावं ...... आणि अतिरेकी असो की गुंड, तोही देवाची प्रार्थना करणारच ना? का त्याना अधिकार नाही प्रार्थना करण्याचा ? तेही तसेच...

.. हजारो विषय आहेत, ज्यावर चांगले चित्रपट बनु शकतात, पण लक्षात कोण घेतो....

असो १००० रुपये देउन कोणताही चित्रपट बघावा असं वाटत नाही.... मुळात इतके पैसे खर्च करुन चित्रपट बघायची इच्छा होत नाही आजकाल.... Sad

आणि अतिरेकी असो की गुंड, तोही देवाची प्रार्थना करणारच ना? का त्याना अधिकार नाही प्रार्थना करण्याचा ? तेही तसेच>> प्रार्थना करताना दाखवलेत त्यालाच तर आक्षेप आहे की.

Pages