चारचौघी - २

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2013 - 06:13

पहाटे पाचपर्यंत पिझाचे अवशेष उरलेल्या डिशेस तश्याच विखुरलेल्या अवस्थेत पडून राहिल्या. चर्चा संपतच नव्हती. एरवी दहा वाजता पेंगून झोपणारी निली स्वतःच पूर्ण जागी होती, एवढेच नाही तर चर्चेचा केंद्रबिंदू होती. सहा महिने एकत्र राहूनही आजवर बाकीच्या तिघींना हे माहीत नव्हते की निली तिच्या पूर्वायुष्यात कोणत्या दिव्यातून गेलेली आहे.

नीलाक्षीच्या 'आय वॉन्ट टू बी रेप्ड' या विधानाने पसरलेला सन्नाटा हळूहळू विरत गेला तो तिच्याच बोलण्यामुळे. कुठेतरी हरवल्यासारखी निली बोलत राहिली. स्त्री जगतातील असहाय्यता किंवा विवशता त्या रूममध्ये चर्चारुपाने व्यापून राहिलेली होती.

आज सकाळी प्रत्येकीला आपापल्या उद्योगाला निघावे लागणारच होते. पण विषय असा निघाला होता की पाच वाजले तरी चर्चा अखंडच राहिली. नीलाक्षीच्या विचित्र फँटसीवर जया उसळून तिला काहीतरी बोलली. बास, त्यानंतर निली एकटीच कितीतरी वेळ बोलत होती.

=============

पपांना नरेश कुठे आणि कधी भेटला ते आठवत नाही. साध्या विचारसरणीचे, फारश्या अँबिशन्स नसलेले पपा साधीच नोकरी करत होते. पण मोह माणसाला कुठेही नेतो. नरेशची नुसती गाडी आमच्या दारात लागली तरी आजूबाजूचे लोक डोळे विस्फारून बघतात आणि कस्तुरीरंगन कोणीतरी मोठा असामी असावा असा ग्रह करून घेतात ही बाब पपांना फार अभिमानास्पद वाटायची. नरेश वहिनी वहिनी करत आईशी अगदी हासत खेळत बोलायचा. मी त्याला अंकल म्हणत असे. नरेश आणि पपा कितीतरी वेळ हॉलमध्ये चर्चा करत बसायचे. बिझिनेसच्या त्या चर्चा आमच्याच घरी कायम का व्हायच्या हे मला समजायचे नाही. नरेशचे घर एकदोनदा मीही पाहिलेले होते. प्रशस्त आणि श्रीमंतीच्या चिन्हांची मुक्त उधळ असलेला बंगला, भोवतीची प्रशस्त हिरवळ, कारंजे, झोपाळा, फुले, मोठी झाडे, दोन बदके, दोन ससे, कारंज्याच्या तळ्यात तीन लहान कासवे, तीन गाड्या बसतील एवढे पार्किंग, त्यात दोन गाड्या लागलेल्या, आतमध्ये खास बिझिनेस मीटिंग्जसाठी एक खोली, बाकीच्या सहा सात खोल्या, नोकर चाकर, वर्दळ तरीही शांतता! मागच्या आऊट हाऊसच्या तीन खोल्या फक्त नोकरांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी! या सगळ्यासमोर आमचे किचन आणि हॉल असे दोन खोल्यांचे स्वतःचे घर म्हणजे त्याच्या आऊट हाऊस इतकेही नव्हते. नरेशच्या बंगल्यात या चर्चा का होऊ नयेत हे मला कळायचे नाही. आमच्या घरी नरेश रोज येणे हे तो कितीही श्रीमंत असला तरी हळूहळू मला नकोसे होऊ लागले होते. याचे कारण ते दोघे बोलत असतील तेव्हा तिथे अभ्यासाला बसता यायचे नाही. आत किचनमध्ये बसले की आई काही ना काही करत असायची त्या आवाजाने व्यत्यय यायचा. सारखे मैत्रिणीकडेही जाणे योग्य नव्हते. त्यात नरेशने हळूहळू उंची स्कॉच आणायला सुरुवात केली. 'मी घेतच नाही ते अगदी थोडी घाला' आणि 'अगदी थोडी घाला ते आज अजून एक ड्रिंक होऊन जाऊदेत' ही पपांची प्रगती केवळ दोन महिन्यात झालेली मी आणि ममाने पाहिली होती. पण त्याबाबत बोलता येत नव्हते. कारण नरेश येताना रोज रात्रीचे जवळ्पास सगळेच जेवण बाहेरून घेऊन यायचा. ममाला केवळ ते सर्व्ह करण्याशिवाय काही कामच पडायचे नाही. त्यात त्या चवीचा चस्का आम्हालाही लागला होता की काय कोण जाणे! सुका मेवा, पेस्ट्रीज, चीज हे तर रोजच असायचे. फळे असायची. त्याशिवाय चारजणांना पुरेल इतपत एखादी पंजाबी भाजी किंवा चिकन करी आणि बिर्याणी! मग काय, एखाददिवस ममाला नुसत्याच पोळ्या लाटाव्या लागायच्या किंवा अनेकदा तर तेही करावे लागायचे नाही. ते दोघे ड्रिंक्स घेत बसत असल्याने आम्ही दोघी आयतेच गरमगरम आधी जेवून घेऊ शकायचो. त्यांना ममा रात्री साडे अकरा बाराला अन्न परत गरम करून सर्व्ह करायची आणि मग किचनमध्ये येऊन निजायची. मी साडे दहालाच झोपून जायचे कारण माझी शाळा सकाळची असायची. नरेश अंकल किती वाजता परत जातात हे मला माहीतही व्हायचे नाही.

कोणतीतरी केमिकल्स गुजरातमधून आणून येथे विकण्याचा बिझिनेस होता तो! कधी पैसे मिळायचे तर कधी तोटाही व्हायचा. पण नरेश आम्हा दोघींसमोरच बाबांना चेक किंवा कॅश द्यायचा. त्या बदल्यात बाबा चोवीस तास बिझिनेसच्या विचारांनी पछाडल्यासारखे फोन आणि ट्रॅव्हलिंग करत राहायचे. आमच्या घराच्या हॉलचे ऑफीसच झालेले होते.

ममा केव्हातरी पपांना या महिन्यात किती मिळाले असे विचारायची. पपा काहीतरी आकडा सांगायचे. काहीवेळा दोघेही हरखलेले तर काहीवेळा दोघेही किंचित निराश झालेले मला दिसायचे. पण माझ्यावर जबाबदारी अर्थातच काहीच नव्हती. पण एक मोठा फरक पडत चाललेला होता. जवळपास वर्षभर घरात रोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक एक वाजेस्तोवर नरेशचे अस्तित्व ही नित्याची बाब होऊन बसलेली होती. आम्हालाच तिघांना कुठे एखाददिवस जायचे असले तर पपा त्याला आधीच तसे कळवायचे. अदरवाईज तो रोजच येऊन बसायचाच. आपोआपच घरातल्या अश्या विषयांवरच्या चर्चा, ज्या चार भिंतींच्या आत होणे अपेक्षित असते, त्या हळूहळू 'हा काय घरचाच आहे' या नावाखाली त्याच्या समोरच होऊ लागल्या. मग त्यात मला मिळालेले मार्क्स, वाढलेले खर्च, काढायचे असलेले पण मिळत नसलेले कर्ज, घ्यायची असलेली पण घेता येत नसलेली एम एटी, तब्येतीचे त्रास या सगळ्याच बाबी नरेशच्या समोर डिस्कस होऊ लागल्या. त्यात नरेश प्रथम प्रथम 'खरे तर यात मी बोलणे बरोबर नाही' अशी प्रस्तावना करत करत शेवटी 'मी काय म्हणतो, तुम्ही असं असंच करा' या पातळीला पोचलाही.

हे सगळे, तरीसुद्धा सोसण्याइतपत होते. अगदी कित्येकदा 'जास्त झाली' वगैरे तर त्याचे हॉलमध्येच झोपून सकाळी जाणेही सोसणेबल होते. पण या सगळ्याचा 'आर्थिक अर्थ' काय होत होता याकडे पपांचे नीट लक्षच नव्हते हे मला नंतर समजले. एक वर्षात बिझिनेसमधून मिळालेल्या त्या जमान्यातल्या, म्हणजे दहा वर्षापूर्वीच्या जवळपास साडे तीन लाखांपैकी पावणे दोन लाख पपांनी नरेशच्या सांगण्यावरून त्याच केमिकल्सचा स्टॉक करण्यात गुंतवले. जेणेकरून आताशी पुरेसा स्टॉक राहिला की शॉर्टेज येईल तेव्हा तो अधिक किंमतीला विकता यावा. म्हणजे निव्वळ एक लाख पंचाहत्तर हजार रुपयात वर्षभर घर चाललेले होते आणि ते सर्व पैसे घरखर्च, माझे शिक्षण, वस्तू, कपडे, सणवार यात उडालेलेही होते. सेव्हिंग होऊ शकणारे पैसे पपांनी स्टॉकमध्ये गुंतवले. आईच्या हातात पैसाच राहिला नाही तेव्हा एक दिवस तिच्या डोक्यात प्रकाश पडला. नरेश नसताना तिने उसळून पपांना जाब विचारला. पपांनी काय उत्तर द्यावे? मी बिझिनेस करत आहे, त्यात रिस्क असणारच आणि पैसे स्टॉकच्या रुपात आपल्याकडे आहेतच. त्यात पुन्हा नरेशने वर्षभरात घरात किती खर्च केला असेही म्हणाले. वास्तविक पाहता दारू आणि एखाद दोन पदार्थ याचा त्याचा रोजचा खर्च पाचशेच्या घरात म्हंटला तरी दिड एक लाख त्याचेही खर्च झालेले होते हे पटण्यासारखेच होते. पण ते त्याने खर्च केले म्हणून आपले सेव्हिंग ब्लॉक व्हावे हे कसे काय पटले असते आईला? तिने पपांना ताबडतोब स्टॉक बाजारात विकायला सांगितले. त्या रात्री नरेशसमोरच आई आणि पपांचे वाद झाले. नरेश त्यातही पडलाच. म्हणाला स्टॉक्स मार्केट रेटने हवे तर मी घेतो. त्यावेळच्या मार्केट रेटने म्हणजे एक लाख रुपयाला. आई भडकून त्याही गोष्टीसाठी तयार झाली. पण नंतर तिला चूक जाणवली. प्रकरण इतके हाताबाहेर गेलेले होते की नरेशला खडे बोल सुनावण्याची आता तिचीही नैतिक हिम्मत राहिलेली नव्हती. नरेश निघून गेल्यावर पपा बाहेर पीत राहिले आणि आई आतमध्ये रडत राहिली. मलाही रडू आले. हळूहळू नरेशचा वावर कमी करायचा यावर पपा आणि ममीचे शेवटी एकमत झालेले पाहून मला जरा बरे वाटते तोच...

... मार्केट अचानक उठले. नरेशने स्वतःचे सहा लाख टाकून वेगळा स्टॉक घेतला. पपा म्हणाले माझाही घे. तर म्हणाला सरळ कस्टमरलाच विकला जातोय हाय रेटने, कशाला थांबतोस? टाक विकून. पपांनी पावणे दोन लाखांचा स्टॉक अडीच लाखाला विकला आणि आई खुष झाली. मोठी पार्टी झाली. त्यात नरेशने 'बघा माझे बरोबर होते की नाही' हे पटवले. शेवटी मोह होऊन पपांनी आणि ममाने थोडे सोने घालून त्या अडीच लाखात लाखभर रुपयांची भर घालून पुन्हा स्टॉक घेतले. ते नरेशनेच चार लाखाला विकत घेतले आणि सावकाश नंतर सहापर्यंत बाहेर विकले म्हणे! मिळालेल्या पन्नास हजार रुपयांचा आनंद मात्र टिकला नाही. कारण पुन्हा स्टॉक घेतले आणि मार्केट पडले. जवळपास तीन लाख रुपये स्टॉकमध्ये अडकलेले, आता तर ममाही त्या बिझिनेसमध्ये सेम इन्टरेस्ट लेव्हलने गुंतलेली आणि नरेश त्या बिझिनेसमधून जवळपास बाहेर पडलेला असला तरीही आमच्याकडचा त्याचा राबता तसाच राहिलेला. चमत्कारीक अवस्था आली. नरेशला दूरदृष्टी असल्याप्रमाणे पुढची तीन वर्षे या कमोडिटीत जान नाही हे त्याला जणू समजलेले होते. त्याने त्याचे सर्व पैसे वेळच्यावेळी काढून घेऊन तो फायद्यात राहून बाहेर पडलेला होता. बरं, त्याने आमचा दोनवेळा फायदा करून दिलेला असल्याने आता ममाही त्याला दोष न देता नशिबाला जबाबदार मानत होती. पपांचे पिणे मर्यादेबाहेर गेलेले होते. नरेश आता फारसे पदार्थ किंवा बाटल्या आणत नव्हता. कारण ममाने त्याला पपांसमोर सांगितले होते की ह्यांचे पिणे वाढलेले आहे, निदान तुम्हीतरी बाटली आणत जाऊ नका म्हणजे यांचे पैसे संपले की हे ताळ्यावर येतील. त्यावर पपांनी वाद घातला होता. पण नरेशने ममाचे ऐकले होते. पण पपा उरलेल्या पैशांचे अल्कोहोलच करत राहिले. घरात अचानक गरीबी निर्माण झाली. का झाली, कधी झाली आणि कशी झाली हे कळायच्या आतच! मला तर काही समजेनासेच झालेले होते. पपांनी नोकरी का सोडली, नरेशवर विश्वास का ठेवला, काहीच कळत नव्हते. मार्केटही पडलेलेच होते. पुन्हा दुसरी नोकरी करण्याचे आत्मिक व शारीरिक बळ पपांमध्ये उरलेलेच नव्हते. केवळ सव्वा ते दिड वर्षात आमही ही हालत झाली आणि पपांना मोठा आजार झाला. सुरुवातीचा सर्व खर्च ममाने कोणकोणत्या उरल्यासुरल्या सेव्हिंग्जमधून आणि सोन्यामधून केला, पण शेवटी नरेशपुढे हात पसरावे लागले. त्याने तो खर्च मात्र चुटकीसरशी केला. मिंधी झालेली आई कधीतरी त्याच्या तावडीत सापडली. दारूने निष्क्रीय झालेला नवरा आणि तरुण होणार्‍या मुलीची जबाबदारी यांना गरीबीची आणि लाचारीची जोड मिळाली आणि आईला नरेशबरोबर बेड शेअर करावा लागू लागला. कित्येकदा तर पपा पिऊन घरात बेहोश अवस्थेत असतानाच हे दोघे कीचनमध्ये असायचे. ती आईची लाचारी होती, की मिळणार्‍या पैशांची परतफेड अशीच करणे शक्य आहे असे तिला वाटत होते की तिची ती शारीरिक भूकही होती हे मला अजूनही समजलेले नाही. मला घरातून घालवायचे दोघेही. मी बाहेर कोणाकडे किती वेळ बसणार? पपांना नरेश अधिकाधिक पाजायचा. पपा घरात आहेत म्हंटल्यावर आजूबाजूच्यांना तसेही काही वाटायचे नाहीच, पण नरेशची गाडी आमच्या घरासमोर दिवसरात्र उभी असण्याची आता सगळ्यांनाच सवय झालेली होती. कोणालाही कसलाही संशय येत नव्हता. समहाऊ आईमध्ये फरक पडला. ती पपांच्या बाबतीत किंचित निष्ठूरच झाल्यासारखे मला जाणवू लागले. तिच्याकडे नवनवीन साड्या दिसू लागल्या. एकदा गळ्यातलेही दिसले. घर बरे चालू लागले. मलाही खर्चायला पैसे मिळू लागले. हे सगळे नरेशमुळे आहे हे मला कळत होते, पण अ‍ॅट व्हॉट कॉस्ट आहे हे माहीत नव्हते. पण एकदा तेही समजले.

मी अचानक घरात आलेली पाहून दोघांना त्याचक्षणी कळले की ते दार लावून घ्यायला विसरलेच होते. पपा पिऊन तिथेच बडबडत पडलेले, सोफ्यावर बसलेल्या नरेशच्या मिठीत माझी ममा! दोघेही बेभान झालेले होते. मला किळस आली. पण मला माझी भूमिकाच नीट ठरवता येईना. ममाला जाब विचारायची माझी इच्छा असायला हवी की नसायला हवी, जाब विचारला तर कधी आणि कसा विचारायचा? की मोठ्यांचे मोठे पाहून घेतील म्हणून विषय मनातून दूर सारायचा? मला क्षण दोन क्षण काहीच समजले नाही. मी हतबुद्धपणे दोघांकडे पाहात राहिले आणि ममा घाईघाईत उठून आत गेली. नरेशच्या चेहर्‍यावर गिल्ट नव्हती. तो अगदी आरामात माझी चौकशी करू लागला. मी त्या दिवशी खाली मान घालून जेवणे याशिवाय घरात काहीही केले नाही. एक शब्दही न बोलता झोपून गेले. पण हळूहळू लक्ष ठेवायला लागले. पण हाती काही सापडेना! शेवटी एक दिवस रात्रीच जागी राहिले. हॉलमध्ये कुजबुज सुरू होती. पपाही तिथेच होते पण ते बेहोष असल्याचे पाहूनच मी झोपलेले होते. मी दार किलकिले करून पाहिले. ममा आणि नरेश, दोघांना त्या अवस्थेत पाहून मी खिळले आणि कशीबशी अंथरुणावर पडले आणि खूप वेळ रडले. मला इतके नक्कीच समजत होते की आमचे कुटुंब विस्कळीत झालेले आहे, संपलेले आहे, तुकडे तुकडे झालेले आहेत आधीच्या प्रेमळ पायाचे!

ममाही दोषी आहे असे मी मानू लागले. ती तिचीच जास्त गरज असल्याचे मी मानू लागले. ममाशी मी तुटक वागू लागले. आणि एक दिवस ममाने नरेश नसताना आम्ही दोघी जेवत असताना बाँब टाकला. आपले घर दोन महिन्यांपूर्वी नरेशने विकत घेतलेले आहे, आपण त्याला भाडे देऊन येथे राहात आहोत. मिळालेल्या पैशातून तुझ्या पपांनी केलेली कर्जे फिटवली. माझ्या रक्ताचा दगड झाला होता. काय किंमतीला घर विकले, किती पैसे मिळाले, त्यातून कर्ज किती फिटवले, पपांना माहीत आहे का, कोणत्याच प्रश्नांची उत्तरे मला विचारावीशी वाटत नव्हती. ममाने आणि नरेशने कुटुंब पूर्णपणे संपवल्यासारखे मला वाटले. पपांच्या पिण्यामागेही नरेशच आहे हेही आता मी समजून चुकले. हे सगळे प्लॅनिंग एक कुटुंब बरबाद करण्यासाठी चाललेले होते हे माझ्या लक्षात यायला लागले. या सगळ्याचा माझ्या मनावर परिणाम होऊन माझा अभ्यास खुंटला. परिक्षेत उजेड पडला. ममाने मलाच मारले. नरेशने मात्र चक्क त्या क्षणी मला मानसिक आधार दिला. तो ममाला म्हणाला या मुलीला अजिबात ओरडायचे नाही, तिच्या बापाने लक्ष दिलेले नाही म्हणून तिची ही अवस्था झालेली आहे. मला आश्चर्यच वाटले. असे वाटू लागले की नरेशने प्रत्यक्षात कुटुंब सावरायचा आटोकाट प्रयत्न केलेला असावा पण पपांनी सगळे घालवलेले असावे.

जे काही चाललेले होते ते माझ्या आकलनाच्या आणि नियंत्रणाच्या पलीकडील होते. पपांना मृत्यूने सोडवावे असे मला वाटू लागले. म्हणजे अधिक कर्जे झाली नसती. नाहीतरी त्यांचा काहीच उपयोग नव्हता आता काही फूट जागा अडवून बेहोष होण्याशिवाय! बहुधा ममालाही वाटत असावे की पपा मरून जावेत. पण एक दिवस दारात टेंपोच उभा राहिला. आम्ही म्हणे शिफ्ट होत होतो. नरेशच्या आऊटहाऊसमध्ये आम्ही शिफ्ट झालो. दोन खोल्यांमद्ये दोन गडी होते आणि एक खोलीत आम्ही तिघे! तीनही खोल्यांना मिळून एकच वॉशरूम! पण आता नरेशच्या बंगल्यावर होणार्‍या पार्ट्यांमधील उरलेसुरले नित्यनेमाने मिळू लागले. पपांना दारूही बर्‍यापैकी मिळू लागली. ममा तर बंगल्याच्याच स्वच्छतेला वाहून घेतल्यासारखी झालेली होती. आमचे आधीचे घर नरेशने जास्त किंमतीला विकून टाकले होते म्हणे! ममाला आनंद काय तर आऊटहाऊसचे भाडे द्यावे लागणार नव्हते. त्या बदल्यात तो म्हणेल तेव्हा त्याच्याशेजारी निजले की झाले.

बाहेरच्या जगाशी आमचा असलेला नियमीत संबंध आता अचानक कमी झाला. मलाही बंगल्यातील काही ना काम करणे भाग पडू लागले. आणि एक दिवस मान खाली घालून ममा मला म्हणाली... नीलू... अंकल बोलावतायत तुला... ते म्हणतील तसे कर... जा! पूर्णपणे अनभिज्ञ असलेली मी नरेशच्या बेडरूममध्ये पोचले आणि मला काही कळायच्या आत मी त्याची शिकार झालेही. निर्जीव शिल्प असल्यासारखा दगडी चेहरा करून मी गपचूप रूमवर येऊन ममाला मदत करू लागले. एकमेकींकडे आम्ही पाहूही शकत नव्हतो. ममा बहुधा रडत असावी. मला तर असेही वाटले की तिच्यावरची नरेशला खुष ठेवण्याची जबाबदारी आता कमी झाली याचे काहीसे समाधानही कदाचित तिच्या मनात असावे. ती बंगल्यावर गेल्यावर मी हमसाहमशी रडले. या अन्यायाविरुद्ध दाद कशी मागायची? कोणाकडे मागायची? पपा तर नरेशला आता भेटूही शकत नव्हते. दारू मिळाली तर सुखाने प्यायची नाहीतर ममाला किंवा जगाला शिव्या देत बसायच्या एवढेच त्यांच्या हातात होते. नो वंडर, ते एकदा शुद्धीत नसताना अचानक मी त्यांचीही शिकार झाले. अतिरेकी दारू पिऊनही अंगात इतकी ताकद कशी काय राहिली होती त्यांच्या कोणास ठाऊक! मात्र मी चवताळले. पपांना मी मारहाण केली. गडी धावत आले. त्यांनीही त्यांना फटके लगावले. शेवटी सोडून दिले. पुढच्या अनेक रात्री नरेशच्या अंगाखाली स्वतःला सादर करताना मी मूकपणे रडतच होते. नरेश, वडील, आता मला दोघेही सारखेच वाटू लागले होते. जस्ट पुरुष! ममा मात्र आता वडिलांना येताजाता शिव्या देत होती घडलेल्या प्रकारावरून! मला त्यांच्यापाशी एकटे सोडत नव्हती. पण नरेशकडे जायला मात्र विनवत होती. हा काय प्रकार म्हणावा? नरेश अत्याचारी होता. नरेशची ताकद आता ममाला सहन होत नव्हती. मग मला सहन होत असेल हा तिचा तर्क अजबच होता. मग नरेशने एकदा बंगल्यावर एका क्लाएंटला खुष करायची ऑर्डर दिली मला. मी चवताळले तर त्याने मला मारले. गेटवर हा भला मोठा कुत्रा आणि गार्ड बसवून ठेवले. आम्ही बाहेर पडू शकत नव्हतो. फोन काढून घेतलेले होते. जीव द्यायची हिम्मत नव्हती. बंगल्यावरून फोन केला तरी कोणाला करणार? चूपचाप मी त्या म्हातार्‍या क्लाएंटला रात्रभर खुष केले. त्यानंतर काही इतर क्लाएंट्सना माझा नैवेद्य दाखवण्यात आला. शेवटी शेवटी तर आऊट हाऊसचे गडीही मला भोगू लागले. त्याबाबत नरेशला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो आता आम्हाला दोघींना बोलवतच नव्हता. त्याला कोणी तिसरीच मिळालेली होती. ती जी कोण होती तिच्यामुळे किंवा आमचा कंटाळा आल्यामुळे आमची त्या यातनांमधून सुटका झालेली असली तरी बंगल्यातून आणि तुच्छ वागणूकीतून मात्र सुटका होत नव्हती. पगाराचा प्रश्नच नव्हता कारण खायचे प्यायचे सगळे बंगल्यावरच! तिथूनच कपडेही मिळायचे अधेमधे!

एक दिवस पपांनी पुन्हा मला स्पर्श केलेला पाहून मात्र ममाने त्यांच्या डोक्यात गज घालून त्यांचा खूनच केला. कितीतरी काळ मी नुसती ते रक्त पाहून किंचाळतच होते. बहुधा कित्येक वर्षात नरेशच्या त्या बंदिस्त बंगल्याच्या वातावरणाला बाहेरच्या जगाच्या चौकशीने तडे गेले. पोलिस येऊ लागले. माझी रवानगी पुनर्वसन केंद्रात झाली. ममा आहे की गेली माहीत नाही. नरेशला शिक्षा झाली की नाही माहीत नाही. त्या बंगल्यात आता काय चालते हे माहीत करून घ्यायची इच्छा नाही.

जगातील प्रत्येक पुरुष हा मला नर म्हणूनच माहीत झाला. तारुण्यसुलभ प्रेमभावना म्हणजे आपल्यावर होणारा बलात्कार असतो इतकेच ज्ञान मला प्राप्त झाले. प्रेम म्हणजे आपली शरीर वाटेल तसे ओरबाडले जाणे, जखमी होणे असेच माझ्या मनात भिनले. आता जर कोणी मला म्हणाले, की तुझी प्रेम, प्रणय याबाबतची फँटसी काय, तर मला फक्त हेच म्हणता येईल की आय वॉन्ट टू बी रेप्ड! इफ अ‍ॅट ऑल आय विश टू हॅव सेक्स ऑर विश टू मेक लव्ह, आय हॅव टू गेट रेप्ड बाय समवन! हेच माझ्या डोक्यात भिनलेले आहे. मी केवळ वीस वर्षांची व्हायच्या आतच मी चौदा पुरुषांची शिकार झालेले होते. आज आठ वर्षे झाली त्या सर्व घटनांना! पण काल झाल्यासारखे वाटते सगळे! रात्री कित्येकदा दचकून उठते मी! स्वप्न पडते. ममा मला उठवून नरेशसाठी तयार व्हायला सांगत आहे. नरेशचा क्लाएंट मला रात्रभर कुस्करत आहे. रक्ताळत आहे. शेजारच्या खोलीतला घाणेरडा गडी मला ओढून त्याच्या खोलीत नेत आहे. ममाचे लक्ष नाही पाहून देशीचा वास तोंडाला येणारे पपा माझ्या अंगावर व्यापत आहेत.

मी इथे तुमच्याबरोबर राहते. तुम्ही तिघी जी सोबत देता ते माझ्या आयुष्याकडून मला मिळत असलेले सर्वात मोठे दान आहे. येथे मला भीती वाटत नाही. सेफ वाटते. कोणीतरी मला इथे ठेवलेले आहे. मी इथे राहण्याचे पैसे कोणी भरले हे मला कळू देत नाहीत. मी स्वार्थी नाही. पैसे परत देण्यासाठी प्रयत्न करीनच. पण मला ते सांगितले जात नाही की कोण मला येथे ठेवत आहे. जो कोण असेल तो चांगला माणूस म्हणायचा. मी पुनर्वसन केंद्रातच काम करते कारण पुरुषांशी कमीत कमी संबंध यावा असेच मला वाटते.

पण एकच सांगते! पावलापावलाला गिधाडे आहेत. आपली इच्छा तर सोडाच, पण आपला पूर्ण विरोध असताना बळजबरीने आपल्या शरीरावर दुसर्‍याचे अत्याचार सहन करणे हे किती भयंकर असते हे मी माझ्या कोवळ्या वयातील सलग चार वर्षे पाहिलेले आहे. पुरुषांशी बोलताना मी आजही कमालीची घाबरलेली असते. रस्त्याने चालताना मान वर करत नाही. आपण कोणाच्या नजरेत भरू नये यासाठी प्रयत्न करते. जास्तीतजास्त वेळ बायकांमध्ये, त्यांच्याचबरोबर घालवते. पुरुषाने सभ्यपणे स्त्री दाक्षिण्य म्हणून जरी सहानुभुती दाखवली तरी मला तीच शंका येते. कदाचित हे चुकत असेल, पण माझ्या मनावर या विचारांची न निघणारी पुटे बसलेली आहेत. यातून बाहेर पडेपर्यंत कदाचित मी चाळिशीचीही झालेली असेन! पुरुष जमातीवर माझा विश्वास राहिलेला नाही. माझ्या ममाच्या वागण्यामु़ळे खरे तर स्त्रियांवरही मी फार विश्वास ठेवत नाही. तेव्हा जीव द्यावासा वाटायचा पण हिम्मत नव्हती. जिवंत आहे म्हणून जिवंत आहे. पेपरमध्ये बातम्या वाचल्या की वाटते ममाने पपांना मारले तसेच प्रत्येकाला मारत सुटावे. द्या म्हणाव मला फाशी! स्वतःच्या शरीराची किळस येते. एखाद्या वासामुळे जुन्या आठवणी जाग्या होतात. नरेशच्या बाथरूममध्ये नेहमी सिंथॉल साबण असायचा. तो वास आजही कुठे आला की मला तिटकारा येतो.

माझ्याबाबतीत जे झाले त्यात माझ्या पपांचा दोष तर आहेच, ममाचाही आहेच! पण माझा प्रश्न असा आहे की नरेशचा काही दोष आहे असे कोणाच्या मनातच का येत नसावे? तू एखाद्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो आहेस किंवा घाणेरड्या हेतूच्या पूर्ततेसाठी निदान तसे दाखवतो आहेस म्हणून त्या घरातील प्रत्येक स्त्रीला उपभोगण्याच्या तुझ्या मानसिकतेत गंभीर दोष असून तू समाजस्वास्थ्यासाठी मारला गेला पाहिजेस असे कोणीच त्याला का म्हणत नसावे? पपा, ममा, ते गडी, ते क्लाएंट्स? कोणीच? प्रत्येकजण एक तर उपभोग घेणारा तरी आहे किंवा देणारा तरी! तटस्थपणे माणूसपण जपून ठेवणारा कोणीच का नाही या साखळीत? ममाने पपांचा खून केल्याकेल्या वर जाऊन नरेशच्याही डोक्यात तोच गज का घातला नसेल? घाबरली असेल? की नरेशच्या उपकारांमुळे किंवा सामर्थ्यामुळे दबली असेल? फक्त बापाने पोरीला हात लावणे, इतकेच का वाईट आपल्या संस्कृतीत? कोणीही कोणालाही इच्छेविरुद्ध भोगणे हे वाईट का नाही? म्हणजे तितकेच वाईट का नाही?

सत्तेपुढे मिंधेपणा, लाचारी व पैसे खाऊन सत्ताधीशाची गुन्ह्यातून सुटका करणे या गोष्टीच का केल्या जातात? कोणीच चांगले नसते म्हणून असे होते? मग कोणीच का चांगले नसते? जे चांगले असतात ते लोक कुठे असतात? ते अश्या प्रकरणात स्वतःहून का पडत नाहीत? स्वतःहून पडत नसतील तर ते चांगले तरी कसे? फक्त स्वतःच्याच पोरीबाळींना वाचवत बसले तर चांगले तरी कसे?

माझ्याच बाबतीत असे का घडले? फुलासारख्या फुलणार्‍या आणि कौटुंबिक सुरक्षिततेत आनंदाने न्हाऊन निघालेल्या मुली पाहून मला असे का वाटते की आपण असे काही सुख मिळवण्यासाठी जन्मलेलोच नव्हतो? आपण आणि त्या वेगळ्याच आहोत, असे का वाटते? काय वेगळे आहे आमच्यात, एक जर बापाचे वागणे सोडले तर? ज्यावर कोणाचे नियंत्रणही नसतेच त्या बापाचे वागणे?

मी फार सुंदर नाही, भावना चाळवल्या जाव्यात अशी मी वागले असे म्हणणे हास्यास्पद ठरेल कारण त्या नराधमाशी मी कायम माझ्या आई वडिलांसोबतच भेटले व बोलले. माझे वयही कळते नव्हते तेव्हापासून या चक्रात अडकले. म्हणजे, केवळ मी हक्काने उपलब्ध होणारी आणि कोवळ्या वयाची होते इतक्याचमुळे हे घडले? मग हे तर लाखोंच्या बाबतीत घडत असेल. कित्येक स्त्रिया गरीब असतील, लाचार असतील, त्यामुळे विवशपणे उपलब्धही असतील, तरुणही असतील. पुरुषाचा स्पर्श, पुरुषाची नजर, पुरुषाच्या सान्निध्यात असणे, या सर्वांची घृणा आहे माझ्या मनात!

मग सगळे तसेच असतील का? तर नाही. पण माझ्या मनात काहीही शाश्वती नाही कोणाचीही! मी ऐंशी वर्षाचे आयुष्य पहिल्या वीस वर्षात जगले. आता मी फक्त जिवंत आहे. माझ्याबद्दलचे शारीरिक आकर्षण कोणाला वाटणारच नाही अश्या शारीरिक अवस्थेत जाण्याची घाई करत मी जिवंत आहे. म्हातार्‍यांना तारुण्य परत हवे असते. मला कोणी त्याचे म्हातारपण दिले तर त्या बदल्यात मी माझे हे तारुण्य त्याला द्यायला तयार आहे. पण तरी हे तरी नक्की आहे का? की मी म्हातारी झाल्यावर माझ्यावर रेप होणार नाही?

===================================

नीलाक्षीच्या भयानक अनुभवकथनानंतर चर्चा सुरू झाली.

====================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख लिहिता तुम्ही,भयानक वास्तव समाजाच्या कुठल्यातरी कोपर्यात अशा घटना घडतात आणी मुकाटपणे दाबल्या जातात्,,खुप सुरेख मांड्लय शब्दात