चंद्राबाईचा आत्मा

Submitted by प्रकाश कर्णिक on 7 January, 2013 - 05:45

boat.jpg

विष्णू कोळ्याच्या घरात अतिशय भीतीचं आणि सुन्न वातावरण होतं. एका आठवडयापूर्वी विष्णूची बायको चंद्रा पहिल्याच मुलाला जन्म देताना दिवंगत झाली. जन्मलेलं मूल सुध्दा त्याच्या आई नंतर काही वेळातच गेलं. विष्णू चंद्राच्या जाण्यानं अतिशय दुख्खी आणि विषण्ण झाला होता. त्यावर गेल्या सात दिवसात जमातीतील सर्व वडिलधारी माणसं आणि सूज्ञ बायका एका पाठोपाठ येऊन त्याला चंद्राच्या गरोदरपणात झालेल्या अकाली मृत्यूमुळे त्याच्यावर, कुटुंबावर आणि सर्व कोळी जमातीवर होणारी भयंकर बाधा काही करून दूर करण्यासाठी त्याला चंद्राच्या अतृप्त आत्म्याला पळवून लावायचा सल्ला देऊन गेले. म्हणून संक्रांतीच्या अगोदर कृष्णा भगताच्या सांगण्यानुसार अमावस्येच्या रात्री विष्णूनं सगळ्या जात बांधवांना आपल्या घरी बोलावलं. रामा गोंधळी आणि त्याचा अनुयायी विश्राम तर अगोदरच पोहोचले होते.
चंद्रा मेली त्या खोलीत मध्यभागी जमिनीवर कृष्णा भगत बसला होता. कृष्णाच्या अंगावर लाल साडी होती. त्याच्या समोर पितळेच्या परातीत दोऱ्या मधे गुंडाळलेला कणकेचा गोळा, भेंडीच्या पायांची आणि दोऱ्यात विणलेली वितभर खाट, अनेक प्रकारची चांदीची कानातली, हिरव्या काचेच्या बांगडया, पोवळ्याचा हार आणि अजबशी दिसणारी चांदीची साखळी असं सामान ठेवलेले होतं. मंतरलेलं सर्व सामान योग्य वेळ पाहून देवघरातल्या खुंटीवर टांगण्यात येणार होतं.
आठवडाभरात विष्णू पार रोडावला होता. त्याची अन्नावरची वासना उडाली होती. चंद्राच्या आठवणीनं त्याचं डोकं सुन्न झालं होतं. चंद्राच्या मृत्युनंतर, जन्मलेलं पोर तिच्या खोलीत पुरलं गेलं होतं. चंद्राला अग्नी दिल्यावर विष्णू भरकटला होता त्याला पोराटोरांनी शोधून परत आणला. पण परत तो समुद्राकिनारी जाऊन बसू लागला. त्याची एकटक समुद्राकडे लागलेली असे. सर्वांना त्याची काळजी वाटू लागली तेंव्हा कृष्णा भगत आणि रामा गोंधळी यांना पाचारण केलं गेलं होतं. सगळे जमल्यावर विष्णूच्या विधवा आईनं परात डोक्यावर घेतली आणि तिच्या पाठोपाठ सर्वजण समुद्राकडे जाऊ लागले. खोलीमध्ये कृष्णा भगत शिवाय कोणीही राहिलं नाही.
रात्र अंधारी होती आणि अंधारात समुद्राचा आवाज आणि वाहणारा थंड वारा अंगावर शहारे आणत होता. किनाऱ्याच्या ओल्या वाळूवर कोरडी चटई अंथरली गेली. आईनं डोक्यावरची परात उतरून चटई वर ठेवली. परातीसमोर ठेवलेल्या पितळेच्या एका तांब्यात दूध आणि दुसऱ्यात पाणी होतं.
रामा गोंधळी परातेच्या समोर समुद्राकडे तोंड करून बसला आणि सर्वजण अर्धवर्तुळाकार उभे राहिले
थोडा वेळ रामा डोळे झाकून बसला आणि त्यानंतर अचानक त्यानं मृत चंद्राच्या आत्म्याला बोलवायला अनकलनीय मंत्रोच्चारण सुरु केलं. प्रथम विष्णूनं परातीत तांब्याचं नाणं टाकलं त्यावर रामानं आरोळी ठोकली “चंद्राबाई, ही घे तुझ्या घोवाची भेट.” विष्णू नंतर एकामागून एक इतर नातलग आले. मेलेल्या चंद्राचे चार भाऊ आले. प्रत्येकानं आपापलं नाणं वर उचलून धरलं आणि रामाच्या आरोळीनंतर परातीत टाकलं. चंद्राच्या भावजईनं नाणं टाकताना चंद्राच्या आत्म्याला सांगितलं “बाई हे तुझ्या जेवणाचं”, चंद्राची आई बोलली “ चोळी पातळ “ तर आणि कोण म्हणालं “खण नारळ”. सर्व नातलगानी आपापल्या इच्छेनुरूप छत्री, पलंग, चपलाचे जोड तर कोणी बांगड्यांचा जोड म्हणून नाणं टाकलं. परलोकात मेलेल्या बाईला सर्वसाधारणपणे जे जे काही लागेल त्या त्या वस्तूंची आठवण करून अर्पण करण्यात आल्या. या सगळ्यात रामा गोंधळी मृत चंद्राबाईला सतत आवाहन करत होता. तसच विष्णूच्या देवघरातल्या सर्व भुताच्या खुंट्यावर लटकलेल्या पूर्वजांना चंद्राबाईला प्रेमानं स्वीकारावं असं नम्रपणे विनावण्यात पण येत होतं.
शेवटच्या माणसानं आपला नाणं दिल्यानंतर रामा गोंधळी उठला आणि आईनं परात डोक्यावर घेतली. सर्वजण आता सटवाईच्या देवळाकडे आले. सटवाईचं देऊळ वडाच्या झाडाच्या ढोलीत होतं. त्यावर खूप पारंब्या लटकत होत्या. सगळीकडे झाडावर काळ्या कापडी बाहुल्या लटकलेल्या होत्या. झाडावर लाल गुलालाचा लेप चढला होता. कोणीतरी अगोदरच दोन टेंभे पेटवले होते त्यात सटवाईची प्रतिमा रागीट दिसत होती. चंद्राबाईनं जिवंतपणी सटवाईची पूजा घातली नव्हती तेंव्हा तिच्या आत्म्याला पूजा करायला लावणं महत्वाचं होतं. वडाच्या झाडापाशी एक सुईण केस सोडून आणि मळवट भरून बसली. तिच्या समोर खण आणि साडी होती. त्याच ताटात कुंकू, कंगवा, काजळी, केसाचं तेल, अंगठी, नथ, बांगडया कुंकवाचं मेण आणि बत्ताशे होते. चंद्राबाईचा एक भाऊ पुढं झाला. त्याच्या हातात पाखडायचं सूप होत ज्याच्या पुढे एक वात पेटवली होती. सूपामध्ये सटवाईसाठी फळं आणि फुलं होती. चंद्राबाईच्या भावानं सूप सटवाई आईच्या पुढे धरलं आणि रामा गोंधळी मोठ्या मोठ्यानं सटवाई आईला चंद्राबाईचा आत्मा सुपात टाकायला सांगू लागला. अचानक सुपावरली पेटलेली वात विझली आणि रामानं सर्वांना सांगितलं की चंद्राबाईचा आत्मा सुपात अवतरला आहे.
अंगात संचारल्यासारखं रामानं ते सूप आपल्या हातात घेतलं आणि तो धावत विष्णूच्या घरात आला. सर्वजण त्याच्या मागोमाग धावत घरात शिरले. कृष्णा खोलीच्या मध्यभागी अजुनही नं हलता डोळे झाकून बसला होता. अचानक चार पाच माणसं झांज वाजवायला लागली. आईच्या डोक्यावरली परात कृष्णाच्या समोर ठेऊन रामानं चंद्राबाईचा आत्मा असलेलं सूप कृष्णाच्या डोक्यावरून ओवाळायला सुरुवात केली. कोणीतरी धूप आणि उदबत्या आणल्या. रामानं धूपाचा धूर कृष्णाच्या तोंडावर फुंकला आणि तो मोठ्यानं म्हणाला “चंद्राबाई समोर ये “. झांजेचा आवाज मोठ्ठा झालेला होता. कृष्णा एखादं पान वाऱ्यानं हलायला लागेल असा थरथरायला लागला. चंद्राच्या भावांनी पुढं होऊन कृष्णाच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. थोडया वेळानंतर कृष्णा गडबडा लोळायला लागला जसं जसं चंद्राचा आत्मा कृष्णाच्या अंगात शिरला. कृष्णा अचानक सुपाकडे पाहून स्तब्ध झाला आणि त्याच्या तोंडून फेस येऊ लागला. त्याचे अंग झटके बसल्यासारखं गचके देऊ लागलं. झांजा जोर जोरात वाजत होत्या. रामानं ओरडून कृष्णाला विचारलं “ कोण आहेस तू “
“चंद्रा “ कृष्णाच्या तोंडून उत्तर फुटलं.
“तुझ्या काही अपुऱ्या इच्छा आहेत का?” रामानं चंद्राला विचारलं
“नाही, माझ्या काही इच्छा नाहीत. मी आता तुमच्यात नाही, मला सोडा.” कृष्णाच्या तोंडून बायकी आवाज आला. हे शब्द एकू येता क्षणीच रामानं जवळ ठेवलेली लाकडाची बाहुली घेतली आणि कृष्णाच्या हातात कोंबली. “चंद्राबाई जा, समुद्रात जा “ असे सर्वजण रामा बरोबर ओरडायला लागले.
अचानक कृष्णा झोकांड्या खात उठून उभा राहिला. त्याला आवरायला चंद्राबाईचे भाऊ धावले पण त्यांना झुगारून कृष्णा एका सुसाट बैला सारखा धावत सुटला. घराबाहेर पडून कृष्णानं समुद्राकडे धाव घेतली. त्याचे दोनीही हात आकाशाकडे आणि डोकं उंचावलेलं होतं.
त्याचे हात जणू ढगाला पकडण्याचा प्रयत्न करताहेत आणि मागे क्रूर लांडगे लागलेत या आवेशात तो पळत होता. त्याच्या अंगावरची साडी एका लांब सुटलेल्या शिडाच्या कापडासारखी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याने फडफडत होती. रामा आणि बाकी सर्वजण कृष्णाच्या मागे धावत सुटले.
समुद्राकाठी येताच कृष्णानं मोठ्ठी आरोळी ठोकली आणि तो समुद्राच्या पाण्यात निपचित पडला. काहींनी त्याला उचलून कोरड्या वाळूत आणलं, एकानं वाळूत खड्डा केला. आणि दुसऱ्याने बरोबर आणलेल्या काळ्या रंगाच्या कोंबड्याला पिशवीतून बाहेर काढलं आणि रामाच्या हातात दिलं. रामाने कोंबडा अचेतन कृष्णाच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवला आणि नंतर वाळूत खणलेल्या खड्यात त्या कोंबड्याची मान पिरगळली व एका हिसक्यात कोंबड्याचं डोकं धडा वेगळं केलं.
सर्वजण आता शांत झाले होते. कृष्णा अजुनही बेशुद्धावस्थेत निपचित पडला होता. त्याला काही जणांनी उचलून घेतलं. कोंबड्याच्या धडाला त्याच खड्यात पुरलं गेलं. आता चंद्राबाईचा आत्मा समुद्रावर इतर दिवंगत कोळी पूर्वजांच्यात वास्तव्य करायला निघून गेला होता. कृष्णाला शुद्ध येई पर्यंत त्याच्या भोवताली माणसं बसणार होती. आता विष्णूला किंवा कोणालाच चंद्राबाईचा त्रास किंवा बाधा होणार नव्हती. सर्वजण निवांतपणे झोपायला आपापल्या घरी निघून गेले. विष्णू अजुनही वाळूत बसून होता, समुद्राकडे टक लावून.
दोन आठवडे कसे निघून गेले पत्ता पण लागला नाही. पुनवेच्या रात्री आईनं विष्णूला जेवायला हाक मारली. विष्णू घरात आला आणि म्हणाला “ आई, आता नाही नं कुणाला चंद्राचं भय वाटत?”
आई म्हणाली , “नाही रे पुता. कशाला वाटल. त्या कृष्णानं पाठवली नं तिला समुद्रावर? का रे, तू का विचारतोय?’
“नाही ग आय.” विष्णू म्हणाला “ मला समुद्रावरून नेहमी तिची गोड हाक येतीय. आज पुनव आहे, समुद्रावर उजेड असल. मी माझ्या चंद्राला आज भेटूनच येतो.”
असं म्हणून आईच्या असंबध्द बोलण्याकडे लक्ष नं देता विष्णू बाहेर पडला. त्यानं होडी पाण्यात ढकलली आणि होडीत पाय टाकला. खिशातून आणलेला चंद्राच्या आवडीचा मोगऱ्याचा हार काढून काळजी पूर्वक समोर कोरड्या जागी ठेवला आणि पश्चिमेला वल्हवायला सुरुवात केली.

--------***----------

टीप : बॉम्बेचे पोलिस कमिशनर स्टिफन मेरेडिथ या ब्रिटीश अधिकाऱ्यानं १९१२ साली नमूद केलेल्या घटनेवर आधारित.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोष्ट म्हणजे ही सत्यकथा वाचायला छान वाटली, पण कळली नाही.:अओ:

ती चंद्रा खरच भूत बनली का? की या गावकर्‍यांची अंधश्रद्धा होती? की काही वेगळे रहस्य?

सहीच.....
पु.ले.शु.
असले प्रकार आजही अनेक कोळिवाड्यात, आदिवासी पाड्यात अश्या कित्येक ठीकाणी पाहायला मिळतात.