चिपळूणचे शरद पवारांचे भाषण

Submitted by pkarandikar50 on 12 January, 2013 - 10:00

शरद पवारांचे रोखठोक भाषण.

आपल्या आजवरच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात शरद पवारांनी अनेक सभा-संमेलनातून उत्तम भाषणे केलीत. त्यापैकी काही मोजक्या भाषणांमध्ये, चिपळूणच्या साहित्य संमेलनातील उदघाटनपर भाषणाचा क्रम वरचा राहील. आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर कराडला भरलेल्या साहित्य संमेलनात कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. तसाच पवारांच्या चिपळूणच्या भाषणाचाही उल्लेख यापुढे वरचेवर होत राहील यात शंका नाही.

मराठी साहित्य संमेलने साहित्य-बाह्य मुद्द्यांवरून 'गाजण्या'चा एक अनिष्ट पायंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पडला आहे. समाजात हरेक प्रकाराची माणसे जगत असतात आणि अनेक बर्‍या-वाईट प्रवृत्तीही वावरत असतात. त्यापैकी ज्या हिणकस आणि त्याज्य प्रवृत्ती आहेत, त्यांचेच गदळ नेमके या संमेलनाच्या निमित्ताने का वर येत असावे? 'येन केन प्रकारेण' प्रसिद्धी मिळवण्याचा काही जणांचा सवंग खटाटोप हे एक कारण असू शकेल. आपल्या प्रसार माध्यमांनाही 'तसल्या'च गोष्टींत रस वाटतो हेही एक कारण असावे. पवारांनी आपल्या भाषणात साहित्य-बाह्य वादंग माजविणार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली. "हे कोणत्यातरी अधिकारी व्यक्तिने बोलायला हवे होते. बरे झाले, सोनारानेच कान टोचले." अशी या संदर्भातली एक बोलकी प्रतिक्रिया मला ऐकावयास मिळाली.

मुळात, संमेलनेच साहित्य-बाह्य ठरत चालली असल्यामुळे ती साहित्य-बाह्य गोष्टींसाठी गाजत असावीत की काय अशीही शंका येते. सांगलीच्या संमेलनात, पूर्वाध्यक्षांनी नव्या अध्यक्षांच्या हाती सूत्रे सोपविण्याची औपचारिकता पाळली गेली नव्हती. महाबळेश्वरचे संमेलन तर निर्वाचित अध्यक्षांवाचूनच पार पडले! बहुमताने निवडून आलेल्या पक्षाला सरकार बनवू न देण्यासारखाच हा एक अश्लाघ्य प्रकार होता. संमेलनाचे वातावरण उत्साही असावे, ते उत्सवी असले तरी काही बिघडत नाही पण त्यांचा 'उरुस' होऊ नये.

सध्या संमेलनांचे 'बजेट' काही कोटींच्या घरात पोहोचले आहे, असे ऐकतो. त्यालाही आक्षेप घ्यावयाचा नाही परंतु इतका मोठा खर्च केल्यासारखे, त्यातून काही तरी ठोस निष्पन्न व्हावे, साहित्याला काही नवी दिशा मिळावी अशी अपेक्षा बाळगणार्‍या साहित्यप्रेमींच्या पदरी मात्र निराशाच पडते, असे का? याबाबत संमेलनांच्या संयोजकांनी आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी गंभीरपणे आत्म-चिंतन करावे अशी अगदी योग्य आणि स्वागतार्ह सूचना पवारांनी केली.

संमेलनाच्या अध्यक्षांची निवड [णूक] हाही एक चिंतेचा विषय. यावर गेली अनेक वर्षे मान्यवर साहित्यिक तीव्र नापसंती व्यक्त करत आले आहेत परंतु बदल मात्र होत नाही. संमेलनाच्या व्यासपीठावरून याबाबत पवारांइतके रोखठोक वक्तव्य यापूर्वी कोणी केल्याचे मला तरी आठवत नाही.

मराठी साहित्य-संस्था म्हणजे गढूळ पाण्याची डबकी आणि ठराविक कंपूंची मिरासदारी झाली आहेत. संमेलनाध्यक्षांच्या निवडणूकी साठी मतांचा 'कोटा' ठरवणे, मतदारांची यादी बनविणे, प्रत्यक्ष मतदान आणि शेवटी मत-मोजणी ही सगळी प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक आणि अविश्वसनीय आहे. त्यात सर्व प्रकारचे गैरप्रकार सर्रास घडतात असे बोलले जाते. या संस्थांच्या घटनेत आणि संरचनेत काही काल-सुसंगत सुधारणा घडवून आणणे आवश्यक झाले आहे. प्रश्न एवढाच आहे की हे काम कोण करणार्? शासनाने क्रिडा-संघटनांसाठी काही मार्गदर्शक तत्वे विहीत केली आहेत, त्या धर्तीवर महाराष्ट्र शासन मराठी साहित्य-संस्थांसाठी काही मार्गदर्शक तत्वे घालून देऊ शकेल. " तुमच्या स्वायत्ततेवर आम्हाला बंधने आणावयाची नाहीत किंवा तुमच्या कारभारात ढवळाढवळही करावयाची नाही. तथापि शासनाची मान्यता आणि निधी हवा असेल तर शासनाने विहीत केलेल्या तत्वांनुसार तुम्ही आवश्यक त्या घटना-दुरुस्त्या कराव्यात आणि कार्यपद्धतीत [उदा. संमेलनाध्यक्षांची निवड] यथायोग्य बदल करावेत" अशी भूमिका शासन घेऊ शकणार नाही का? दरवर्षी शासन [आणि स्थानिक स्वराज्य संस्था] संमेलनाकरिता लक्षावधी रुपयांचे विनाअट अनुदान देत आले आहे. आता मार्गदर्शक तत्वांची अट नव्याने घालणे शक्य होणार नाही का? अर्थात मार्गदर्शक तत्वे ठरविताना राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून संबंधित संस्थांचे पदाधिकारी, हयात पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार यांच्या समवेत शासनाला चर्चा करावी लागेल, त्यांच्या सूचना विचारात घ्याव्या लागतील. चिपळूणला उपस्थित मंत्र्यांच्या संख्येवर थोडी टिका-टिप्पणी झाली. त्या सगळ्या मंत्र्यांना पवारांच्या भाषणाची सकारात्मक दखल घ्यावीशी वाटली आणि यासंबंधात काही वेगळे आणि चांगले घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली तर पवारांच्या भाषणाचे खरे चीज होईल.

स्त्री-साहित्यिकांना मिळणार्‍या वागणूकीविषयी त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या एकूण महिलाविषयक भूमिकेशी सुसंगत असेच होते आणि अत्यंत स्वागतार्ह् ही. याविषयीही यापूर्वी या विषयावर पवारांइतके थेटपणे कोणी स्वागताध्यक्ष किंवा उदघाटक बोलले नसावेत. विशेषतः मुक्ताबाई- जनाबाईंपासून ते विभावरी शिरूरकर आणि आशा बगे पर्यंतच्या स्त्री-साहित्यिकांचा त्यांनी केलेला गौरवपूर्ण उल्लेखही सुखावणारा होता.

एकंदरीत, चिपळूणचे पवारांचे भाषण अत्यंत प्रभावी आणि समयोचित झाले. साहित्यक्षेत्रातली अनेक दुखणी त्यांनी वेशीवर टांगली. संबधित यातून काही धडा घेतील आणि सुधारणा-प्रक्रियेला चालना मिळेल अशी आशा करू या.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आट पाट नगर होते, तिथे फार्फार वर्षांपूर्वी.." अशी सुरुवात करून अनेक ष्टोर्‍या सुरु होतात. त्याच प्रमाणे long long ago once upon a time मा. शरदरावजी हे अभ्यासू व आदरणीय राजकारणी म्हणून नावाजले जात.
सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर लोकांनी पीएचड्या केलेल्या आहेत. स्त्री ला मालमत्तेत वाटा मिळावा, सरकारी कोट्यातून मिळणार्‍या सदनिकेत/भूखंडात इ. स्त्री/पत्नीचे नांव लावलेच गेले पाहिजे इ. गोष्टींची अंमलबजावणीही त्यांच्याकडून झाली. खेळाच्याही क्षेत्रात त्यांचा सहभाग असे. अगदी राष्ट्रीय स्तरावर खोखो स्पर्धा भरविण्यापासून आजकालच्या क्रिकेटपर्यंत. अशी साहेबांची महती होती.

मात्र गेल्या काही वर्षांत त्यांचा लौकिक कलंकित झालेला आहे. उघड नसेल तरी अनेक शंका त्यांच्या विरोधात आहेत, अन त्यामुळेच का होईना, काय बोलले यापेक्षा कोण बोलले म्हणून पवारांनी केलेल्या भाषणाची वाट लागेल असे म्हणावेसे वाटते.

भाषणातले शब्द, विचार छानच होते. विषयाला धरून व विचारप्रवर्तक असे उत्तम भाषण स्वतः लिहून तयार करू शकणार्‍या आजच्या फार थोड्या राजकारण्यांपैकी साहेब एक आहेत. बाकी, गालात "काहीतरी" उत्पन्न झालेल्या व्याधीमुळे कराव्या लागलेल्या यशस्वी कमांडो शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या शब्दोच्चारांची झालेली गोची, ते भाषण प्रत्यक्ष ऐकताना रसभंग करीत होती.

करंदिकर साहेब,

ते पूर्ण भाषण किंवा त्या भाषणाचा चांगला सारांश कुठे मिळेल का? सद्ध्याची वर्तमानपत्रे त्यांच्या "राजकिय अजेंडा" नुसार त्यांना हवं तेवढच छापतात.. त्यामुळे वर्तमानपत्राच्यतिरिक्त कोणी त्याचा सारांश दिला असेल तर वाचायला नक्कि आवडेल.

धन्यवाद.

एकंदरीत, चिपळूणचे पवारांचे भाषण अत्यंत प्रभावी आणि समयोचित झाले. साहित्यक्षेत्रातली अनेक दुखणी त्यांनी वेशीवर टांगली. संबधित यातून काही धडा घेतील आणि सुधारणा-प्रक्रियेला चालना मिळेल अशी आशा करू या.>>>> पवारांनी आपले भाट सगळी कडे पेरले आहेत Sad मायबोलीत सुद्धा !!

काय बोलले गेले यापेक्षा कोण बोलले यालाच महत्व देणार्‍या व्यक्तिंसाठी मी लिहित नाही. आणि मला काविळ झालेली नसल्यामुळे मी स्वच्छ नजरेने जगाकडे पाहू शकतो.

-प्रभाकर [बापू] करंदीकर

गणोबा,
म.टा. म्हणजे 'मवाली टाइम्स' असे माझा एक मित्र म्हणतो, तर दुसयाच्या मते, एके काळी म.टा. ची जाहिरात ' पत्र नव्हे, मित्र' अशी केली जायची, त्याऐवजी आता ' पत्र नव्हे, कुत्रं ' अशी त्याची जाहिरात करण्याची वेळ आली आहे!
आता तुम्ही ' पोलिस टाईम्स' असं नवं नाव दिलं आहे. पण मला वाटतं की घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करावा आणि गुन्हेगारांना शासन करावे अशी आपली अपेक्षा असते. म.टा. मात्र न घडलेल्या गुन्ह्यातच रस घेतो, त्याला पोलिस कसं बरं म्हणावं? We love to hate Pawar असं म्हणणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे!

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

pkarandikar50 | 14 January, 2013 - 14:34 नवीन
काय बोलले गेले यापेक्षा कोण बोलले यालाच महत्व देणार्‍या व्यक्तिंसाठी मी लिहित नाही. आणि मला काविळ झालेली नसल्यामुळे मी स्वच्छ नजरेने जगाकडे पाहू शकतो.

-प्रभाकर [बापू] करंदीकर

pkarandikar50 | 14 January, 2013 - 14:46 नवीन
गणोबा,
म.टा. म्हणजे 'मवाली टाइम्स' असे माझा एक मित्र म्हणतो, तर दुसयाच्या मते, एके काळी म.टा. ची जाहिरात ' पत्र नव्हे, मित्र' अशी केली जायची, त्याऐवजी आता ' पत्र नव्हे, कुत्रं ' अशी त्याची जाहिरात करण्याची वेळ आली आहे!
आता तुम्ही ' पोलिस टाईम्स' असं नवं नाव दिलं आहे. पण मला वाटतं की घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करावा आणि गुन्हेगारांना शासन करावे अशी आपली अपेक्षा असते. म.टा. मात्र न घडलेल्या गुन्ह्यातच रस घेतो, त्याला पोलिस कसं बरं म्हणावं? We love to hate Pawar असं म्हणणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे!

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

त्याचे काय आहे बापूजी, की आम्ही कुणी छापले यापेक्षा काय छापले याला महत्व देतो Proud Biggrin Rofl Lol Light 1 Light 1 Light 1

साहेबांचे भाषण चांगलेच झाले, अन ते "अभ्यासू" म्हणूनच पहिल्यापासून प्रसिद्ध आहेत.
मात्र त्यान्च्या अभ्यासात त्यान्च्याच छत्रछायेखाली वाढत चाललेल्या ब्रिगेडीन्नी निर्माण केलेल्या "परशुराम" प्रकरणाचा समावेश मात्र दिसून आला नाही वा त्यावर ठाम भुमिका घेऊन ब्रिगेडीन्ना दुखावणे राजकिय गरजेपोटी त्यान्ना सोईस्कर वाटले नसावे. किम्बहुना, महाराष्ट्रातून कॉन्ग्रेस सफाचाट झाल्यावर्/झाल्यास उरलेले एकमेव विरोधी "हिन्दुत्ववाद्यान्चे कार्ड" भाजपा/शिवसेना/मनसे या पक्षान्चे माध्यमातून चालू नये म्हणूनच ब्रिगेडीन्ना आत्तापासूनच उभे केले जाते आहे की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे. असो.
साहेब दोन शब्द "परशुराम" प्रकरणाबद्दल (परशुरामान्बद्दल गरज नाही) बोलले अस्ते तर बरे झाले अस्ते. निदान आम्हाला स्पःष्टता तरी आली अस्ती.

करंदीकर काका, - साहेब भाषणे चांगलीच करतात, पण दोन भाषणांच्या मधे ज्या करामती करतात त्यांनी ह्या महाराष्ट्र देशाची अशी दशा झाली आहे.
त्यांनी फक्त भाषणच केली तर मी सुद्धा खूष होईन.

प्रसाद,
राज्याची 'दशा' झाली असेल तर त्याला कोणी एकटा दुकटा राजकारणी कधीच जबाबदार नसतो. आपण मतदार ज्यांना निवडून देतो त्यांच्या बर्‍या-वाईट कारभाराला आपणही अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतोच की !
गेल्या पस्तीस वर्षात शरद पवार किती वर्षं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? वसंतदादा पाटील, सुधाकर नाईक, विलासराव देशमुख [तीनदा का चारदा], सुशीलकुमार शिंदे, मनोहर जोशी, नारायण राणे, अशोक चव्हाणआणि आता पृथ्वीराज चव्हाण या मंडळींचा गेल्या ३५ वर्षातला एकूण कार्यकाळ किती राहिला याचा हिशेब मांडला तर काय दिसेल? समजा, शरद पवारांनी राज्याची वाट लावली असं धरून चाललं तर मग या सगळ्या मंडळींनी कोणते दिवे लावले?
वास्तवात, तर-तम हा विचार करण्याला पर्याय नसतो. संपूर्ण काळं -कुट्ट किंवा संपूर्ण पांढरं असं कुणीच नसतं.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

राज्याची 'दशा' झाली असेल तर त्याला कोणी एकटा दुकटा राजकारणी कधीच जबाबदार नसतो. आपण मतदार ज्यांना निवडून देतो त्यांच्या बर्‍या-वाईट कारभाराला आपणही अप्रत्यक्षरित्या जबाबदार असतोच की !>>>

बरोबर आहे तुमचे. सगळ्याला जनताच जबाबदार असते. पण जनतेला मुर्ख बनवायला कोण जबाबदार आहे ह्याचा जरा विचार करा.

कुणी कुणाचे कान पिळायचे याबद्दल गोंधळ झालाय मनात. अर्थातच बेगर्स हॅव नो चॉइस हे देखील आठवलं...

<<सध्या संमेलनांचे 'बजेट' काही कोटींच्या घरात पोहोचले आहे, असे ऐकतो. त्यालाही आक्षेप घ्यावयाचा नाही परंतु इतका मोठा खर्च केल्यासारखे, त्यातून काही तरी ठोस निष्पन्न व्हावे, साहित्याला काही नवी दिशा मिळावी अशी अपेक्षा बाळगणार्‍या साहित्यप्रेमींच्या पदरी मात्र निराशाच पडते, असे का? याबाबत संमेलनांच्या संयोजकांनी आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी गंभीरपणे आत्म-चिंतन करावे अशी अगदी योग्य आणि स्वागतार्ह सूचना पवारांनी केली.
>>

(नानाची टांग)
राज्यं-बिज्यं गेलं तेल लावत... ते संभाळणं, वाढीला लावणं ही ह्यांच्या पार नजरेच्याही पल्याडची गोष्टं आहे, राव.
वरचंच वक्तव्यं आपण क्रिकेटबोर्डं ध्यानात घेऊन विचारात घेऊया. काय संबंध ह्यांचा क्रिकेटशीही आणि साहित्याशीही?
एक पैसा आणि सत्ता सोडल्यास समाजकारणाशी... (मुद्दाम राजकारण हा शब्दं वापरत नाहीये. आजकालच्या "राजकारणात" लोककल्याण येत नाही... असले शब्दंही विनोदी वाटतात.) काडीचाही संबंध नाही असली माणसं... एकाच नव्हे तर काही पीढ्यांचे भोग ह्या एका आणि एकाच कारणासाठी सत्तारूढ आहेत.
फक्तं अशांच्या जीवंतपणीच त्यांच्या "कारकिर्दी"चा शेवट व्हावा असं वाटतं... त्यांचा शेवट होण्याआधी. नाहीतर त्यांना हुतात्मापद मिळतं.

संमेलनातल्या भाषणात शरद पवार हंसत म्हणाले कीं अत्रेंपासून महानोरपर्यंत अनेक साहित्यिक राजकारणात आले व त्यांचं तिथं स्वागतच झालं; मग राजकारण्यांचं साहित्यसंमेलनात स्वागत व्हायला काय हरकत आहे ! सहज मनात आलं, कोंकरूं लांडग्यांच्या कळपात गेलं तर तिथं त्याचं जिभल्या चाटत स्वागतच होणार पण उलटं झालं तर हाहा:कार माजणारच ना !!!
मुद्दाम हा उथळ विनोद करावासा वाटला कारण पवारांच्या भाषणावरून भलतीचकडे वळलेला हा धागा पुन्हा भाषणावरच आणतां येतो कां तें पहावं ! Wink

...

मी शरद पवारांच्या भाषणाबद्दल लिहिलं याचं एक कारण ते एक 'गुडी गुडी' भाषण नव्हतं. पवार ज्या परखडपणे बोलले ते एका राजकारण्याकडून क्वचितच ऐकायला मिळतं. दुसरं कारण की शरद पवार हा शब्द नुसता उच्चारला तरी काही जणांचा तिळपापड होतो आणि मग धमाल प्रतिक्रिया यायला लागतात, त्यांची मजा लुटता येते ! ती निव्वळ करमणूक असते !!
चिपळूणला वसंत आबाजींनी जे छोटेखानी भाषण केलं ते जितकं सडेतोड होतं तितकंच मनस्वी आणि संयमी होतं. एखाद्या चिंतनशील आणि परिपक्व साहित्यिकाकडून ज्या प्रकारच्या भाषणाची अपेक्षा करावी तसंच ते होतं. माझ्या मते तीन दिवसांच्या संमेलनाचा तो 'हायलाईट' होता. आमच्या बथ्थड आणि बधीर मध्यमांनी 'त्या' भाषणाची फारशी दखल घेतली नाही याचं मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही पण संमेलनातल्या परिसंवाद किंवा चर्चांमधूनही त्याबाबत काही विचार मंथन झालं नाही, हे मात्र थोडसं खटकलं. अर्थात 'वार्षिक जत्रे'त त्याची अपेक्षा बाळगणंही चूकच म्हणा !
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

<<वास्तवात, तर-तम हा विचार करण्याला पर्याय नसतो. संपूर्ण काळं -कुट्ट किंवा संपूर्ण पांढरं असं कुणीच नसतं.>>
चला म्हणजे तुम्ही ही मान्य केले की तुमचे साहेब बरेसचे काळे आहेत.

तर-तम भाव करु नये, एका चोरा पेक्षा दुसरा चोर बरा असे होत नाही. दोन्ही चोर च आहेत असे आधी तुम्ही मनात आणा म्हणजे दोन्ही चोरांपेक्षा तिसरा पोलिसांचा पर्याय आहे का त्याकडे बघता येईल. त्यासाठी दोन्ही चोर आहेत हे accept करायला लागते. चांगला चोर, चांगला गुंड असे काही नसते.

आणि जे जनतेच्या पैश्यावर जगत आहेत त्यांनी तर पांढरे स्वत्छ च असायला पाहीजे.

मी शरद पवारांच्या भाषणाबद्दल लिहिलं याचं एक कारण ते एक 'गुडी गुडी' भाषण नव्हतं. पवार ज्या परखडपणे बोलले ते एका राजकारण्याकडून क्वचितच ऐकायला मिळतं. दुसरं कारण की शरद पवार हा शब्द नुसता उच्चारला तरी काही जणांचा तिळपापड होतो आणि मग धमाल प्रतिक्रिया यायला लागतात, त्यांची मजा लुटता येते ! ती निव्वळ करमणूक असते !!
चिपळूणला वसंत आबाजींनी जे छोटेखानी भाषण केलं ते जितकं सडेतोड होतं तितकंच मनस्वी आणि संयमी होतं. एखाद्या चिंतनशील आणि परिपक्व साहित्यिकाकडून ज्या प्रकारच्या भाषणाची अपेक्षा करावी तसंच ते होतं. माझ्या मते तीन दिवसांच्या संमेलनाचा तो 'हायलाईट' होता. आमच्या बथ्थड आणि बधीर मध्यमांनी 'त्या' भाषणाची फारशी दखल घेतली नाही याचं मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही पण संमेलनातल्या परिसंवाद किंवा चर्चांमधूनही त्याबाबत काही विचार मंथन झालं नाही, हे मात्र थोडसं खटकलं. अर्थात 'वार्षिक जत्रे'त त्याची अपेक्षा बाळगणंही चूकच म्हणा !
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

बापू, शरद पवार हा शब्दं म्हटला की माझा तीळपापड होत नाही... तितकी उथळ मी नाही ह्याबद्दल माझी खात्री आहे.
तुमच्या-त्यांच्या कोणत्याही संबंधाविषयी, किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल वाटत असलेल्या आदराबद्दलही मला काहीही म्हणायचं नाहीये.
पण त्यांच्या ज्या दुतोंडी वक्तव्याचा उदो झाला... त्यावरून माझा नक्की तीळपापड झाला.
... त्यावरून मी दिलेली प्रतिक्रिया "धमाल" असेल आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळाला असेलही.... किंवा इतर वाचकांच्या तीळपापड मधून इथे आलेल्या इतर प्रतिक्रिया तशाच "धमाल" असू शकतिल आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळाला असेल.
पण लेख लिहिण्यामागचं हे सुद्धा कारण असू शकतं?
छान आहे. जो जे वांछील तो ते लाहो...
(तुमच्या प्रतिक्रियेचा मी काढलेला हा अर्थं नसेल तर क्षमा करा)

..

बरं, अध्यक्षांच्या समारोपाच्या भाषणाबद्दल धागा कोण उघडतयं?
लौकर उघडा, कारण माझं डोक तापलय Proud

कायसंबंध ह्यांचा क्रिकेटशी आणि साहित्याशीही?
कुठलीही संघटना बांधण्यासाठी आणि टिकवण्यासाठीही उत्तम संघटक आणि दूरदृष्टीचे प्रशासक लागतात.एखादा उत्तम खेळाडू त्या त्या खेळाचा सल्लागार अथवा कोच होउ शकतो किंवा होतोच पण संघटना टिकवणे,वाढवणे, पैसा गोळा करणे यासाठी त्या खेळाची वाढ आणि खेळाडूंचे हित इच्छिणारा कुशल कारभारी लागतो. तेव्हा 'काय संबंध?' हा प्रश्न अगदीच गैरलागू आहे. साहित्यातले 'ओ' की 'ठो' न कळणारे आपण सर्व इथे तिथे तारस्वरात चर्चा करीत असतो. मग राजकारण्यांनी- त्यातही साहित्यिकांशी घनिष्ठ संबंध राखून असलेल्या आणि त्यांच्या सुखदु:खाची जाण असलेल्या, बर्‍यापैकी वाचन असलेल्या एखाद्याने- काही मते व्यक्त केली तर काय बिघडले?
शरद पवारांची बरीचशी मते पटणारी पण hee sahamatee hirireene vyakta na karaNaaree, बहुधा सायलेंट (विशेषतः इंटरनेटवर) असणारी मोठी जनता आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या निर्णयांविषयी चांगले बोलता येईल असे बरेच काही आहे. कृषिमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम आहे. सध्याच्या राजकारणपटावर पंतप्रधान होऊ शकतील अशा काही थोड्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांच्यामधली कमतरता म्हणजे वक्तृत्वाची उणीव. शस्त्रक्रियेनंतर तर ती अधिकच जाणवते. पण ती उणीव त्यांनी कृतीने भरून काढली आहे.

<< कृषिमंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम आहे.>>

Rofl Rofl Rofl

<< पण ती उणीव त्यांनी कृतीने भरून काढली आहे.>>

Rofl Rofl Rofl Rofl

ज्या त्या क्षेत्रात उत्तम माणसांची वानवा आहेत. साहित्यीक असलेले प्र के अत्रे यांच्या कडे महाराष्ट्रातले सरकार हादरवण्याची ताकद होती. पुल देशपांडे यांची आणिबाणी नंतरच्या निवडणुकातली भाषणे गाजली होती.

या ताकदीचा साहित्यीक नसल्यामुळे राजकारणी लोकांना रान मोकळे आहे. सदान कदा सरकारी पैशाने अधिवेशने करायची म्हणल्यावर राजकारणी तिथे येणारच.

बापु - शरद पवार साहेबांची उपस्थिती वादग्रस्त असली तरी भाषण उत्तम होते याबाबत मी सहमत आहे.

>>या ताकदीचा साहित्यीक नसल्यामुळे राजकारणी लोकांना रान मोकळे आहे. सदान कदा सरकारी पैशाने अधिवेशने करायची म्हणल्यावर राजकारणी तिथे येणारच.

बरोबर, जेथे पैसा आणि प्रसिद्धी तेथे राजकारणी येती !

Pages