चिपळूणचे शरद पवारांचे भाषण

Submitted by pkarandikar50 on 12 January, 2013 - 10:00

शरद पवारांचे रोखठोक भाषण.

आपल्या आजवरच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात शरद पवारांनी अनेक सभा-संमेलनातून उत्तम भाषणे केलीत. त्यापैकी काही मोजक्या भाषणांमध्ये, चिपळूणच्या साहित्य संमेलनातील उदघाटनपर भाषणाचा क्रम वरचा राहील. आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर कराडला भरलेल्या साहित्य संमेलनात कै. यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख आजही गौरवाने केला जातो. तसाच पवारांच्या चिपळूणच्या भाषणाचाही उल्लेख यापुढे वरचेवर होत राहील यात शंका नाही.

मराठी साहित्य संमेलने साहित्य-बाह्य मुद्द्यांवरून 'गाजण्या'चा एक अनिष्ट पायंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पडला आहे. समाजात हरेक प्रकाराची माणसे जगत असतात आणि अनेक बर्‍या-वाईट प्रवृत्तीही वावरत असतात. त्यापैकी ज्या हिणकस आणि त्याज्य प्रवृत्ती आहेत, त्यांचेच गदळ नेमके या संमेलनाच्या निमित्ताने का वर येत असावे? 'येन केन प्रकारेण' प्रसिद्धी मिळवण्याचा काही जणांचा सवंग खटाटोप हे एक कारण असू शकेल. आपल्या प्रसार माध्यमांनाही 'तसल्या'च गोष्टींत रस वाटतो हेही एक कारण असावे. पवारांनी आपल्या भाषणात साहित्य-बाह्य वादंग माजविणार्‍यांची चांगलीच हजेरी घेतली. "हे कोणत्यातरी अधिकारी व्यक्तिने बोलायला हवे होते. बरे झाले, सोनारानेच कान टोचले." अशी या संदर्भातली एक बोलकी प्रतिक्रिया मला ऐकावयास मिळाली.

मुळात, संमेलनेच साहित्य-बाह्य ठरत चालली असल्यामुळे ती साहित्य-बाह्य गोष्टींसाठी गाजत असावीत की काय अशीही शंका येते. सांगलीच्या संमेलनात, पूर्वाध्यक्षांनी नव्या अध्यक्षांच्या हाती सूत्रे सोपविण्याची औपचारिकता पाळली गेली नव्हती. महाबळेश्वरचे संमेलन तर निर्वाचित अध्यक्षांवाचूनच पार पडले! बहुमताने निवडून आलेल्या पक्षाला सरकार बनवू न देण्यासारखाच हा एक अश्लाघ्य प्रकार होता. संमेलनाचे वातावरण उत्साही असावे, ते उत्सवी असले तरी काही बिघडत नाही पण त्यांचा 'उरुस' होऊ नये.

सध्या संमेलनांचे 'बजेट' काही कोटींच्या घरात पोहोचले आहे, असे ऐकतो. त्यालाही आक्षेप घ्यावयाचा नाही परंतु इतका मोठा खर्च केल्यासारखे, त्यातून काही तरी ठोस निष्पन्न व्हावे, साहित्याला काही नवी दिशा मिळावी अशी अपेक्षा बाळगणार्‍या साहित्यप्रेमींच्या पदरी मात्र निराशाच पडते, असे का? याबाबत संमेलनांच्या संयोजकांनी आणि ज्येष्ठ साहित्यिकांनी गंभीरपणे आत्म-चिंतन करावे अशी अगदी योग्य आणि स्वागतार्ह सूचना पवारांनी केली.

संमेलनाच्या अध्यक्षांची निवड [णूक] हाही एक चिंतेचा विषय. यावर गेली अनेक वर्षे मान्यवर साहित्यिक तीव्र नापसंती व्यक्त करत आले आहेत परंतु बदल मात्र होत नाही. संमेलनाच्या व्यासपीठावरून याबाबत पवारांइतके रोखठोक वक्तव्य यापूर्वी कोणी केल्याचे मला तरी आठवत नाही.

मराठी साहित्य-संस्था म्हणजे गढूळ पाण्याची डबकी आणि ठराविक कंपूंची मिरासदारी झाली आहेत. संमेलनाध्यक्षांच्या निवडणूकी साठी मतांचा 'कोटा' ठरवणे, मतदारांची यादी बनविणे, प्रत्यक्ष मतदान आणि शेवटी मत-मोजणी ही सगळी प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक आणि अविश्वसनीय आहे. त्यात सर्व प्रकारचे गैरप्रकार सर्रास घडतात असे बोलले जाते. या संस्थांच्या घटनेत आणि संरचनेत काही काल-सुसंगत सुधारणा घडवून आणणे आवश्यक झाले आहे. प्रश्न एवढाच आहे की हे काम कोण करणार्? शासनाने क्रिडा-संघटनांसाठी काही मार्गदर्शक तत्वे विहीत केली आहेत, त्या धर्तीवर महाराष्ट्र शासन मराठी साहित्य-संस्थांसाठी काही मार्गदर्शक तत्वे घालून देऊ शकेल. " तुमच्या स्वायत्ततेवर आम्हाला बंधने आणावयाची नाहीत किंवा तुमच्या कारभारात ढवळाढवळही करावयाची नाही. तथापि शासनाची मान्यता आणि निधी हवा असेल तर शासनाने विहीत केलेल्या तत्वांनुसार तुम्ही आवश्यक त्या घटना-दुरुस्त्या कराव्यात आणि कार्यपद्धतीत [उदा. संमेलनाध्यक्षांची निवड] यथायोग्य बदल करावेत" अशी भूमिका शासन घेऊ शकणार नाही का? दरवर्षी शासन [आणि स्थानिक स्वराज्य संस्था] संमेलनाकरिता लक्षावधी रुपयांचे विनाअट अनुदान देत आले आहे. आता मार्गदर्शक तत्वांची अट नव्याने घालणे शक्य होणार नाही का? अर्थात मार्गदर्शक तत्वे ठरविताना राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या माध्यमातून संबंधित संस्थांचे पदाधिकारी, हयात पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार यांच्या समवेत शासनाला चर्चा करावी लागेल, त्यांच्या सूचना विचारात घ्याव्या लागतील. चिपळूणला उपस्थित मंत्र्यांच्या संख्येवर थोडी टिका-टिप्पणी झाली. त्या सगळ्या मंत्र्यांना पवारांच्या भाषणाची सकारात्मक दखल घ्यावीशी वाटली आणि यासंबंधात काही वेगळे आणि चांगले घडविण्याची प्रक्रिया सुरू झाली तर पवारांच्या भाषणाचे खरे चीज होईल.

स्त्री-साहित्यिकांना मिळणार्‍या वागणूकीविषयी त्यांनी व्यक्त केलेले विचार त्यांच्या एकूण महिलाविषयक भूमिकेशी सुसंगत असेच होते आणि अत्यंत स्वागतार्ह् ही. याविषयीही यापूर्वी या विषयावर पवारांइतके थेटपणे कोणी स्वागताध्यक्ष किंवा उदघाटक बोलले नसावेत. विशेषतः मुक्ताबाई- जनाबाईंपासून ते विभावरी शिरूरकर आणि आशा बगे पर्यंतच्या स्त्री-साहित्यिकांचा त्यांनी केलेला गौरवपूर्ण उल्लेखही सुखावणारा होता.

एकंदरीत, चिपळूणचे पवारांचे भाषण अत्यंत प्रभावी आणि समयोचित झाले. साहित्यक्षेत्रातली अनेक दुखणी त्यांनी वेशीवर टांगली. संबधित यातून काही धडा घेतील आणि सुधारणा-प्रक्रियेला चालना मिळेल अशी आशा करू या.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उलट उदाहरण आहे का काही ? की एखादा माणुस मुळात खुप चांगला राजकारणी होता/आहे आणि त्याचबरोबर बर्‍यापैकी साहित्यिक देखील.

१)विन्स्टन चर्चिल. (पश्चिमेकडे तसे बरेच आहेत.)
२)स्वातंत्र्यवीर सावरकर.
३)लोकमान्य टिळक
४)जवाहरलाल नेहरू.
५)महात्मा गांधी
६)विनोबाजी
७)ना.ग.गोरे.
८)दलित चळवळीतले अनेक विद्रोही साहित्यिक
आणि अर्थातच आचार्य अत्रे. पण अत्र्यांच्या बाबतीत राजकारण हा त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा एक फार छोटा भाग होता.

@ हीरा....

तुम्ही दिलेल्या यादीतील 'विन्स्टन चर्चिल' हे नाव पाहून आनंद झाला. भारतीय मनाला हे नाव काहीसे अप्रिय असले तरी इंग्रजी साहित्य क्षेत्रात या नावाचा खूप दबदबा आहे.

विशेष म्हणजे विन्स्टन चर्चिल याना जे 'नोबेल प्राईझ' मिळाले होते ते 'साहित्या'चे होते. पार्लमेन्टच्या कामात दिवसभर स्वतःला बुडवून घेतलेल्या चर्चिलमधील लेखक रात्री १० ते पहाटे ३ असा जागा असे आणि त्यामुळेच हजारो पानांचे ग्रंथ त्यांच्याकडून लिहिले गेले आहेत.

अशोक पाटील

करंदीकर काका, - साहेब भाषणे चांगलीच करतात, पण दोन भाषणांच्या मधे ज्या करामती करतात त्यांनी ह्या महाराष्ट्र देशाची अशी दशा झाली आहे.
त्यांनी फक्त भाषणच केली तर मी सुद्धा खूष होईन.

प्रसाद१९७१,
१००% अनुमोदन !

अभ्यासपुर्ण भाषणे करुन,अनेक आश्वासने देऊन नंतर मी विसरणारे,सत्तेसाठी इतरांना सरास विकत घेणारे,वेळ पडली तर इतर नेत्यांची जात जाहीरपणे काढणारे (मुळात जातीयवादी नसलेले) , 'जाणता राजा' अशी उपाधी लावुन हजाऱो शेतकर्‍यांच्या आत्महत्या यांच्याच काळात झाल्या हे समाजाला हेही विसरुन चालणार नाही

@अशोक पाटील,
पाटीलसाहेब, आपल्याला ठाऊकच आहे, सर विन्स्टन हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व होतं. ते एक उत्तम तैलचित्रकार होते. त्यांचं धूम्र आणि मद्यपान अफाट होतं पण ते त्यांच्या दीर्घोद्योगाच्या आड कधी आलं नाही. दुसर्‍या महायुद्धात त्यांनी डबघाईला आलेल्या ब्रिटनला नवसंजीवनी दिली आणि पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणला. दुसर्‍या महायुद्धाचे ते महानायक होते. त्यांनी लिहिलेला दुसर्‍या युद्धाचा इतिहास ऑथेंटिक तर आहेच आहे, शिवाय अत्यंत वाचनीय आहे. त्यांच्या एकंदर साहित्यसेवेबद्दल आणि भाषणांबद्दल त्यांना नोबेल मिळालं असलं तरी त्यात या पुस्तकाचा मोठा हात आहे.
@भरत मयेकर,
हो, राव हे उत्तम बहुभाषी साहित्यिक होते. त्यांना विसरून चालणार नाही.संस्कृत,इंग्लिश्,तेलुगु,मराठी,हिंदी या भाषांवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन नंतर त्यांच्या इतका प्राच्यविद्येतील अधिकारी राजकारणी दुसरा नाही. डॉ. रफी़क झकारिया हेही मोठं नाव. उर्दू परंपरेतही अनेक आहेत.

विन्स्टन चर्चिल हा कुशाग्र बुद्धीचा, अफाट कार्यक्षमतेचा व इंग्लीश भाषेवर प्रभुत्व असलेला महान जागतिक नेता होता हे इतिहास कधीच विसरुं शकणार नाही. पण एक राजकारणी साहित्यिक म्हणून मात्र नेहरु, गांधी इत्यादींच्या उंचीवर चर्चिल जाऊं शकत नाहीत, असं मला नेहमीच वाटत आलं आहे. कदाचित हें आगाऊपणाचं वाटेल- व असेलही- पण चर्चिल यांच्या रक्तात भिनलेला साम्राज्यवाद त्यांच्या लिखाणाला संकुचितपणाची मर्यादा घालतोच. 'माय अर्ली डेज' हें त्यांचं अत्यंत वाचनीय आत्मचरित्रात्मक पुस्तक वाचताना मला प्रथम हें जाणवलं. बोटीने जाताना पूर्वी ब्रिटीशांच्या ताब्यांत असलेलं एक बेट पाहून चर्चिल म्हणतात ' हें बेट आपल्या साम्राज्यातून बाहेर जावूं दिल्याबद्दल मीं माझ्या पूर्वजाना कधींच माफ करणार नाही !' [ हें वाचतानाची माझी प्रतिक्रिया होती 'अरे, सर्व पृथ्वी काय तुमच्या बापाच्याच नांवावर करून ठेवलीय !' ]. अमेरिकेला दुसर्‍या महायुद्धात सहभागी व्हायला प्रेरित करण्यासाठी त्यानी तिथं जावून जीं भाषणं केलीं तीं ' ऑल इंग्लीश स्पीकिंग पिपल युनाईट' या शिर्षकाखाली प्रसिद्ध झाली. या भाषणांसाठी, भाषेवरचं प्रभुत्व, 'कन्व्हिन्सींग पॉवर' याकरतां चर्चिल याना सलाम ठोकताना , 'इंग्लीश स्पीकींग' लोकांचाच त्याना आलेला पुळका- व तोही तात्कालीन गरजेमुळे- त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचीं क्षितीजं मर्यादित करतो असं मला वाटतं. स्वातंत्र्यासाठी एका गरीब, रुढीग्रस्त देशाचं नेतृत्व करत असतानाही , तुरुंगवासात असतानाही, नेहरू,गांधींसारख्या नेत्यांचं लिखाण [ भाषेवर तितकंच प्रभुत्व असूनही] असल्या संकुचित संकल्पनांनी डागाळलं नाही व म्हणूनच तें अधिक कालातित, वैश्विक व म्हणूनच सरस आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.

विषयांतराचा दोष पत्करूनही, मला बरीच वर्षं सतावणारा विचार मांडला आहे; प्रतिसाद जाणून घ्यायला आवडेल .

भाऊ फारच थोर पोस्ट. या कोनातून कधीच पाहिले गेले नव्ह्ते. नवा दृष्टीकोन दिल्याबद्दल धन्यवाद.
यशवन्तराव चव्हाणांचे साहित्य दर्जेदार आहे . त्यातील काही वेचें अम्हाला पाठ्यपुस्तकात होते त्यावरून यशवन्तराव राजकारणात गेल्यामुळे महाराष्ट्र एका साहित्यिकाला मुकला असे वाटत राहते.

@भाऊ नमसकर,
सर विन्स्टन हे हाडाचे साम्राज्यवादी होते हे कोणीच नाकारू शकणार नाही. त्या गुर्मीत त्यांनी गांधींचा उपहास केला, 'साम्राज्याचे तुकडे करण्यासाठी मी जन्माला आलेलो नाही' अशी दर्पोक्तीही केली.पण युद्ध संपताच ब्रिटिश जनतेनेच त्यांना शांतिकालातली त्यांची जागा दाखवून दिली. ते असो. पण त्यांच्या लिखाणाला साम्राज्यवादाचा वास येतो म्हणून ते कमी दर्जाचे ठरत नाही. पु.भा. भावे हे कट्टर उजव्या विचारसरणीचे होते. विदा करंदीकर हे उघड उघड डावे. मला वाटते लेखकाच्या राजकीय विचारसरणीवर त्याच्या साहित्याचे मूल्य ठरत नसते. तसे ते ठरवले जाऊही नये. आपण उपस्थित केलेला मुद्दा हा सध्याच्या मराठीविश्वात अगदी ऐरणीवर आला आहे. सध्या मराठीत विद्रोहाची हवा आहे. विद्रोह हे बाय इटसेल्फ साहित्याचे मूल्य ठरू शकते का असा प्रश्न मला कधी कधी पडतो. कट्टरपंथी आणि उदारमतवादी असे प्रवाह कलेच्या क्षेत्रात सदैव आहेतच. चित्रकलेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट, मॉडर्निझ्म, पोस्ट्-मॉडर्निझ्म च्या गलबल्यात मला मधुकर धोंडांची जलरंगातली चित्रेही तितकाच आनंद देतात. हां, अस्तित्ववाद,आधुनिकतावाद्,उत्तराधुनिकता, स्त्रीवाद या चष्म्यातून आपण कलाकृतीचे विश्लेषण करू शकतो, मूल्यमापन मात्र नव्हे.

हीरा,
तुमचे प्रतिसाद अभ्यासपूर्ण व 'इनसाईटफुल' असतात असे मी इतरत्र म्हट्ले होतेच. इथे पुन्हा म्हणतो. माबोवर आधी तुम्हाला पाहिलेले आठवत नाही.
चर्चिल यांचेबद्दल तुम्ही मांडलेले (सिमिलर)च विचार मांडायला धाग्यावर परत आलो होतो, कदाचित बरेच तोकडे अन भडक भाषेत मी मांडले असते, हे ही मान्य करतो.
धन्यवाद!

<<मग राजकारण्यांनी- त्यातही साहित्यिकांशी घनिष्ठ संबंध राखून असलेल्या आणि त्यांच्या सुखदु:खाची जाण असलेल्या, बर्‍यापैकी वाचन असलेल्या एखाद्याने- काही मते व्यक्त केली तर काय बिघडले?>>
मत व्यक्तं करण्याला माझा आक्षेप नाही. दुटप्पी वागण्या-बोलण्याला आहे. क्रिकेट्बोर्ड हे एकच उदाहरण नाही.
इत्यलम!

भाऊ
विषयांतराचा दोष अशा पोस्ट्ससाठी एकदा नाही हज्जारदा पत्करावासा वाटेल.
एक विनंती : चर्चिल या विषयावर लेख लिहू शकाल का आमच्यासाठी ? त्यांची भाषणं, भाषाप्रभुत्व या सर्वांविषयी उत्सुकता आहे.

मत व्यक्तं करण्याला माझा आक्षेप नाही. दुटप्पी वागण्या-बोलण्याला आहे. >>> अगदी अगदी. ज्यांनी कान उपटायचे त्यांच्याच स्टेजवर त्यांचेच कान ज्यांचे उपटायला हवेत त्यांनीच उपटल्याचे मजेशीर दृश्य पहायला मिळाले. राज्य कसे चालले आहे हे याच गंभीरतेने पाहीले तरी पुरे. मात्र, भाषण कुणी केले हा दोष सोडला तर आशय काय होता या विषयावर ते भाषण लेखक म्हणतात तसे चिंतनीय आहे. शरद पवारांचा व्यासंग कुणीच नाकारत नाही. मात्र इथे जी टीका चालू आहे ती पाहता एकच प्रश्न विचारावासा वाटतो, साहीत्यिकांना बैल म्हणणा-यांबद्दल टीकाकारांचे काय मत आहे ? त्यांचेच नाव प्रवेशद्वाराला आणि व्यासपीठाला देण्यात आले हा आयोजकांचा दुटप्पीपणा नाही का ?

तसंच जाहीररित्या कान उपटूनही निषेधाचा क्षीण सूरही साहीत्यिक / आयोजक यांच्याकडून निघू नये यामागे लाचारीची भावना असेल का ? असो. दोन्ही कानांबद्दल सामान्यांना फारशी सहानुभूती उरलीये असं काही नाही.

<< मला वाटते लेखकाच्या राजकीय विचारसरणीवर त्याच्या साहित्याचे मूल्य ठरत नसते. >> १००% सहमत. पण त्या विचारसरणीचाच पगडा त्याच्या साहित्यात मुख्यत्वे जाणवूं लागला तर त्याच्या साहित्याचे अवमूल्यन होईलच ना; पु.भा., विंदा यांच्या साहित्यातील मूलभूत मनोव्यापारांचा शोध घेण्याची प्रवृत्ति त्यांच्या राजकीय विचारसरणीला अगदीच गौण ठरवते, हा फरक असावा. शिवाय , साहित्याचं मूल्यमापन त्यातून जें कांही चिरकालीन मिळतं, त्यावरच करावं ना; ज्या साम्राज्यवादाचं अधिष्ठान चर्चिल यांच्या साहित्याचं होतं, तो साम्राज्यवाद त्यांच्या हयातीतच जगाने कचर्‍याच्या टोपलीत टाकला. ज्या इंग्लंडच्या ' इंग्लीश स्पीकींग' अस्मितेचा टेंभा त्यानी मिरवला, त्याच देशाला ' नॉन- इंग्लीश स्पिकींग' युरोपियन संघात आपल्याला सामील करून घ्यावं म्हणून नाक घांसावं लागलं. त्याउलट, गांघींच्या मृत्यूनंतर कित्येक तपं लोटलीं तरी अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा राष्ट्रपति पदग्रहण करताना ' आपण गांधीना गुरू मानतो' असं मनोभावे म्हणतो !
कृपया मला 'अँग्लोफोबिया' आहे, मीं 'चर्चिलद्वेष्टा' आहे किंवा मी अस्सल गांधीवादी आहे असा गैरसमज नको; मनात एक वेगळा विचार आला , तो मांडावासा वाटला.

<<नॉन- इंग्लीश स्पिकींग' युरोपियन संघात आपल्याला सामील करून घ्यावं म्हणून नाक घांसावं लागलं<<>>

हे तुम्हाला कोणी सांगीतले? ब्रिटन ला युरोपियन संघ ही concept मनापासुन मान्य नाहीये. म्हणुन ते काठावर राहुन मजा बघतात. पाऊंड म्हणुनच तसाच ठेवला गेला.
वेळ पडली तर सामिल व्हायचे, आणि हा संघ मोडीत निघाला तर मजा बघायची इतकी त्यांची नीती आहे.

<<ज्या साम्राज्यवादाचं अधिष्ठान चर्चिल यांच्या साहित्याचं होतं, तो साम्राज्यवाद त्यांच्या हयातीतच जगाने कचर्‍याच्या टोपलीत टाकल<< साम्राज्यवाद असा काही वाद होता असे मला वाटत नाही. त्या काळा प्रमाणे त्यांना जी फायद्याची नीती वाटली ती त्यांनी वापरली.
नंतर साम्र्याज्य राखण्याचे कष्ट जास्त आणि फायदा काही नाही हे बघुन त्यांनी बरेच देश कुठल्याही प्रकारची चळवळ किंवा क्रांती न होता सोडुन दिले.

नेहरुं, गांधीं सारखी जगाची काळजी करायची आणि स्वताच्या देशा ची मारायची अशी नीती तरी नव्हती churchill ची.
भारताला ह्यांच्या पेक्षा churchill मिळाला असता तर फायदा झाला असता.

churchill स्वता: ला कधीच मोठा साहित्यिक समजत नव्हता. त्याला nobel मिळाले ते सुद्धा त्याला शांती साठीचे नोबेल देण्याला काही विरोध होता म्हणुन साहित्याचे दिले.
तसा churchill चांगला चित्रकार सुद्धा होता. थोडी थोडकी नाही, ६००० paintings केली आहेत त्याने.

श्री शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणी नेत्याकडे उत्तम साहित्यीक गुण असतात हे त्यांच्या अनेक भाषणातून जाणवते .:)

अमोल केळकर
मला इथे भेटा

आपले मायबोलीकर ज्ञानेश यांचा समावेश राजकारणी-लेखक यांच्यात करावा का? ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत असे ऐकिवात आहे. चु.भु.दे.घे.

<< त्या काळा प्रमाणे त्यांना जी फायद्याची नीती वाटली ती त्यांनी वापरली. >> ह्याला 'नीती' म्हणतात ?
<< हे तुम्हाला कोणी सांगीतले? >> 'पौंड' हा इंग्लंडने प्रतिष्ठेचा प्रश्न केला तरीही थॅचर मॅडम युरोपियन संघात सामील होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होत्या , हें निश्चित आठवतंय .
<< नेहरुं, गांधीं सारखी जगाची काळजी करायची आणि स्वताच्या देशा ची मारायची अशी नीती तरी नव्हती churchill ची. >> पण नेमकी उलटी निती होती चर्चिलची, असं नाही वाटत ?
<< नंतर साम्र्याज्य राखण्याचे कष्ट जास्त आणि फायदा काही नाही हे बघुन त्यांनी बरेच देश कुठल्याही प्रकारची चळवळ किंवा क्रांती न होता सोडुन दिले.>> मीं पामर यावर काय बोलणार !!! अहो, साधं फॉकलंड बेट हातचं सुटतंय म्हटल्यावर सगळं आरमार तिथं पाठवणार्‍या थॅचरमॅडमना इतक्या लौकर नाही विसरतां यायचं मला तरी !!!

अहो फॉकलंड बेटावर सार्वमत घेउन झालेले आहे, तसे जिब्राल्टर ला पण घेउन झाले आहे. तिथल्या लोकांना ब्रिटिश म्हणुन च रहायचे आहे. तुम्ही इतिहास वाचा जरा. आणि दोन्ही ठिकाणी मुळचे ब्रिटिश नागरिक रहातात.
लंका, ब्रह्मदेश, आफ्रिकेतील कित्येक देश स्वातंत्र्याची मागणी नसताना सोडले.

मी म्हणलोच होतो की स्वताच्या देशाची काळजी करायची, जगाची नाही हीच churchill ची नीती होती. कितीही टिका झाली तरी स्वताची प्रतिमा जपण्या साठी देशाला दावणीला नाही लावले.

उलट नेहरु हॅदराबाद वर पोलिस कारवाई करायला तयार नव्हते. तिसरा पाकिस्तान होता तो भारताच्या मध्यात. आणि हॅदराबाद छोटे नव्हते, पटेल होते म्हणुन वाचलो.
तिबेट दान केले स्वताची शांतीदुत प्रतिमा बनवण्या साठी. चीन ने तर त्यांचा चांगला उपयोग करुन घेतला.

साम्राज्यवादी असणे म्हणजे काही गुन्हा आहे का? Happy ते साम्राज्यवादि होते वगैरे छीथू केल्यासारख्या आशयाचे उल्लेख येताहेत म्हणून विचारतोय.
की हजारो वर्षान्पासून, साम्राज्य न स्थापताही आपला वावर/वहिवाट ज्या ज्या भूमिवर होती त्यातली भुमि हजारोवर्षान्पासून दर शतकान्गणीक गमावत जाणे, अगदी ते १९४७च्या पाकव्याप्त काश्मिरच काय त्यानन्तरही कालपरवापर्यन्त चीनने काश्मिर उजवा कोपरा व्यापेपर्यन्त आम्ही आपले "साम्राज्यवादी" नाही आहोत हे सिद्ध करण्याकरता आळीमिळीगुपचिळी करुन बसणार अन त्यातच भूषण मानणार? किन्वा तिथे गवताचे पातेही उगवत नाही तर त्याची गरज काय असले भ्याड युक्तिवाद करणार?
असो, या धाग्याचा विषय नाही, पण आम्ही कायमच पराभूत मनस्थितीत विचार करत आलो आहोत, तशीच शिकवण खोट्या व पॉलिश्ड इतिहासाद्वारे आमचे नेते/शिक्षणप्रणाली आम्हाला देत असते.
[हल्ली तर काय म्हणे छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणे सर्वधर्मसमभावी वा निधर्मी होते...... वा रे वा , तरी बरे कोणसासा तो कवी त्या काळातला म्हणून गेलाय की 'अगर न होते शिवाजी, तो सुन्नत सबकी होती!' ]
असो, मूळ विषय साहेबान्चे भाषण हा होता... बिचारा चर्चिल कसा काय चावला जातोय काय की! Proud

साहेब चान्गले बोलतात, शब्दावर त्यान्चे चान्गले प्रभुत्व आहे, पण ते केवळ त्यान्च्या राजकीय गरजेनुसार "सोईस्कर" तेवढेच बोलतात. बाकी वेळेस मूग गिळून बसतात हा आक्षेप आहे. अन म्हणूनच, परकीय वंशाचा पंतप्रधान नको, या त्यान्च्या नविन पक्षस्थापने वेळची भूमिका पटत असली, पाठिम्बाच द्यावा अशी वाटत असली, तरी ती भूमिका त्यान्च्या कडून असणे हेच मूळात "विश्वासार्ह" वाटत नाही. Wink यास कारण बाकी ठिकाणी ते घेत असलेल्या बोटचेप्या भुमिका वा मौन होय!

वास्तविक 'विन्स्टन चर्चिल' हा विषय ह्या धाग्यात घेणे म्हणजे दोन्ही व्यक्तींना राजकीय तसेच साहित्यप्रेमाच्या मोजमापात एकत्रित घेतले गेले आहे असे त्रयस्थाला [वा ज्याला 'चर्चिल म्हणजे ब्रिटनचे माजी पंतप्रधान' इतपतच माहीत आहे त्याला] वाटण्याची शक्यता गडद आहे.

पण आता त्याला नाईलाज आहे कारण 'साहित्यप्रेमी चर्चिल' असा स्वतंत्र धागा आता काढण्यापेक्षा इथेच त्यावर वरील काही प्रतिसादाच्या अनुरोधाने चर्चा करणे योग्य.

राजकारणामुळे प्रसिद्धीस आलेल्या व्यक्तींच्याबाबतीत एक धोका असू शकतो की त्याला 'त्या' शिवाय दुसरे काही आयुष्य वा अंग असू शकत नाही असे सर्वसामान्यांना वाटत असते....त्यामुळेच की काय आम्हा भारतीय मनाला चर्चिल हे नाव खलनायकाप्रमाणे भासू लागते, ज्याने भारताला स्वातंत्र्य द्यावे या मताला कधीच पाठींबा दिला नव्हता. पण एखाद्या व्यक्तीमधील साहित्य गुणांचे मूल्यमापन करायचे असेल आणि जर त्याला त्याच भूमिकेतून पाहायचे झाल्यास त्याच्या आयुष्यावरील अन्य पुटांकडे लक्ष न देणे योग्य. गुणदोषाकडे तटस्थपणे पाहिले गेले तरच आपण ते कार्य करू शकतो.

भालचंद्र नेमाडे तसेच त्यांच्या त्या काळातील 'अ‍ॅन्ग्री यंग वन्स' मित्र पु.ल.देशपांडे यांच्यावर कित्येक वेळा कित्येक प्रसंगी सडकून टीका करीत असत; पण म्हणून पु.लं. ना 'कोसला' बद्दल जे वाटले त्याबद्दल भरभरूनच त्यानी लिहिले, इतके की त्या कादंबरीची तितकी भलावण खुद्द नेमाडे मित्रांनीही कधी केली नसेल. पु.शि.रेगे एक व्यक्ती म्हणून त्यांच्या निकटवर्तीय मित्रांना, परिचितांना कधीच आवडले नव्हते [त्याची कारणमीमांसा इथे नको], त्यांच्या स्वभावाविषयी अप्रीती असणार्‍यामध्ये खुद्द पु.ल.ही होते, पण म्हणून त्यानी 'सावित्री' आणि 'दुसरा पक्षी' या कलाकृतीना अक्षरशः डोक्यावर घेतले होते.

अशी काही देशी उदाहरणे आहेत....जी त्यांचा विचित्र असा वैयक्तिक स्वभाव दर्शवितात....[विदेशीही देता येतीलच....उदा. डिलन थॉमसकडे असामान्य प्रतिभा होती. आधुनिक इंग्रजी कवींत त्यास मानाचे असे स्थान आजही आहे. बीबीसीवरून सादर केल्या जाणार्‍या त्याच्या काव्यवाचनाकडे लाखो काव्यप्रेमी श्रोते कान लावून बसत. कौतुकाला तो कधीच पारखा झाला नाही, पण खाजगी जीवनात हाच डिलन थॉमस अत्यंत बेबंद आयुष्य जगत असे. कमालीच्या मद्यपानामुळे अक्षरशः भीकेला लागला होता, लोकांकडून, मित्रांकडून उसनवार पैसे घेऊन तो ते दारुवरच उधळत असे...परत देणे शक्यच नव्हते....परिचितांच्या घरी जाऊन त्यांचे कपडेही तो चोरत असे. हकनाक अशी त्याने समजून घेतली होती की प्रत्येक क्रांतिकारी कवीने तरुणपणातच मृत्युमुखी पडले पाहिजे तरच तो कवी....विशेष म्हणजे डिलन थॉमस क्षयाने चाळीशीच्या आतच गेला....]; पण म्हणून त्यांचे साहित्य गुण दुय्यम दर्जाचे ठरतात असे म्हणणे योग्य नाही.

साहित्याचे 'नोबेल प्राईझ' मिळविलेल्या विन्स्टन चर्चिल यानी कधीच आपला 'साम्राज्यवादी' दृष्टिकोण लपविला नव्हता....तो त्यांच्या कारकिर्दीचा एकप्रकारे फ्लॅगच झाला होता....राणीचा मुकुट जगभर गेल्याचे जसे त्यानी पाहिले तसे तो शेवटी पायदळी तुडविला गेल्याचेही त्याना पाहावे लागले, हा नियतीने त्यांच्यावर घेतलेला सूडच म्हणावा लागेल. सत्तेचे असो वा विरोधाचे असो...राजकारण हा नक्कीच एक जीवघेणा, निर्घृण खेळ आहे, तो खेळणारे शेकड्यांनी आहेत, तरीही अशा शेकड्यातील एकदोन जर साहित्याच्या बागेकडे वळलेले असतील आणि तिथे त्यानी आपल्या त्या प्रतिभेला फुलू दिले असेल तर समाज त्याबद्दल नेहमीच त्यांच्याशी कृतज्ञ राहील....अशा राजकारणी लोकांबद्दल नेहमीच आत्मीयता एखाद्याला वाटली म्हणजे त्याचे ते लक्षण अयोग्य म्हणता येणार नाही.

अशोक पाटील

@ भाऊ - भारत पण सांम्राज्यवादी च आहे. काश्मीर जबरदस्ती ने दाबुन ठेवला आहे. तिथे सार्वमत का नाही घेत तुम्ही?

साहित्यिकांना राजकारण्यांच्या मागे मागे फिरण्याची गरजच काय... अनेक साहित्यिक स्वतःच राजकारणी असल्यासारखे वागतात .उदा:- "आम्ही भट तुम्ही भट ,घेऊ संमेलनाचे अध्यक्षपद", असा प्रचार करणारे सांप्रत काळचे एक जातीयवादी साहित्यिक.

राजकारणीसुद्धा ईतक्या खालच्या पातळीत जात नाहीत असे पवार भाषणात म्हणाले होते.

उतारवयात शारिरीक किमान त्रास होईल असा छंद जोपासावा म्हणून चर्चिलनी चित्रकला अंगिकारली व त्यांत भरीव, अप्रतिम कामही केलं . मीं त्यांचीं चित्रं खूप आवडीनं पाहिली आहेत. सलाम !
चर्चिल यांचं लिखाण वाचणं हा आगळा आनंद आहे . सांगणेच न लगे !
हिटलरपासून जगाला वांचवण्याच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याबद्दल त्याना त्रिवार मुजरा!
रगेलपणा , अहंकार हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्याना शोभून दिसणाराच भाग होता . निर्विवाद !

माझा छोटासा वेगळा वाटलेला विचार एवढाच होता कीं राजकारणात जसं 'राजकारणी ' [डिप्लोमॅट] व 'मुद्सद्दी ' [ स्टेटसमन ] हा फरक असतो तसा साहित्याच्या क्षेत्रात करायचा झाला तर चर्चिल हे ' स्टेटसमन'पेक्षां 'डिप्लोमॅट' या संज्ञेच्या अधिक जवळ जातील . हा विचार साफ चूकीचा असूं शकतो, याचीही मला जाणीव आहे. विचार करायला लावणार्‍या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तिथे सार्वमत का नाही घेत तुम्ही?>>> अहो काश्मीरात बहुसंख्य मुस्लिम होते(आहेत) व त्याना पाकिस्तानात जायचे होते. सार्वमत घेतल्यास काश्मीर पाकिस्तानातच जाईल, हे सर्वाना माहित आहे. बहुसंख्य लोकांचा कल धुडकावून काश्मिर भारताला जोडला. प्रजेला पाकिस्तानात जायचे होते तर राजा हिंदु असल्यामुळे त्याला भारतात यायचे होते (वा आणले गेले).
म्हणजे मुळात काश्मीरची जोडणीच तिथल्या स्थानिकांवर अन्याय करणारी होती. म्हणून मागची साठ-बासष्ठ वर्षे आपण त्याना फुकटात पोसतोय. तिथे सेल्स टॅक्स, सर्विस टॅक्स व आजून कुठलेच सरकारी कर नाहीत. म्हणजे सरकारचे उत्पन्न नाही. आपण सगळ्यानी कर भरायचा व केंद्र सरकारने त्यातून काश्मीर पोसायचे.

Pages